मुख्य विषय | प्रार्थना केल्यानं काही फायदा होतो का?
प्रार्थना केल्यानं तुम्हाला काय फायदा होतो
कोणतीही नवीन गोष्ट करण्याआधी, ‘यात मला काही फायदा मिळेल का?’ असा विचार तुम्ही नक्की करता. पण प्रार्थनेबद्दल हा प्रश्न मनात येणं चुकीचं आहे का? नाही. प्रार्थना केल्यानं खरंच काही फायदा होतो का, असा प्रश्न येणं साहजिक आहे.
प्रार्थना करणं फक्त एक नित्यक्रम नाही किंवा ती एक प्रकारची उपचार पद्धती नाही, तर देवाबरोबर चांगला नातेसंबंध जोडण्याचा एक मार्ग आहे, याबद्दल आधीच्या लेखांमध्ये आपण पाहिलं होतं. खरा देव यहोवा, खरोखर आपल्या प्रार्थना ऐकतो. आपण योग्य पद्धतीनं आणि त्याच्या नजरेत योग्य असलेल्या गोष्टींसाठी प्रार्थना केली तर तो नक्कीच आपल्या प्रार्थना ऐकेल. खरंतर तो आपल्याला त्याच्या जवळ येण्यास आर्जवतो. (याकोब ४:८) आपणसुद्धा यहोवाला नियमितपणे प्रार्थना करू लागलो तर आपल्याला काय फायदे होऊ शकतात? काही फायदे पुढं दिले आहेत.
मनःशांती मिळते
तुमच्या जीवनात समस्या आणि अडचणी येतात तेव्हा तुम्ही चिंतेनं अगदी गोंधळून जाता का? अशा वेळी “निरंतर प्रार्थना करा” आणि “आपली मागणी देवाला कळवा.” (१ थेस्सलनीकाकर ५:१७; फिलिप्पैकर ४:६) तेव्हा “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती [आपली] अंतःकरणे व [आपले] विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील,” असं आश्वासन बायबलमध्ये आहे. (फिलिप्पैकर ४:७) आपल्या स्वर्गातील पित्याकडं आपलं मन मोकळं केल्यानंच आपली मानसिक अस्वस्थता बऱ्यापैकी दूर होईल. म्हणून तो आपल्याला स्तोत्र ५५:२२ मध्ये असं आर्जवतो: “तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल.”
“तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल.”—स्तोत्र ५५:२२
जगभरातील असंख्य लोकांनी ही मनःशांती अनुभवली आहे. दक्षिण कोरियामध्ये राहणारी ही-रान म्हणते: “मला फार गंभीर
समस्या आहेत. पण जेव्हा मी त्यांबद्दल प्रार्थना करते, तेव्हा माझं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आणि समस्यांचा सामना करण्यासाठी शक्ती मिळते.” फिलिपीन्झमध्ये राहणारी सिसील्या म्हणते: “मी एक आई आहे आणि माझ्या मुलींची मला फार चिंता असते. मला माझ्या आईचीसुद्धा काळजी वाटते कारण वय झाल्यामुळं आता ती मला ओळखू शकत नाही. पण मी प्रार्थना करत राहते आणि त्यामुळं मी स्वतःला सावरून रोजची कामं करू शकते. मला माहीत आहे की यहोवा मला या सर्वांची काळजी घ्यायला मदत करेल.”समस्यांचा सामना करताना सांत्वन आणि बळ मिळते.
तुम्हाला अतिशय तीव्र तणावाचा सामना करावा लागत आहे का? तुम्ही फार दुःखद किंवा धोकादायक परिस्थितीत आहात का? “सर्व सांत्वनदाता देव” यहोवा याला प्रार्थना केल्यानं तुम्हाला बरं वाटेल. त्याच्याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे: “तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो.” (२ करिंथकर १:३, ४) एकदा येशू चिंतेनं व्याकूळ झाला होता. तेव्हा त्यानं गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. याचा काय परिणाम झाला? “स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्याला सामर्थ्य देत राहिला.” (लूक २२:४१, ४३, ईझी-टू-रीड व्हर्शन) देवाचा विश्वासू सेवक नेहम्या याचंही उदाहरण घ्या. देवानं त्याला सोपवलेल्या कामगिरीत दुष्ट लोक अडथळा आणत होते आणि त्याला धमकावत होते. त्यानं देवाला प्रार्थना केली: “हे देवा, माझा हात दृढ कर.” आणि देवानं खरंच त्याला त्याच्या भीतीवर मात करण्यास आणि दिलेलं काम पूर्ण करण्यास मदत केली हे बायबलमधील अहवाल वाचल्यावर आपल्याला कळतं. (नहेम्या ६:९-१६) घानामध्ये राहणारा रेजिनॉल्ड त्याचा अनुभव सांगतो: “मी जेव्हा समस्येत असताना प्रार्थना करतो ना, तेव्हा मला असं जाणवतं, की मी माझी समस्या अशा व्यक्तीला सांगितली आहे जी मला मदत करू शकते आणि मला जणू काय म्हणते, ‘ठीक आहे, तू मला तुझी समस्या सांगितलीस ना, तर आता निश्चिंत राहा.’” खरंच, आपण देवाला प्रार्थना करतो तेव्हा तो आपलं सांत्वन करतो.
देवाकडून बुद्धी मिळते.
आपण घेतलेल्या काही निर्णयांचा आपल्यावर आणि आपल्या जवळच्या लोकांवर कायमचा परिणाम होऊ शकतो. मग आपण सुज्ञ निर्णय कसे घेऊ शकतो? बायबलमध्ये सांगितलं आहे: “तुम्हांपैकी कोणी ज्ञानाने [खासकरून समस्यांचा सामना करण्यासाठी लागणाऱ्या ज्ञानाने] उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.” (याकोब १:५) आपण बुद्धीसाठी प्रार्थना केली तर यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याच्या मदतीनं आपल्याला सुज्ञ निर्णय घेण्यास मार्गदर्शन देईल. आपण देवाकडे पवित्र आत्मा मागू शकतो कारण येशू आपल्याला हे आश्वासन देतो: “स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”—लूक ११:१३.
महत्त्वाचे निर्णय घेताना येशूलासुद्धा आपल्या पित्याला म्हणजेच यहोवा देवाला मदत मागायची गरज भासली. त्याच्या १२ प्रेषितांची निवड करण्याआधी तो “रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला,” असं बायबलमध्ये सांगितलं आहे.—लूक ६:१२.
यहोवानं येशूची प्रार्थना ऐकून त्याला योग्य निर्णय घेण्यास मदत केली. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांनी हे अनुभवलं आहे, की यहोवानं त्यांच्या प्रार्थना ऐकून त्यांनाही योग्य निर्णय घेण्यास मदत केली आहे. फिलिपीन्झमध्ये राहणाऱ्या रेजीनानं बऱ्याच समस्यांना तोंड दिलं. तिच्या पतीचा मृत्यू झाल्यावर कुटुंबाची सर्व जबाबदारी तिच्यावर आली, तिची नोकरी सुटली. तिच्या दोन मुलींचं संगोपन करतानाही तिला बऱ्याच अडचणी आल्या. तिला सुज्ञ निर्णय घेण्यासाठी कशामुळं मदत मिळाली? ती म्हणते: “मला काहीही अडचण आली की मी लगेच यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करते.” घानामध्ये राहणारा क्वाबेना सांगतो, की त्याला यहोवाकडे मदत का मागावी लागली. तो म्हणतो: “बांधकाम क्षेत्रातील माझी चांगली नोकरी सुटली.” दुसरी नोकरी शोधताना त्यानं काय केलं? “योग्य निर्णय घेण्यासाठी मी सतत यहोवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करत होतो. आणि मला अशी नोकरी मिळाली ज्यामुळं त्याच्यासोबतचा माझा नातेसंबंध टिकून आहे आणि माझ्या गरजाही पूर्ण होतात. मला पक्कं माहीत आहे, की ही नोकरी निवडण्यासाठी त्यानंच मला मदत केली.” ज्या गोष्टींमुळं यहोवासोबत असलेल्या तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो, त्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना केली तर तो तुमचंसुद्धा नक्कीच मार्गदर्शन करेल.
प्रार्थना केल्यानं बरेच फायदे होतात. त्यांपैकी केवळ काही फायदे आपण या लेखात पाहिले आहेत. (आणखी उदाहरणांसाठी “प्रार्थना केल्यानं होणारे फायदे” ही चौकट पाहा.) पण हे सगळे फायदे मिळवण्यासाठी पहिल्यानं तुम्हाला यहोवाबद्दल आणि त्याच्या इच्छेबद्दल जाणून घ्यावं लागेल. हे जाणून घ्यायची इच्छा असल्यास तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्याची विनंती करू शकता. * प्रार्थना ऐकणाऱ्या यहोवा देवाजवळ जाण्यासाठी तुमचं हे पहिलं पाऊल असू शकतं.—स्तोत्र ६५:२. ▪ (w15-E 10/01)