माझे कपडे माझे खरे रूप प्रकट करतात का?
अध्याय ११
माझे कपडे माझे खरे रूप प्रकट करतात का?
“हा स्कर्ट इतका आखूड नाही,” पेग्गी आपल्या आईवडिलांना ओरडून म्हणाली. “तुम्ही अगदी त्या जुन्याकाळच्या लोकांसारखं वागताहात!” मग ती आपल्या खोलीत निघून गेली—तिला घालायचा होता त्या स्कर्टवरून झालेल्या भांडणाचा असा हा शेवट होता. कदाचित तुम्हाला आवडणाऱ्या कपड्यांविषयी पालकाने, शिक्षकाने अथवा बॉसने टीका केल्यावर तुमच्यासोबत देखील असाच वाद झाला असावा. तुमच्या मते तो कॅझ्युएल पेहराव होता; त्यांच्या मते तो गबाळा होता. तुमच्या मते ती आधुनिक फॅशन होती; त्यांच्या मते ते भडक किंवा असभ्य होते.
हे मान्य आहे, की आवडीनिवडी भिन्न असतात आणि वैयक्तिक अभिप्राय बाळगण्याचा तुम्हाला हक्क आहे. पण, तुमच्या पेहरावाच्या बाबतीत ‘काहीही चालतं’ असा याचा अर्थ व्हावा का?
योग्य संदेश?
पम्मी नामक एक मुलगी म्हणते, “तुमची वस्त्रे म्हणजे तुम्ही स्वतः व तुमचे स्वतःबद्दलचे विचार यांची वास्तविक प्रतिमा.” होय, पेहराव एक संदेश देतात, इतरांना तुमच्याबद्दलचे मत प्रकट करतात. पेहरावाद्वारे सदसद्विवेक बुद्धी, स्थैर्य, उच्च नैतिक दर्जे जाणवू शकतात. किंवा त्याद्वारे बंडखोर वृत्ती आणि असंतुष्टता व्यक्त होऊ शकते. तो एक प्रकारची ओळखही देऊ शकतो. विशिष्ट ओळख पटविण्यासाठी, काही युवक फाटके कपडे, पंक स्टाईल्स किंवा महागडे डिझायनर कपडे वापरतात. इतरजण पेहरावाकरवी विरुद्धलिंगी व्यक्तीला आकर्षित करतात अथवा वयापेक्षा मोठे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात.
यास्तव, पेहराव हा अनेक युवकांना महत्त्वाचा का वाटतो हे चटकन लक्षात येते. तथापि, यशस्वी होण्याकरता पेहराव करणे (इंग्रजी) याचे लेखक, जॉन टी. मॉलो असा सावधानतेचा इशारा देतात: “आपला पेहराव, आपल्याला भेटणाऱ्या लोकांवर विलक्षण प्रभाव पाडतो आणि त्यांच्याकडून
मिळणाऱ्या वागणुकीवरही बराचसा परिणाम करतो.”म्हणूनच, तुमच्या पेहरावाबद्दल तुमचे पालक इतकी चिंता बाळगतात! त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न व्यक्तिगत आवडीनिवडीपुरताच मर्यादित नसतो. तुमची योग्य प्रतिमा दिसावी, ज्यावरून तुम्ही संतुलित, जबाबदार व्यक्ती असल्याचे कळावे असे त्यांना वाटते. परंतु, तुम्ही जसा पेहराव करता त्याद्वारे हे साध्य होते का? तुम्ही वस्त्रांची निवड कशी करता?
“माझे मित्र जे करतात तेच मीही करते”
अनेक युवक, आपल्या पेहरावाद्वारे स्वातंत्र्य आणि स्वत्व यांच्याबद्दलचा आपला अभिप्राय व्यक्त करत असतात. पण युवक या नात्याने तुमचे व्यक्तिमत्व अद्यापही बदलत आहे—ते अद्यापही वाढत आहे त्यात अद्यापही परिवर्तन होत आहे. म्हणून तुम्हाला स्वतःविषयी एखादे मत मांडायचे असले, तरी त्या अभिप्रायाद्वारे काय व्यक्त करावे अथवा ते कसे व्यक्त करावे याची तुम्हाला कदाचित इतकी खात्री नसेल. यास्तव, काही युवक विचित्र, निर्लज्ज पोषाख घालतात. तथापि, ‘स्वत्व’ पटवण्याऐवजी, ते केवळ स्वतःच्या अपरिपक्वतेकडे लक्ष वेधत असतात—यामुळे त्यांच्या पालकांची लाजिरवाणी स्थिती होते हे काही वेगळे सांगायला नको.
इतर युवक त्यांच्या समवयस्कांसारखा पोषाख करण्याचे ठरवतात; यामुळे त्यांना जणू सुरक्षिततेची भावना आणि एखाद्या गटासोबत संलग्न असल्याची ओळख प्राप्त होते. अर्थात, चार चौघांसारखे दिसण्यामध्ये नेहमी काही वावगे असतेच असे नाही. (पडताळा १ करिंथकर ९:२२.) पण सत्य न मानणाऱ्या युवकांसोबत संलग्न असल्याची ओळख पटावी असे एखाद्या ख्रिश्चनाला खरोखरच वाटेल का? त्याचप्रमाणे, कोणत्याही किंमतीवर समवयस्कांची स्वीकृती मिळवणे हे सुज्ञपणाचे असेल का? एका तरुण मुलीने कबूल केले: “माझे मित्र जे काही करतात तेच मीही करते म्हणजे ते माझ्याकडे बोट दाखवणार नाहीत.” पण जो दुसऱ्याच्या इशाऱ्यांवर नाचतो किंवा दुसऱ्या कोणाच्या इच्छेला वश होतो त्याला तुम्ही काय म्हणणार? बायबल उत्तरते: “आज्ञापालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःस . . . समर्पण करिता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहा . . . हे तुम्हाला ठाऊक नाही काय?” (तिरपे वळण आमचे.)—रोमकर ६:१६.
युवकांमध्ये, “गटाच्या सदस्यांनुरुप वागण्याचे इतके ठसवले जाऊ शकते की त्यातील सदस्य गटाच्या नियमांचे अक्षरशः कैदी बनतात व कसा पेहराव करावा, कसे बोलावे, काय करावे एवढेच नव्हे तर काय विचार करावा आणि कशावर विश्वास ठेवावा यावरील सल्ल्यासाठी देखील त्यांच्यावर [समवयस्कांवर] विसंबून राहतात.”—पौगंडावस्था: बालपण ते प्रौढत्व यातील स्थित्यंतर (इंग्रजी).
पण अशा प्रकारचा सल्ला देण्याकरता तुमचे मित्र कितपत पात्र आहेत? (पडताळा मत्तय १५:१४.) त्यांना देखील तुमच्यासारखीच वाढत्या वयातील दुःखे सहन करावी लागत नाहीत काय? तर मग, निमूटपणे त्यांना तुमच्याकरता दर्जे ठरवू देणे सुज्ञपणाचे ठरेल का—ते पण, हे दर्जे तुमच्या समजबुद्धीच्या किंवा मूल्यांच्या आणि तुमच्या पालकांच्या इच्छेच्या विरुद्ध जात असले तरीही?
आजची “फॅशन”—उद्या “कालबाह्य”
इतर युवकांच्या डोक्यात फॅशनचे खूळ शिरते. पण ते खूळ किती चंचल असते! आपल्याला बायबलच्या या शब्दांची आठवण करून दिली जाते: “ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे.” (१ करिंथकर ७:३१) म्हणून, आजची “फॅशन” आश्चर्य वाटावे एवढ्या आकस्मिकपणे उद्या जुनी बनण्याची शक्यता आहे. (भुर्दंड बसतो तो वेगळाच). हेमलाईन्स कमी-जास्त होतात, विजारीचे पाय कधी ढगळ तर कधी निमुळते होतात, हे सर्वकाही उत्पादक व ड्रेस डिझायनरच्या फायद्याचे ठरते जे आपल्या काबूत असलेल्या जनतेकडून भरपूर नफा मिळवतात.
उदाहरणासाठी, काही वर्षांआधी डिझायनर जीन्सचे जे खूळ पसरले होते त्याचा विचार करा. अचानक जीन्सच्या फॅशनचे असे लोण पसरले की लोकांनी, कॅल्विन क्लाईन आणि विक्टोरिया वॉन्डरबिल्ट या नावांचे चालते-फिरते जाहिरात फलक होण्यासाठी भरमसाट किंमती मोजल्या. “सर्जियो वॅलेंट” जीन्स उत्पादक कंपनीचे अध्यक्ष, इलाय कॅप्लन यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, “लोकांना नाव हवं असतं.” पण, हे मिस्टर वॅलेंट आहेत तरी कोण ज्यांचे प्रतिष्ठित नाव जीन्सच्या खिशांवर इतक्या ठळकपणे लावले जाते? न्यूझवीकनुसार, “मुळात, अशा नावाची कुणी व्यक्तीच नाही.” स्पष्टीकरण देत कॅप्लन यांनी स्वतःच असा प्रश्न केला: “नाहीतरी, इलाय कॅप्लन नावाच्या जीन्स कोणी घेतल्या असत्या?”
तुम्ही कदाचित विचाराल, ‘पण अद्ययावत फॅशन करणं चुकीचं आहे का?’ नेहमीच नाही. बायबल काळातील देवाच्या सेवकांनी स्थानिक आवडींनुसार पेहराव केला. उदाहरणार्थ, बायबल म्हणते, की तामारने पायघोळ झगा घातला कारण “राजकन्या कुमारी असता असे झगे घालीत असत.”—२ शमुवेल १३:१८.
पण एखाद्याने अद्ययावत फॅशनला वश व्हावे
का? एका तरुण मुलीने खेदाने असे म्हटले: “तुम्हाला दुकानात फार सुंदर पँट दिसते जी सर्वांकडे आहे आणि तुम्ही आईला म्हणता, ‘आई, मला ती पँट घे ना,’ व ती म्हणते, ‘नको, मी ती घरी शिवू शकते.’ मी म्हणते, ‘पण तुला कसं कळत नाही. मला हीच पँट हवीय.’” खरे पाहता, फॅशन डिझायनर्सच्या इशाऱ्यांवर नाचल्याने तुमचे स्वत्व हिरावले जाऊन खरे रूप झाकले जात नाही का? उत्तेजक जाहीराती, घोषवाक्ये आणि डिझायनर नावे यांचा पगडा तुमच्यावर असावा का?बायबल आपल्याला रोमकर १२:२ येथे म्हणते: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” तुमच्या वस्त्राच्या निवडीची बाब येते तेव्हा ‘देवाची ग्रहणीय इच्छा’ काय असते?
‘भिडस्तपणाचा आणि साजणारा’
पहिले तीमथ्य २:९ ख्रिश्चनांना “स्वतःस साजेल अशा वेषाने आपणांस भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे” असे प्रोत्साहन देते. ‘साजेल असा वेष’ स्वभावतः नीट व स्वच्छ असेल. ‘भिडस्तपणा’ परिस्थितींचा विचार करतो. ऑफिसमध्ये सुटबुट घालणे उचित ठरेल, पण समुद्रकिनारी फिरायला जाताना तो अर्थातच अनुचित ठरेल! त्याउलट, पोहण्याचा पोषाख एखाद्या कार्यालयात अगदीच हास्यास्पद मानला जाईल.
यास्तव, यहोवाच्या तरुण साक्षीदारांनी याचा विचार केला पाहिजे, की ख्रिस्ती सभा किंवा इतरांना प्रचार करण्याच्या कार्यात त्यांचा पोषाख खूपच अप्रासंगिक वाटू नये तर देवाचे तरुण सेवक अशी त्यांची ओळख पटवणारा असावा. २ करिंथकर ६:३, ४ येथील पौलाच्या शब्दांची आठवण करा: “आम्ही करीत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याहि प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही; तर सर्व गोष्टीं देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो.”
भिडस्तपणा इतरांच्या भावनांचा देखील विचार करतो. प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे, एखाद्या ख्रिश्चनाच्या कार्यहालचालींनी केवळ स्वतःच्याच नव्हे तर ‘दुसऱ्या व्यक्तीच्या विवेकाचा’ देखील विचार केला पाहिजे. (१ करिंथकर ) तुमच्या पालकांच्या विवेकाबद्दल तुम्हाला विशेष काळजी असू नये का? १०:२९
उचित पेहराव करण्याचे फायदे
बायबल आपल्याला अशा काळाविषयी सांगते जेव्हा एस्तेर राणीला आपल्या पतीसमोर, म्हणजेच राजासमोर प्रस्तुत व्हावयाचे होते. तथापि, आमंत्रण नसताना अशाप्रकारे हजर होणे देहान्त शिक्षेस पात्र ठरणारा गुन्हा ठरला असता! एस्तेरने देवाच्या मदतीकरता कळकळीने प्रार्थना केली असेल यात काहीच शंका नाही. पण, तिने “राजकीय वस्त्रे धारण करून” आपल्या स्वरूपाकडे देखील लक्ष दिले—जे प्रसंगोचित होते! “राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले तेव्हा त्याची तिजवर कृपादृष्टि झाली.”—एस्तेर ५:१, २.
नोकरीच्या मुलाखतीसाठी आकर्षक परंतु भिडस्तपणाने पेहराव केल्याने तुमची चांगली छाप पडण्यास मदत होईल. करियर विकास केंद्र येथील व्यवस्थापिका, विक्की एल. बॉम असे निरीक्षण करतात: “काही स्त्रिया मुलाखतीसाठी जातात तेव्हा गोंधळतात. त्यांना वाटतं त्या मित्रासोबत फिरायलाच चालल्यात आणि म्हणून त्या मोहक दिसण्याचा प्रयत्न करतात.” त्याचे परिणाम? “यामुळे तुमच्यामध्ये व्यावसायिकता राहत नाही.” त्या “तंग किंवा असभ्य कपडे” न घालण्याचा सल्ला देतात.
तरुण पुरुषांनी देखील नोकरी शोधताना साजेल असा वेष करण्याचा यत्न केला पाहिजे. जॉन टी. मॉलो असे निरीक्षण करतात, की व्यावसायिकांचे “केस नीट विंचरलेले आणि बूट चमकत असतात. इतर पुरुषांकडूनही ते तशीच अपेक्षा करतात.”
तथापि, असभ्य पेहराव इतरांबरोबरील तुमचे नातेसंबंध बिघडवू शकतो. आजचे मानसशास्त्र (इंग्रजी) यात पौगंडांच्या सर्वेक्षणाचा संदर्भ होता ज्यात दिसून आले की, “खोल गळ्याचा टॉप, शॉर्ट्स, तंग जीन्स किंवा ब्रा न घालणे” यामुळे, लैंगिकतेस प्रोत्साहन दिले जात आहे असा पुरुषांनी अर्थ काढण्याची शक्यता आहे. एका तरुण पुरुषाने असे कबूल केले: “तरुण स्त्रिया जसा पेहराव करतात तो पाहून त्यांच्याविषयी केवळ शुद्ध विचार करणं मला स्वतःला अतिशय कठीण जातं.” भिडस्तपणाचा पेहराव तुमच्या आंतरिक गुणांचे मूल्य जाणण्यास लोकांना वाव देईल. एखादा पोषाख भिडस्तपणाचा असण्याची तुम्हाला खात्री नसल्यास, तुमच्या पालकांचा सल्ला घ्या.
“आतील माणूस” सुशोभित करणे
प्रेषित पेत्राने, ख्रिश्चनांनी त्यांचे भूषण, “जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने”—होय, व इतरांच्या दृष्टीने देखील—“बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी” असे त्यांना प्रोत्साहन दिले! (१ पेत्र ३:४) अद्ययावत पद्धतीच्या पोषाखाने तुमचे काही समवयस्क स्तिमित होतील. परंतु, वस्त्रांमुळे कोणाचे मन जिंकता येत नाही अथवा खरे मित्र बनवता येत नाहीत. केवळ “आतील माणूस” सुशोभित केल्याने—तुमच्या आंतरिक व्यक्तित्वाला घडवल्याने हे साध्य होते. (२ करिंथकर ४:१६, पं.र.भा.) आंतरिकदृष्ट्या देखणी असणारी व्यक्ती इतरांना नेहमीच आकर्षक वाटेल, मग तिचे वस्त्र आधुनिक पद्धतीचे नसले किंवा त्यावर निरर्थक डिझायनर लेबल “छापलेले” नसले तरीही.
पुढील कोणत्या फॅशनचे खुळ युवकांना दुकानाच्या दिशेने पळवेल कोण जाणे. परंतु, तुम्ही स्वतःकरता विचार करू शकता. पेहरावाचे उच्च दर्जे राखा. अद्ययावत पद्धतीचा पोषाख आणि लैंगिकतेवर जोर देणारी वस्त्रे टाळा. मर्यादित असा, फॅशनच्या बाबतीत, सर्वांच्यापुढे असू नका, अथवा अगदीच मागासलेलेही असू नका. लगेचच कालबाह्य होणारे नव्हे तर टिकणारे दर्जेदार कपडे घ्या. तुमची वस्त्रे योग्य संदेश देतात व प्रसार माध्यम अथवा समवयस्कांच्या कल्पनेनुसारची प्रतिमा नव्हे तर तुमचे खरे स्वरूप प्रकट करतात याची खात्री करा!
चर्चेसाठी प्रश्न
◻ पेहराव एखादा संदेश कसा देतो?
◻ कपड्यांची निवड करताना विचित्र असण्याकडे काही युवकांचा कल का असतो?
◻ कपड्यांच्या निवडीच्या बाबतीत तुमच्या समवयस्कांचा तुमच्यावर कितपत प्रभाव पडतो?
◻ नेहमीच अद्ययावत स्टाईलप्रमाणे असण्याचा प्रयत्न करण्याचे काही तोटे कोणते आहेत?
◻ एखादी स्टाईल ‘भिडस्तपणाची आणि साजेशी’ आहे हे कशावरून ठरवले जाते?
[९४ पानांवरील संक्षिप्त आशय]
“तुमची वस्त्रे म्हणजे तुमची वास्तविक प्रतिमा आणि तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं ते असतात”
[९१ पानांवरील चित्र]
कपड्यांवरून पालकांचे मुलांसोबत नेहमी खटके उडत असतात. पालक जुन्या विचारांच्या व्यक्तींसारखे वागत असतात का?
[९२ पानांवरील चित्र]
अनेक युवक विचित्र पेहराव करून आपले स्वत्व ठसवण्याचा प्रयत्न करतात
[९३ पानांवरील चित्र]
परिस्थितीला उचित असेल अशा पद्धतीने पेहराव करा. वस्त्र तुमच्याविषयी एक संदेश देतात!