अध्याय १६
तुमच्या कुटुंबासाठी चिरकालिक भवितव्य संपादन करा
१. कौटुंबिक व्यवस्थेसाठी यहोवाचा उद्देश काय होता?
यहोवाने आदाम हव्वेला विवाहबंधनात बांधले तेव्हा आदामाने सर्वात जुनी लेखबद्ध केलेली इब्री कविता म्हणून आपला आनंद व्यक्त केला. (उत्पत्ति २:२२, २३) तथापि, निर्माणकर्त्याच्या मनात, त्याच्या मानवी मुलांना केवळ सुख देण्यापेक्षा आणखी काही होते. वैवाहिक जोडप्यांनी आणि कुटुंबांनी त्याच्या इच्छेप्रमाणे करावे, असे त्याला वाटत होते. त्याने पहिल्या जोडप्याला सांगितले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” (उत्पत्ति १:२८) ती किती मोठी, प्रतिफलदायक नेमणूक होती! आदाम, हव्वा आणि भवितव्यातील त्यांच्या मुलांनी पूर्ण आज्ञाधारक राहून यहोवाची इच्छा आचरली असती, तर ते किती आनंदी झाले असते!
२, ३. आज कुटुंबांना अधिक सौख्यानंद कसा मिळू शकतो?
२ आज देखील, कुटुंबे देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी एकत्र मिळून कार्य करतात तेव्हा अत्यानंदी असतात. प्रेषित पौलाने लिहिले: “सुभक्ति [ईश्वरी भक्ती] तर सर्व बाबतीत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.” (१ तीमथ्य ४:८) बायबलमध्ये दिलेल्या ईश्वरी भक्तीनुसार जीवन व्यतीत करणाऱ्या आणि यहोवाच्या मार्गदर्शनाचा अवलंब करणाऱ्या कुटुंबाला ‘आताच्या जीवनात’ आनंद मिळतो. (स्तोत्र १:१-३; ११९:१०५; २ तीमथ्य ३:१६) कुटुंबात बायबल तत्त्वांचा अवलंब एखादा सदस्य जरी करत असला, तरी, ही परिस्थिती कुटुंबात कोणीही अवलंब करीत नाहीत त्यापेक्षा अधिक चांगली असते.
३ या पुस्तकात कौटुंबिक सौख्यानंद घडवून आणण्यास मदत करणाऱ्या अनेक बायबल तत्त्वांची चर्चा केलेली आहे. या पुस्तकात त्याविषयीची काही तत्त्वे पुनःपुन्हा आल्याचे कदाचित तुमच्या निदर्शनास आले असेल. असे का बरे? कारण कौटुंबिक जीवनाच्या विविध पैलूंमध्ये सर्वांवर चांगला प्रभाव करणाऱ्या शक्तिशाली सत्याची ही तत्त्वे प्रतिनिधीत्व करतात. या बायबल तत्त्वांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाला, ईश्वरी भक्ती खरोखर ‘आताच्या जीवनाचे अभिवचन देत,’ असल्याचे दिसते. आता आपण पुन्हा एकदा त्या चार महत्त्वपूर्ण तत्त्वांबद्दल पाहू या.
आत्मसंयमाचे मोल
४. विवाहात आत्मसंयम का आवश्यक आहे?
४ शलमोन राजाने म्हटले: “ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.” (नीतिसूत्रे २५:२८; २९:११) आनंदी विवाहाची इच्छा बाळगणाऱ्यांनी ‘चित्त स्वाधीन ठेवणे,’ आत्मसंयम दाखवणे महत्त्वाचे आहे. क्रोध अथवा अनैतिक वासना यासारख्या विध्वंसक भावनांच्या आहारी गेल्याने हानी होऊ शकते, जी भरून काढण्याजोगी असली, तरीही त्याला अनेक वर्षे लागतील.
५. एखादा अपरिपूर्ण मानव आत्मसंयम कसे विकसित करू शकतो आणि त्याचे लाभ कोणते आहेत?
५ अर्थातच, आदामाचा कोणताही वंशज त्याच्या अपरिपूर्ण शरीरावर पूर्णपणे काबू ठेवू शकत नाही. (रोमकर ७:२१, २२) तरीही, आत्मसंयम हे आत्म्याचे एक फळ आहे. (गलतीकर ५:२२, २३) या कारणास्तव, या गुणासाठी आपण प्रार्थना केल्यास, याविषयी शास्रवचनात दिलेल्या उचित सल्ल्याचा अवलंब केल्यास आणि त्यास प्रदर्शित करत असलेल्यांची संगत धरल्यास आणि प्रदर्शित करत नसलेल्यांची संगत टाळल्यास देवाचा आत्मा आपल्यात आत्मसंयम निर्माण करील. (स्तोत्र ११९:१००, १०१, १३०; नीतिसूत्रे १३:२०; १ पेत्र ४:७) हा मार्ग, आपल्याला मोह होतो तेव्हाही ‘जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढण्यासाठी’ आपली मदत करील. (१ करिंथकर ६:१८) आपण हिंसेला झिडकारू आणि दारूबाजीला टाळू अथवा तिच्यावर जय मिळवू. शिवाय, आपण चिथावणी आणि कठीण परिस्थितींचा अधिक शांतपणे सामना करू. आपण सर्व—मुले देखील—आत्म्याचे हे महत्त्वपूर्ण फळ विकसित करण्याचे शिकू.—स्तोत्र ११९:१, २.
मस्तकपदाबद्दल उचित दृष्टिकोन
६. (अ) मस्तकपदाची कोणती ईश्वरीय प्रस्थापित व्यवस्था आहे? (ब) एखाद्या पुरुषाला, त्याच्या मस्तकपदाने कुटुंबासाठी सौख्यानंद आणावयाचा असल्यास त्याने कशाची आठवण ठेवली पाहिजे?
६ दुसरे महत्त्वपूर्ण तत्त्व मस्तकपदाला मान्यता देणे हे आहे. पौलाने उचित व्यवस्थेचे वर्णन करताना म्हटले: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.” (१ करिंथकर ११:३) याचा अर्थ, कुटुंबामध्ये पुरुष नेतृत्त्व करत असतो, त्याची पत्नी निष्ठावंतपणे त्याला पाठिंबा देणारी असते आणि मुले त्यांच्या पालकांच्या आज्ञेत असतात. (इफिसकर ५:२२-२५, २८-३३; ६:१-४) तथापि, मस्तकपदाचा वापर उचित रीतीने केला तरच त्यापासून आनंद मिळू शकतो, याकडे लक्ष द्या. ईश्वरी भक्तीनुसार आपले जीवन व्यतीत करणाऱ्या पतींना, मस्तकपद ही हुकुमशाही नसल्याची जाणीव आहे. ते त्यांचे मस्तक, येशू याचे अनुकरण करतात. येशूने “सर्वांवर मस्तक” व्हावयाचे होते, तरी तो “सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास” आला. (इफिसकर १:२२; मत्तय २०:२८) अशाच रीतीने, ख्रिस्ती पुरुष आपल्या मस्तकपदाचा वापर स्वतःच्या लाभासाठी नव्हे, तर आपली पत्नी आणि मुलांच्या हिताची काळजी घेण्यासाठी करतो.—१ करिंथकर १३:४, ५.
७. एखाद्या पत्नीला देवाने दिलेली भूमिका पूर्ण करण्यासाठी कोणती शास्रवचनीय तत्त्वे तिची मदत करतील?
७ ईश्वरी भक्तीचे जीवन व्यतीत करत असलेली पत्नी आपल्या पतीबरोबर चढाओढ अथवा त्याच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला पाठिंबा देण्यात आणि त्याच्यासोबत कार्य करण्यात तिला आनंद वाटतो. बायबल काही वेळा पत्नीविषयी ती पतीच्या ‘मालकीची’ असल्याचे सांगते तेव्हा, तो तिचा मस्तक आहे याबद्दल कसलाही संशय मागे ठेवत नाही. (उत्पत्ति २०:३) विवाहाद्वारे ती “नियमशास्राने पतीला बांधलेली असते.” (रोमकर ७:२) याच वेळी बायबल तिला एक “साहाय्यक” व ‘अनुरूप व्यक्ती’ असे संबोधते. (उत्पत्ति २:२०) ती पतीठायी उणीव असलेले गुण आणि क्षमता पुरवते आणि त्याला आवश्यक तो पाठिंबा देते. (नीतिसूत्रे ३१:१०-३१) बायबल, पत्नीला आपल्या सोबत्याच्या शेजारी राहून कार्य करणारी “सहकारिणी” असल्याचे देखील सांगते. (मलाखी २:१४) ही शास्रवचनीय तत्त्वे, पती व पत्नीला एकमेकांच्या स्थानाची कदर बाळगण्यास आणि एकमेकांना उचित आदराने व सन्मानाने वागवण्यास मदत करतात.
‘ऐकावयास तत्पर असा’
८, ९. कुटुंबातील सर्वांना स्वतःच्या दळणवळणाच्या कौशल्यांत सुधारणा करण्यास मदत करतील अशा काही तत्त्वांचे स्पष्टीकरण द्या.
८ या पुस्तकात दळणवळणाच्या गरजेवर अनेकदा जोर देण्यात आलेला आहे. का बरे? कारण लोक एकमेकांसोबत बोलतात आणि खरोखर एकमेकांचे ऐकत असतात तेव्हा सहजपणे समस्या सोडवता येतात. दळणवळण हे दुतर्फी रस्त्यासारखे आहे या वस्तुस्थितीवर पुनःपुन्हा जोर दिला होता. शिष्य याकोबाने त्याविषयी याप्रकारे म्हटले: “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा . . . असावा.”—याकोब १:१९.
९ आपण कसे बोलतो याविषयी खबरदारी बाळगणे देखील महत्त्वाचे आहे. अविचारी, विवाद्य किंवा अतिशय टीकात्मक शब्दांमुळे यशस्वी दळणवळण होत नाही. (नीतिसूत्रे १५:१; २१:९; २९:११, २०) आपण जे काही सांगतो ते बरोबर असले तरी, जर ते क्रूर, गर्विष्ठ किंवा भावनारहित पद्धतीने व्यक्त केले तर त्यामुळे चांगले होण्यापेक्षा कदाचित हानीच होईल. आपले बोलणे स्वादिष्ट, “मिठाने रुचकर” केल्यासारखे असावे. (कलस्सैकर ४:६) आपले शब्द “रुपेरी करंड्यात सोन्याची फळे,” यांसारखे असले पाहिजेत. (नीतिसूत्रे २५:११) चांगल्याप्रकारे दळणवळण राखण्याचे शिकत असणाऱ्या कुटुंबांनी सौख्यानंद मिळवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
प्रेमाची महत्त्वपूर्ण भूमिका
१०. विवाहात कोणत्या प्रकारचे प्रेम आवश्यक आहे?
१० या पुस्तकात “प्रेम” हा शब्द बऱ्याचदा दिसतो. प्रामुख्याने, कोणत्या प्रकारच्या प्रेमाचा उल्लेख करण्यात आला ते तुम्हाला आठवते का? हे खरे की, विवाहात रोमँटिक प्रेम (ग्रीक, इरॉस) एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि यशस्वी विवाहात गाढ आपुलकी व मित्रता (ग्रीक, फिलिया) पती पत्नीमध्ये वाढत असते. परंतु, यापेक्षाही अधिक महत्त्वाचे अगापे या ग्रीक शब्दाने ध्वनित होणारे प्रेम आहे. हेच प्रेम आपण यहोवा, येशू आणि शेजाऱ्यांविषयी विकसित करत असतो. (मत्तय २२:३७-३९) हेच प्रेम यहोवा मानवजातीप्रती दाखवतो. (योहान ३:१६) यहोवा जे प्रेम दाखवतो तेच प्रेम आपण आपल्या वैवाहिक सोबती आणि मुलांप्रीत्यर्थ दाखवू शकतो हे किती अप्रतिम आहे!—१ योहान ४:१९.
११. विवाहात प्रेम भल्यासाठी कसे कार्य करते?
११ विवाहात हे भारदस्त प्रेम खरेच एक “पूर्णता करणारे बंधन” आहे. (कलस्सैकर ३:१४) ते जोडप्यांना एकत्र आणते आणि एकमेकांसाठी त्यांच्या मुलांसाठी काय चांगले आहे ते करावयास लावते. कुटुंब कठीण परिस्थितींना तोंड देते तेव्हा प्रेम त्यांना सर्वकाही एकत्र मिळून हाताळण्यासाठी मदत करते. जोडप्यांचे वय होत जाते तसे, प्रेम एकमेकांना आधार देण्यास आणि एकमेकांची सतत कदर बाळगण्यास मदत करते. “प्रीति . . . स्वार्थ पाहत नाही. . . . ती सर्व काही सहन करिते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीति कधी अंतर देत नाही.”—१ करिंथकर १३:४-८.
१२. वैवाहिक जोडप्यांचे देवावरील प्रेम त्यांचा विवाह मजबूत का करते?
१२ वैवाहिक बंधन, केवळ वैवाहिक सोबत्यांमधील प्रेमामुळे नव्हे, तर प्रामुख्याने यहोवाबद्दलच्या प्रेमाने घट्ट सांधल्यावर विशेषपणे दृढ असते. (उपदेशक ४:९-१२) का बरे? प्रेषित योहानाने लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.” (१ योहान ५:३) यास्तव, जोडप्याने त्यांच्या मुलांना ईश्वरी भक्तीनुसार प्रशिक्षण, केवळ मुलांवर त्यांचे गाढ प्रेम असल्यामुळे नव्हे, तर ही यहोवाची आज्ञा असल्यामुळे दिले पाहिजे. (अनुवाद ६:६, ७) त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळेच नव्हे, तर यहोवावर प्रेम आहे व तो “जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय” करील म्हणून त्यांनी अनैतिकता टाळली पाहिजे. (इब्री लोकांस १३:४) विवाहात एखादा जरी वैवाहिक सोबती खडतर समस्या आणत असला, तरी यहोवावरील प्रेम दुसऱ्या सोबत्याला बायबल तत्त्वांचे अनुसरण करीत राहण्यास प्रवृत्त करील. यहोवाबद्दलच्या प्रेमात एकमेकांशी मजबूत बनलेली कुटुंबे खरोखर धन्य आहेत!
देवाची इच्छा आचरणारे कुटुंब
१३. देवाची इच्छा आचरण्याचा निर्धार, वैयक्तिकांनी त्यांची दृष्टी खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर ठेवण्यास कशा प्रकारे मदत करील?
१३ ख्रिश्चनाचे संपूर्ण जीवन देवाची इच्छा करण्यावर केंद्रित आहे. (स्तोत्र १४३:१०) हाच ईश्वरी भक्तीचा अर्थ होतो. देवाची इच्छा आचरत राहिल्याने कुटुंबांना खरोखर महत्त्वाच्या गोष्टी दृष्टीसमोर ठेवण्यास मदत होत असते. (फिलिप्पैकर १:९, १०) उदाहरणार्थ, येशूने इशारा दिला: “मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे; आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.” (मत्तय १०:३५, ३६) येशूच्या इशाऱ्याप्रमाणेच, त्याच्या अनेक अनुयायांना त्यांच्या कौटुंबिक सदस्यांकडून छळले गेले आहे. किती दुःखद, त्रासदायक परिस्थिती! तथापि, कौटुंबिक प्रेम, यहोवा देव आणि येशू ख्रिस्तावरील आपल्या प्रेमापेक्षा अधिक असू नये. (मत्तय १०:३७-३९) एखादी व्यक्ती कौटुंबिक विरोध असतानाही टिकून राहिल्यास, ईश्वरी भक्तीचे चांगले परिणाम पाहिल्यावर विरोध करणाऱ्यांमध्ये कदाचित बदल होईल. (१ करिंथकर ७:१२-१६; १ पेत्र ३:१, २) परंतु, असे जरी घडले नाही, तरी विरोध येतो म्हणून देवाची सेवा करण्याचे थांबवल्याने कोणताही दीर्घकालीन चांगला परिणाम प्राप्त होत नाही.
१४. पालकांना, देवाची इच्छा आचरण्याची अभिलाषा आपल्या मुलांच्या उत्तम हितासाठी कार्य करण्यास कशी मदत करील?
१४ देवाच्या इच्छेप्रमाणे केल्यामुळे योग्य निर्णय घेण्यास पालकांना मदत मिळते. उदाहरणार्थ, काही समाजात मुले ही एक गुंतवणूक आहे असा पालकांचा दृष्टिकोन असतो व वृद्धावस्थेत मुले त्यांची काळजी घेतील म्हणून ते त्यांच्यावर विसंबून राहतात. प्रौढ मुलांनी आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेणे हे योग्य आणि उचित असले, तरी अशा विचारामुळे मुलांना भौतिकवादी जीवनशैली स्वीकारण्यास पालकांनी प्रवृत्त करू नये. मुले आध्यात्मिक गोष्टींपेक्षा भौतिक मालमत्तेला अधिक मोलाचे समजतील अशा रीतीने पालकांनी त्यांचे संगोपन केले, तर ते हितकारक ठरणार नाही.—१ तीमथ्य ६:९.
१५. तीमथ्याची आई, युनीके, देवाची इच्छा आचरणाऱ्या पालकाचे एक अत्युत्तम उदाहरण कशी होती?
१५ याबाबतीत एक चांगले उदाहरण, पौलाचा मित्र, तरुण तीमथ्य याची आई युनीके हिचे आहे. (२ तीमथ्य १:५) युनीकेचा विवाह, सत्य न मानणाऱ्या व्यक्तीसोबत झालेला असतानाही, ती व तीमथ्याची आजी, लोईस यांनी तीमथ्याने ईश्वरी भक्तीचा पिच्छा करावा म्हणून त्याचे यशस्वीपणे संगोपन केले. (२ तीमथ्य ३:१४, १५) तीमथ्य प्रौढ झाल्यावर, युनीकेने तीमथ्याला पौलाचा एक मिशनरी सोबती म्हणून राज्य प्रचार कार्य करण्यासाठी घर सोडण्याची अनुमती दिली. (प्रेषितांची कृत्ये १६:१-५) तिचा मुलगा एक उल्लेखनीय मिशनरी झाला तेव्हा तिला किती आनंद झाला असावा! एक प्रौढ या नात्याने त्याने आचरलेल्या ईश्वरी भक्तीने त्याच्या प्रारंभीच्या प्रशिक्षणास उत्तमपणे प्रतिबिंबित केले. तीमथ्य युनीकेसोबत नसल्यामुळे तिला चुकल्यासारखे वाटले, तरी त्याच्या विश्वासू सेवेचे अहवाल ऐकताना तिला नक्कीच समाधान आणि आनंद मिळाला.—फिलिप्पैकर २:१९, २०.
कुटुंब आणि तुमचे भवितव्य
१६. येशूने पुत्र या नात्याने कोणती उचित काळजी दाखवली परंतु त्याचा प्रमुख उद्देश कोणता होता?
१६ येशूचे पालनपोषण ईश्वरी कुटुंबात झाले आणि प्रौढ या नात्याने त्याने एखाद्या पुत्राला आपल्या आईबद्दल वाटणारी उचित काळजी दाखवली. (लूक २:५१, ५२; योहान १९:२६) तथापि, देवाची इच्छा पूर्ण करणे हा येशूचा प्रमुख उद्देश होता आणि त्यामध्ये सार्वकालिक जीवनाचा आनंद घेण्यास मानवांसाठी मार्ग खुला करण्याचा समावेश होता. हे त्याने पापी मानवांसाठी त्याचे परिपूर्ण मानवी जीवन खंडणी या नात्याने अर्पण केले तेव्हा साध्य केले.—मार्क १०:४५; योहान ५:२८, २९.
१७. येशूच्या विश्वासू कार्यामुळे देवाची इच्छा आचरणाऱ्यांसाठी कोणते अत्युत्तम भवितव्य खुले झाले?
१७ येशूच्या मृत्यूनंतर, यहोवाने त्याला स्वर्गीय जीवनासाठी उठवले आणि त्याला मोठा अधिकार दिला आणि कालांतराने, स्वर्गीय राज्याचा एक राजा म्हणून नियुक्त केले. (मत्तय २८:१८; रोमकर १४:९; प्रकटीकरण ११:१५) येशूच्या बलिदानामुळे त्या राज्यात त्याच्यासोबत राज्य करण्यासाठी काही मानवांची निवड करणे शक्य झाले. यामुळे प्रामाणिक अंतःकरणाच्या इतर मानवांसाठी पृथ्वीवर पुनःस्थापित केलेल्या परादीसमय परिस्थितीत परिपूर्ण जीवनाचा आनंद घेण्यासाठी देखील मार्ग खुला झाला. (प्रकटीकरण ५:९, १०; १४:१, ४; २१:३-५; २२:१-४) आपल्या शेजाऱ्यांना अत्युत्तम सुवार्ता सांगणे, हा आपल्यासाठी आज महान विशेषाधिकारांमधील एक विशेषाधिकार आहे.—मत्तय २४:१४.
१८. कुटुंबाना आणि वैयक्तिकांना कोणते स्मरण आणि उत्तेजन दिलेले आहे?
१८ प्रेषित पौलाने दाखवल्याप्रमाणे, ईश्वरी भक्तीनुसार जीवन व्यतीत केल्याने लोकांना, ‘येणाऱ्या’ जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होण्याचे अभिवचन मिळू शकते. नक्कीच, सौख्यानंद मिळवण्याचा हा अत्युत्तम मार्ग आहे! लक्षात ठेवा, “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) या कारणास्तव, तुम्ही एखादे मूल असो वा एखादे पालक, एखादा पती अथवा एखादी पत्नी किंवा एखादी सडी अथवा अपत्यहीन प्रौढ व्यक्ती असो देवाची इच्छा आचरण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तणावाखाली असला किंवा अतिशय कठीण परिस्थितींना तोंड देत असला, तरी तुम्ही जिवंत देवाचे एक सेवक आहात हे कधीही विसरू नका. अशा प्रकारे, तुमची कार्ये यहोवाला हर्षित करोत. (नीतिसूत्रे २७:११) तुमच्या आचरणामुळे तुम्हाला आता सौख्यानंद मिळो आणि येणाऱ्या नवीन जगात सार्वकालिक जीवन!