एकलकोंडेपणा मला कसा घालवता येईल?
अध्याय १४
एकलकोंडेपणा मला कसा घालवता येईल?
शनिवारची रात्र आहे. एक मुलगा एकटाच आपल्या खोलीत बसलेला आहे.
“मला शनिवार-रविवारचे दिवस मुळीच आवडत नाहीत!” तो ओरडतो. पण खोलीत त्याला उत्तर द्यायला कुणीच नाही. पुस्तक घेतो तर त्यात समुद्रकिनाऱ्यावरील तरुण-तरुणींचे चित्र त्याला दिसतं. मग तो ते पुस्तक भिंतीवर भिरकावतो. त्याचे डोळे अश्रुंनी डबडबतात. तो जोराने आपला ओठ चावतो पण अश्रू गालावर ओघळू लागतात. असह्य झाल्यावर, तो खाटेवर पडतो आणि रडू लागतो, “मला नेहमीच एकटं का सोडतात?”
तुम्हाला अशाप्रकारे कधी वाटते का—जगापासून अलिप्त, एकलकोंडे, निरुपयोगी आणि रिक्त? तसे असल्यास, निराश होऊ नका. कारण एकलकोंडेपणा हा काही आनंदाचा नसला, तरी तो एखादा घातक रोग नाही. सरळसोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, एकलकोंडेपणा हा एक संकेत आहे. भूक लागली म्हणजे जेवण हवे आहे असा संकेत मिळतो. एकलकोंडेपणामुळे तुम्हाला साहचर्य, जवळीक, सलगी यांची गरज आहे असा संकेत मिळतो. जिवंत राहण्यासाठी आपल्याला जेवणाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे, आनंद मिळावा म्हणून आपल्याला साहचर्य हवे असते.
तुम्ही कधी जळते निखारे पाहिले आहेत का? त्यातून एक विस्तव बाहेर काढल्यास, तो विझतो. पण पुन्हा निखाऱ्यात टाकल्यावर,
पुन्हा जळू लागतो! अशाचप्रकारे, आपण मानव देखील अलिप्ततेत असताना दीर्घ काळापर्यंत ‘सतेज’ राहत नाही किंवा चांगल्यारितीने कार्य करू शकत नाही. साहचर्याची आवश्यकता आपल्या स्वभावातच अंतर्भूत आहे.एकटे परंतु एकलकोंडे नाही
निबंधकार हेन्री डेवीड थॉरो यांनी लिहिले: “एकान्तवासाइतका साथ देणारा सहचर मला कधीच लाभला नाही.” तुम्ही याजशी सहमत आहात का? “होय,” असे २० वर्षांचा शरद म्हणतो. “मला निसर्ग खूप आवडतो. काही वेळेस मी माझ्या लहानशा बोटीत बसून तलावाकडे जातो. तिकडे मी तासन्तास एकटाच बसून राहतो. यामुळे मी जीवन कसं जगत आहे याचे चिंतन करायला मला वेळ मिळतो. खरंच खूप छान वाटतं.” एकवीस वर्षांचा स्टीवन हे मान्य करतो. “मी एका भल्यामोठ्या निवास इमारतीत राहतो,” असे तो म्हणतो, “आणि काहीवेळा नुसतं एकटं असावं म्हणून मी गच्चीवर जातो. मी काही गोष्टींवर विचार करतो आणि प्रार्थनाही करतो. त्यामुळे ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं.”
होय, उचितपणे वापर केल्यास एकान्तवासातील क्षण आपल्याला अतीव समाधान देऊ शकतात. येशू देखील अशा क्षणांचा आनंद लुटायचा: “मग [येशू] सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.” (मार्क १:३५) लक्षात घ्या, ‘मनुष्य काही क्षणासाठी एकटा असावा हे त्याच्यासाठी बरे नाही’ असे देवाने म्हटले नाही. याउलट, देवाने म्हटले, “मनुष्य [एकटाच] असावा” हे बरे नाही. (तिरपे वळण आमचे.) (उत्पत्ति २:१८-२३) यास्तव, दीर्घ कालावधींच्या अलिप्ततेमुळे एकलकोंडेपणा निर्माण होऊ शकतो. बायबल इशारा देते: “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.”—नीतिसूत्रे १८:१.
तात्पुरता एकलकोंडेपणा
काहीवेळा आपल्या नियंत्रणात नसणाऱ्या परिस्थितींमुळे एकलकोंडेपणा आपल्यावर लादला जातो, जसे की, एखाद्या नवीन ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे
निकट मित्रांपासून दूर होणे. स्टीवन म्हणतो: “घरी असताना, जेम्स आणि मी सख्ख्या भावांपेक्षा जवळचे होतो. मी स्थलांतर केल्यानंतर, मला त्याची आठवण येणार हे ठाऊक होतं.” स्टीवन, जणू विलग होण्याचा तो क्षण पुन्हा अनुभवत असल्यासारखा अंमळ थांबतो. “विमानात जाण्याची वेळ आली तेव्हा मला गहिवरून आलं. आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि मग मी निघून गेलो. मला वाटलं, की जणू माझ्याजवळची एखादी मौल्यवान गोष्ट नाहीशी झालीय.”स्टीवनला त्याच्या नवीन वातावरणात कसे वाटले? “फारच कठीण होतं,” तो म्हणतो. “घरी असताना माझ्या मित्रांना मी प्रिय होतो, पण इथं मी ज्यांच्यासोबत काम करायचो त्या काही लोकांनी जणू मी काही कामाचा नाही असं मला वागवलं. मला आठवतं, मी घड्याळाकडे पाहून चार तास मागे मोजून (तो वेळातील फरक होता) जेम्स आणि मी यावेळेस काय करत असलो असतो असा विचार करायचो. मला खूपच एकलकोंडेपणा जाणवायचा.”
सर्वकाही सुरळीत नसते, तेव्हा आपल्या मनात गतकाळात आपण घालवलेल्या सुखद काळांचा विचार येत असतो. तथापि, बायबल म्हणते: “सांप्रतच्यापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको.” (उपदेशक ७:१०) असा सल्ला का दिला आहे?
एक गोष्ट म्हणजे, परिस्थिती बदलल्याने आपल्यालाच फायदा होऊ शकतो. यास्तव, संशोधक बहुतेक वेळा “तात्पुरता एकलकोंडेपणा” अशी ही संज्ञा वापरतात म्हणून स्टीवन आपल्या एकलकोंडेपणावर मात करू शकला. कसे बरे? “ज्या व्यक्तीला माझी काळजी आहे तिच्यासोबत याविषयी बोलल्याने मदत मिळाली. माणसाला गतकाळाच्या गोष्टींवरच जगता येत नाही. मी
आपणहून इतर लोकांना भेटू लागलो, त्यांच्याबद्दल आस्था दाखवू लागलो. त्याचा फायदा झाला; मला नवीन मित्र मिळाले.” जेम्सविषयी काय? ‘माझा अंदाज चुकीचा निघाला. अलिप्त झाल्याने आमची मैत्री काही संपली नाही. एकदा मी त्याला फोन केला. आम्ही चक्क सव्वा तास मनसोक्त गप्पा मारल्या.’चिरकालीन एकलकोंडेपणा
परंतु, काहीवेळा एकलकोंडेपणाचे सलणारे दुःख तसेच राहते आणि त्यातून बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही. रॉनी, हा माध्यमिक शालेय विद्यार्थी सांगतो: “आठ वर्षांपासून मी या प्रांतातील शाळेत जात आहे पण या सबंध काळात मी एकालाही मित्र बनवू शकलो नाही! . . . मला काय वाटतं हे कोणालाच माहीत नाही आणि त्याची काळजी कोणालाच नाही. काहीवेळा मला असं वाटतं, की यापुढे मी बिलकुल सहन करू शकणार नाही!”
रॉनीप्रमाणे, अनेक किशोरवयीनांना, चिरकालीन एकलकोंडेपणा जाणवतो. हा तात्पुरत्या एकलकोंडेपणापेक्षा अतिशय गंभीर आहे. वास्तविक पाहता, संशोधक म्हणतात की, या दोन्हीत, “सर्दी आणि न्यूमोनिआ यांच्याइतका फरक आहे.” पण न्यूमोनिआ बरा केला जाऊ शकतो त्याचप्रमाणे चिरकालीन एकलकोंडेपणावर देखील मात केली जाऊ शकते. पहिले पाऊल म्हणजे, त्याचे मूळ कारण समजून घेण्याचा प्रयत्न करणे. (नीतिसूत्रे १:५) तसेच, १६ वर्षांची ऱ्हॉन्डा चिरकालीन एकलकोंडेपणाच्या सर्वसामान्य कारणाकडे बोट दाखवून म्हणते: “माझ्या मते, मला फार एकलकोंडेपणा यासाठी वाटतो कारण—एक तर, आपलं स्वतःविषयीचं मत चांगलं नसलं तर आपल्याला मित्र असू शकत नाहीत. आणि दुसरं म्हणजे, मी स्वतःबद्दल समाधानी नाही.”—अमेरिकेत एकलकोंडे (इंग्रजी).
ऱ्हॉन्डाच्या एकलकोंडेपणासाठी ती स्वतःच कारणीभूत आहे. तिच्या कम-स्वाभिमानामुळे इतरांसोबत मिसळण्यास आणि मित्र बनवण्यास अडथळा निर्माण होतो. एक संशोधक म्हणतात: “‘मी सुंदर नाही,’ ‘मी निरस आहे,’ ‘मी निरुपयोगी आहे,’ अशाप्रकारच्या कल्पना चिरकालीन एकलकोंडेपणा अनुभवणाऱ्यांमध्ये सर्रास दिसून येतात.” म्हणून एकलकोंडेपणावर मात करण्याची गुरुकिल्ली, स्वाभिमान वाढवण्यावर अवलंबून असू शकते. (अध्याय १२ पाहा.) बायबलनुसार, ममता, सौम्यता आणि लीनता ह्यांनी युक्त असलेला “नवा मनुष्य” तुम्ही धारण कराल, तसतसा तुमचा स्वाभिमान निश्चितच वाढेल!—शिवाय, तुम्ही स्वतःविषयी संतुष्ट असण्याचे, शिकला तर इतरजण तुमच्या अपीलकारक गुणांनी आकर्षित होतील. पण ज्याप्रमाणे फूल उमलल्यावरच त्याचे सगळे रंग दिसतात त्याचप्रमाणे तुम्ही इतरांशी मिसळल्यावरच ते तुमच्यातील गुण पूर्णपणे समजू शकतील.
संकोच मोडणे
‘एकलकोंड्या व्यक्तीसाठी सर्वात उत्तम सल्ला म्हणजे तिने इतर लोकांसोबत मिसळावे,’ असे यू.एस. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थमधील एक अलीकडील प्रकाशन म्हणते. हा सल्ला, ‘आपली अंतःकरणे विशाल करा’ आणि “समसुखदुःखी” असा किंवा सहानुभूती दाखवा या बायबलच्या मार्गदर्शनाच्या सुसंगतेत आहे. (२ करिंथकर ६:११-१३; १ पेत्र ३:८) तो सार्थ ठरतो. इतरांची काळजी घेतल्याने तुमच्या मनातून एकलकोंडेपणा नाहीसा होतो इतकेच नव्हे तर इतरांना तुमच्याबद्दल आस्था बाळगण्यासही प्रवृत्त केले जाते.
म्हणून इतरजण आपल्याकडे येऊन अभिवादन करेपर्यंत वाट पाहायची नाही असे एकोणीस वर्षांच्या नतालीने ठरवले. ‘मी सुद्धा मनमिळाऊ असलं पाहिजे,’ असे ती म्हणते. ‘नाहीतर लोकांना वाटायचं मी भावखाऊ आहे म्हणून.’ तर स्मितहास्याने सुरवात करा. दुसरी व्यक्ती कदाचित तुम्हाला पाहून स्मितहास्य करील.
पुढे, एखादे संभाषण सुरू करा. १५ वर्षांची लिलियन मान्य करते: “पहिल्याच वेळी अनोळखी लोकांकडे जाऊन बोलायची मला भीतीच वाटते. ते माझ्याकडे दुर्लक्ष करतील असं वाटायचं.” लिलियन संभाषण कसे सुरू करते? ती म्हणते: “मी लहानसहान प्रश्न विचारते, जसं की, ‘तुम्ही कुठले आहात?’ ‘तुम्ही अमुकअमुक व्यक्तीला ओळखता का?’ आणि जर का, एखादी व्यक्ती दोघांच्या ओळखीची निघाली तर थोड्या वेळानंतर पाहिलंत, तर आमच्या चक्क गप्पा रंगलेल्या असतात.” त्याचप्रमाणे, चांगुलपणाची कृत्ये आणि उदार आत्मा तुम्हाला मौल्यवान मैत्री वाढवण्यास मदत करू शकतात.—हे देखील लक्षात असू द्या, की तुमचे मन कधीच न दुखावणारा मित्र तुम्हाला असू शकतो. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना म्हटले: “मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.” (योहान १६:३२) यहोवा तुमचा देखील सर्वात जवळचा मित्र बनू शकतो. बायबलचे वाचन करून आणि त्याच्या निर्मितीचे निरीक्षण करून त्याचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करा. प्रार्थनेद्वारे त्याच्यासोबतची मैत्री बळकट करा. सरतेशेवटी, यहोवा देवासोबतची मैत्रीच एकलकोंडेपणावरील सर्वोत्तम तरणोपाय आहे.
तरीही, वेळोवेळी तुम्हाला एकलकोंडे वाटत असले तर अनावश्यक चिंता करू नका. ती अगदीच सामान्य गोष्ट आहे. पण, अतिशय बुजरा स्वभाव तुम्हाला मित्र बनवण्यापासून आणि इतरांसोबत सहवास राखण्यापासून रोखत असल्यास काय?
चर्चेसाठी प्रश्न
◻ एकटेपणा नेहमीच वाईट असतो का? एकांतवासाचे फायदे आहेत का?
◻ पुष्कळवेळा एकलकोंडेपणा तात्पुरता का असतो? तुमच्या स्वतःच्या बाबतीत हे खरे असल्याचे तुम्हाला आढळले आहे का?
◻ चिरकालीन एकलकोंडेपणा काय आहे आणि तुम्ही त्याला लढा कसा देऊ शकता?
◻ इतरांसोबतचा ‘संकोच मोडण्याचे’ काही मार्ग कोणते आहेत? तुमच्या बाबतीत कोणती गोष्ट फायदेकारक ठरली आहे?
[११९ पानांवरील संक्षिप्त आशय]
‘एकलकोंड्या व्यक्तीसाठी सर्वात उत्तम सल्ला म्हणजे तिने इतर लोकांसोबत मिसळावे,’ असे यू.एस. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थ म्हणते
[Pictures on page 116, 117]
दूर असतानाही मित्र आपापसांत संपर्क ठेवू शकतात
[११८ पानांवरील चित्र]
एकांत आल्हाददायक असू शकतो