त्रैक्याच्या तत्त्वाची कशी वाढ झाली?
त्रैक्याच्या तत्त्वाची कशी वाढ झाली?
आता तुम्ही कदाचित म्हणालः ‘त्रैक्य हे पवित्र शास्त्रीय शिक्षण नाही, तर मग ते ख्रिस्तीधर्मराज्याचे तत्त्व कसे बनले?’ पुष्कळांना वाटते की, या तत्त्वाची प्रस्थापना इ. स. ३२५ मध्ये निका येथील परिषदेत झाली.
पण हे संपूर्णपणे खरे नाही. निका येथील परिषदेने हे प्रतिपादिले की, ख्रिस्त हा देवाच्याच घटकाचा आहे आणि हीच गोष्ट नंतर त्रैक्याच्या वेदांताचा पाया ठरली. पण निका येथे त्रैक्याचे तत्त्व प्रस्थापित झाले नाही, कारण पवित्र आत्मा हा त्रैक देवपणातील तिसरी व्यक्ती आहे असे प्रतिपादण्यात आले नव्हते.
निका येथील कॉन्स्टंटाईनची भूमिका
येशू हा देव होता या कल्पनेच्या वाढीला कित्येक वर्षे पवित्र शास्त्रीय आधारावर विरोध केला गेला होता. या मतभेदाला निकालात काढण्यासाठी रोमी सत्ताधीश कॉन्स्टंटाईन याने सर्व बिशपांची निका येथे सभा बोलावली. त्यापैकी प्रत्यक्षात जवळजवळ ३०० बिशप या सभेला उपस्थित राहिले.
कॉन्स्टंटाईन ख्रिस्ती नव्हता. तो नंतर परिवर्तित झाला असे समजण्यात येते पण त्याचा मरेपर्यंत बाप्तिस्मा झाला नव्हता. त्याच्याविषयी द अर्ली चर्च पुस्तकात हेन्री चॅडवीक म्हणतातः “कॉन्स्टंटाईन आपल्या बापाप्रमाणेच ‘अजिंक्य सूर्या’ची भक्ती करीत होता, . . . त्याच्या धर्मांतराचा अर्थ त्याचे अंतःकरणपूर्वक परिवर्तन झाले होते असा करता कामा नये. . . . ती लष्करी बाब होती. त्याने ख्रिस्ती तत्त्वांचे केलेले आकलन स्पष्ट रुपाचे नव्हते. पण लढाईतील विजय हा ख्रिश्चनांच्या देवाची देणगी आहे असे त्याचे ठाम मत होते.”
तर या बाप्तिस्मा न झालेल्या सत्ताधिशाने निका येथे कोणती भूमिका पार पाडली? द एन्सायक्लोपिडिआ ब्रिटेनिका सांगतेः “कॉन्स्टंटाईनेच स्वतः अध्यक्षपद भूषविले आणि सर्व चर्चेवर आपले नियंत्रण ठेवले. त्यानेच स्वतः परिषदेत सांगण्यात आलेला ख्रिस्ताचा देवाशी असणारा नातेसंबंध याचा नमुना बदलून ‘पित्याचाच एक घटक’ हा निर्णायक प्रस्ताव मांडला. . . . सत्ताधिशाच्या दहशतीने घाबरुन दोघांचा अपवाद वगळता सर्व बिशपांनी या तत्त्वाच्या मसुद्यावर आपल्या स्वाक्षऱ्या केल्या; बहुतेकांना आपली इच्छा नसताना त्या कराव्या लागल्या.”
अशाप्रकारे कॉन्स्टंटाईनची भूमिका मोठी खडतर होती. दोन महिने चाललेल्या संतप्त वादविवादानंतर या मूर्तिपूजक राजकारणी मुत्सद्याने हस्तक्षेप केला आणि ज्यांनी येशू हा देव आहे असे म्हटले त्यांच्या बाजूने आपला निर्णय दिला. पण का? याला पवित्र शास्त्राचे पाठबळ होते म्हणून नव्हे. “ग्रीक वेदांतशाळेत जे प्रश्न विचारले जात असत त्याची कॉन्स्टंटाईनला कसलीही समज नव्हती,” असे ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ ख्रिश्चन डॉक्ट्रीन म्हणते. त्याला एवढेच कळाले होते की धार्मिक विभाजन हे त्याच्या साम्राज्यास घातक होते; आपली सत्ता मजबूत राखावी ही त्याची इच्छा होती.
तरीपण, निका येथील कोणाही बिशपाने त्रैक्याला चालना दिली नव्हती. त्यांनी येशूच्या स्वरुपाविषयीचा निर्णय घेतला होता आणि पवित्र आत्म्याच्या भूमिकेचा विचार केला नव्हता. त्रैक्य हे जर पवित्र शास्त्राचे शिक्षण असते तर ते त्यांनी या परिषदेत मांडले नसते का?
पुढील घडामोडी
निका येथील परिषदेनंतर या विषयावरील वादविवाद कित्येक दशके चालला. येशू देवाच्या बरोबरीचा नाही असे ज्यांनी मानले होते त्यांना काही काळासाठी संमती मिळाली. पण नंतर थिऑडोसीस या सम्राटाने यांच्याविरुद्ध निर्णय दिला. निका येथील परिषद त्याच्या सत्तेसाठी नमुना असल्याचे त्याने म्हटले आणि म्हणूनच इ. स. ३८१ मध्ये याच्या स्पष्टोक्तीसाठी त्याने कॉन्स्टँटिनोपलची परिषद बोलावली.
या परिषदेत पवित्र आत्मा हा देव व ख्रिस्त यांच्या समान दर्जावर आहे असे ठरविण्यात एकमत झाले. आता पहिल्यांदाच ख्रिस्तीधर्मराज्याच्या त्रैक्याला प्रकाशझोतात आणण्यात आले.
तथापि, कॉन्स्टँटिनोपलची परिषद संपली तरीही त्रैक्य हे विस्तारीतपणे स्विकारले जाणारे तत्त्व झाले नाही. पुष्कळांनी त्याचा विरोध केला आणि आपणावर हिंसाचारी छळ ओढावून
घेतला. नंतरच्या शतकात त्रैक्याला तत्त्वप्रणाली या अर्थाने मान्यता मिळाली. द एन्सायक्लोपिडिआ अमेरिकाना निरिक्षण करतेः “त्रैक्याच्या तत्त्वाची पूर्ण वाढ पश्चिमी राष्ट्रात, जेव्हा मध्ययुगीन विद्यालयीन पद्धतीत निगमनात्मक तत्त्वज्ञान पद्धतीचा अवलंब होत गेला तेव्हा झाली.”अथेनेशिन तत्त्व
त्रैक्याची व्याख्या अथेनेशियन तत्त्वात अधिक पूर्ण तऱ्हेने करण्यात आली. अथेनेसियस हा तो पाळक होता ज्याने निका येथे कॉन्स्टंटाईनला आपला पाठिंबा दिला होता. त्याचे नाव असणारे तत्त्व म्हणतेः “आम्ही एका देवाची त्रैक्यात भक्ती करतो. . . . पिता हा देव आहे. पुत्र हा देव आहे आणि पवित्र आत्मा हा देव आहे; तरीपण ते तीन देव नसून एक देव आहेत.”
तरीपण जाणकार प्रामाण्यांच्या मते अथेनेसियस याने या तत्त्वाची रचना केली नाही. द न्यू एनसाक्लोपिडिआ ब्रिटेनिका विवेचन मांडतेः “हे तत्त्व इस्टर्न चर्चला १२ व्या शतकापर्यंत माहीत नव्हते. १७ व्या शतकापासून प्रामाण्यांचे हे सर्वमत आहे की, अथेनेशियन तत्त्व अथेनेसियसकरवी (मृत्यु ३७३ मध्ये) रचले गेले नाही, तर ५ व्या शतकात दक्षिण फ्रान्समध्ये त्याची रचना करण्यात आली. . . . तत्त्वाचा प्रभाव प्रामुख्यत्वे ६ व्या व ७ व्या शतकात दक्षिण फ्रान्स व स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला. ९ व्या शतकात जर्मनीतील चर्चेसमधील प्रार्थनाविधीत ते वापरण्यात येऊ लागले आणि काही कालांतराने ते रोममध्ये आले.”
अशाप्रकारे त्रैक्य तत्त्वाला ख्रिस्तीधर्मराज्यात व्याप्तरुपी मान्यता मिळण्यास ख्रिस्ताच्या काळानंतर कित्येक शतके लागली. आणि इतक्या काळात कशामुळे हा निर्णय ठरवण्यात आला बरे? ते देवाचे वचन होते की, धर्माधिकारी व राजकारणी विचारधारा होती? ओरिजिन ॲण्ड एव्होल्युशन ऑफ रिलिजन यात ई. डब्ल्यु. हॉपकिन्स उत्तर देतातः “त्रैक्याची अंतिम सनातनी व्याख्या ही प्रामुख्यत्वे चर्च राजकारण्यांची बाब होती.”
धर्मत्यागाविषयीचे पूर्वभाकित
त्रैक्याचा हा निंद्य इतिहास, येशू व त्याच्या प्रेषितांनी त्यांच्या गमनानंतर जे काही घडण्याविषयीचे भाकित केले होते त्याच्याशी तंतोतंत जुळणारे आहे. त्यांनी म्हटले की, ख्रिस्त परत येऊन, या युगात देवाच्या नाशाचा दिवस येण्याच्या आधी खऱ्या भक्तीची पुनर्स्थापना होईपर्यंत धर्मत्याग, खऱ्या भक्तीचे पतन होणे, बाजूला जाणे घडणार.
त्या “दिवसा”विषयी प्रेषित पौलाने म्हटलेः “त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन अनीतीमान पुरुष प्रगट होईल.” (२ थेस्सलनीकाकर २:३, ७) नंतर त्याने हे भाकित केलेः “मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील . . . तुम्हापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून नेण्यासाठी सत्याविषयी विपरीत गोष्टी बोलतील.” (प्रे. कृत्ये २०:२९, ३०, जे.बी.) येशूच्या इतर शिष्यांनी देखील या धर्मात्यागाविषयी आणि त्याच्या ‘अधर्मी’ पाळक गटाविषयी लिहिले.—उदाहरणादाखल पहा, २ पेत्र २:१; १ योहान ४:१-३; यहुदा ३, ४.
पौलाने असेही लिहिलेः “अशी वेळ नक्की येईल जेव्हा सबळ शिक्षणामध्ये तृप्त राहण्याऐवजी लोक आधुनिक कौतुकास्पद गोष्टींकडे धावतील आणि आपल्याला पसंत वाटतील त्या शिक्षकांच्या मागे जातील. सत्याचे श्रवण करण्याऐवजी ते दंतकथांकडे वळतील.”—२ तीमथ्य ४:३, ४, जे.बी.
खऱ्या उपासनेपासून दूर नेणाऱ्या या पतनाच्या मागे काय आहे त्याची स्वतः येशूने स्पष्टता केली. तो म्हणाला की, त्याने चांगल्या बीचे रोपण शेतात केले आहे पण वैरी, सैतान हा परत निदणाची पेरणी करील. याकारणास्तव गव्हाचे पाते दिसताच निदण देखील दिसू लागेल. यामुळेच ख्रिस्त कापणी करीपर्यंत वा सर्व यथास्थित करेपर्यंत खऱ्या ख्रिस्ती धर्मापासूनचे पतन दिसून येणार होते. (मत्तय १३:२४-४३) द एन्सायक्लोपिडिआ अमेरिकाना विवेचन मांडतेः “चवथ्या शतकातील त्रैक्यवाद्यात प्रारंभीच्या ख्रिस्ती शिक्षणाचे देवाच्या स्वरुपासंबंधीचे प्रतिबिंब अचूकपणे दिसू शकले नाही. तर ते विरुद्ध दिशेचे म्हणजे खऱ्या शिक्षणापासून पतन घडल्याचे दिसले.” हे पतन, मग, कोठून सुरु झाले?—१ तीमथ्य १:६.
कशामुळे त्यावर प्रभाव पाडला गेला
सबंध प्राचीन जगतात अगदी मागे म्हणजे बाबेलोनियापासून तिघांचा गट असलेल्या किंवा त्रैक देवाची भक्ती सर्वसाधारण
होती. हाच प्रभाव मिसर ग्रीस आणि रोममध्ये ख्रिस्ताच्या आधी व नंतर देखील होता. प्रेषितांच्या मृत्युनंतर या मूर्तिपूजक विश्वासाने ख्रिस्ती धर्मात आपला शिरकाव केला.इतिहासकार वील डुरंट यांचे असे परिक्षण आहेः “ख्रिस्ती धर्माने मूर्तिपूजक धर्माला नष्ट केले नाही तर त्याच्याबरोबर जुळवून घेतले. . . . मिसरातून दैवी त्रैक्याची कल्पना आली.” इजिप्शियन रिलिजन या पुस्तकात सिगफ्रीड मोरेन्झ म्हणतातः त्रैक्यावर या मिसरच्या वेदांत्यांनी मन एकाग्र केले होते. . . . ते तीन देवांना एकत्र करीत व त्याचा एक देव करीत आणि त्याला एकवचनी नावाने संबोधित. अशाप्रकारे मिसरी धर्माचा आध्यात्मिक प्रभाव ख्रिस्ती वेदांतासोबत स्पष्ट संबंध असल्याचे दर्शवितो.”
यामुळेच मिसरमधील अलेक्झांड्रिया येथे तिसऱ्या शतकाच्या अंताचे आणि चवथ्या शतकाच्या आरंभीच्या अथेनेसिस यासारख्या चर्च प्रतिनिधींनी हा प्रभाव प्रवर्तित करुन त्रैक्याची कल्पना सामोरी आणली. त्यांचा स्वतःचा प्रभाव देखील पडला व यामुळेच मोरेन्झच्या मतानुसार “अलेक्झांड्रियाची मतप्रणाली ही मिसरी धर्माचा वारसा आणि ख्रिस्ती धर्म यात सांगड घालणारी ठरली.”
एडवर्ड गिबोन यांच्या हिस्ट्री ऑफ ख्रिश्चॅनिटि या पुस्तकाच्या प्रास्ताविकतेत आपण वाचतोः “ख्रिस्ती धर्माने मूर्तिपूजक धर्माला जिंकले असे म्हटले तर ख्रिस्ती धर्म मूर्तिपूजक धर्माकरवी तितक्याच प्रमाणात भ्रष्टावला गेला हे खरेपणाने म्हणता येईल. आरंभीच्या ख्रिश्चनांचा केवलेश्वरवाद . . . चर्च ऑफ रोमने त्रैक्याच्या अज्ञेय तत्त्वात बदलून टाकला. मिसऱ्यांनी शोधून काढलेल्या आणि प्लॅटोने पुरस्कारलेल्या कित्येक सिद्धांताना विश्वासास योग्य या अर्थाने तसेच ठेवण्यात आले.”
ए डिक्शनरी ऑफ रिलिजस नॉलेज सांगते की, पुष्कळांचे असे म्हणणे आहे की, त्रैक्य “ही मूर्तिपूजक धर्मापासून उसनवारीने घेतलेली भ्रष्टता असून तिचे ख्रिस्ती विश्वासात कलम करण्यात आले आहे.” तसेच पॅगानिझम इन आवर ख्रिश्चॅनिटी पुस्तक जाहीर करतेः “[त्रैक्याचा] मूळारंभ सर्वतोपरि मूर्तिपूजक आहे.”
या कारणामुळेच एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन ॲण्ड एथिक्स यात जेम्स हेर्स्टिग्ज यांनी लिहिलेः “भारतीय धर्मात आम्हाला ब्रम्ह, शिव आणि विष्णु यांचे त्रैक्य दिसते; मिसरी धर्मात असेच त्रैक्य ओसिरीस, इसीस आणि होरस यांचे दिसते. . . . केवळ ऐतिहासिक धर्मात देव त्रैक्य आहे असा दृष्टीकोण आपल्याला दिसून येत नाही. एखाद्याला खासपणे सर्वोच्च किंवा अंतिम वास्तवतेविषयीचा निओ-प्लॅटोनिक दृष्टीकोणही लक्षात येईल” आणि हा “सांप्रदायिक” असल्याचे गणले जाते. पण प्लॅटो या ग्रीक तत्त्ववेत्त्याचा त्रैक्यासोबत काय संबंध आहे?
प्लॅटोची तत्वप्रणाली
प्लॅटो हा ख्रिस्ताच्या आधी ४२८ ते ३४७ पर्यंत हयात होता असे मानले जाते. त्याने त्रैक्याचे आधुनिक रुपात असणारे शिक्षण दिले नव्हते तरी त्याच्या तत्त्वप्रणालीने यासाठी मार्ग खुला केला. नंतर तत्त्वज्ञानी हालचालीत जेव्हा तीन मिळून असणाऱ्या विश्वासाचा शिरकाव झाला तेव्हा त्यावर प्लॅटोच्या देव आणि निसर्ग या तत्त्वप्रणालीचा मोठा पगडा बसला.
फ्रेंच भाषेत असणारी न्यू युनिव्हर्सल डिक्शनरी प्लॅटोच्या या प्रभावाविषयी म्हणतेः “जुन्या काळच्या लोकांमध्ये आढळणाऱ्या त्रैक्यांची निव्वळ पुनर्रचना असणाऱ्या प्लॅटोच्या त्रैक्याने, जे विविध गुणांचे त्रैक्य आहे त्यानेच ख्रिस्ती चर्चेसमध्ये शिकविण्यात येणाऱ्या तीन दैवी व्यक्तींच्या एकत्रीकरणाला जन्म दिला. . . . ग्रीक तत्त्ववेत्त्याने दैवी त्रैक्याविषयी बाळगलेली ही विचारधारा . . . सर्व प्राचीन [मूर्तिपूजक] धर्मात आढळून येते.”
या ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रभाव कसा घडला ते द न्यू स्कॅफ-हेर्झोग एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजस नॉलेज ने दाखविले आहेः “लोगोस आणि त्रैक्य तत्त्वज्ञानाला ग्रीक फादर्सकडून आकार मिळाला, यांच्यावर . . . थेट किंवा अप्रत्यक्षरुपात प्लॅटोच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव जडला होता. . . . या उगमाकडूनच चर्चमध्ये चुका व भ्रष्टता आणल्या गेल्या हे अमान्य करता येणार नाही.”
द चर्च ऑफ द फर्स्ट थ्री सेंच्युरीज पुस्तक म्हणतेः “त्रैक्याचे तत्त्व हळुवारपणे आणि तुलनात्मकपणे अलिकडेच घडत गेले. . . . त्याचा मूळारंभ यहुदी व ख्रिस्ती शास्त्रवचनांना पूर्णपणे अनोळखी असणाऱ्या उगमाकडून झाला. . . . तो प्रभाव वाढत गेला आणि त्याचे प्लॅटो मतवादी फादर्सकरवी ख्रिस्ती धर्मात कलम केले गेले.”
तिसऱ्या शकाच्या समाप्तीला “ख्रिस्ती धर्म” आणि नवी प्लॅटो तत्त्वप्रणाली वेगळी होणार नाही इतकी एकजीव झाली. ॲडाल्फ हरनॅक आउटलाईन ऑफ द हिस्ट्री ऑफ डॉग्मा यात म्हणतात त्याप्रमाणे चर्चची तत्वे “नरक तत्त्वप्रणालीच्या [मूर्तिपूजक ग्रीक तत्त्व] जमिनीत खोलवर मुळावली गेली. यामुळेच बहुतेक ख्रिस्तीजनांसाठी ती तत्त्वे गूढ अशी बनली.”
आपली नव तत्त्वप्रणाली पवित्र शास्त्रावर आधारीत आहे असा चर्चने दावा केला. पण हरनॅक म्हणतातः “पण वस्तुतः त्याने आपणामध्ये नरकवादी मिमांसा, अंधश्रद्धेचे दृष्टीकोण आणि मूर्तिपूजकांच्या गूढ-उपासनेच्या प्रथा यांना कायदेशीर स्वरुप दिले असेच म्हणावे लागेल.”
ए स्टेटमेंट ऑफ रिझन्स या पुस्तकात ॲन्ड्रू नॉर्टन त्रैक्याविषयी म्हणतातः “या तत्त्वाचा इतिहास आपल्याला शोधून काढता येऊन त्याचा मूळ उगम पाहता येईल. तो ख्रिस्ती प्रकटीकरणात नव्हे तर प्लॅटोच्या तत्त्वज्ञानात आहे. . . . त्रैक्य
हे ख्रिस्त आणि त्याच्या प्रेषितांनी शिकविलेले तत्त्व नव्हे, नंतरच्या प्लॅटो अनुयायांनी शिकविलेल्या शिक्षणातील उद्भव आहे.”अशाप्रकारे, येशू व प्रेषितांनी आधीच भाकित केलेला धर्मत्याग इ. स. च्या चौथ्या शकात पूर्णपणे बहरला. याचा एक पुरावा म्हणजे त्रैक्याच्या तत्त्वाची वाढ. धर्मत्यागी चर्चेसनी नरकाग्नी, जीवाचे अमरत्व, मूर्तिपूजा यासारख्या इतर मूर्तिपूजक कल्पनांना पूर्णपणे समाविष्ट करुन घेतले. आध्यात्मिकदृष्ट्या म्हणावयाचे तर ख्रिस्ती धर्मराज्य आपल्या काळ्या युगात पूर्णपणे शिरले होते व त्याच्यावर आता “धर्मत्यागी पुरुष” पाळकवर्गाचे वाढते वर्चस्व होते.—२ थेस्सलनीकाकर २:३, ७.
देवाच्या संदेष्ट्यांनी त्याची शिकवण का दिली नाही?
देवाच्या संदेष्ट्यांपैकी एकाने देखील देवाच्या लोकांना इतक्या हजारो वर्षांपर्यंत त्रैक्याची शिकवण का दिली नाही? अगदीच अलिकडे पाहिल्यास येशू त्याच्या काळी पृथ्वीवर थोर शिक्षक होता तेव्हा निदान त्याने तरी आपल्या अनुयायांना त्रैक्याचे शिक्षण स्पष्ट करायला नको होते का? जर ते विश्वासाचे “केंद्रिय तत्त्व” असते तर ज्या परमेश्वराने पवित्र ग्रंथाद्वारे शेकडो पाने प्रेरित केली त्यातल्या एकातरी सूचनेचा त्रैक्य शिकविण्यासाठी उपयोग केला नसता का?
ख्रिस्त येऊन गेल्याच्या काही शतकानंतर, तसेच पवित्र शास्त्राच्या लिखाणास प्रेरणा देऊन संपवल्यावर मग देव, त्याच्या सेवकांना हजारो वर्षे माहीत नसलेल्या तसेच “अत्यंत गूढ” “मानवी आकलनाच्या पलिकडे” असलेल्या, ज्याची पार्श्वभूमी मूर्तिपूजकातून आहे आणि जे “बहुतांशी चर्च राजकारणाशी संबंधीत” आहे त्या तत्त्वाला पाठिंबा देईल असे ख्रिश्चनांनी समजावे का?
इतिहासाची साक्ष अगदी स्पष्ट आहेः त्रैक्याचे शिक्षण सत्यापासून दुरावलेले आहे; ते धर्मत्यागी आहे.
[पानांवरील चित्रं ८]
“ग्रीक वेदांतीय शिक्षणाविषयी जे प्रश्न विचारण्यात येत त्याची कसलीही समज कॉन्स्टंटाईनला नव्हती.”—ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ ख्रिश्चन डॉक्ट्रीन
[८ पानांवरील चौकट]
‘चवथ्या शतकातील त्रैकत्ववाद आरंभीच्या ख्रिस्ती शिक्षणापासून दुरावलेले शिक्षण होते’—द एनसायक्लोपिडिआ अमेरिकाना
[९ पानांवरील चौकट]
“थोर देवांचे त्रैक्य”
ख्रिस्ताच्या काळाआधी कित्येक शतके प्राचीन बाबेलानिया आणि अश्शुर यांजमध्ये देवांचे त्रिकूट अथवा त्रैक्य होते. मेसोपोटेमियातील एका विभागात अशाप्रकारे आढळलेल्या एका त्रैक्याविषयी फ्रेंच “लौरस एन्सायक्लोपिडिआ ऑफ मिथॉलॉजी” असे परिक्षण मांडतेः “विश्वाचे तीन विभाग करण्यात आले होते आणि यापैकीच्या प्रत्येक विभागावर एका देवाचे प्रभुत्व होते. अनुचा आकाशावर ताबा होता. पृथ्वी एन्लीलच्या मालकीची होती तर इआ पाण्याच्या शास्ता बनला. यांचे मिळून थोर देवांचे त्रैक्य तयार झाले.”
[१२ पानांवरील चौकट]
हिंदूंचे त्रैक्य
“द सिंबॉलिझम ऑफ हिंदू गॉड्स ॲण्ड रिच्युअल्स” हे पुस्तक ख्रिस्ताआधी कित्येक शतके अस्तित्वात असलेल्या हिंदू त्रैक्याविषयी म्हणतेः “शिवा हा त्रैक्यापैकीचा एक देव आहे. तो नाशाचा देव आहे असे मानतात. दुसरा देव ब्रम्ह असून तो निर्मितीचा देव आहे आणि विष्णु हा राखणारा देव आहे . . . ही तिन्ही दैवते एक व तीच आहेत हे दाखविण्यासाठी या तीन देवांचे मिळून एक रुप तयार करण्यात आले.”—ए. पार्थसारथी, मुंबईतर्फे प्रकाशित.
[१० पानांवरील चित्रं]
१. मिसर. होरस, ओसिरीस, इसीस यांचे त्रैक्य, इ.स.पू. चे दोन हजारावे वर्ष
२. बाबेलोन. इश्थर, सीन, शामस यांचे त्रैक्य, इ.स.पू. चे दोन हजारावे वर्ष
३. पामीरा. चंद्रदेव, आकाशाचा प्रभू, सूर्यदेव यांचे त्रैक्य, इ.स. चे सुमारे पहिले शतक.
४. भारत. हिंदूचे त्रिमूर्ति दैवत, इ.स. चे सुमारे ७ वे शतक.
५. कम्पुचिआ. बुद्धांचे त्रिमूर्ति दैवत, इ.स. चे सुमारे १२ वे शतक.
६. नॉर्वे. त्रैक्य (पिता, पुत्र, पवित्र आत्मा), इ.स. चे सुमारे १३ वे शतक.
७. फ्रान्स. त्रैक्य, इ.स. चे सुमारे १४ वे शतक.
८. इटली. त्रैक्य, इ.स. चे सुमारे १५ वे शतक.
९. जर्मनी. त्रैक्य, इ.स. चे सुमारे १९ वे शतक.
१०. जर्मनी. त्रैक्य, इ.स. चे २० वे शतक.