व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भवितव्यात माझ्याकरता काय राखून ठेवलेले आहे?

भवितव्यात माझ्याकरता काय राखून ठेवलेले आहे?

अध्याय ३८

भवितव्यात माझ्याकरता काय राखून ठेवलेले आहे?

“मला भवितव्याची, आण्विक धोके असलेल्या जगातील भवितव्याची भीती वाटते.” हे शब्द एका जर्मन युवकाने त्या राष्ट्रातील सर्वोच्च राजनैतिक अधिकाऱ्‍याला उद्देशून केलेल्या भाषणात उद्‌गारले.

अशाचप्रकारे, कदाचित भवितव्याच्या तुमच्या कल्पनेवर एखाद्या आण्विक स्फोटात भस्म होऊन जाण्याच्या भीतीचे काळे सावट पसरलेले असेल. “मी चांगले मार्क मिळवण्यासाठी चिंता का करत बसावं?” असा प्रश्‍न एका तरुणाने केला. “नाहीतरी जग भस्मच होणार आहे.” खरे तर, शालेय मुलांच्या एका सर्वेक्षणात लहान मुलांनी आण्विक युद्धाची सर्वात जास्त भीती वाटत असल्याचे व्यक्‍त केले. मुलींनी त्यास दुय्यम स्थान दिले आणि “माझ्या आईवडिलांचा मृत्यू” ही पहिली भीती असल्याचे व्यक्‍त केले.

तथापि, अण्वस्त्राच्या भीतीचीच तेवढी काळी सावली पसरलेली नाही. “वाढती लोकसंख्या, खनिज संपत्ती क्षय पावणे, पर्यावरणाचे प्रदूषण” आणि भविष्यातील इतर विपत्तींच्या धास्तीचा विचार करून मानसशास्त्रज्ञ बी. एफ. स्कीनर यांनी असा निष्कर्ष काढला: “मानवजात आता धोक्यात आहे असं दिसतंय.” नंतर त्यांनी कबूल केले: “मी अतिशय निराशावादी आहे. आपण खरोखर आपल्या समस्या सोडवणार नाही.”

अशा ज्ञानवंत निरीक्षिकांचा जर भवितव्याविषयी भयावह दृष्टिकोन असला, तर अनेक युवकांची “चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे,” अशी मनोवृत्ती आहे यात मुळीच आश्‍चर्य नाही. (१ करिंथकर १५:३२) खरे म्हणजे, तुमचे भवितव्य राजकारण्यांच्या आणि शास्त्रज्ञांच्या क्षमतेवर निर्भर असल्यास ते निश्‍चितच भयंकर असेल. कारण यिर्मया १०:२३ म्हणते: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही. पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.”

मनुष्याला स्वतःचे नियंत्रण करण्याची क्षमता नाही असे नाही. पण ते “त्याच्या हाती” नाही याकडे लक्ष द्या—त्याला पृथ्वीचे भवितव्य घडवण्याचा काहीच अधिकार नाही. यास्तव, त्याचे प्रयत्न फोल ठरतात. म्हणूनच, यिर्मयाने ईश्‍वरी हस्तक्षेपासाठी प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, मला शिक्षा कर पण ती न्यायाने कर.” (यिर्मया १०:२४) याचा अर्थ आपला निर्माणकर्ता आपले भवितव्य ठरवील. पण, ते भवितव्य काय असेल?

पृथ्वीकरता देवाचा उद्देश—आणि तुमचे भवितव्य

मानवाच्या निर्मितीनंतर लगेचच, देवाने पहिल्या मानवी जोडप्याला म्हटले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” (उत्पत्ति १:२८) अशाप्रकारे, मानवाला जागतिक परादीसमध्ये राहण्याची प्रत्याशा देण्यात आली होती.

तथापि, पहिल्या जोडप्याने देवाच्या शासनाविरुद्ध बंड केले. शलमोनाने नंतर त्याविषयी असे म्हटले, “देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्‍न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.” (उपदेशक ७:२९) मानवी कल्पना विनाशकारी शाबीत झाल्या आहेत आणि त्यांमुळे विद्यमान पिढीला दुःखाचा वारसा आणि सर्वात भयानक भवितव्य मिळाले आहे.

पण देवाने ही पृथ्वी प्रदूषित, किरणोत्सर्गी—आणि कदाचित निर्जीव—होण्यास सोडून दिली आहे असा त्याचा अर्थ होतो का? अशक्य! “पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच; त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.” यास्तव, पृथ्वीसाठी त्याने जो उद्देश सांगितला आहे तो निश्‍चितच पूर्ण होईल!—यशया ४५:१८; ५५:१०, ११.

पण केव्हा—आणि कसा? लूक अध्याय २१ वाचा. या शतकात, मानवजातीला ग्रासून टाकलेल्या समस्यांबद्दल तेथे येशूने सांगितले आहे: आंतरराष्ट्रीय युद्धे, भूकंप, रोगराई, अन्‍नटंचाई, सर्वदूर गुन्हेगारी. या घटनांचा काय अर्थ होतो? स्वतः येशू त्याचे स्पष्टीकरण देतो: “ह्‍या गोष्टींस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे. . . . ह्‍या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.”—लूक २१:१०, ११, २८, ३१.

ते राज्य तुमच्या भवितव्याची गुरुकिल्ली आहे. सरळ शब्दांत सांगायचे झाल्यास, ते एक सरकार आहे, पृथ्वीवर आधिपत्य गाजवण्याचे देवाचे माध्यम. देवाच्या राज्याचे ते सरकार मानवांच्या हातून पृथ्वीवरचा ताबा बळजबरीने काढून घेईल. (दानीएल २:४४) खुद्द देव, “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा” नाश करून मानवांच्या गैरव्यवहारातून पृथ्वीची—आणि मानवजातीची—सुटका करील.—प्रकटीकरण ११:१८; उपदेशक १:४.

देवाच्या राज्य व्यवस्थेखालील सुरक्षिततेत, पृथ्वीचे हळूहळू जागतिक परादीसमध्ये रूपांतर होईल. (लूक २३:४३) अशाप्रकारे, पुन्हा एकदा परिस्थितीकीत परिपूर्ण समतोल येईल. इतकेच नव्हे, तर मानव आणि पशुमध्ये देखील एकता असेल. (यशया ११:६-९) युद्ध आणि युद्धातील शस्त्रास्त्रे नाहीशी होतील. (स्तोत्र ४६:८, ९) गुन्हेगारी, भूक, राहण्याची अडचण, आजारपण—मृत्यूसुद्धा—काढून टाकला जाईल. पृथ्वीचे निवासी “उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:१०, ११; ७२:१६; यशया ६५:२१, २२; प्रकटीकरण २१:३, ४.

देवाची अभिवचने ‘पारखणे’

परादीसमधील सार्वकालिक जीवन—हे तुमचे भवितव्य बनू शकते! पण ही कल्पना आकर्षक वाटत असताना, सर्व चांगले लोक स्वर्गात जातात हा विश्‍वास मनातून घालवणे तुम्हाला कदाचित कठीण वाटत असेल किंवा तुम्हाला बायबलविषयीच काही शंका असतील. यहोवाच्या साक्षीदारांमधील काही युवकांना देखील काहीवेळा आपला विश्‍वास अतिशय अस्थिर असल्याचे भासले आहे. उदाहरणार्थ, मिशेलचे संगोपन तिच्या साक्षीदार पालकांनी केले. बायबल सत्य आहे असे मानणे जणू दिवस मावळल्यावर रात्र होते ही हकीकत मानण्यासारखे होते. पण, एके दिवशी तिच्या डोक्यात प्रकाश पडला—आपण बायबलवर विश्‍वास का करत आहोत हे तिचे तिलाच ठाऊक नव्हते. “मला वाटतं, माझ्या आईवडिलांमुळे मी तोपर्यंत त्यावर विश्‍वास केला,” असे ती म्हणते.

“विश्‍वासावाचून [देवाला] संतोषविणे अशक्य आहे,” असे बायबल म्हणते. (इब्री लोकांस ११:६) पण, तुमच्या आईवडिलांचा विश्‍वास आहे म्हणजे तुमचाही आहे असे नाही. तुमचे भवितव्य सुरक्षित असावयास हवे तर तुम्ही ठोस आधारावर आपला विश्‍वास—“आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा”—उभारला पाहिजे. (इब्री लोकांस ११:१) बायबलच्या मते, तुम्ही “सर्व गोष्टींची पारख” केली पाहिजे.—१ थेस्सलनीकाकर ५:२१.

स्वतःला बायबलची सत्यता पटवणे

बायबल खरोखर “परमेश्‍वरप्रेरित” आहे का याची कदाचित तुम्हाला प्रथम पारख करावी लागेल. (२ तीमथ्य ३:१६) तुम्ही ते कसे करू शकता? फक्‍त सर्वशक्‍तिमान देव, बिनचूकपणे “आरंभीच शेवट” कळवू शकतो. (यशया ४३:९; ४६:१०) तसेच, तो बायबलमध्ये वारंवार हे कळवतो. लूक १९:४१-४४ आणि २१:२०, २१ मधील जेरूसलेमच्या पाडावाविषयीच्या भविष्यवाण्या वाचा. किंवा यशया ४४:२७, २८ आणि ४५:१-४ येथील बॅबिलोनच्या पाडावाविषयीच्या भविष्यवाण्या वाचा. या घटनांविषयी बायबलने किती बिनचूकपणे कथन केले हे लौकिक इतिहास सिद्ध करतो! “त्यातील काही भविष्यवाण्यांचं परीक्षण केल्यावर,” १४ वर्षांची नीलू म्हणते की, “हे सर्व कसं भाकीत करता आलं याचं मला आश्‍चर्यच वाटलं.”

बायबलची ऐतिहासिक अचूकता, प्रामाणिकता, स्पष्टवक्‍तेपणा, आणि परस्परविरोध नसणे या गोष्टी बायबलवर विश्‍वास ठेवण्यास आणखी कारणे पुरवितात. a पण, यहोवाचे साक्षीदार ज्या पद्धतीने बायबल समजून घेतात ते योग्य आहे हे तुम्हाला कसे कळणार? प्राचीन बिरुयातील रहिवाश्‍यांनी बायबलविषयी प्रेषित पौलाने जे स्पष्टीकरण दिले ते विनाहरकत स्वीकारले नाही. त्याउलट, ‘ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी त्यांनी शास्त्रात दररोज परीक्षण केले.’—प्रेषितांची कृत्ये १७:११.

आम्ही देखील तुम्हाला बायबलच्या शिकवणुकींचा सखोल अभ्यास करण्यास आर्जवत आहोत. सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान (वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियाद्वारे प्रकाशित) या प्रकाशनाने स्पष्ट रूपात या शिकवणी मांडल्या आहेत. तुमचे पालक यहोवाचे साक्षीदार असल्यास, तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याकरता ते निःसंशये तुम्हाला मदत करू शकतील. “तुम्हाला याविषयी काही समस्या असल्यास, आपल्या पालकांसोबत प्रामाणिक असा,” असे जेनेल नामक एक तरुणी सुचवते. “तुम्हाला एखाद्या गोष्टीवर विश्‍वास ठेवायला कठीण जात असले, तर प्रश्‍न विचारा.” (नीतिसूत्रे १५:२२) कालांतराने तुम्हाला निश्‍चितच हे समजेल की, यहोवाने त्याच्या साक्षीदारांना बायबल सत्यांची अद्‌भुत समज प्रदान करून नक्कीच आशीर्वादित केले आहे!

प्रेंटीस नामक एक युवक म्हणतो: “जगाकडे पाहून मी कधीकधी दुःखी होतो. प्रकटीकरण २१:४ सारखी शास्त्रवचने मी काढून पाहतो आणि मग मला त्यातून आशा मिळते.” होय, देवाच्या अभिवचनांवर भक्कम विश्‍वास ठेवल्याने तुमच्या दृष्टिकोनावर निश्‍चितच परिणाम होईल. तुम्ही भवितव्याकडे दुःखाने नव्हे तर आनंदी आशेने पाहाल. तुमचे सद्य जीवन अर्थहीन धडपड नव्हे, तर ‘खरे जीवन बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होण्याचा साठा करणारे’ माध्यम बनते.—१ तीमथ्य ६:१९.

पण, बायबलच्या शिकवणी केवळ शिकून त्यांवर विश्‍वास करण्याशिवाय हे “खरे जीवन” साध्य करण्यात आणखी काही गोवलेले आहे का?

[तळटीपा]

a बायबलच्या खरेपणाविषयी आणखी तपशीलवार माहितीसाठी शास्त्रवचनांतून युक्‍तिवाद करणे (इंग्रजी) (वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित) या प्रकाशनातील पृष्ठे ५८-६८ पाहा.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ अनेक युवकांना भवितव्याविषयी कोणते भय आहे?

◻ पृथ्वीसाठी देवाचा मूळ उद्देश काय होता? देवाचा उद्देश बदललेला नाही याची आपल्याला खात्री का असू शकते?

◻ पृथ्वीसाठी देवाचा उद्देश पूर्ण करण्यात देवाच्या राज्याची काय भूमिका आहे?

◻ तुम्ही बायबलच्या शिकवणुकींची सत्यता पारखावी हे आवश्‍यक का आहे आणि तुम्ही ते कसे करू शकता?

◻ बायबल देवाकडून प्रेरित केलेले आहे हे तुम्ही स्वतःला कसे सिद्ध करून दाखवू शकता?

[३०६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“मी अतिशय निराशावादी आहे. आपण खरोखर आपल्या समस्या सोडवणार नाही.”—मानसशास्त्रज्ञ बी. एफ. स्कीनर

[३०७ पानांवरील चित्र]

पृथ्वीचा निर्माणकर्ता मानवाला आपल्या ग्रहाची नासाडी करण्यास अनुमती देणार नाही

[३०९ पानांवरील चित्र]

तुम्ही स्वतःला बायबलच्या सत्यतेची खात्री पटवून दिली आहे का?