व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुले—जबाबदारी व एक बहुमान

मुले—जबाबदारी व एक बहुमान

अध्याय ७

मुले—जबाबदारी व एक बहुमान

१-४. (अ) गर्भाशयातील बाळाच्या वाढीची काही आश्‍चर्यकारक वैशिष्ट्ये कोणती? (ब) या गोष्टींच्या माहितीमुळे स्तोत्रसंहिता १२७:३ चे योग्य मूल्यमापन करण्यास तुम्हाला कशी मदत होते?

 मुलांना जन्म देण्याची कल्पनाच अतिशय आनंददायक व तेवढीच विचार करावयास लावणारी आहे. हर घडी मुले जन्मतात हे खरे. प्रत्येक जन्म अनेक किचकट प्रक्रियातून होतो. हे कळले म्हणजे स्तोत्रकर्त्याच्या भावना आपल्याला नीट समजतील. तो म्हणतो: “पहा, संतती ही यहोवाने दिलेले धन आहे. पोटचे फळ ही त्याची देणगी आहे.” (स्तोत्रसंहिता १२७:३) मूल जन्माला येण्यात कोणत्या प्रक्रिया घडतात पहा.

पुरुषाच्या पुंबीजाचे स्त्रीच्या बीजाशी मीलन होते. ती दोन्ही एकरूप होतात व या नवीन पेशीचे विभाजन सुरू होते. एकाच्या दोन, दोनांच्या चार, चारांच्या आठ अशी विभाजने होऊन त्या एका पेशीच्या ६,००,००,००,००,००,००० पेशीयुक्‍त मनुष्य निर्माण होतो! प्रथम सर्व पेशी सारख्याच असतात. पुढे पुढे त्यांच्यामध्ये रुपांतर होऊ लागून, अस्थि पेशी, स्नायू पेशी, मज्जा पेशी, यकृत पेशी, डोळ्याच्या पेशी, त्वचापेशी वगैरे निरनिराळे गट उत्पन्‍न होतात.

असा भेद उत्पन्‍न होण्यामागील व प्रजोत्पादनातील काही गूढ गोष्टी उलगडल्या असल्या तरी बऱ्‍याच प्रक्रिया अजूनही कळलेल्या नाहीत. पहिल्या पेशीचे विभाजन कशामुळे होते? विभाजन चालू असताना त्यांचे निरनिराळे भेद कशाने होतात? अशा पेशी गटाने एकत्र राहून ठराविक आकाराचे अवयव व ठराविक कामे कशी करतात? यकृत, नाक, बोटे कशी होतात? हे सर्व भेद आधीच ठरलेल्या वेळेवर होतात. यावर कोणाचे नियंत्रण असते? तसेच मातेच्या उदरात वाढणारा गर्भ तिच्या शरीराशी मिळता जुळता नसतो. सामान्यतः तिचे शरीर परक्या वस्तुचा उदा. दुसऱ्‍या माणसांकडून घेतलेल्या त्वचा अथवा अवयवाचा त्याग करते. मग तसा याचाही त्याग न करता त्याला २८० दिवसांसाठी का पोसते?

या सर्व आश्‍चर्यजनक गोष्टी कशा वेळापत्रकानुसार होतात कारण पुंबीज व स्त्री-बीजापासून उत्पन्‍न होणाऱ्‍या पेशीतच यहोवा देवाने त्या घातलेल्या आहेत. निमार्णकर्त्याला उद्देशून स्तोत्रकर्ताही हेच सूचित करतो, तो म्हणतो: “मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते.”—स्तोत्रसंहिता १३९:१६.

वाढ व जन्म

५-८. गर्भधारणेच्या चवथ्या आठवड्यापासून प्रसूतीपर्यंत गर्भाशयात कोणत्या गोष्टी घडतात?

गर्भ वेगाने वाढतो. चवथ्या आठवड्यापर्यंत मेंदू, मज्जासंस्था तसेच हृदय व रक्‍तवाहिन्या पूर्ण झालेल्या असून रूधिराभिसरण सुरू झालेले असते. रक्‍त बनविण्याचे कार्य पहिले सहा आठवडे बालकाच्या पिशवीतून होते. नंतर ते काम यकृताकडे जाते व शेवटी हाडातील पोकळ्या ते काम करतात. पाचव्या आठवड्यात हात-पाय बनू लागतात. आणखी तीन आठवड्यांनी हाता-पायाची बोटे बनतात. सातव्या आठवड्यापर्यंत नाक, कान, डोळे, तोंड या सह बहुतेक सर्व स्नायूंचे गट बनलेले असतात.

यहोवाला बोलताना स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो: “मी गुप्तस्थानी निर्माण होत असता . . . माझी आकृती तुला गुप्त नव्हती.” (स्तोत्रसंहिता १३९:१५) नवव्या आठवड्यापर्यंत सांगाड्यातील कूर्चाचे हाडात रूपांतर होते. आता या वाढत्या बाळाला गर्भाऐवजी भ्रूण असे संबोधले जाते. “तूच माझे अंतर्याम निर्माण केले.” (स्तोत्रसंहिता १३९:१३) याविषयीची ईश्‍वरी प्रक्रिया चवथ्या महिन्यात घडू लागते. आणि आता गुर्द्यामधून रक्‍त गाळले जाते.

आतापावेतो गर्भ पोटात हालतो, हाताला वा पायाला गुदगुल्या झाल्यास बोटांची उघडझाप करतो. बोटांनी तो वस्तू धरतो, अंगठा चोखतो व नंतर दूध पिण्यासाठी लागणाऱ्‍या स्नायूंना चालना देतो. त्याला उचक्या येतात व त्याचे हिसके आईलाही जाणवतात. सहाव्या महिन्यापर्यंत बहुतेक सर्व अवयव पूर्ण झालेले असतात. नाकपुड्या उघडलेल्या असतात, भुवयाही उगवतात. लवकरच डोळेही उघडतील व कानही ऐकू लागतील. म्हणूनच मोठ्या आवाजाने उदरातील गर्भही दचकतो.

चाळीस आठवड्यांनी प्रसूतीला प्रारंभ होतो. मातेच्या गर्भाशयाच्या भिंतीचे स्नायू आकुंचन पावतात व बाळ बाहेर निघण्याच्या वाटेला लागते. या क्रियेत बाळाचे डोके वेडे-वाकडे चेपले जाते. पण त्याच्या कवटीची हाडे अजून जुळलेली नसल्याने प्रसूतीनंतर त्याच्या डोक्याला पुन्हा मूळ आकार प्राप्त होतो. आतापर्यंत आईच बाळासाठी सर्व करत होती—प्राणवायू, अन्‍न, संरक्षण, ऊब आणि हानीकारक पदार्थ बाहेर टाकणे, पण आता या सर्व गोष्टी बाळालाच केल्या पाहिजेत व त्याही तात्काळ. नाहीतर ते मरेल.

९. गर्भाशयाबाहेर मूल जिवंत राहण्यासाठी कोणत्या गोष्टी झटपट व्हायला हव्या?

फुफ्फुसाने रक्‍तामध्ये प्राणवायू घालण्यासाठी त्याने श्‍वसन केले पाहिजे. परंतु हे करण्यासाठी तात्काळ एक बदल घडून आला पाहिजे: रुधिराभिसरणाचा मार्ग बदलला पाहिजे! गर्भ उदरात असताना हृदयाच्या पडद्याला एक भोक होते. त्या पडद्यामुळे हृदयाचे डावा व उजवा असे दोन भाग होतात. पण त्यातील भोकामुळे रक्‍त शक्यतो फुफ्फुसाकडे जात नसे. तरीही जे जात असे त्यातील बहुतेक एका मोठ्या नलिकेमुळे इतरत्र वळविले जाई. गर्भ उदरात असताना फक्‍त १० टक्के रक्‍त फुफ्फुसाकडे जाई. मूल जन्माला आल्यावर सर्व रक्‍त वेळ न घालविता फुफ्फुसाकडेच गेले पाहिजे. यासाठी फुफ्फुसाकडे जाणारे रक्‍त इतरत्र वळविणारी नलिका आवळली जाते व त्यातून जाणारे रक्‍त फुफ्फुसाकडे जाऊ लागते. त्याच वेळी हृदयातील भोकही बंद होते. त्यामुळे हृदयाच्या उजव्या बाजूकडील रक्‍त आता प्राणवायू मिसळण्यासाठी फुफ्फुसाकडे जाते. आता मूल श्‍वासोच्व्छास करते व रक्‍तात प्राणवायू मिसळतो. बाळाच्या जीवनात नाट्यपूर्ण बदल झालेले असतात आणि बाळ जगते! या बाबतीत स्तोत्रकर्ता सुरेखपणे म्हणतो: “तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. भयप्रय व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो.”—स्तोत्रसंहिता १३९:१३, १४.

१०. बाळाची गर्भाशयातील आश्‍चर्यजनक वाढ पाहिल्यावर पालकांना मुलांबद्दल काय वाटले पाहिजे?

१० विवाहित जोडप्यांनी यहोवाच्या या भेटीकडे केवढ्या कृतज्ञतेने पाहिले पाहिजे! दोघांचा भाग असूनही त्यांच्यापेक्षा निराळेच मूल—एक नवीन मानव—निर्माण करण्याची ही शक्‍ती यहोवाने त्यांना दिलेली आहे! खरोखर ते “यहोवाने दिलेले धन आहे”!

‘धनाची’ काळजी घेणे

११. मुलांना जन्म देण्याचा विचार करणाऱ्‍या जोडप्यांनी स्वतःला कोणते प्रश्‍न विचारावेत व का?

११ फक्‍त विवाहित जोडप्यातच लैंगिक संबंध असावेत असा यहोवा देवाने नियम घालून देण्यात केवळ नीतिमत्ताच गोवलेली नाही. त्याच्या मनात पुढे होणाऱ्‍या मुलांचाही विचार होता. एकमेकांवर प्रीती करणारे व त्याच्यावरही प्रेम करून त्याची काळजी वाहणारे आई वडील मुलास हवे असतात. नवजात अर्भकाला घरातील माया व सुरक्षितता यांची गरज असते. तसेच त्याच्या वाढीस आणि व्यक्‍तित्वाचे विकसन होण्यासाठी योग्य असे वातावरण निर्माण करणारे व त्याच्यावर माया करणारे आई आणि वडील त्याला हवे असतात. आपल्याला मूल व्हावे अशी इच्छा करणाऱ्‍या पती-पत्नीने काही गोष्टींबाबत सखोल विचार केला पाहिजे. उदा. आपल्याला बाळ हवे आहे का? त्याच्या नुसत्या शारीरिकच नव्हे तर मानसिक व आध्यात्मिक गरजाही आपण पुरवू शकू काय? त्याला वळण लावण्यासाठी, त्याने आचरण्यासारखा योग्य कित्ता आपण घालून देऊ का? पालकत्वाच्या जबाबदाऱ्‍या पत्करण्याची व त्यासाठी लागणारा त्याग करण्याची आपली तयारी आहे का? आपण लहान असताना आपल्या पालकांनी अतिशय बंधने घातली असे आपल्याला वाटले असेल. परंतु आपण स्वतः पालक झाल्यावर मुलांना वाढविणे किती अवघड आहे हे आपल्या लक्षात येते. पण या जबाबदाऱ्‍यांसह एक आगळा आनंदही असतो.

१२-१४. गरोदर राहिल्यावर (अ) आहार, (ब) मद्य, तंबाकू सेवन व मादक द्रव्यांचा उपयोग, (क) भावनावरील नियंत्रण याबद्दल काय लक्षात ठेवल्याने तिच्या बाळाची गर्भाशयात सुदृढ वाढ होण्यासाठी सहकार्य लाभेल?

१२ जैविक परिस्थितींप्रमाणे किंवा पालकांनी ठरविल्याप्रमाणे निर्णय झालेला आहे. पत्नी, तुम्ही गर्भवती आहात. ‘यहोवाच्या धनाची’ काळजी घेण्याची सुरवात आता होते. काही गोष्टी सेवन केल्या पाहिजेत तर काही टाळल्या पाहिजेत अथवा त्यांचे प्रमाण कमी केले पाहिजे. लोहयुक्‍त अन्‍न महत्त्वाचे आहे, * कारण जन्मानंतर सहा महिने पुरेल इतके लोह गर्भ साठवून ठेवीत असते. तिला अधिक दुधाची गरज आहे (पनीर सुद्धा चालेल) कारण त्यातून बाळाच्या हाडांसाठी कॅल्शियमचा पुरवठा होतो. पिष्टमय पदार्थ * बेताने घेतले पाहिजेत, म्हणजे वजन फाजील वाढणार नाही. तुम्ही दोघांसाठी खात आहात हे खरे, पण त्यातील एक अगदीच इटुकले आहे!

१३ इतरही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील. किंवा दुर्लक्षिल्या तरी चालतील—पण ते तुमच्या राहणीमानावर अवलंबून राहील. मद्य प्याल्याने ते गर्भालाही पुरविले जाते. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. त्याचा अतिरेक झाल्यास बाळाची शारीरिक व मानसिक वाढ खुंटते. काहींच्या माता अतिशय मद्य सेवन करीत असल्याने काही बालके मद्याच्या गुंगीतच जन्माला आलेली आहेत. धूम्रपानाने गर्भाच्या रक्‍तात प्राणवायू ऐवजी त्याच्या रक्‍तात कार्बन-मोनॉक्साईड हा विषारी वायूही मिसळतो. त्यामुळे जन्माला येण्यापूर्वीच बाळाच्या भावी स्वास्थ्याचे तीन-तेरा वाजतात. धूम्रपान करणाऱ्‍या महिलांमध्ये आकस्मिक गर्भपात व मृत बालके जन्माला येण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. व्यसन लावणारे पदार्थ मातांनी घेतल्यास मुलांना जन्मतः ते व्यसन असण्याचा संभव असतो. व्यसन न लावणारी काही औषधे घातक ठरतात. त्यांच्यामुळे बालके अपंग होण्याची शक्यता असते. एवढेच काय पण अतिशय कॉफी पिण्यानेही बालकाला धोका संभवण्याचा संशय व्यक्‍त केला जातो.

१४ शिवाय मातेवर पडणाऱ्‍या मानसिक ताणामुळे तिच्या शरीरात हार्मोनस्‌चे (विशिष्ट ग्रंथीचे स्त्राव) प्रमाणही बदलते व ते गर्भाला अतिशय सक्रिय करते. त्यामुळे बालक चिडचिडे व अस्वस्थ होते. मातेच्या उदरात वाढणारा गर्भ जणू ‘पडद्याआड’ असला तरी त्याचा बाह्‍य-जगाशी काहीही संबंध नसतो असे म्हणणे चुकीचे होईल. मातेच्या मार्फतच त्याचा बाह्‍य-जगाशी संबंध असतो. त्यामुळे तो चांगला की वाईट असावा हे बहुतांशी तिच्यावर अवलंबून असते. ती स्वतःची काळजी कशी घेते व सभोवतालच्या परिस्थितीवरील तिची प्रतिक्रिया कशी आहे यावरच ते अवलंबून आहे. यासाठीच, भोवतालच्या लोकांचे सहकार्य विशेषतः तिच्या पतीचे प्रेम व मदत यांची तिला गरज असते, ही गोष्ट सांगण्याची गरजच नाही.—१ शमुवेल ४:१९ पडताळून पहा.

तुम्हाला घ्यावे लागणारे निर्णय

१५, १६. प्रसूतीची जागा व पद्धती याबद्दल कोणते निर्णय घ्यावे लागतील?

१५ प्रसूती दवाखान्यामध्ये व्हावी की घरी व्हावी असे तुम्हाला वाटते? काही वेळी तर परिस्थितीच निर्णय करील. काही भागात दवाखान्याची सोयच नसेल. तर काही भागात माहितगार व अनुभवी मदतीच्या अभावी, उदा. सुईण, बाळंतपण घरी करणे धोक्याचे असेल. जेथे शक्य असेल तेथे, गर्भारपणात डॉक्टरकडून तपासून घ्यावे व नैसर्गिक प्रसूती होईल की अवघड ते समजावून घ्यावे.

१६ तसेच, प्रसूती नैसर्गिक व्हावी की गुंगीच्या औषधांचा उपयोग करावासा तुम्हाला वाटतो? त्याचे फायदे व तोटे लक्षात घेऊन तुम्ही व तुमच्या पतीने हा निर्णय घेतला पाहिजे. नैसर्गिक प्रसूती होत असताना काही घटनेत पती गोवला जाऊ शकतो. प्रसूतीनंतर बाळाला लगेच आईजवळ ठेवतात. प्रसूती अवघड नसल्यास हा मोठाच फायदा असल्याचे काहींना वाटते. नैसर्गिक प्रसूतीच्या शांत वातावरणात जन्माला आलेल्या मुलांत पुढे भावनिक समस्या व मानसिक आजार कमी प्रमाणात होतात असा काही संशोधकांचा दावा आहे.

१७-१९. बालकाला जन्मानंतर लगेचच आईचा सहवास मिळण्याबद्दल संशोधनात काय निष्पन्‍न झाले आहे?

१७ सायकॉलॉजी टुडे या नियतकालिकात डिंसेबर १९७७ च्या अंकात म्हटले आहे:

 “बालकाच्या आयुष्यातील पहिल्या वर्षाचा त्याच्या पुढील शारीरिक व मानसिक वाढीवर परिणाम होतो हे मानसशास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून माहीत आहे. आता असे दिसून येते की त्याचा पहिला दिवस—किंबहुना पहिला तासही—तेवढाच महत्त्वपूर्ण असतो. प्रसूतीनंतर लगेचच मातेचा बालकाशी निगडीत भावबंध व ती त्याची घेत असलेली काळजी यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. नुकत्याच केलेल्या पहाणीतून असे दिसून येते की बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या काही तासातील घडामोडींचा, मातेचा बाळाबाबतचा दृष्टिकोन, त्याच्या विषयीच्या जबाबदारीची तिची जाणीव व ती पार पाडण्याची तिची कुवत यावर सखोल परिणाम होतो.”

१८ प्रसूती समयी मातेला भूल दिलेली नसल्यास बाळ तरतरीत असेल, त्याचे डोळे उघडे असतील, ते अवतीभोवती पाहील, इतरांच्या हालचाली न्याहाळील. आवाजाकडे वळेल व त्यातही स्त्रियांच्या आवाजाकडे जास्त आकर्षित होईल. माता व बालक यांची लगेच दृष्टीभेट होईल. याला अतिशय महत्त्व आहे. पहाणीत असे आढळून आले की बाळाने त्यांच्याकडे पाहिल्यावर मातांना बाळाबद्दल अधिक जवळीक वाटू लागली. प्रसूतीनंतर लगेच एकमेकाचा शरीर स्पर्श माता व बालक या दोघांना लाभदायक असतो.

१९ वैद्यकीय केंद्रात इलाज केलेल्या अर्भकांच्या समस्यांचे मूळ त्यांच्या जन्मानंतरच्या पहिल्या काही तासात आढळून येते असे संशोधकांचे मत आहे. सर्वसाधारण इस्पितळामध्ये जन्मलेल्या आणि इलाज लाभलेल्या व जन्मानंतर तात्काळ आईजवळ दिलेल्या मुलांमध्ये तुलना केल्यास असे दिसले की दुसऱ्‍या गटातील मुलांची वाढ जास्त चांगली होती. सायकॉलॉजी टुडे म्हणते, “मातेच्या अधिक जवळ राहिलेली मुले पाचव्या वर्षी अधिक नजरेत भरतात. त्यांची बुद्धिमत्ता—गुणक वरचा असतो, भाषा विषयातही त्यांना—सर्वसाधारण हॉस्पिटल कार्यपद्धतीत आयुष्याचे पहिले दिवस घालविलेल्या मुलांपेक्षा जास्त गुण पडतात.”

२०. या सर्वांबद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी आणखी कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे?

२० या सर्व गोष्टीत, परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्या पहिल्या पालकांनी आपणा सर्वांना अपूर्णतेचा वारसा दिला आहे याचे भान विसरता कामा नये. त्या अपूर्णतेमुळे “नैसर्गिक प्रसूती” यामध्ये स्वाभाविकता आज जरा अभावानेच असते. शिवाय त्यामुळे गुंतागुतीच्या बिकट समस्या निर्माण होऊ शकतात. (उत्पत्ती ३:१६; ३५:१६-१९; ३८:२७-२९) आपली परिस्थिती विचारात घेऊन आपल्याबाबतीत स्वतःला योग्य वाटेल असा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. मग तो इतरांच्या दृष्टीने “योग्य” असो वा नसो.

२१, २२. स्तनपानाचे फायदे कोणते?

२१ तुम्ही आपल्या बाळाला स्तनपान द्याल काय? त्यात तुम्हाला व बाळालाही अनेक फायदे आहेत. मातेचे दूध बाळाला सर्व दृष्टिने योग्य अन्‍न आहे. ते पचण्यास सोपे असते, रोगांपासून, पोटाच्या विकारांपासून तसेच श्‍वसनाच्या विकारापासूनही संरक्षण देते. पहिले काही दिवस पिवळट रंगाचे कोलस्ट्रम दूध स्तनात उत्पन्‍न होते. ते नवजात अर्भकाला फारच योग्य असते कारण (१) मेद व पिष्टमय पदार्थ त्यात कमी असल्याने पचनास हलके असते. (२) थोड्या दिवसानंतर बनणाऱ्‍या दुधापेक्षा त्यात रोग प्रतिकारक द्रव्ये जास्त प्रमाणात असतात. (३) ते सौम्य रेचक असते, त्यामुळे जन्माआधी बाळाच्या आंतड्यात साठलेल्या पेशी, श्‍लेष्मल पदार्थ व पित्त विसर्जन करण्यास त्याची मदत होते.

२२ स्तनपान दिल्याने मातेलाही फायदा होतो. दूध पिताना बाळाच्या चोखण्याच्या क्रियेने गर्भाशयाचे आकुंचन होण्यास मदत होते. त्यामुळे मातेचा रक्‍तस्त्राव कमी होतो. चोखण्याच्या क्रियेने स्तनात अधिक दूध निर्माण होण्यास उत्तेजन मिळते. ज्यांना कमी दूध निर्माण होण्याची भिती वाटते त्यांना ते कधीही कमी पडत नाही असे आढळून येते. नियमित स्तनपानामुळे काही प्रकरणात मासिक पाळी व रजोत्पादनाचे कार्य पुढे ढकलले जाते. अशा रितीने नैसर्गिक संततीनियमन होते. “ज्या माता मुलांना स्तनपान करवतात त्यांच्यामध्ये स्तनांच्या कर्क रोगाचे प्रमाण अल्प असते,” असे अमेरिकन कर्क रोग संस्थेचे मत आहे. स्तनपानाने कुटुंबाच्या खर्चातही बचत होते!

मुलांची वाढ—त्याला तुम्ही वळण कसे लावाल?

२३. स्तोत्रसंहिता १२७:४, ५ मध्ये बाल-संगोपनाची कोणती तत्त्वे सूचित केलेली आहेत?

२३ “तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य!” (स्तोत्रसंहिता १२७:४, ५) धनुष्यापासून सुटताना नेम कसा धरला आहे यावर त्या बाणाची उपयुक्‍तता अवलंबून असते. बाण लक्षावर अचूक पोचण्यासाठी काळजीपूर्वक व कौशल्याने नेम धरला पाहिजे. त्याचप्रमाणे पालक या नात्याने, आपल्या मुलाच्या जीवनाचा आरंभ कसा करून द्यावा यावर शहाणपणाने व प्रार्थनेसह तुम्ही विचार केला पाहिजे. तुमच्या देखरेखीखालून गेल्यानंतर तो किंवा ती समतोल विचारांची, इतरांच्या आदरास पात्र व देवाला गौरव प्राप्त करून देणारी प्रौढ व्यक्‍ती असेल का?

२४. (अ) आपल्या अपत्यांसाठी पालकांनी घराचे वातावरण कसे करण्यास झटावे? (ब) हे महत्त्वाचे का आहे?

२४ बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याचा संभाळ व शिक्षण याविषयी निर्णय घ्यायला हवेत. पहिल्या अपत्याचे जग मूलतः, आईवडील हेच असतात. ते जग कसे असेल? “सर्व प्रकारचा कडवटपणा, संताप, क्रोध, आक्रस्ताळेपणा व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा” हा देव वचनातील उपदेश पालकांनी आत्मसात केला आहे असे तेथे दिसून येईल काय? (इफिसकर ४:३१, ३२) घरातील वातावरण कसेही असले तरी त्याचे प्रतिबिंब त्या बाळात पडेल. आपल्या बाळाचे जग शांती, सुरक्षितता व प्रीतीने व्यापून टाकण्यासाठी झटा. प्रेमाने संगोपन केलेल्या बाळात हे गुण उतरतील. त्या गुणांनी त्याच्या भावना घडविल्या जातील. बाळ, तुमच्या भावना जाणील, तुमचा कित्ता गिरवला जाईल. देवाने निर्मिलेल्या अनुवंशिकतेच्या नियमांनी, मातेच्या उदरात बाळाची वाढ आश्‍चर्यकारकरित्या होते, मग जन्माला आल्यानंतर तुम्ही त्याला कसे घडवाल? तुम्ही त्याला घरातील जे वातावरण पुरवाल त्यावर बरेचसे अवलंबून आहे. अनुवंशिकते इतकेच घरातील वातावरणावर, मूल मोठे झाल्यावर कसे होईल, हे अवलंबून असते. “मुलाच्या स्थितीस अनुरुप असे शिक्षण त्याला दे. म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”—नीतीसूत्रे २२:६.

२५, २६. आपल्या मुलांसाठी पालकांनी बराच वेळ व लक्ष पुरविणे अगत्याचे का आहे?

२५ पुरुष काय किंवा स्त्री काय, त्यांना गवताचे एक पातेही निर्माण करता येत नाही. परंतु त्याहीपेक्षा गुंतागुंतीचा, जगातील कोणत्याही व्यक्‍तिपेक्षा निराळा असा मानवी जीव मात्र ते दोघे मिळून बनवू शकतात! ही आश्‍चर्य करण्यासारखी बाब आहे इतकी, की त्याच्याशी संलग्न अशा पवित्र जबाबदारीची जाणीव अनेकांना नसते याचाच अचंबा वाटतो! सुंदर बाग बनविण्यासाठी लोक झाडे लावतात, त्यांना पाणी व खते घालतात, तण काढतात. मग आपली मुले चांगली व्हावी म्हणून आपण कित्येकपटीने अधिक वेळ व कष्ट घ्यायला नकोत का?

२६ विवाहित दांपत्याला मुले असण्याचा हक्क आहे. तसाच मुलांनाही नावापुरते नव्हे तर खरोखरचे आईवडील असण्याचा हक्क आहे. देवाला समर्पण केलेला ख्रिस्ती एखादा अनुयायी मिळविण्याच्या आशेने, आपला वेळ व शक्‍ती खर्च करील आणि तरी देखील नेहमीच यशस्वी होणार नाही. तर मग “यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात” आपल्या मुलांना वाढविण्यासाठी पालकांनी अधिक वेळ खर्च करावयास नको काय? (इफिसकर ६:४) आपल्या जीवनदात्या यहोवा देवाचा सेवक होईल असे एक मूल वाढविणे आनंदोत्सव करण्यास योग्य कारण देणारे नाही का? मग मात्र खरेच, त्या मुलाला वा मुलीला जन्म दिल्याचे सार्थक होईल.—नीतीसूत्रे २३:२४, २५.

२७. बाळाच्या वाढीला मार्गदर्शन करताना त्याचे व्यक्‍तिमत्व का लक्षात घ्यावयास हवे?

२७ स्तोत्रसंहिता १२८:३ मध्ये मुलांना जैतून वृक्षांची उपमा दिलेली आहे: “तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेली सारखी, तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील.” झाडांना वळण लावून वेगवेगळे आकार देता येतात, काही भिंतीलगत वाढविली जातात. काही जमीनीवर पसरतात. बॉन्सायच्या बाबतीत करतात तसे, काहींची मुळे व फांद्या खुडून त्यांची वाढ खुंटविली जाते. लहानपणी शिक्षण दिल्याने मुलांना कसे वळण लावता येते हे एका जुन्या म्हणीत सांगितलेले आहे: “जशी कोवळी फांदी वाकवाल तसा वृक्ष वाढेल.” येथे समतोलपणाची गरज आहे. एकीकडे पाहता, नैतिक मूल्यांच्यानुरुप चालण्यासाठी मुलाला मार्गदर्शनाची गरज आहे. त्याचवेळी त्या मुलाचे व्यक्‍तिमत्व कसे असावे या विषयीचा पालकांचा पूर्वग्रह त्याच्यावर लादला जाऊ नये. पेरूच्या झाडाला आंबे आणता येत नाहीत. तुमच्या मुलाला योग्य ते शिक्षण द्या, परंतु तुमच्या काल्पनिक साच्यात त्याला कोंबण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे त्याच्या अंगच्या गुणांचा, व्यक्‍तिमत्वाचा नैसर्गिक विकास होणार नाही. तुम्ही जन्माला घातलेल्या या मुलाला समजून घ्या. मग छोट्या रोपाप्रमाणे आपल्या मुलाला योग्य दिशेला वळण लावणारे व संरक्षण देणारे मार्गदर्शन करा. त्यावेळी त्या मुलाच्या पूर्ण विकासास बाधा येणार नाही याची दक्षता घ्या.

यहोवाची देणगी

२८. उत्पत्ती ३३:१३, १४ मध्ये याकोबाने आपल्या मुलांविषयी वाहिलेल्या काळजीचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

२८ प्राचीन काळी याकोबाने आपल्या मुलांच्या संगोपनाची काळजी दाखवली. त्यांच्या आवाक्याबाहेर वाटचाल होईल अशा प्रवासाचा प्रस्ताव आला तेव्हा याकोब त्यास म्हणाला: “माझ्या स्वामीला ठाऊक आहे की ही मुले सुकुमार आहेत. आणि दूध पाजणाऱ्‍या शेळ्या, मेंढ्या व गाई यांचे मला पाहिले पाहिजे. त्यांची एक दिवस फाजील दौड केली तर अवघा कळप मरुन जाईल. तर स्वामी, आपण आपल्या दासाच्या पुढे जा आणि माझी गुरे, मेंढरे व मुले यांच्याने चालवेल तसा मी हळू हळू चालत सेईर येथे माझ्या स्वामीकडे येईन.” त्याआधी एसाव त्याला भेटला असता त्याने त्यास विचारले: “तुजबरोबर हे कोण आहेत?” याकोब उत्तरला, “आपल्या दासावर देवाने कृपा करून दिलेली मुले होत.” (उत्पत्ती ३३:५, १३, १४) आजही पालकांनी मुलांबाबत याकोबाप्रमाणे दयाळू असावे व शिवाय त्यांच्याबाबत याकोबाचा दृष्टिकोनही ठेवावा—त्यांना यहोवाचे वरदान समजावे. लग्नाआधीच, आपल्याला बायको व मुलांचा प्रतिपाळ करता येईल का याचा विचार माणसाने करावा. पवित्र शास्त्र म्हणते, “तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर मग आपले घर बांध.” (नीतीसूत्रे २४:२७) या व्यवहारी सल्ल्यानुसार माणसाने लग्न व संसाराची तयारी आधीच करावी. मग अनपेक्षित गर्भधारणेची, आर्थिक बोजा म्हणून भीती न वाटता तिचे आनंदाने स्वागत होईल.

२९. मुले होण्याविषयी आधीच गंभीर विचार का करावा?

२९ प्रथम अपत्यच नव्हे तर नंतरच्याही सर्व मुलांबाबत गंभीरपणे विचार केला गेला पाहिजे. आधी असलेल्या मुलांनाच अन्‍न, वस्त्र, देख-भाल व शिक्षण देण्यास पालकांना कठीण जात आहे काय? मग कुटुंबात शक्यतो अधिक भर न पडण्यासाठी देवाचा आदर व प्रीती यांना अनुसरून आत्मसंयमन कसे करता येईल यावर त्यांनी विचार केला पाहिजे.

३०. (अ) मूल देवाचे आहे असे आपण का म्हणू शकतो? (ब) याचा पालकांच्या दृष्टिकोनावर कसा परिणाम व्हावा?

३० ते मूल खरोखर कोणाचे आहे? एका दृष्टिने तुमचे, पण दुसऱ्‍या दृष्टिने ते मूल निर्माणकर्त्याचे आहे. जसे तुम्ही लहान असताना तुमची देखभाल तुमच्या पालकांवर सोपविली होती तशीच या मुलाची तुम्हांवर सोपविलेली आहे. परंतु त्यांना वाटेल तसे त्यांनी तुमच्याशी वागावे असा तुमच्या पालकांचा तुमच्यावर मालकी हक्क नव्हता. त्याचप्रमाणे तुमच्या मुलावर तुमचाही मालकी हक्क नाही. गर्भधारणेच्या क्षणी त्या घटनेवर पालकांचा ताबा नसतो तसेच गर्भातील बाळाच्या वाढीवरही नसतो. त्यात गोवलेल्या अनेक आश्‍चर्यजनक प्रक्रिया त्यांना दिसत नाहीत व कळतही नाहीत. (स्तोत्रसंहिता १३९:१३, १५; उपदेशक ११:५) काही अपघाताने गर्भपात झाल्यास वा मूल मेलेले जन्माला आल्यास त्यांना ते परत जिवंत करता येत नाही. यासाठीच देव आपणा सर्वांचा जीवन दाता आहे व आपण सर्व त्याचे आहोत हे नम्रपणे मान्य केले पाहिजे: “पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही यहोवाचे आहे. जग व त्यात राहणारे सर्व यहोवाचे आहेत.”—स्तोत्रसंहिता २४:१.

३१, ३२. (अ) देवासमोर पालक कशासाठी जबाबदार आहेत? (ब) त्या जबाबदारीची योग्य ती दखल घेतल्यास काय फायदे होतात?

३१ जगात आणलेल्या मुलांकरता तुम्ही जबाबदार आहात व तुम्ही त्यांचे संगोपन कसे केले याविषयी तुम्हाला परमेश्‍वराला जाब द्यावा लागेल. त्याने पृथ्वी निर्माण केली व तिजवर वस्ती असावी अशी त्याची इच्छा आहे. त्यासाठी त्याने आपल्या पहिल्या मानवी पालकांना जनन शक्‍ती दिली. त्यांनी देवाचा अव्हेर केल्याने ते देवाच्या वैऱ्‍याच्या अधिपत्याखाली आले. स्वर्ग व पृथ्वीवरील आपल्या कुटुंबावरील देवाच्या न्याय्य सार्वभौमत्वाला या वैऱ्‍याने आव्हान दिले होते. देवाशी एकनिष्ठ राहण्याचे वळण आपल्या मुलांना देऊन तुमचे कुटुंब या वैऱ्‍याला खोटे व देवाला खरे ठरवील. नीतीसूत्रे २७:११ म्हणते: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदी कर म्हणजे माझी निंदा करण्याऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.”

३२ आपली मुले व देव याविषयीची कर्तव्ये पूर्ण केल्याने आयुष्यात कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळते. मग स्तोत्रसंहिता १२७:३ मधील म्हणीशी तुम्ही पूर्णपणे सहमत व्हाल: “पोटचे फळ ही देणगी आहे.”

[तळटीपा]

^ परि. 12 जसे की, मांस व हिरव्या आणि पिवळ्या भाज्या.

^ परि. 12 पिष्टमय अन्‍न व साखरेचे अधिक प्रमाण असणारे पदार्थ.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९३ पानांवरील चित्रं]

आताची जवळीक नंतरची पीढी-तफावत टाळते