धडा ३२
देवाचं राज्य सुरू झालंय!
देवाचं राज्य १९१४ या वर्षी स्वर्गात सुरू झालं. मानवांच्या राज्याचे शेवटचे दिवसही तेव्हापासूनच सुरू झाले. आपल्याला हे कसं कळतं? हे समजून घेण्यासाठी आपण बायबलच्या काही भविष्यवाण्यांवर लक्ष देऊ या. तसंच १९१४ पासून जगाच्या परिस्थितीत आणि लोकांच्या वागण्या-बोलण्यात कोणते बदल झाले आहेत तेही पाहू या.
१. बायबलच्या भविष्यवाण्यांवरून आपल्याला काय कळतं?
बायबलमधल्या दानीएलच्या पुस्तकात ‘सात काळांबद्दल’ सांगितलं होतं. त्यात असं म्हटलं होतं, की त्या सात काळांच्या शेवटी देवाचं राज्य सुरू होईल. (दानीएल ४:१६, १७) कित्येक शतकांनंतर येशूही याच काळांबद्दल बोलला. त्याने या काळांना “विदेश्यांसाठी ठरवलेले काळ” असं म्हटलं. त्याच्या शब्दांवरून कळतं, की तो पृथ्वीवर होता तेव्हा हे सात काळ अजून सुरूच होते. (लूक २१:२४) हे सात काळ १९१४ मध्ये संपले. याबद्दल आपण या धड्यात शिकणार आहोत.
२. जगाच्या परिस्थितीत आणि लोकांच्या वागण्या-बोलण्यात १९१४ पासून कोणता फरक दिसून आला आहे?
येशूच्या शिष्यांनी त्याला विचारलं, “तुझ्या उपस्थितीचं आणि जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं चिन्ह काय असेल?” (मत्तय २४:३) या प्रश्नाचं उत्तर देताना येशूने अशा बऱ्याच घटनांबद्दल सांगितलं, ज्या भविष्यात घडणार होत्या. स्वर्गात त्याचं राज्य सुरू झाल्यावर या घटना घडतील असं त्याने सांगितलं. या घटनांपैकी काही घटना म्हणजे युद्ध, दुष्काळ आणि भूकंप. (मत्तय २४:७ वाचा.) बायबलमध्ये असंही सांगितलं होतं की “शेवटच्या दिवसांत” लोकांच्या वागणुकीमुळे जगणं खूप “कठीण” होईल. (२ तीमथ्य ३:१-५) या भविष्यवाण्यांमधले शब्द खासकरून १९१४ पासून पूर्ण होताना स्पष्टपणे दिसत आहेत.
३. देवाचं राज्य सुरू झाल्यापासून परिस्थिती इतकी का बिघडली आहे?
येशू स्वर्गात देवाच्या राज्याचा राजा बनल्यानंतर लगेचच सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांसोबत लढला. या लढाईत सैतान हरला. बायबलमध्ये म्हटलंय, की त्याला “पृथ्वीवर फेकून देण्यात आलं, आणि त्याच्यासोबत त्याच्या दूतांनाही फेकण्यात आलं.” (प्रकटीकरण १२:९, १०, १२) सैतान आज खूप संतापलेला आहे. कारण त्याला माहीत आहे की लवकरच त्याचा नाश होणार आहे. म्हणूनच तो पृथ्वीवर वेगवेगळी संकटं आणून लोकांना त्रास देतोय. आणि त्यामुळेच आज जगाची परिस्थिती इतकी बिघडली आहे. पण देवाचं राज्य या सगळ्या समस्या काढून टाकेल आणि त्यानंतर पृथ्वीवर खूप चांगली परिस्थिती असेल.
आणखी जाणून घेऊ या
देवाचं राज्य १९१४ मध्ये सुरू झालं हे आपल्याला कसं समजतं आणि हे कळल्यावर आपण काय केलं पाहिजे यावर विचार करू या.
४. बायबलच्या भविष्यवाण्यांप्रमाणे राज्य १९१४ मध्ये सुरू झालं
प्राचीन बॅबिलॉनचा (बाबेलचा) राजा नबुखद्नेस्सर याला देवाने एक स्वप्न दाखवलं. त्या स्वप्नात भविष्यातल्या घटनांबद्दल माहिती होती. बायबलमध्ये आपल्याला ते स्वप्न आणि दानीएलने सांगितलेला त्याचा अर्थ वाचायला मिळतो. त्यावरून आपल्याला कळतं की ते स्वप्न फक्त नबुखद्नेस्सरच्या राज्याबद्दलच नाही, तर देवाच्या राज्याबद्दलसुद्धा होतं.—दानीएल ४:१७ वाचा. a
दानीएल ४:२०-२६ वाचा, आणि मग तक्त्याच्या (चार्टच्या) मदतीने खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
(१) स्वप्नात नबुखद्नेस्सरने काय पाहिलं?—२० आणि २१ ही वचनं पाहा.
-
(२) वृक्षाबद्दल काय सांगितलं होतं?—२३ वं वचन पाहा.
-
(३) “सात काळ” संपल्यावर काय होणार होतं?—२६ वं वचन पाहा.
वृक्षाबद्दलच्या स्वप्नाचा देवाच्या राज्याशी काय संबंध आहे?
भविष्यवाणी (दानीएल ४:२०-३६)
राज्य
(१) एक मोठा, उंच वृक्ष
राज्य काही काळासाठी थांबलं
(२) “वृक्ष कापून टाका,” आणि त्यावरून “सात काळ” जाऊ द्या
राज्य परत सुरू झालं
(३) “तुमचं राज्य तुम्हाला परत मिळेल”
या भविष्यवाणीच्या पहिल्या पूर्णतेत . . .
-
(४) वृक्ष कोणाला सूचित करतो?—२२ वं वचन पाहा.
-
(५) त्याचं राज्य काही काळासाठी कसं थांबलं?—दानीएल ४:२९-३३ वाचा.
-
(६) “सात काळ” संपल्यावर नबुखद्नेस्सरसोबत काय घडलं?—दानीएल ४:३४-३६ वाचा.
पहिली पूर्णता
राज्य
(४) बॅबिलॉनचा राजा, नबुखद्नेस्सर
राज्य काही काळासाठी थांबलं
(५) इसवी सन पूर्व ६०६ नंतर, नबुखद्नेस्सर राजाला वेड लागलं आणि तो सात वर्षं राज्य करू शकला नाही
राज्य परत सुरू झालं
(६) नबुखद्नेस्सरला त्याची बुद्धी परत मिळाली आणि तो पुन्हा राज्य करू लागला
या भविष्यवाणीच्या दुसऱ्या पूर्णतेत . . .
-
(७) वृक्ष कोणाला सूचित करतो?—१ इतिहास २९:२३ वाचा.
-
(८) त्यांचं राज्य काही काळासाठी कसं थांबलं? येशू पृथ्वीवर होता तेव्हासुद्धा ते राज्य पुन्हा सुरू झालं नव्हतं हे आपल्याला कसं कळतं?—लूक २१:२४ वाचा.
-
(९) ते राज्य कुठे आणि कधी परत सुरू झालं?
दुसरी पूर्णता
राज्य
(७) देवाच्या वतीने राज्य करणारे इस्राएली राजे
राज्य काही काळासाठी थांबलं
(८) यरुशलेमचा नाश झाला आणि अशा प्रकारे २,५२० वर्षांपर्यंत कोणत्याही इस्राएली राजाने राज्य केलं नाही
राज्य परत सुरू झालं
(९) स्वर्गात देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशू राज्य करू लागला
सात काळ म्हणजे किती वर्षं?
बायबलमधल्या काही वचनांचा अर्थ समजून घेण्यासाठी इतर वचनं आपल्याला मदत करतात. जसं की, बायबलमधल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आपल्याला कळतं, की साडेतीन काळ म्हणजे १,२६० दिवस. (प्रकटीकरण १२:६, १४) आणि सात काळ म्हणजे या संख्येच्या दुप्पट, म्हणजे २,५२० दिवस. बायबलच्या भविष्यवाण्यांमध्ये बऱ्याचदा, एक दिवस एका वर्षाच्या काळाला सूचित करतो. (यहेज्केल ४:६) दानीएलच्या पुस्तकात सांगितलेल्या सात काळांच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. हे सात काळ म्हणजे २,५२० वर्षं.
५. जगाचं चित्र १९१४ पासून बदललं आहे
येशूने आधीच सांगितलं होतं, की तो राजा बनल्यानंतर या जगाची परिस्थिती कशी असेल. लूक २१:९-११ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
तुम्ही यांपैकी कोणत्या गोष्टी पाहिल्या किंवा ऐकल्या आहेत?
मानवी राज्याच्या शेवटच्या दिवसांत लोकांचं वागणंबोलणं कसं असेल याबद्दल प्रेषित पौलने सांगितलं होतं. २ तीमथ्य ३:१-५ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
तुम्ही लोकांच्या वागण्या-बोलण्यात यांपैकी कोणत्या गोष्टी पाहिल्या आहेत?
६. देवाच्या राज्याबद्दल समजल्यावर आपण काय केलं पाहिजे?
मत्तय २४:३, १४ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
कोणत्या महत्त्वाच्या कामावरून दिसून येतं की देवाचं राज्य स्वर्गात सुरू झालंय?
-
तुम्ही या कामाला कसा हातभार लावू शकता?
देवाचं राज्य स्वर्गात राज्य करत आहे आणि लवकरच ते संपूर्ण पृथ्वीवरही राज्य करायला सुरुवात करेल. इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
“तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचं आपण पाहतो” तसतसं आपल्यापैकी प्रत्येकाने काय केलं पाहिजे?
कदाचित कोणी विचारेल: “देवाचं राज्य १९१४ मध्ये सुरू झालं, हे तुम्हाला कसं माहीत?”
-
तुम्ही काय उत्तर द्याल?
थोडक्यात
बायबलच्या भविष्यवाण्या आणि जगाच्या परिस्थितींवरून कळतं, की देवाचं राज्य आज राज्य करत आहे. प्रचारात भाग घेऊन आणि सभांना हजर राहून आपण यावर विश्वास असल्याचं दाखवतो.
उजळणी
-
दानीएलच्या पुस्तकात सांगितलेले सात काळ संपल्यावर काय घडलं?
-
देवाचं राज्य १९१४ मध्ये सुरू झालं हे तुम्ही खातरीने का म्हणू शकता?
-
देवाचं राज्य सुरू झालंय यावर तुमचा विश्वास आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?
हेसुद्धा पाहा
१९१४ पासून जगात जे बदल झाले आहेत त्यांबद्दल इतिहासाचा अभ्यास करणारे आणि इतर लोक काय म्हणतात ते पाहा.
“नैतिकतेच्या घसरणीला कमालीचा वेग येतो तेव्हा” (सावध राहा!, जुलै २००७)
मत्तय २४:१४ मधल्या भविष्यवाणीमुळे एका माणसाचं आयुष्य कसं बदललं ते पाहा.
दानीएलच्या ४ थ्या अध्यायातली भविष्यवाणी देवाच्या राज्याबद्दल आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो?
“देवाचे राज्य केव्हापासून शासन करू लागले? (भाग १)” (टेहळणी बुरूज, १ जानेवारी, २०१५)
दानीएलच्या ४ थ्या अध्यायात सांगितलेले “सात काळ” १९१४ मध्ये संपले हे कशावरून दिसून येतं?
“देवाचं राज्य केव्हापासून शासन करू लागलं? (भाग २)” (टेहळणी बुरूज, १ एप्रिल, २०१५)
a या धड्याच्या “ हेसुद्धा पाहा” या भागातले शेवटचे दोन लेख वाचा.