व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ४९

कुटुंब आनंदी राहावं म्हणून तुम्ही काय करू शकता?भाग १

कुटुंब आनंदी राहावं म्हणून तुम्ही काय करू शकता?भाग १

लग्नाच्या दिवशी सहसा प्रत्येक जोडपं खूप आनंदी असतं. हा आनंद असाच कायम राहावा अशी त्यांची इच्छा असते. आणि तो नक्कीच राहू शकतो. असं का म्हणता येईल? कारण यहोवाच्या सेवकांमध्ये बऱ्‍याच वर्षांपासून लग्न झालेली अशी अनेक जोडपी आहेत, जी आजही आनंदाने संसार करत आहेत. बायबलचा सल्ला लागू करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतल्यामुळेच हे शक्य झालंय.

१. पतीसाठी बायबलमध्ये कोणता सल्ला दिलाय?

यहोवाने पतीला कुटुंबप्रमुख म्हणून नेमलंय. (इफिसकर ५:२३ वाचा.) याचा अर्थ कुटुंबात निर्णय घेण्याची जबाबदारी यहोवाने त्याला दिली आहे. पण त्याने असे निर्णय घेतले पाहिजेत, की ज्यांमुळे संपूर्ण कुटुंबाला फायदा होईल. बायबलमध्ये पतींना असं सांगितलंय की “आपल्या पत्नीवर प्रेम करा.” (इफिसकर ५:२५) याचा काय अर्थ होतो? एक प्रेमळ पती आपल्या पत्नीशी चारचौघांत आणि घरातसुद्धा चांगलं वागतो. तो तिचं संरक्षण करतो आणि तिला आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतो. तसंच, तो तिच्या सगळ्या गरजाही पूर्ण करतो. (१ तीमथ्य ५:८) पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तिला यहोवासोबत जवळचं नातं टिकवून ठेवायला वेगवेगळ्या मार्गांनी मदत करतो. (मत्तय ४:४) जसं की, तो तिच्यासोबत प्रार्थना करू शकतो आणि बायबल वाचू शकतो. पतीने आपल्या पत्नीची अशी प्रेमळपणे काळजी घेतली, तरच तो यहोवासोबतची आपली मैत्री टिकवून ठेवू शकतो.—१ पेत्र ३:७ वाचा.

२. पत्नीसाठी बायबलमध्ये काय सल्ला दिलाय?

देवाच्या वचनात असं म्हटलंय की “पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर करावा.” (इफिसकर ५:३३) याचा काय अर्थ होतो? पतीचा मनापासून आदर करणारी पत्नी, त्याच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देते. तसंच, तो तिच्यासाठी आणि मुलांसाठी जी मेहनत घेतोय त्याचीही ती कदर करते. शिवाय त्याने घेतलेल्या निर्णयांना सहकार्य करून ती त्याचा आदर करते. सोबतच, तो यहोवाचा उपासक असो किंवा नसो, ती नेहमी त्याच्याशी प्रेमळपणे बोलते आणि त्याच्याबद्दल दुसऱ्‍यांशी बोलतानाही नेहमी आदराने बोलते.

३. पतीपत्नी आपलं नातं मजबूत कसं करू शकतात?

बायबलमध्ये पतीपत्नींबद्दल असं म्हटलंय, “ते दोघं एकदेह होतील.” (मत्तय १९:५) याचा अर्थ त्यांच्यात दुरावा येईल अशी प्रत्येक गोष्ट त्यांनी टाळली पाहिजे. यासाठी त्यांनी नियमितपणे एकमेकांसोबत वेळ घालवणं आणि आपल्या मनातले विचार आणि भावना, एकमेकांना प्रेमळपणे आणि मनमोकळेपणाने सांगणं गरजेचं आहे. यहोवाला सोडून, त्यांनी कोणालाही किंवा कशालाही आपल्या जोडीदारापेक्षा जास्त महत्त्व देऊ नये. तसंच, दुसऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीशी जास्त जवळीक न करण्याची त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे.

आणखी जाणून घेऊ या

पतीपत्नीचं नातं मजबूत करण्यासाठी बायबलमधली कोणती तत्त्वं मदत करू शकतात, हे आता आपण पाहू या.

४. पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा आणि तिला जपा

बायबलमध्ये म्हटलंय, की “पती जसा स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं.” (इफिसकर ५:२८, २९) याचा काय अर्थ होतो? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • एक पती आपल्या पत्नीवर प्रेम करतो आणि तिला जपतो, हे तो कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?

कलस्सैकर ३:१२ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • पती आपल्या पत्नीशी वागताना हे गुण कसे दाखवू शकतो?

५. पत्नींनो, आपल्या पतीवर प्रेम करा आणि त्याचा आदर करा

पत्नीने आपल्या पतीचा आदर करावा असं बायबलमध्ये सांगितलंय, मग तो यहोवाची उपासना करणारा असो किंवा नसो. १ पेत्र ३:१, २ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • तुमचा पती यहोवाचा साक्षीदार नसेल, तर त्यानेही तुमच्यासोबत मिळून यहोवाची उपासना करावी असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. पण कोणत्या गोष्टीमुळे त्याच्यावर जास्त चांगला परिणाम होईल—उठताबसता त्याला बायबलबद्दल सांगितल्यामुळे की बायबल तत्त्वांप्रमाणे वागून त्याला आदर दिल्यामुळे? आणि तुम्हाला असं का वाटतं?

पतीपत्नी एकमेकांच्या सहमतीने चांगले निर्णय घेऊ शकतात. पण कधीकधी असं होऊ शकतं, की पत्नीला पतीचे विचार पटत नाहीत. अशा वेळी ती आपले विचार शांतपणे आणि आदराने त्याला सांगू शकते. पण तिने नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुटुंबासाठी निर्णय घेण्याची जबाबदारी यहोवाने पतीला दिली आहे. म्हणून तिने त्याच्या निर्णयांना सहकार्य करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. तिने जर असं केलं तर कुटुंबात नेहमी आनंदी वातावरण राहील. १ पेत्र ३:३-५ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • जेव्हा एक पत्नी आपल्या पतीचा आदर करते तेव्हा यहोवाला कसं वाटतं?

६. सोबत मिळून समस्या सोडवा

प्रत्येक विवाहात समस्या येतातच. पण पतीपत्नींनी सोबत मिळून या समस्या सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • कोणत्या छोट्याछोट्या गोष्टींवरून दिसून आलं, की ते पतीपत्नी एकमेकांपासून दूर जात होते?

  • आपलं नातं मजबूत करण्यासाठी त्यांनी काय केलं?

१ करिंथकर १०:२४ आणि कलस्सैकर ३:१३ वाचा. प्रत्येक वचन वाचून झाल्यावर या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • हा सल्ला लागू केल्यामुळे पतीपत्नींना आपलं नातं मजबूत करण्यासाठी कशी मदत होऊ शकते?

बायबल म्हणतं की आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. आदर करणं म्हणजे एखाद्याशी प्रेमाने वागणं आणि त्याला महत्त्व देणं. रोमकर १२:१० वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • ‘माझ्या जोडीदाराने आधी माझ्याशी आदराने वागावं’ अशी पती किंवा पत्नीने अपेक्षा केली पाहिजे का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

काही जण म्हणतात: “आमच्यात आता पहिल्यासारखं प्रेम राहिलेलं नाही.”

  • बायबलच्या सल्ल्यामुळे त्यांना मदत होऊ शकते हे तुम्ही कसं समजावून सांगाल?

थोडक्यात

पतीपत्नी जेव्हा एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांचा आदर करतात आणि बायबलची तत्त्वं लागू करतात, तेव्हा ते खऱ्‍या अर्थाने आनंदी होतात.

उजळणी

  • कुटुंब आनंदी राहावं म्हणून पतीने काय केलं पाहिजे?

  • कुटुंब आनंदी राहावं म्हणून पत्नीने काय केलं पाहिजे?

  • तुमचं वैवाहिक नातं मजबूत करण्यासाठी बायबलमधलं कोणतं तत्त्व तुम्हाला मदत करू शकेल?

ध्येय

हेसुद्धा पाहा

आनंदी कुटुंबासाठी उपयोगी पडतील असे सल्ले जाणून घ्या.

तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते  (माहितीपत्रक)

विवाहात देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागल्यामुळे कोणते फायदे होतात हे एका संगीत व्हिडिओमध्ये पाहा.

नातं आपलं खरं  (४:२६)

पतीच्या अधीन राहण्याचा काय अर्थ होतो हे जाणून घ्या.

“स्त्रियांनी मस्तकपदाच्या अधीन का राहिले पाहिजे?” (टेहळणी बुरूज,  १५ मे, २०१०)

एका जोडप्याने घटस्फोट आणि त्यासारख्या गंभीर समस्यांवर कशी मात केली?

देवाच्या मदतीने आम्ही आमच्या लग्नाचं नातं मजबूत केलं  (५:१४)