व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही एका महत्त्वाच्या वादविषयात गोवलेले आहात

तुम्ही एका महत्त्वाच्या वादविषयात गोवलेले आहात

प्रकरण १२

तुम्ही एका महत्त्वाच्या वादविषयात गोवलेले आहात

१, २. (अ) तुम्ही आपले जीवन कसे जगता याचे महत्त्व तुम्हाला का वाटावे? (ब) त्याचे महत्त्व आणखी कोणाला वाटते व का?

 आपले आयुष्य तुम्ही कसे व्यतीत करता याला महत्त्व आहे. त्यामुळे तुमचे भविष्य एक तर सुखाचे वा दुःखाचे ठरेल. कालांतराने तुम्ही या जगाबरोबर नाहीसे व्हाल की त्याच्या नाशातून बचावून देवाच्या नवीन व्यवस्थीकरणात अनंतकाल जीवन मिळवाल हे सुद्धा त्यावरच अवलंबून आहे.—१ योहान २:१७; २ पेत्र ३:१३.

तुमचे आयुष्य तुम्ही कसे घालवता याचा परिणाम फक्‍त तुमच्या पुरताच मर्यादित राहात नाही. त्याचा इतरांवरही परिणाम होतो. तुम्ही काय करता याचा त्यांच्यावरही परिणाम होतो. उदाहरणार्थ, तुमचे आई-वडील हयात असल्यास तुमच्या कार्यामुळे त्यांना सन्मान तरी मिळतो वा त्यांची मानहानी तरी होते. पवित्र शास्त्र म्हणतेः “मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी.” (नीतीसूत्रे १०:१) त्याहून अधिक म्हणजे, तुम्ही आपले आयुष्य कसे जगता याचा यहोवावर परिणाम होतो. त्यामुळे तो आनंदी अथवा दुःखी होतो. का बरे? तुम्ही ज्यात गोवलेले आहात त्या एका महत्त्वाच्या वादविषयामुळे.

मानव देवाशी प्रामाणिक राहतील का?

३. सैतानाने यहोवाला कोणते आव्हान दिले?

दियाबल सैतानाने हा वाद उपस्थित केला. आदाम व हव्वेला देवाचा नियम मोडण्यास फितवून व देवाविरुद्ध बंडामध्ये त्यांना स्वतःकडे सामील करुन घेऊन सैतानाने हा वाद पुढे आणला. (उत्पत्ती ३:१-६) त्यामुळे, ‘तुझ्यापासून फायदे मिळतात म्हणून लोक तुझी सेवा करतात. मला संधी दिल्यास मी सर्वांना तुझ्याविरुद्ध करु शकेन.’ असे आव्हान यहोवा देवाला देण्यास जागा आहे असे सैतानाला वाटले. हे शब्द पवित्र शास्त्रात सापडत नाहीत. पण पवित्र शास्त्रातील ईयोबाच्या पुस्तकामध्ये सैतानाने देवाला इतर शब्दात असेच काही म्हटल्याचे दिसून येते.

४, ५. (अ) ईयोब कोण होता? (ब) ईयोबाच्या काळी स्वर्गात काय घडले?

एदेन बागेतील बंडानंतर अनेक शतकानंतर ईयोब हयात होता. तो यहोवा देवाचा नीतीमान व विश्‍वासू सेवक होता. पण ईयोबाचे विश्‍वासू असणे हे देवाच्या किंवा सैतानाच्या दृष्टीने अर्थपूर्ण होते का? होय, ते होते असे पवित्र शास्त्र दाखविते. यहोवाच्या स्वर्गीय दरबारातील सैतानाच्या उपस्थितीबद्दल ते सांगते. त्यांच्या संभाषणाचा विषय पहाः

“एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र यहोवासमोर येऊन उभे राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. यहोवा सैतानास म्हणालाः ‘तू आता कोठून आलास?’ सैतानाने यहोवास उत्तर दिलेः ‘मी पृथ्वीवर इकडेतिकडे हिंडून फिरुन आलो आहे.’ यहोवाने सैतानास विचारलेः ‘माझा सेवक ईयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते का? कारण भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही?’”—ईयोब १:६-८.

६. ईयोबाच्या काळी कोणता वाद होता असे पवित्र शास्त्र दर्शविते?

ईयोब सरळ माणूस असल्याचे यहोवाने सैतानाला का सांगितले? कारण ईयोब यहोवाशी इमानदार राहील किंवा नाही असा वाद असावा हे उघड आहे. “तू आता कोठून आलास?” या देवाच्या प्रश्‍नावर, “मी पृथ्वीवर इकडेतिकडे हिंडून फिरुन आलो आहे” या सैतानाच्या उत्तरावर जरा विचार करा. हा प्रश्‍न व सैतानाचे उत्तर यावरुन कळते की, देवाने सैतानाला ‘कोणासही देवापासून परावृत्त करु’ हा दावा सिद्ध करण्यास मोकळीक दिली होती. ईयोबाच्या विश्‍वासूपणाबद्दल यहोवाने विचारलेल्या प्रश्‍नाला सैतानाने काय उत्तर दिले?

७, ८. (अ) ईयोब देवाची सेवा कोणत्या कारणास्तव करतो असे सैतानाचे म्हणणे होते? (ब) हा वाद सोडवण्यासाठी यहोवाने काय केले?

“सैतानाने यहोवाला उत्तर दिले की, ‘ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो? तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातास यश दिले आहे ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना? तू आपला हात पुढे करुन त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.’”—ईयोब १:९-११.

ईयोबाच्या विश्‍वासूपणाबद्दल सैतान निरर्थक सबब काढीत होता असे त्याच्या उत्तरावरुन कळते. ‘तुझ्यावरील प्रेमामुळे नव्हे, तर तू त्याला ज्या गोष्टी देतोस, त्यामुळे ईयोब तुझी सेवा करतो’ असे सैतानाचे म्हणणे होते. तसेच, यहोवा आपल्या उच्च शक्‍तीचा वापर अन्यायीपणे करतो अशी तक्रारही सैतानाने केली. तो म्हणालाः ‘तू त्याचे सदैव रक्षण केले आहेस.’ यामुळेच वाद मिटविण्यासाठी यहोवाने उत्तर दिलेः “पहा, त्याचे सर्वस्व मी तुझ्या हाती देतो; त्याला मात्र हात लावू नको.”—ईयोब १:१२.

९. सैतानाने ईयोबाला कोणते क्लेश दिले व त्याचा परिणाम काय झाला?

त्याच क्षणापासून तत्काळ सैतानाने ईयोबाला त्रास द्यायला सुरवात केली. त्याने ईयोबाची गुरे मारवली अथवा पळवली. त्यानंतर त्याची १० मुले ठार केली. ईयोबाचे बहुतेक सर्व गमावले गेले तरी तो यहोवाशी एकनिष्ठ राहिला. त्याने देवाची निंदा केली नाही. (ईयोब १:२, १३-२२) पण इथेच शेवट झाला नाही.

१०. सैतानाने हार मानली नाही हे कशावरुन दिसते?

१० सर्व देवदूतांसह सैतान पुन्हा यहोवासमोर हजर झाला. ईयोबाची निष्ठा पाहिली काय असे देवाने सैतानाला पुन्हा विचारले व तो म्हणालाः “तरी तो आपल्या सत्त्वाला दृढ धरुन आहे”, तेव्हा सैतान उत्तरलाः “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. तू आपला हात पुढे करुन त्याच्या हाडामांसास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.”—ईयोब २:१-५.

११. (अ) सैतानाने ईयोबाला आणखी कोणता त्रास दिला? (ब) त्यामुळे काय निष्पन्‍न झाले?

११ उत्तरादाखल यहोवाने सैतानाला ईयोबास शक्य तेवढा त्रास देण्याची अनुमती दिली. पण तो म्हणालाः “त्याची प्राणहानी मात्र करु नकोस.” (ईयोब २:६) तेव्हा सैतानाने ईयोबाला एका भयंकर रोगाने पिडले. ईयोबाच्या यातना इतक्या असह्‍य होत्या की आपण मरावे अशी प्रार्थना तो करु लागला. (ईयोब २:७; १४:१३, १४) त्याची बायकोही त्याच्याविरुद्ध उलटली व म्हणालीः “देवाचे नाव सोडून द्या आणि मरुन जा.” (ईयोब २:९) पण ईयोबाने तसे करणे नाकारले. तो म्हणालाः “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्त्वसमर्थन सोडणार नाही.” (ईयोब २७:५) ईयोब देवाशी एकनिष्ठ राहिला. अशा रितीने, प्रेमापोटी नव्हे तर, भौतिक लाभासाठी ईयोब देवाची सेवा करतो हा सैतानाचा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. सैतान प्रत्येकाला देवाविरुद्ध वळवू शकणार नाही हेही त्यावरुन सिद्ध झाले.

१२. (अ) सैतानाच्या आव्हानाला उत्तर देण्यास ईयोबाने देवाला कशी मदत केली? (ब) देवावरील येशूच्या निष्ठेने काय सिद्ध झाले?

१२ ईयोबाच्या विश्‍वासू वर्तणूकीने यहोवाला काय वाटले असेल असे तुम्हास वाटते? त्याला अतिशय आनंद झाला! देवाचे वचन म्हणतेः “माझ्या मुला, सूज्ञ होऊन माझे अंतःकरण आनंदीत कर; म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.” (नीतीसूत्रे २७:११) सैतानच देवाची निंदा करत आहे. आपल्या विश्‍वासू वर्तनाने ईयोबाने यहोवाचे अंतःकरण संतोषविले. मानवांची परिक्षा घेतल्यास ते यहोवाची सेवा करणार नाहीत या सैतानाच्या बढाईखोर आव्हानाला त्यामुळे यहोवाजवळ उत्तर मिळाले. इतर अनेकांनीही असे उत्तर देण्यास देवाला मदत केली आहे. त्यातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अव्यंग मानव, येशू. सैतानाने आणलेल्या सर्व परिक्षा व क्लेशातून त्याने आपली निष्ठा सोडली नाही. याद्वारे हे सिद्ध झाले की, आदामाची इच्छा असती तर तो सुद्धा देवाशी एकनिष्ठ राहू शकला असता. तसेच माणसांकडून संपूर्ण आज्ञाधारकपणाची अपेक्षा करण्यात देवाची काहीही चूक नाही असेही यावरुन सिद्ध केले गेले.

तुमची भूमिका कोणती?

१३. (अ) तुम्ही आपले जीवन कसे जगता याचा या वादाशी काय संबंध आहे? (ब) आपण देवाला आनंद वा दुःख कसे देऊ शकतो?

१३ आता तुमच्या जीवनाविषयी काय? तुम्ही कसे जगता याला फारसे महत्त्व नाही असे तुम्हाला कदाचित वाटत असेल. पण त्याला महत्त्व आहे. तुम्हाला माहीत असो वा नसो तुमच्या वर्तनाने एकतर देवाला नाहीतर सैतानाला पाठिंबा मिळतो. देवाला तुमची काळजी आहे. त्याची सेवा करीत, पृथ्वीवरील नंदनवनात तुम्ही अनंतकाल जीवन उपभोगावे अशी त्याची इच्छा आहे. (योहान ३:१६) जेव्हा इस्राएल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले तेव्हा त्याला दुःख झाले वा वाईट वाटले. (स्तोत्रसंहिता ७८:४०, ४१) तर मग, तुमचा जीवनक्रम देवाला आनंदविणारा आहे की दुःख देणारा आहे? अर्थात, देवाला आनंदी करण्यासाठी तुम्ही त्याचे नियम शिकून त्याचे अवलंबन केले पाहिजे.

१४. (अ) देवाला आनंद देण्यासाठी लैंगिक संबंधाबद्दल कोणते नियम आपण पाळले पाहिजेत? (ब) ह्‍या नियमांना मोडणे हा गुन्हा का आहे?

१४ आपल्या प्रजनन शक्‍तीचा उपयोग करण्याविषयीचे तसेच विवाह व कुटुंब संस्था यांचे नियमन करणारे देवाचे कायदे आपण मोडावे हा सैतानाचा प्रमुख उद्देश आहे. आपल्या सुखाचे रक्षण करणाऱ्‍या, देवाच्या नियमांनुसार, अविवाहीत व्यक्‍तींनी कोणालाही लैंगिक संबंधात गुंतवू नये आणि विवाहीत व्यक्‍तींनी देखील आपल्या जोडीदाराशिवाय इतर कोणाशीही लैंगिक संबंध ठेवू नयेत. (१ थेस्सलनीकाकर ४:३-८; इब्रीयांस १३:४) जेव्हा देवाचा नियम मोडला जातो तेव्हा अनेकदा, अशी मुले जन्माला येतात ज्यांना पालकांचे प्रेम व जिव्हाळा मिळत नाही. काही माता गर्भपात करुन घेतात व मुले जन्मण्यापूर्वीच त्यांना मारुन टाकतात. शिवाय व्यभिचार केल्याने अनेकांना भयानक गुप्तरोग होतात. भविष्यात त्यांना होणाऱ्‍या मुलांना त्यापासून अपाय होऊ शकतो. ज्या व्यक्‍तीशी तुमचा विवाह झालेला नसेल त्याबरोबर लैंगिक संबंध ठेवणे हा विश्‍वासघात असून देवाविरुद्ध गुन्हाही आहे. ईयोब म्हणालाः “माझे मन कोणा स्त्रीला पाहून लंपट झाले असेल, मी आपल्या शेजाऱ्‍याच्या दाराशी टपून बसलो असलो तर . . . हे दुष्कर्म आहे. हा न्यायाधिशांनी शिक्षा करण्याजोगा गुन्हा आहे.”—ईयोब ३१:१, ९, ११.

१५. (अ) जारकर्माने आपण कोणाला प्रसन्‍न करीत असतो? (ब) देवाचे नियम पाळणे हे सूज्ञतेचे का आहे?

१५ ज्याच्याशी आपले लग्न झालेले नाही अशा व्यक्‍तीशी लैंगिक संबंध ठेवणे स्वाभाविक व योग्य आहे असे या सैतानाच्या जगाने तुम्हाला भासवल्यास त्यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही. परंतु, तुमच्या अशा या वागणुकीने तुम्ही कोणाला संतोषवीत आहात? यहोवाला नव्हे तर सैतानाला. देवाला प्रसन्‍न करण्यासाठी तुम्ही “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ” काढला पाहिजे. (१ करिंथकर ६:१८) देवाशी विश्‍वासू राहणे नेहमीच सोपे नसते हे खरे. ईयोबालाही ते सोपे नव्हते. पण लक्षात ठेवा की देवाचे नियम पाळणे सूज्ञतेचे असते. तसे ते पाळल्यास तुम्ही आताही सुखी व्हाल. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे या वादविषयात तुम्ही देवाला पाठिंबा देऊन त्याला आनंदी कराल. आणि तो तुम्हाला पृथ्वीवर चिरकाल आनंदात राहण्याचा आशीर्वाद देईल.

१६. (अ) एकनिष्ठ राहिल्यामुळे ईयोबाला कोणते आशीर्वाद मिळाले? (ब) ईयोबाच्या १० मुलांना मारण्यासारख्या सैतानाच्या अत्याचारांबद्दल काय म्हणता येईल?

१६ सैतानाने ईयोबाला दरिद्री केले व त्याच्या १० मुलांचा मृत्यु घडवून आणला. यामुळे ईयोबाची खूप हानी झाली यात शंका नाही. परंतु ईयोब एकनिष्ठ राहिल्याने, सैतानाने परिक्षा घेण्यापूर्वी त्याच्याजवळ जितके काही होते, त्याच्या दुप्पट देवाने त्याला दिले. ईयोबाला आणखी १० मुलेही झाली. (ईयोब ४२:१०-१७) शिवाय ईयोबाच्या ज्या मुलांना सैतानाने मारले तीही, मृतांचे पुनरुत्थान होईल तेव्हा पुन्हा जिवंत होतील. हे खरे की, सैतान देऊ शकणारी कोणतीही इजा वा अत्याचार असा नाही की जो आपला प्रेमळ पिता यहोवा त्याच्या नेमस्त काळात दूर करू शकणार नाही.

१७. आपले जीवन आपण कसे जगतो याला खरोखर का महत्त्व आहे?

१७ तेव्हा, तुम्ही आपले जीवन कसे घालवता याला महत्त्व आहे याची तुम्ही नेहमी आठवण ठेवली पाहिजे. विशेषतः यहोवा देव व सैतान यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. कारण मानव देवाशी एकनिष्ठ राहील किंवा नाही या वादविषयात तुम्हीही गोवलेले आहात.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१०६ पानांवरील चित्रं]

परिक्षाप्रसंगात कोणीही देवाशी विश्‍वासू राहू शकत नाही या सैतानाच्या आव्हानाला ईयोबाने समर्थपणे तोंड दिले

[११० पानांवरील चित्रं]

ज्या व्यक्‍तीसोबत तुमचे लग्न झालेले नाही अशाबरोबर लैंगिक समागम करणे हा देवाच्या दृष्टीने गुन्हा आहे

[१११ पानांवरील चित्रं]

ईयोबाने विश्‍वासूपणा राखला म्हणून देवाने त्याला पूर्वीपेक्षा अधिक पटीने आशीर्वादित केले