व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अतिशय प्रिय असलेली पत्नी

अतिशय प्रिय असलेली पत्नी

अध्याय ५

अतिशय प्रिय असलेली पत्नी

१-४. पतीने प्रीतीची खात्री देण्याविषयी स्त्रिया काय तक्रार करतात?

 एक स्त्री तक्रारीच्या सुरात दुसरीला म्हणाली, ‘माझ्यावर माझ्या पतीचे प्रेम आहे हे मला माहीत आहे पण ते तसे कधी बोलून दाखवीत नाहीत. मी अगदी पिच्छा पुरविला तर कधीतरी म्हणतातही, पण त्यांनी स्वतःहून तसे बोलून दाखविले तर किती चांगले वाटेल.’

दुसरी उत्तरली: ‘होय. पुरूष असेच असतात. ‘माझ्यावर तुमचे प्रेम आहे का?’ असे एकदा मी माझ्या पतीना विचारले. तेव्हा ते म्हणाले, “मी तुझ्याशी लग्न केले नाही का? मी तुझे पालनपोषण करतो, तुझ्यासोबत राहातो, माझे प्रेम नसते तर हे सर्व मी केले नसते.”’

एक क्षण थांबून ती पुढे म्हणाली: ‘परवा संध्याकाळी मात्र एक हृदयस्पर्शी गोष्ट घडली. त्या दिवशी मी त्यांचे टेबल आवरत होते. एका खणामध्ये मला एक फोटो सापडला. माझ्या जुन्या अल्बममधला तो फोटो मी त्यांना दाखवला होता. सात वर्षाची असताना पोहण्याच्या कपडयात काढलेला तो माझा फोटो होता. त्यांनी अल्बममधून काढून तो आपल्या टेबलाच्या खणात ठेवला होता.’

हे आठवताना तिला हसू येत होते. मग आपल्या मैत्रिणीकडे वळून ती म्हणाली, ‘त्या दिवशी संध्याकाळी कामाहून परतल्यावर ह्‍यांना मी त्याबद्दल विचारले. त्यांनी तो फोटो आपल्या हातात घेतला आणि हसले व म्हणाले, “मला ही छोकरी फार आवडते.” मग फोटो खाली ठेवून दोन्ही हातांनी माझा चेहरा धरून म्हणाले, “ती नंतर काय झाली, तीही आवडते.” आणि हळूवारपणे त्यांनी माझे चुंबन घेतले. माझे डोळे ओलावले.’

५. पतीने मनःपूर्वक प्रीती करण्यासाठी पत्नीने कसे आचरण ठेवावे?

आपण आपल्या पतीला अतिशय प्रिय आहोत हे माहीत असलेल्या स्त्रीला मनात सुरक्षित आणि समाधानी वाटते. आपल्या पत्नीवर अशी प्रीती करावी असा सल्ला देववचन पुरुषांना देते. “पतींनो आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी, जो आपल्या पत्नीवर प्रीती करितो तो स्वतःवरच प्रीती करितो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही. तर तो त्याचे पालनपोषण करितो . . . ती उभयतां एक देह होतील.” (इफिसकर ५:२८, २९, ३१) आपण आधी पाहिल्याप्रमाणे पत्नीने पतीविषयी आदर बाळगावा. पण पतींनी आपली वागणूक अशी ठेवावी की ते त्या आदरास पात्र ठरतील. येथेही, तुमच्या पतीला तुमच्यावर प्रीती करण्याचा सल्ला देताना, तीच गोष्ट लक्षात ठेवावी: तुमची वागणूक अशी ठेवा की त्यांना तुमच्यावर मनापासून प्रेम करावेसे वाटावे.

तुम्ही सहयोग देता का?

६, ७. (अ) उत्पत्ती २:१८ ला अनुसरून यहोवाने स्त्रीची उत्पत्ती कोणत्या भूमिकेसाठी केली? (ब) पत्नीने आपल्या पतीला खरे सहकारी होण्यासाठी काय करण्याची गरज आहे?

पत्नी प्रिय वाटण्यासाठी, नुसते पतीच्या आज्ञेत राहाणे पुरेसे नाही. शिकवून तयार केलेला एखादा घोडा किंवा कुत्राही त्याच्या आज्ञेत राहील. एदेन बागेत आदामाबरोबर अनेक प्राणी होते व ते त्याच्या आज्ञेत होते. परंतु त्याच्यासारखे मानवजातीतील आणखी कोणी नव्हते. त्याला अनुरूप अशा बुद्धिमान साहाय्यकाची गरज होती की जो त्याला सहकार्य देणारा असावा व त्याच्या कामात मदतनीस असावा. यहोवा देव म्हणाला: “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. तर त्याच्यासाठी अनुरूप सहकारी मी करीन.”—उत्पत्ती २:१८.

त्याच्यावर प्रीती करणारी व त्याचा आदरच करणारी नव्हे तर त्याच्या निर्णयांमध्ये त्याला आधार व मदत देणारी पत्नी पतीला हवी असते. उभयतांमध्ये चर्चा केल्यानंतर एकमताने निर्णय घेतल्यास ही गोष्ट कठीण नसते. परंतु निर्णय घेताना तुमचा सल्ला घेतलाच नसेल अथवा तुम्ही त्या निर्णयाशी सहमत नसाल तर ते तेवढे सोपे जाणार नाही. अशा प्रसंगी तुम्ही निष्ठेने आपल्या पतीला सहकार्य देऊन कायद्याचे वा देववचनाचे उल्लंघन होत नसल्यास त्याच्या निर्णयानुसार काम करण्यास मदत करता का? की तो अयशस्वी होण्याची आशा बाळगून हट्टीपणे असहकार पुकारता, म्हणजे मग ‘मी तुम्हाला सांगितलेच होते ना’ असे तुम्हाला म्हणता येईल? तुम्ही त्या निर्णयाविषयी कितीही साशंक असलात तरी तुम्ही झटून कामाला लागलात तर तुमची निष्ठा पाहून तुमच्याविषयी त्याला अधिक प्रीती वाटेल असे तुम्हाला वाटत नाही का?

८. प्रमुखपद योग्यरित्या राबविण्यास पत्नी पतीस कशा रीतीने उत्तेजन देऊ शकेल?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबप्रमुखाचे स्थान बळकाविण्याचा मुळीच प्रयत्न करू नका! तसे करण्यात तुम्ही जर यशस्वी झालातच तर तुम्हाला परस्परांविषयी नावड उत्पन्‍न होईल. त्याने जसा पुढाकार घ्यायला हवा तसा तो घेत नसेल. त्याला पुढाकार घेण्यास तुम्ही उत्तेजन देऊ शकाल का? पुढाकार घेण्याच्या प्रयत्नांचे तुम्ही कौतुक करता का? त्याच्या पुढाकाराला तुम्ही उत्तेजन व सहकार्य देता का? किंवा त्याने ठरविलेले काम होणे शक्यच नाही कारण ते संपूर्ण चुकीचे आहे असे तुम्ही सांगता? पतीमध्ये पुढाकाराची उणीव असण्यास कधी कधी पत्नी कारणीभूत असते. उदाहरणार्थ, त्याच्या कल्पना ती तुच्छ लेखीत असेल, त्याच्या कामाला विरोध करीत असेल अथवा त्याचे काम बिनतोड झाले नसल्यास ‘मी म्हटलेच होते’ यासारखे उद्‌गार काढीत असेल. अशा वागणूकीमुळे पती हळू हळू खंबीरपणा व निर्णय घेण्याच्या बाबतीत उणा पडू लागतो. या उलट तुमची निष्ठा, सहकार्य व विश्‍वासामुळे पतीला बळ प्राप्त होऊन तो यशस्वी होतो.

“कर्तबगार पत्नी”

९. कर्तबगार पत्नीविषयी नीतीसूत्रे ३१:१० काय म्हणते?

प्रियतम पत्नी होण्यासाठी घराच्या जबाबदाऱ्‍याही तुम्ही चांगल्या सांभाळल्या पाहिजेत. अशा स्त्रीबद्दल पवित्र शास्त्र म्हणते, “तिचे मोल मोत्यांहूनही अधिक आहे.” (नीतीसूत्रे ३१:१०) तुम्ही अशी पत्नी आहात का? तुम्हाला तसे व्हावेसे वाटते का?

१०, ११. नीतीसूत्रे ३१:१५ मधील वर्णन आपल्याला लागू पडते हे पत्नी कशा रीतीने दाखवू शकते?

१० “कर्तबगार पत्नी”ची चर्चा करताना नीतीसूत्रे म्हणते: “रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्‍नसामग्रीची व्यवस्था करते.” (नीतीसूत्रे ३१:१५) अनेक तरुण मुलींना त्यांच्या आयांनी स्वयंपाक करावयास शिकविलेले नसल्याने त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीस त्यांना अडचणी येतात. परंतु त्या नंतरही ते शिकू शकतात. आणि शहाणी स्त्री स्वयंपाक उत्तम रितीने करण्यास शिकेल! स्वयंपाक ही एक कला आहे. जेवण सुग्रास असल्यास त्याने पोट तर भरतेच पण त्याला मनापासून दादही मिळते.

११ स्वयंपाकाच्या बाबतीत बरेच शिकावे लागते. अन्‍नाच्या पोषक गुणांची माहिती असणे फायद्याचे असते. त्यामुळे तुम्ही आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्याकडे लक्ष पुरवू शकता. परंतु नुसते पोषक अन्‍न पतीच्या ताटात घातल्याने तो आनंदी होणार नाही. पवित्र शास्त्र सांगते, इसहाकाच्या पत्नीला—रिबेकाला नवऱ्‍याच्या आवडीचे ‘चविष्ट’ अन्‍न बनविता येत होते. (उत्पत्ती २७:१४) अनेक स्त्रियांना तिचा कित्ता गिरविता येईल.

१२. नीतीसूत्रे ३१:१४ ला अनुसरुन स्त्रीच्या वर्तनात आणखी कोणत्या गोष्टीची भर घालता येईल?

१२ अनेक प्रदेशात, दिवसाला लागणाऱ्‍या वस्तू स्त्रिया दररोज सकाळी विकत घेतात. काही ठिकाणी आठवड्यातून एकदा त्या बाजारहाट करून नाशवंत चिजा शीतपेटीत घालून ठेवतात. परिस्थिती कशीही असली तरी असलेल्या मिळकतीमध्ये हात राखून, नीटनेटका संसार करणाऱ्‍या पत्नीचे पतीला नेहमी कौतुक वाटते. चांगला कपडा व अन्‍नपदार्थ यांची तिला पारख असली, किंमती माहीत असल्या तर समोर दिसेल तो पदार्थ मागेल त्या किंमतीला ती घेणार नाही. उलट नीतीसूत्रे ३१:१४ मध्ये म्हटल्याप्रमाणे: “ती व्यापारी गलबतांसारखी आहे. ती अन्‍नसामग्री दुरून आणिते.”

१३. घरकामाच्या बाबतीत, नीतीसूत्रे ३१:२७ ला अनुसरून, कर्तबगार पत्नीकडून काय अपेक्षा करता येतील?

१३ आपल्या कामाबद्दलची ही जाणीव तिच्या घरातही जाणवली पाहिजे. कर्तबगार पत्नीचे गुणविशेष सांगताना नीतीसूत्रे ३१:२७ पुढे म्हणते: “ती आपल्या कुटुंबाच्या आचार-विचाराकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्‍न खात नाही.” सकाळी उशीरापर्यंत झोपणे आणि शेजाऱ्‍यांशी निरर्थक गप्पा मारणे यासारखी कामे तिची नव्हत. आजार वा इतर प्रसंग यामुळे घरकामात थोडा खंड पडला तरी बहुधा तिचे घर स्वच्छ व नीट असेल. अनपेक्षित पाहुणे वा मित्रमंडळी आल्यास आपले घर अस्ताव्यस्त नसेल याची पतीला खात्री बाळगता येईल.

१४, १५. वस्त्रे व अलंकार यांच्या बाबतीत पवित्र शास्त्र स्त्रियांना काय सल्ला देते?

१४ आपण कसे दिसतो याकडे लक्ष द्यावे असे बहुतेक स्त्रियांना सांगण्याची गरज पडत नाही. परंतु काहींना मात्र जरुर सांगावेसे वाटते. स्वतः कसे दिसतो याविषयी उदासीन असलेल्या व्यक्‍तिबद्दल फारसा आपलेपणा वाटत नाही. “स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे” असा सल्ला पवित्र शास्त्र देते. त्याचप्रमाणे विनाकारण लक्ष वेधून घेणाऱ्‍या केशभूषा, वस्त्रप्रावरणे व अलंकार यावर भर देऊ नये असेही ते सांगते.—१ तीमथ्य २:९.

१५ वेषभूषेपेक्षा वागणूक अधिक महत्त्वाची आहे. ख्रिस्ती पत्नींना प्रेषित पेत्र सांगतो की “सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे.” (१ पेत्र ३:३, ४) तसेच कर्तृत्ववान पत्नीचे स्वभाव विशेष सांगताना नीतीसूत्रे म्हणतात: “ती गरिबासाठी मूठ उघडिते” आणि “तिच्या जिव्हेवर दयेचे शिक्षण असते.” ती स्वार्थी व भांडखोर नसून उदार व दयाळू असते. (नीतीसूत्रे ३१:२०, २६) पुढे म्हटले आहे, “सौंदर्य भुलविणारे व लावण्य व्यर्थ आहे. परंतु यहोवाचे भय बाळगणाऱ्‍या स्त्रीची प्रशंसा होते.”—नीतीसूत्रे ३१:३०.

१६. अशा स्त्रीबद्दल मर्मज्ञ पतीला काय वाटेल?

१६ जिचा दृष्टिकोन देवाशी मिळता जुळता आहे तिचा पती (मग तो कोणीही असो) अशा स्त्रीवर मनापासून प्रीती करील. नीतीसूत्राच्या लेखकाप्रमाणेच त्यालाही वाटेल की, “बहुत स्त्रियांनी सद्‌गुण दाखविले आहेत. पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस.” (नीतीसूत्रे ३१:२८, २९) आणि मुद्दाम विचारल्याशिवायही तो आपली भावना पत्नीजवळ व्यक्‍त करील.

लैंगिक विषयाबाबतचा तुमचा दृष्टिकोन फरक घडवितो

१७, १८. लैंगिक विषयाच्या बाबतीमधील पत्नीच्या दृष्टिकोनाचा पतीवर कसा परिणाम होईल?

१७ अनेक विवाहित जोडप्यामधील समस्याचे मूळ असमाधानकारक लैंगिक संबंधात असते. काही वेळा पत्नीच्या शारीरिक व मानसिक गरजांकडे पतीने दुर्लक्ष केल्याने त्या निर्माण होतात तर काही वेळा पत्नी, समागमातील शारीरिक व मानसिक सुखात पतीशी एकरूप होत नाही. समागमामध्ये पती व पत्नी स्वेच्छेने व परस्परांच्या ओढीने एकत्र आल्यास त्यात परस्परांविषयीची प्रीती व्यक्‍त होते.

१८ पतीमध्ये आपलेपणाचा अभाव असल्याने पत्नी लैंगिक दृष्ट्या अनुत्साही असू शकते. परंतु पत्नीची उपेक्षा पतीला दुःखी करते तसेच, या बाबतीतील तिची नावड पतीमध्ये नपुंसकत्व उत्पन्‍न करू शकते अथवा त्यामुळे तो दुसऱ्‍या कोणा स्त्रीकडे आकृष्ट होण्याचा संभव असतो. ‘आलिया भोगासी असावे सादर’ अशा मनोवृत्तीने पत्नी जर समागमास सिद्ध होत असेल तर पत्नीचे आपल्यावर प्रेम नाही असा अर्थ पती काढू शकेल. लैंगिक प्रतिसाद भावनांवर अवलंबून असतो, आणि पत्नी तसा प्रतिसाद देत नसेल तर तिने आपला दृष्टिकोन तपासून पाहिला पाहिजे.

१९. (अ) आपल्या वैवाहिक सोबत्याला त्याचा लैंगिक हक्क बराच काळ नाकारणे अयोग्य असल्याचे पवित्र शास्त्र कशा प्रकारे दाखविते? (ब) लैंगिक बाबतीत जोडप्याच्या वर्तनाची योग्यता वा अयोग्यता तिऱ्‍हाईताने ठरविणे अयोग्य का आहे?

१९ पती व पत्नीला पवित्र शास्त्र सल्ला देते की त्यांनी “एकमेकांची वंचना करू नये.” आपल्या सोबत्याला शिक्षा देण्यास वा त्याच्यावरचा राग प्रदर्शित करण्यासाठी आपल्या लैंगिक क्षमतेचा वापर करण्यास देववचन परवानगी देत नाही. उदाहरणार्थ, पत्नीने कित्येक आठवडे वा महिने पतीचा हक्क नाकारू नये. जसा ‘पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा’ तसाच ‘पत्नीनेही पतीला द्यावा.’ (१ करिंथकर ७:३-५) याचा अर्थ असा नव्हे की पत्नीने नैतिक दृष्ट्या किळसवाण्या अनैसर्गिक कृत्यांना संमती द्यावी. तसेच आपल्या पत्नीविषयी प्रीती व आदर बाळगणारा पती पत्नीकडून तशी अपेक्षाही करणार नाही. “प्रीती गैरशिस्त वागत नाही.” (१ करिंथकर १३:४, ५) विवाहित जोडप्याच्या वागणुकीविषयी ते योग्य वा अयोग्य याचा निर्णय तिऱ्‍हाईताने घेऊ नये. यहोवा देवाच्या भक्‍तांनी कोणत्या गोष्टी टाळाव्या ते १ ले करिंथकर ६:९-११ मध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे: “जारकर्मी, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे.” (लेवीय १८:१-२३ पडताळून पहा.) ‘नवी नीती’—खरे तर अनीती—आचरणारे काही आधुनिक स्वातंत्र्यवादी अशा निषिद्ध लैंगिक आचरणाला पुष्टी देत आहेत. तर काही पुराणमतवादी अशा बंधनात भर घालू इच्छितात. पण पवित्र शास्त्र समतोल दृष्टिकोन दाखवून देते. सर्वसाधारणपणे विवाहसंबंधात इतर सर्व गोष्टी, म्हणजे प्रीती, आदर, विचारांची देवाण-घेवाण, समजूतदारपणा या गोष्टी असतील तर सहसा लैंगिक बाबतीत समस्या येत नाहीत.

२०. पत्नीने आपली लैंगिक क्षमता सौद्यासाठी वापरल्यास काय परिणाम होतात?

२० पतीला अतिशय प्रिय असलेली पत्नी आपली लैंगिक क्षमता सौदा करण्यास वापरत नाही. सर्व पत्नी असा सौदा करीत नाहीत, पण काही करतात. अनेक तऱ्‍हांनी पतीकडून फायदे उकळण्याकरता त्या आपल्या लैंगिक क्षमतेचा वापर करतात. त्याचा परिणाम काय होतो? तुम्हाला साडी विकणाऱ्‍याविषयी आपुलकी वाटत नाही, होना? तसेच फायदे मिळविण्यासाठी आपल्या लैंगिक क्षमतेचा व्यापार करणाऱ्‍या पत्नीविषयी पतीलाही प्रीती वाटत नाही. अशा स्त्रीला आर्थिक-भौतिक लाभ होईल. परंतु तिला फार मोठा भावनात्मक तोटा होईल.

रडणाऱ्‍या व हट्टी स्त्रिया

२१-२३. शमशोनाच्या बाबतीत दाखविल्याप्रमाणे स्त्रियांच्या रडण्याने व हट्टाने सुखाला सुरुंग कसा लागतो?

२१ शमशोन अतिशय शक्‍तिशाली पुरुष होता. परंतु आपल्याच मनाप्रमाणे गोष्टी व्हाव्या म्हणून रडारड व हट्ट करणाऱ्‍या स्त्रियांच्या भडिमारापुढे त्याने हात टेकले. एका प्रसंगी त्याच्या वाग्दत्त वधूने रड-रडून त्याला पेचात टाकले. शास्ते १४:१६, १७ मध्ये म्हटल्याप्रमाणे, ती “रडत म्हणू लागली: ‘तुमचे माझ्यावर प्रेम नाही, तुम्ही माझा केवळ द्वेष करिता, माझ्यावर प्रीती करीत नाही, माझ्या लोकांना तुम्ही कोडे घातले. पण मला मात्र त्याचा अर्थ सांगितला नाही.’ तो तिला म्हणाला, ‘मी ते प्रत्यक्ष माझ्या आई-वडिलांना सांगितले नाही, तर ते काय तुला सांगू?’” त्याच्या समजूतदारपणाच्या सल्ल्याचा काहीही परिणाम झाला नाही. जेव्हा भावना उफाळून येतात तेव्हा सहसा परिणाम होतही नाही. “मेजवानीच्या सातव्या दिवसापर्यंत ती त्याच्यासमोर रडत राहिली. तिने फारच गळ घातल्यामुळे त्याने सातव्या दिवशी ते तिला सांगितले. लगेच तिने ते कोडे आपल्या लोकांना उलगडून सांगितले.”

२२ तुमच्या मनाप्रमाणे त्याने काम केले नाही तर तुमच्या पतीचे तुमच्यावर प्रेमच नाही असा विचार करू नका. शमशोनाच्या वाग्दत्त वधूनेही त्याच्यावर असाच आरोप केला. परंतु प्रत्यक्षात तिचेच त्याच्यावर प्रेम नव्हते. तो बेजार होईपर्यंत तिने त्याचा पिच्छा पुरविला आणि शेवटी त्याने कोड्याचा अर्थ सांगितल्याबरोबर, त्याचे गुपित त्याच्या वैऱ्‍यांना सांगून तिने त्याचा विश्‍वासघात केला. सरतेशेवटी तिने दुसऱ्‍याच माणसाशी विवाह केला.

२३ त्यानंतर शमशोन, दलीला नावाच्या स्त्रीच्या प्रेमात पडला. ती कदाचित दिसावयास आकर्षक असेल, पण मनःपूर्वक प्रेम करण्याच्या लायकीची होती का? स्वतःच्या स्वार्थासाठी शमशोनाकडून माहिती मिळविण्यासाठी तिने त्याच्यामागे भुणभुण लावली. तो वृतांत सांगतो, “तिच्या ह्‍या रोजच्या कटकटींमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला.” या सर्वांचा, शेवटी अतिशय दुःखद परिणाम झाला.—शास्ते १६:१६.

२४-२७. (अ) पत्नीच्या हट्टामुळे काय परिणाम होतात असे नीतीसूत्रे सांगतात? (ब) असा सल्ला शास्त्रवचने स्त्रीला खासपणे का देतात? (क) आपल्या पत्नीसाठी चांगल्या गोष्टी करण्यास पतीला कशाने प्रोत्साहन मिळेल?

२४ रडणे व कटकट करणे शहाणपणाचे नव्हे. त्यामुळे विवाहबंधनावर ताण पडतो. त्यांच्यामुळे पती पत्नीपासून दुरावतो. अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा इशारा पवित्र शास्त्र देते. “जो गत गोष्टी घोकीत बसतो त्याला मित्र अंतरतात.” “बायकोच्या कटकटी सतत गळणाऱ्‍या ठिपक्यासारख्या आहेत.” “भांडखोर बायकोजवळ राहून संताप करून घ्यावा त्यापेक्षा अरण्यवास पुरवला.” “पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळते ठिपके व कटकटी बायको, ही सारखीच आहेत. तिला आवरणारा म्हणजे वाऱ्‍याला आवरणारा होय. तेल बोटांच्या चिमटीने उचलण्यासारखे ते आहे.”—नीतीसूत्रे १७:९; १९:१३; २१:१९; २७:१५, १६.

२५ पवित्र शास्त्रात स्त्रीविषयी असे उद्‌गार का काढले असतील? बहुधा, स्त्रिया अधिक भावनाप्रधान असल्याने व पुरुषांपेक्षा त्या आपल्या भावना झटकन प्रकट करणाऱ्‍या असल्यामुळे किंवा त्याशिवाय इतर शस्त्र वा उपाय नाही असेही त्यांना वाटत असल्यामुळे आणि कुटुंबप्रमुख या नात्याने पुरुष लहरीपणाने वागत असल्यास त्यावर भावनात्मक दडपण आणणे हाच उपाय आहे असे पत्नीला वाटत असावे. परंतु तुम्ही पत्नींनी असे वागू नये आणि पतीनेही तिच्यावर असे वागण्याची पाळी येऊ देऊ नये.

२६ असाही प्रसंग येतो की जेव्हा तुम्हाला काही बरोबर झाल्याचे वाटत नसेल आणि तुमच्या इच्छेविरुद्ध अश्रू वाहू लागतात. परंतु आपल्याच मनासारखे व्हावे या हेतूने मुद्दाम रडारड करण्यापेक्षा ते वेगळे आहे.

२७ आपल्या पत्नीवर पतीची प्रीती असेल तर बहुधा व्यक्‍तिगत आवड-निवड बाजूस सारुन तो पत्नीच्या मनासारखेच करतो. तुम्ही आपल्या पतीला खूष करा, पहा, तोही तुम्हाला खूष ठेवण्यासाठी धडपडेल.

“मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय”

२८-३५. (अ) पतीला, पत्नीशी संभाषण करणे अशक्यप्राय करण्याऱ्‍या कोणत्या सवयी असतात ते सांगा. (ब) पती-पत्नीमधील संभाषण सुधारण्यासाठी काय करणे शक्य आहे?

२८ अनेक स्त्रियांची तक्रार असते की त्यांचे पती त्यांच्याशी कधीच बोलत नाहीत. त्यांची चूक असेलही, पण बहुधा पतीला पत्नीशी बोलण्याची इच्छा असली तरी तसे करणे जडच जाते. ते कसे? सर्व स्त्रिया सारख्या नसतात. खाली दिलेल्या प्रकारात तुम्ही मोडता का हे स्वतःला विचारा:

२९ पहिल्या प्रकारच्या स्त्रीला शेजाऱ्‍यापाजाऱ्‍यांशी बोलणे मुळीच कठीण जात नाही. पण तिची पद्धत कशी असते? शेजारीण बोलताना श्‍वास घ्यायला थांबली तेव्हा हिचे बोलणे सुरु होते. ती एक-दोन प्रश्‍न विचारते किंवा एखाद्या नवीनच विषयावर बोलावयास लागते. लवकरच, जिला निम्यात काटले ती पुन्हा तुटलेल्या धाग्यापासून सुरुवात करून बोलू लागते. आपण जे बोलत आहोत त्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही याची दोघींना जाणीव नसते.

३० मग तिचा पती घरी येतो. त्याला काही खास बातमी सांगावयाची असते. घरात शिरता शिरता तो म्हणतो, ‘अग ऐकलस का आज ऑफिसात काय झालं ते . . . ?’ तो त्यापुढे सरकूच शकत नाही. त्याला मध्येच तोडून ती म्हणते, ‘पण तुमच्या शर्टावर हा डाग कसला पडला? जरा जपून चाला. आताच मी फरशी पुसली आहे?’ यानंतर विषयाचा धागा पुन्हा पकडावयास तो बिचकतो.

३१ किंवा ते दोघे मित्र-मंडळीशी बोलत असतात. तो एखादा प्रसंग सांगत असतो. त्यात बारीक सारीक गोष्टी वगळल्या जातात किंवा उलट्या सुलट्या होतात. त्याची बायको त्याचे बोलणे तोडून आधी चुकांची दुरुस्ती करते आणि मग गोष्टीचा एकंदर शेवट सांगू लागते. लवकरच तो एक सुस्कारा टाकून म्हणतो: ‘तूच ते सांग ना.’

३२ दुसऱ्‍या प्रकारची स्त्री पतीला बोलण्यास प्रोत्साहन देते. तिच्या मनात सर्व गोष्टींबद्दल उत्कट जिज्ञासा असते. परंतु वरकरणी ती ते दिसू देत नाही. ती विचारते, ‘तुम्ही कोठे होता?’ ‘तिथे आणखी कोण होते?’ ‘मग काय झाले?’ रोजच्या गोष्टीत तिला रस नसतो. पण खास व गुप्त गोष्टींबाबत तिला अतिशय कुतूहल असते. ती सर्व बोलण्यातून मिळालेल्या शब्दाला शब्द जोडते व त्याला आपल्या कल्पना शक्‍तीची झालर लावते. खरे म्हटल्यास त्यातील काही माहिती गोपनीय असल्याने तिच्या पतीने तिला सांगावयास नको असते. त्याशिवाय काही पत्नीला सांगण्याजोग्या असल्या तरी तिने आणखी कोणास सांगणे योग्य नसते. अशा गोष्टी तिने इतरांना सांगितल्यास त्यांच्यामधील विश्‍वासास तडा जातो. “इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नको.” असा इशारा नीतीसूत्रे २५:९ मध्ये आढळतो. परंतु तिने तसे केल्यास अनेक समस्या उद्‌भवतात. यानंतर पतीला पत्नीशी बोलताना किती मोकळेपणा वाटेल?

३३ तिसऱ्‍या सदरात मोडणारी स्त्री स्वतः फारशी बोलत नाही. ती घरकाम उत्तम जाणते. पण दोन-चार शब्दाखेरीज फारसे ती बोलत नाही. तिच्याशी बोलण्याचा जो कोणी प्रयत्न करतो त्यालाच काय बोलावे यासाठी डोके खाजवावे लागते. ती बुजरी असावी किंवा लहानपणी शिक्षणाची संधी तिला मिळालेली नसेल. कारण काहीही असले तरी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न फोल ठरतो.

३४ प्रकार काहीही असला तरी त्यात बदल करता येतो. संभाषण ही कला आहे. ती शिकता येते. घरकामाशिवाय थोडे चांगले वाचन व इतरांना उपयोगी पडणारी कामे केल्यास त्या स्त्रीला आपल्या पतीसोबत बोलण्यासारखे खूप काही असते, आणि यशस्वी संभाषणासाठी सहभागितेची आवश्‍यकता असते. तेच उत्तम संभाषण, त्यात, दुसऱ्‍याचे म्हणणे त्याला पूर्णपणे मांडू देण्याइतका, आदर असावा लागतो. बोलणाऱ्‍याला स्वतःच्या शब्दात त्याच्या कल्पना व्यक्‍त करू द्याव्या. शिवाय कोणत्या गोष्टी ऐकल्या तरी बोलाव्या किंवा बोलू नये याचेही भान ठेवावे. उपदेशक ३:७ मध्ये म्हटल्याप्रमाणे, “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.”

३५ यासाठीच आपला पती बोलत नाही अशी नुसती तक्रार करण्यापेक्षा, त्याला बोलावेसे वाटेल असे का करू नये? त्याच्या कामात रस घ्या. तो बोलतो तेव्हा लक्षपूर्वक ऐका. तुमच्या उत्तरात व बोलण्यात त्याच्या विषयीची तुमची प्रीती व आदर व्यक्‍त करा. तुम्ही बोलता ते स्फूर्तीदायक व विधायक असावे यावर कटाक्ष ठेवा. लवकरच तुम्हाला असे आढळून येईल की परस्पर संभाषण आनंददायक असेल.

“वचनावाचून मिळवून घेतले”

३६-३८. आपल्याप्रमाणेच पवित्र शास्त्रावर विश्‍वास ठेवणारा साथी असल्यास त्याच्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी कोणते मार्ग अवलंबिता येतील?

३६ अनेक प्रसंगी शब्दांपेक्षा कृती प्रभावी ठरते—विशेषतः जेव्हा एखाद्या स्त्रीच्या पतीचा पवित्र-शास्त्रावर विश्‍वास नसेल तेव्हा, त्यांच्या विषयी प्रेषित पेत्राने म्हटले: “तुमचे भिडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.” (१ पेत्र ३:१, २) पवित्र शास्त्रावर विश्‍वास न ठेवणारे अनेक पती तक्रार करतात की त्यांच्या स्त्रिया त्यांना सतत ‘उपदेश’ करत असतात आणि त्यांना त्याचा राग येतो. याउलट देव-वचनाच्या सत्याने त्यांच्या स्त्रियांमध्ये झालेल्या बदलांमुळे अनेकजणांचा पवित्र शास्त्रावर विश्‍वास बसला आहे. उपदेश ऐकण्यापेक्षा कृतीत आणलेला पाहून अनेकांवर सखोल परिणाम होतो.

३७ तुम्ही जेव्हा आपल्या वैवाहिक सोबत्याशी बोलता तेव्हा, “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे” असे शास्त्र सांगते. बोलण्याची एक वेळ असते. तसेच ते सांगते: “रूपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.” आपला पती निरुत्साही झाला आहे काय? कदाचित कामाच्या ठिकाणी काही बिघडले असेल. अशा वेळी समजूतदारपणाचे दोन बोल त्याला बहुमोल वाटतील. “ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांस आरोग्य देणारी आहेत.” (कलस्सैकर ४:६; नीतीसूत्रे २५:११; १६:२४) किंवा प्रसंगानुरूप त्याच्या हाताला कनवाळूपणे आपल्या हातात घेतल्यास त्याला सर्व उमगेल की: मला सर्व समजले, मी तुमच्या पाठीशी आहे. मला मदत करणे शक्य असेल तर मी जरूर करीन.

३८ तुमचा पती जरी विश्‍वासाच्या बाबतीत तुमच्याशी सहमत नसला तरी तुम्ही त्याच्या अधीन राहिले पाहिजे असे पवित्र शास्त्र सांगते. तुमचे सत्‌शील वर्तन काही काळाने त्याला जिंकून घेईल व त्यामुळे तो देखील तुमच्या विश्‍वासात सहभागी होईल. तो किती आनंदाचा दिवस असेल! आणि तशी वेळ आली तर तुमच्यावर प्रीती करण्यास त्याला अधिक चांगले कारण मिळेल. तुम्हाला जे योग्य आहे असे माहीत आहे त्याविषयीचा खंबीरपणा व भक्‍ती “खऱ्‍या जीवनाचा” ताबा मिळविण्यास त्याला साहाय्यभूत होईल.—१ करिंथकर ७:१३-१६; १ तीमथ्य ६:१९.

३९, ४०. तीत २:४, ५ मध्ये सांगितलेल्या कोणत्या गुणांमुळे पतीलाच नव्हे तर यहोवा देवालाही ती पत्नी बहुमोल वाटेल?

३९ तुमच्या पतीचा पवित्र शास्त्रावर विश्‍वास असो वा नसो, शास्त्रवचने सांगतात की, ख्रिस्ती स्त्रियांनी “आपल्या नवऱ्‍यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे. त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्‍या मायाळू आपापल्या नवऱ्‍याच्या अधीन राहणाऱ्‍या, असे असावे. म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.”—तीत २:४, ५.

४० तुम्ही—पत्नीने—या गोष्टी यथाशक्‍ती केल्यास, फक्‍त पतीच नव्हे तर यहोवा देवही तुमच्यावर मनःपूर्वक प्रीती करील.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[५७ पानांवरील चित्रं]

“सद्‌गुणी स्त्री . . . तिचे मोल मोत्याहून अधिक आहे.”—नीतीसूत्रे ३१:१०.

[६४ पानांवरील चित्रं]

शमशोनाच्या जीवनातील स्त्रिया