पवित्र आत्मा—देवाची क्रियाशील शक्ती
पवित्र आत्मा—देवाची क्रियाशील शक्ती
त्रैक्याच्या तत्वानुरुप पवित्र आत्मा हा त्रिमस्तकीय देवामध्ये तिसरी व्यक्ती आहे आणि तो देव व पुत्र यांच्या बरोबरीचा आहे असे समजले जाते. आवर ऑर्थडक्स ख्रिश्चन फेथ हे पुस्तक म्हणते त्याप्रमाणे “पवित्र आत्मा हा सर्वतोपरी देवच आहे.”
इब्री शास्त्रवचनात “आत्मा” या शब्दासाठी वापरण्यात आलेला शब्द रुʹआख असा आहे. याचा अर्थ, “श्वास; हवा; आत्मा.” ग्रीक शास्त्रवचनात वापरण्यात आलेला शब्द न्यूʹमा असून त्याचा तोच अर्थ आहे. हे शब्द, पवित्र आत्मा त्रैक्याचा एक भाग आहे असे सूचित करतात का?
क्रियाशील शक्ती
पवित्र शास्त्राने वापरलेला “पवित्र आत्मा” हा शब्द सुचवितो की, ती अशी नियंत्रित शक्ती आहे जिला यहोवा देव आपले विविध उद्देश साध्य करण्यासाठी उपयोगात आणतो. काही अंशी तिची तुलना विद्युतशक्तीसोबत करता येते, तिचा वापर विविध कार्ये करण्यासाठी करता येतो.
पवित्र शास्त्र उत्पत्ती १:२ मध्ये म्हणतेः “देवाची क्रियाशील शक्ती [“आत्मा” (इब्री, रुʹआख)] पाण्याच्या पृष्ठभागावर मागेपुढे होत होती.” येथे देवाचा आत्मा त्याची क्रियाशील शक्ती पृथ्वीचा आकार घडवीत होती.
देव आपला आत्मा, त्याची सेवा करणाऱ्यांना प्रज्वलित करण्यासाठी वापरतो. दाविदाने प्रार्थिलेः “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव; कारण तू माझा देव आहेस. तुझा आत्मा [रुʹआख] उत्तम आहे; तो मला सरळ मार्गाने नेवो.” (स्तोत्रसंहिता १४३:१०) मोशेला मदत करण्यासाठी ७० पुरुषांची नियुक्ती करण्यात आली तेव्हा देवाने त्याला म्हटलेः “तुझ्यावर असणाऱ्या आत्म्यातून [रुʹआख] काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन.”—गणना ११:१७.
देवाकडील लोक “पवित्र आत्म्याने [ग्रीक, न्यूʹमा] प्रेरित झाले” तेव्हा पवित्र शास्त्र भविष्यवादांचे लिखाण करण्यात आले. (२ पेत्र १:२०, २१) अशाप्रकारे पवित्र शास्त्र “ईश्वर प्रेरित” झाले. याकरता असणारा ग्रीक शब्द थि․ओʹन्यू․स्टोस असा असून याचा अर्थ “देवाने घातलेला फुंकर” हा आहे. (२ तीमथ्य ३:१६) पवित्र आत्म्यामुळे काही लोकांना दृष्टांत किंवा भविष्यवादित स्वप्ने पाहण्याचे मार्गदर्शन मिळाले.—२ शमुवेल २३:२; योएल २:२८, २९; लूक १:६७; प्रे. कृत्ये १:१६; २:३२, ३३.
येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर त्याला पवित्र आत्म्याकरवीच रानात निरविले गेले. (मार्क १:१२) पवित्र आत्मा देवाच्या सेवकांमध्ये अग्नीसारखा भडकत होता व ते त्या शक्तीने प्रबळ होत. त्यामुळे ते निर्भिडपणे व धैर्याने बोलू शकले.—मीखा ३:८; प्रे. कृत्ये ७:५५-६०; १८:२५; रोमकर १२:११; १ थेस्सलनीकाकर ५:१९.
आपल्या आत्म्याद्वारेच देव माणसे व राष्ट्रे यांजवर न्यायदंड बजावितो. (यशया ३०:२७, २८; ५९:१८, १९) देवाचा आत्मा सर्वत्र पोहंचू शकतो आणि लोकांसाठी वा त्यांच्याविरुद्ध कार्य करु शकतो.—स्तोत्रसंहिता १३९:७-१२.
“सामर्थ्याची पराकोटी”
देवाचा आत्मा, देवाची सेवा करणाऱ्यांना “सामर्थ्याची पराकोटी” सुद्धा देऊ शकतो. (२ करिंथकर ४:७) यामुळे त्यांना परिक्षाप्रसंगात टिकून राहण्यास वा त्यांना जमू न शकणाऱ्या गोष्टी करण्याची मदत मिळते.
उदाहरणार्थ, शमशोनाविषयी शास्ते १४:६ म्हणतेः “याहवेच्या आत्म्याने त्याच्यावर झडप घातली आणि हातात कोणतेही हत्यार नसता त्याने . . . सिंहाला फाडून टाकले.” (जे.बा.) मग आता कोणी ईश्वरी व्यक्तीने शमशोनावर झडप घालून त्याच्यात प्रवेश मिळविला आणि त्याने जे केले ते त्याला करावयाला लावले का? नाही. तर ती खरेपणाने “प्रभुची शक्ती होती [जिने] शमशोनाला सामर्थ्यवान केले.”—टु.इं.व्ह.
पवित्र शास्त्र म्हणते की, येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा पवित्र आत्मा कोणा मानवाच्या रुपाने नव्हे तर कबुतराच्या रुपात खाली येताना दिसला. (मार्क १:१०) देवाच्या या क्रियाशील शक्तीने येशूला आजाऱ्यांना बरे करण्यास आणि मृतांना पुनरुत्थित करण्यासाठी समर्थ केले. लूक ५:१७ म्हणते त्याप्रमाणे “रोग बरे करण्यास प्रभुचे [देवाचे] सामर्थ्य त्याच्या [येशूच्या] ठायी होते.”—जे.बा.
देवाच्या आत्म्याने येशूच्या शिष्यांना देखील आश्चर्यकारक कामे करण्यासाठी प्रबळ केले. प्रे. कृत्ये २:१-४ याविषयीचे वर्णन देते की, शिष्य पेंटेकॉस्टच्या दिवशी एकत्र जमले असता “अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, . . . आणि ते पवित्र आत्म्याने पूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.”
अशाप्रकारे हे स्पष्ट दिसते की, जे कार्य मानवाला सहजपणे करता येणे जमत नाही ते करण्यासाठी पवित्र आत्म्याने येशूला व इतर देवाच्या सेवकांना सामर्थ्य दिले.
व्यक्ती नाही
तरीपण, पवित्र शास्त्रात अशी काही वचने आहेत का जी, पवित्र आत्म्याविषयी व्यक्तीवाचक संज्ञेने बोलतात? होय, पण याविषयी कॅथोलिक वेदांतीय एडमंड फोर्टमन आपल्या द ट्रियुन गॉड या पुस्तकात काय म्हणतात ते लक्षात घ्याः “या आत्म्याला बहुधा व्यक्तीवाचक संज्ञेने वर्णिण्यात आले आहे तरी [इब्री शास्त्रवचनांच्या] पवित्र लेखकांनी हा आत्मा विशिष्ट व्यक्ती आहे असा कधीच विचार केला नव्हता किंवा त्याची तशी माहिती दिली नाही हे अगदीच स्पष्ट आहे.”
कोणा एकास व्यक्तीत्वरुपाने सादर करणे ही शास्त्रवचनांची काही असाधारण बाब नाही. ज्ञानाला मुले असल्याचे संबोधिले आहे. (लूक ७:३५) पाप व मरण यांना राजे म्हणण्यात आले आहे. (रोमकर ५:१४, २१) उत्पत्ती ४:७ चे द न्यू इंग्लिश बायबल (न्यू.इं.बा.) असे म्हणतेः “पाप हे दरवाजावर टपलेले भूत आहे.” याचा अर्थ हा की, पापाला काईनच्या दरवाजाजवळ असलेल्या दुरात्म्याची उपमा देण्यात आली. पण पाप हे काही आत्मिक व्यक्ती नाही; त्यामुळे पवित्र आत्म्याला व्यक्तीवाचक करणे म्हणजे ती आत्मिक व्यक्ती आहे असा याचा अर्थ नव्हे.
याच्याच अनुषंगाने १ योहान ५:६-८ मध्ये केवळ आत्माच नव्हे तर “पाणी व रक्त” ह्याही गोष्टी “साक्षी” आहेत असे म्हणण्यात आले आहे. पण वस्तुतः पाणी व रक्त या काही व्यक्ती नाहीत, त्यामुळे पवित्र आत्मा ही देखील व्यक्ती नाही.
याच पद्धतीने, पवित्र आत्म्याला पाणी व अग्नि यांच्या मत्तय ३:११; मार्क १:८) लोकांना द्राक्षारसाऐवजी पवित्र आत्म्याने भरण्याचा आर्जव केला आहे. (इफिसकर ५:१८) लोक जसे ज्ञान, विश्वास आणि आनंद यांनी भरु शकतात तसेच ते पवित्र आत्म्याने भरले आहेत असेही सांगण्यात आले आहे. (प्रे. कृ. ६:३; ११:२४; १३:५२) तसेच २ करिंथकर ६:६ मध्ये पवित्र आत्म्याला कित्येक गुणांच्या मालिकेत ठेवण्यात आले आहे. जर पवित्र आत्मा ही व्यक्ती असती तर अशी ही वक्तव्ये इतकी सर्वसाधारणपणे दिसलीच नसती.
मालिकेत दाखवून त्याचा अव्यक्तीवाचक प्रयोग पवित्र शास्त्राने सर्वसाधारणपणे दर्शविला आहे. (काही पवित्र शास्त्रीय वचने आत्मा बोलतो असे सांगत असली तरी इतर वचने दाखवितात की ही गोष्ट वास्तविकपणे मानव किंवा दिव्यदूत यांजमार्फत करण्यात आली. (मत्तय १०:१९, २०; प्रे. कृत्ये ४:२४, २५; २८:२५; इब्रीयांस २:२) या उदाहरणातील आत्म्याची हालचाल ही एका माणसापासून दूरवर राहणाऱ्या माणसापर्यंत संदेश वाहून नेणाऱ्या रेडिओच्या ध्वनिलहरींसमान आहे.
मत्तय २८:१९ मध्ये “पवित्र आत्म्याच्या नामाने” असा संदर्भ आला आहे. तथापि, “नाम” याचा अर्थ नेहमीच व्यक्तिगत नावाला उद्देशून नसतो. इंग्रजीत जेव्हा असे म्हटले जाते की, “इन दे नेम ऑफ द लॉ” तेव्हा कोणा व्यक्तीचा संदर्भ त्यात नसतो. तर त्याचा अर्थ कायदा ज्याचे प्रतिक असतो तो म्हणजे अधिकाराला ते सूचित असते. (‘इन द नेम ऑफ . . .’ ही जी परिभाषा इंग्रजीत वापरली जाते तिचा मराठीतील अर्थ ‘. . . ला स्मरुन’ असा आहे.) रॉबर्टसन यांचे वर्ड पिक्चर इन द न्यू टेस्टमेंट म्हणतेः “सेप्ट्युजंट आणि भूर्जपत्रातील लिखाणात नाम (ओनोमा) या शब्दाचा वापर सामर्थ्य वा अधिकार दर्शविण्यासाठी केला गेला आहे.” तद्वत, ‘पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा घेणे’ म्हणजे आत्म्याचा अधिकार ओळखणे हे आहे; म्हणजेच ती शक्ती देवाकडून आहे आणि ईश्वरी इच्छेनुरुप तिचे कार्यप्रवण होते हे कबूल करणे होय.
“कैवारी”
येशूने पवित्र आत्म्याला “कैवारी” असे म्हटले आणि तो शिकवील, मार्गदर्शन देईल आणि बोलेल असेही सांगितले. (योहान १४:१६, २६; १६:१३) येथे कैवारी या शब्दासाठी त्याने वापरलेला (पा․राʹक्ले․टोस) ग्रीक शब्द पुर्ल्लिगी रुपात आहे. यास्तव, कैवारी काय करील ते सांगताना येशूने पुर्ल्लिगी व्यक्तीवाचक सर्वनाम वापरले. (योहान १६:७, ८) पण तेच आत्म्यासाठी जेव्हा नपुंसकलिंगी ग्रीक शब्द (न्यूʹमा) वापरण्यात येतो तेव्हा “ते” हे नपुंसकलिंगी सर्वनाम योग्यपणे वापरण्यात येते.
बहुतेक त्रैक्यत्ववादी भाषांतरकार या गोष्टीला लपवून ठेवतात. ही गोष्ट कॅथोलिकांच्या न्यू अमेरिकन बायबल ने योहान १४:१७ च्या बाबतीत कबूल केली आहे. ते म्हणतेः “‘आत्मा’ यासाठी असणारा शब्द नपुंसकलिंगी आहे. आम्ही इंग्रजीत याविषयी जेथे व्यक्तीवाचक सर्वनाम (‘तो,’ ‘त्याचे,’ ‘त्याला’) वापरतो तेथे ग्रीक हस्तलिखितात ‘ते’ वापरण्यात आले आहे.”
अशाप्रकारे आपल्याला आता हे कळेल की, पवित्र शास्त्र जेव्हा योहान १६:७, ८मध्ये पा․राʹक्ले․टोस च्या अनुषंगाने पुर्ल्लिगी व्यक्तीवाचक सर्वनाम वापरुन आहे तेव्हा तो प्रयोग व्याकरणाला अनुसरुन आहे, तेथे तत्वप्रणालीविषयीचे वक्तव्य नाही.
त्रैक्याचा भाग नाही
पवित्र आत्मा ही त्रैक्यातील तिसरी व्यक्ती आहे या कल्पनेला पवित्र शास्त्र पुष्टी देत नाही याविषयी वेगवेगळ्या उगमांकडून कबूली मिळत आहे. उदाहरणार्थः
द कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआः “जुन्या करारात तिसऱ्या व्यक्तीविषयी स्पष्ट असा निर्देश कोठेही मिळत नाही.”
कॅथोलिक वेदांती फोर्टमनः “आत्मा ही व्यक्ती आहे असे यहुद्यांनी कधीच मानले नव्हते. तसेच कोणा जुन्या करारच्या लेखकाने तसा ग्रह बाळगला होता याचा कसलाही बळकट पुरावा उपलब्ध नाही. . . . पवित्र आत्म्याला शुभवर्तमानात आणि प्रे. कृत्येमध्ये ईश्वरी शक्ती किंवा सामर्थ्य असे बहुधा सादर करण्यात आले आहे.”
न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआः “जु[ना] क[रार] देवाच्या आत्म्याला व्यक्ती म्हणून कधीच पाहत नाही . . . देवाचा आत्मा ही देवाची शक्ती आहे. कधी कधी तिला देवापासून वेगळी आहे असे चितारण्यात आले आहे असे दिसते तर ते याहवेचा श्वास बाह्यरुपाने कार्य करीत आहे हे दाखविण्यासाठी असते.” पुढे ते आणखी म्हणतेः “न[वा] क[रार] मधील बहुतेक वचने देवाच्या आत्म्याला कोणीतरी म्हणून नव्हे तर काहीतरी आहे असे प्रदर्शित करतात; आणि हे खासपणे आत्मा आणि देवाचे सामर्थ्य यात जी समांतरता आहे त्यात दिसून येते.”—तिरप्या अक्षरवळणाचा प्रकार आमचा.
ए कॅथोलिक डिक्शनरी: “एकंदरीतपणे, नवा करार हा जुन्या कराराप्रमाणेच आत्म्याच्या बाबतीत ती ईश्वरी शक्ती वा सामर्थ्य आहे असे भाष्य करतो.”
याप्रकारे, पवित्र आत्मा हा त्रैक्यातील भाग आहे असे यहुदी आणि आरंभीच्या ख्रिस्तीजनांनी देखील मानले नव्हते. हे शिक्षण काही शतकांनी सामोरे आले. ए कॅथोलिक डिक्शनरी याविषयीचे परिक्षण मांडताना म्हणतेः “तिसऱ्या व्यक्तीविषयीची समजूत ३६२
मध्ये अलेक्झांड्रियाच्या सभेत आली. . . . आणि सरतेशवटी ३८१ मधील कॉस्टँटिनोपलच्या सभेत ती रुढ झाली”—हे पेंटेकॉस्टला पवित्र आत्म्याकरवी शिष्य भरविले गेले त्यानंतर साडे तीनशे वर्षांनी झाले!”पवित्र आत्मा ही व्यक्ती नाही आणि ती त्रैक्याचा भाग नाही. पवित्र आत्मा ही देवाची क्रियाशील शक्ती असून तिचा वापर देव आपल्या इच्छेची पूर्णता करण्यासाठी करतो. ती देवाच्या बरोबरीची नसून नेहमीच देवाकडे उपलब्ध असते आणि दुय्यम स्थानी राहते.
[२१ पानांवरील चित्रं]
एके प्रसंगी पवित्र आत्मा कबुतराच्या रुपात दिसला. दुसऱ्या प्रसंगी तो अग्निच्या जिव्हा रुपात दिसला—पण व्यक्ती म्हणून कधीच दिसला नाही
[२२ पानांवरील चौकट]
“एकंदरीतपणे, नवा करार हा जुन्या कराराप्रमाणेच आत्म्याच्या बाबतीत ती ईश्वरी शक्ती वा सामर्थ्य आहे असे भाष्य करतो.”—ए कॅथोलिक डिक्शनरी