एका विद्यार्थ्याच्या मनातला गोंधळ
वर्गात बसलेला विकी खूप अस्वस्थ झाला आहे. त्याच्या टीचरने नुकतंच वर्गाला चार्ल्स डार्विन आणि त्याच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्ताबद्दल शिकवलं आहे. त्यामुळे तो विचारात पडला आहे. या सिद्धान्ताने कशा प्रकारे विज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवली आणि मानवांना अंधविश्वासांच्या जाळ्यातून मुक्त केलं, याविषयी तिने मुलांना माहिती दिली आहे. आणि आता तिने विद्यार्थ्यांना आपआपली मतं मांडायला सांगितली आहेत.
त्यामुळे विकी गोंधळात पडला आहे. खरंतर तो त्याच्या टीचरचा खूप आदर करतो. पण, त्याच्या आईवडिलांनी आजपर्यंत त्याला हेच शिकवलं, की पृथ्वी आणि त्यावरच्या सर्व सजीवांना देवानेच बनवलं आहे. बायबलमध्ये दिलेल्या निर्मितीच्या वृत्तान्तावर आपण भरवसा ठेवू शकतो; आणि उत्क्रांतिवाद हा फक्त एक सिद्धान्त असून त्याला कोणत्याही पुराव्याचा आधार नाही, असं त्याच्या आईवडिलांचं म्हणणं आहे. विकीच्या आईवडिलांचा आणि त्याच्या टीचरचा हेतू तसा चांगला आहे. पण विकीला प्रश्न पडला आहे, की कोणावर विश्वास ठेवावा?
जगभरातल्या हजारो वर्गांमध्ये अनेक विद्यार्थ्यांची विकीसारखीच अवस्था होते. मग, अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? या विषयावर त्यांनी स्वतःहून निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यांनी उत्क्रांतिवाद आणि निर्मिती या दोन्ही बाजूंच्या पुराव्यांचं परीक्षण केलं पाहिजे. आणि मगच यांपैकी कशावर विश्वास ठेवायचा हे ठरवलं पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही का?
बायबलसुद्धा, दुसऱ्यांनी शिकवलेल्या गोष्टींवर डोळे मिटून विश्वास ठेवण्याविरुद्ध इशारा देतं. बायबलच्या एका लेखकाने असं लिहिलं, “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.” (नीतिसूत्रे १४:१५) बायबल आपल्याला असं प्रोत्साहन देतं, की जे काही शिकवलं जातं ते आपण ‘समजून घ्यावं’ आणि मगच त्यावर विश्वास ठेवावा.—रोमकर १२:१, २.
शाळांमध्ये निर्मितीबद्दल शिकवलं जावं अशी अनेक धार्मिक गट मागणी करतात. पण हे माहितीपत्रक अशा गटांचं समर्थन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं नाही. मग या माहितीपत्रकाचा उद्देश काय आहे? बरेच लोक असा दावा करतात की जीवन आपोआप अस्तित्वात आलं आणि बायबलमधला निर्मितीचा अहवाल काल्पनिक आहे. अशा दाव्यांचं बारकाईने परीक्षण करण्यासाठी हे माहितीपत्रक तयार करण्यात आलं आहे.
सजीवांतला सर्वात मूलभूत घटक म्हणजे पेशी. त्यामुळे, आपण विशेषतः पेशींची रचना आणि कार्य यावर लक्ष केंद्रित करू. पेशींच्या रचनेबद्दल तुम्हाला या माहितीपत्रकातून काही अतिशय आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेता येतील. तसंच, उत्क्रांतीचा सिद्धान्त ज्या समजुतींवर आधारलेला आहे त्यांचंही तुम्हाला परीक्षण करता येईल.
सजीवांची निर्मिती करण्यात आली की त्यांची उत्क्रांती झाली? या प्रश्नाला आपल्या सर्वांनाच कधी ना कधी सामोरं जावं लागतं. कदाचित तुम्ही यापूर्वीच या विषयाचा गंभीरतेने विचार केला असेल. पण, सृष्टीची निर्मिती करण्यात आली आहे, अशा निष्कर्षावर बरेच जण कोणत्या पुराव्यांमुळे आले? या माहितीपत्रकात त्यांपैकी काही पुरावे सादर करण्यात आले आहेत.