दुरात्मे प्रबल आहेत
प्रकरण १०
दुरात्मे प्रबल आहेत
१. मृतांशी बोलता येते असा अनेकांचा समज का आहे?
लोक मृतांशी बोलल्याचे अनेकदा सांगतात. एक नामवंत दिवंगत एपिस्कोपल बिशप, जेम्स ए. पाईक, आपला मृत मुलगा जिम याच्याशी बोलल्याचे सांगत. पाईक म्हणतात की, त्यांच्या मुलाने त्यांना असे सांगितलेः “माझ्या सभोवार लोकांची गर्दी आहे, आणि जणू अनेक हात मला उंच उचलत आहेत. . . . (हे सर्व) तुम्हाला सांगेपर्यंत मला मुळीच सुख नव्हते.”
२. (अ) मृतांशी कोणीही का बोलू शकत नाही? (ब) तद्वत, कोणते प्रश्न उपस्थित होतात?
२ असे अनुभव बऱ्याच जणांना आले असल्यामुळे अनेक लोक आत्मिक जगातील कोणाशी तरी बोलले आहेत हे उघड आहे. पण ते मृतांशी बोलले नाहीत. पवित्र शास्त्र स्पष्टच म्हणते की, “मृतांस तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) आत्मिक जगातून जर मेलेले लोक बोलत नाहीत तर मग बोलते तरी कोण? आपण मृत व्यक्ति असल्याची बतावणी कोण करतो?
३. (अ) आपण मृत व्यक्ती आहोत असे कोण भासवतात? (ब) दुरात्मे बहुधा कोणाला माहिती देतात?
३ दुरात्मे. हे आत्मे किंवा भूते म्हणजे देवाविरुद्ध बंड करण्यात सैतानाला सामील झालेले देवदूत होत. स्वतः मृत व्यक्ति असल्याची बतावणी ते का करतात? मृत व्यक्ती अजून जिवंत आहे या कल्पनेला उत्तेजन देण्यासाठी. नवीन जीवनाची सुरुवात म्हणजे मृत्यु, अशी लोकांची खोटी समजूत करुन देण्यासही हे दुरात्मे कारणीभूत आहेत. असत्य पसरविण्यासाठी दैवज्ञ, ज्योतिषी, फक्त मृतांकडून मिळालेली आहे असे भासवणारी खास माहिती देणारे मांत्रिक अशांचा हे दुरात्मे उपयोग करतात.
मृत शमुवेल असल्याची बतावणी
४. (अ) शौल राजाला मदतीची आवश्यकता का होती? (ब) पंचाक्षरी व चेटक्यांबद्दल देवाचा नियम काय होता?
४ देवाचा मृत संदेष्टा शमुवेल असल्याचे भासवणाऱ्या एका दुरात्म्याचे उदाहरण पवित्र शास्त्रात आहे. ही घटना शौल राजाच्या कारकिर्दीच्या ४० व्या वर्षी घडली. पलिष्ट्यांची एक बलवान सेना शौलाच्या इस्राएल सैन्यावर चालून आली. तेव्हा शौल अत्यंत भयभीत झाला. “पंचाक्षऱ्याच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका. त्यांच्यामागे लागून अशुद्ध होऊ नका” हा देवाचा नियम शौलास माहीत होता. (लेवीय १९:३१) तरीही कालांतराने शौल यहोवा देवापासून दुरावला. त्यामुळे त्यावेळी हयात असलेल्या शमुवेलाने शौलास पुन्हा कधीही भेटण्यास नकार दिला. (१ शमुवेल १५:३५) या अशा बिकट परिस्थितीत जेव्हा यहोवा देव त्याच्या मदतीसाठी केलेल्या धाव्याकडे लक्ष देईना तेव्हा शौल अगदी निराश झाला.
५. (अ) मदत मिळविण्यासाठी शौल कोठे गेला? (ब) चेटकीण काय करु शकली?
५ भविष्यात काय होईल हे जाणण्याची शौलाला इतकी तीव्र इच्छा होती की, तो एन-दोर येथील एका चेटकिणीकडे गेला. तिलाच दिसेल अशी एका व्यक्तिची आकृती तिने बोलावली. त्या आकृतीच्या वर्णनावरुन तो “शमुवेल” आहे असे शौलास वाटले. तेव्हा आपण शमुवेल आहोत असे भासविणारी व्यक्ती म्हणालीः “तू मला वर बोलावून माझ्या शांतीचा भंग का केला?” शौल म्हणालाः “मी मोठ्या संकटात सापडलो आहे. पलिष्टी माझ्याशी लढत आहेत.” ती आत्मिक व्यक्ती उत्तरलीः “यहोवा तुझा त्याग करुन तुझा शत्रू झाला आहे तर तू मला कशाला प्रश्न करतोस?” मग शमुवेल असल्याचे भासवणाऱ्या त्या आत्मिक व्यक्तिने शौलास पुढे सांगितले की, पलिष्ट्यांशी लढताना तो मरण पावेल.—१ शमुवेल २८:३-१९.
६. शौलासोबत बोलणारी व्यक्ती शमुवेल असणे अशक्य का आहे?
६ चेटकिणीने ज्याच्याशी संपर्क साधला तो शमुवेल नक्कीच नव्हता. शमुवेल मरण पावला होता; आणि मेल्यावर माणूस “आपल्या मातीस मिळतो. त्याचवेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” (स्तोत्रसंहिता १४६:४) या गोष्टींचा विचार केल्यास लक्षात येईल की, तो आवाज मृत शमुवेलाचा नव्हता. शमुवेल देवाचा संदेष्टा होता. त्यामुळे त्याने चेटक्यांचा विरोध केला होता. आपण आधी पाहिल्याप्रमाणे, हयात असताना त्याने अवज्ञा करणाऱ्या शौलाशी बोलण्यास साफ नकार दिला होता. समजा, शमुवेल अजून जिवंत असता तर, चेटकिणीमार्फत शौलाशी तो बोलायला तयार झाला असता का? तसेच यहोवानेही शौलास माहिती देण्यास नकार दिलेला असताना मृत शमुवेलामार्फत यहोवाने शौलास संदेश द्यावा अशी सक्ती चेटकिणीला करता येणे शक्य होते का? शिवाय सजीवांना मृत प्रियजनांशी बोलणे शक्य असल्यास चेटक्यांची मदत घेतल्याने ते ‘अशुद्ध होतील’ असे, प्रीती करणारा देव नक्कीच म्हणणार नाही.
७. आपल्या लोकांचे दुरात्म्यांपासून संरक्षण करण्यासाठी देवाने त्यांना काय इशारा दिला?
७ वस्तुस्थिति अशी आहे की, मानवांचा घात करायला दुरात्मे नुसते टपलेले आहेत. त्यामुळेच आपल्या सेवकांचे रक्षण करण्यासाठी यहोवा त्यांना सूचना देतो. इस्राएल राष्ट्राला दिलेली खालील सूचना वाचा म्हणजे लोकांची फसगत करण्यासाठी हे दुरात्मे कोणते मार्ग अवलंबतात याची तुम्हाला कल्पना येईल. पवित्र शास्त्र म्हणतेः “चेटुक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादुगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा यहोवाला वीट आहे.” (अनुवाद १८:१०-१२) सध्याच्या काळात लोकांची हानी करण्यासाठी दुरात्मे काय करीत आहेत व त्यांच्यापासून आपण स्वतःचे रक्षण कसे करु शकतो ते आपण जाणून घेतले पाहिजे. पण त्या आधी, दुरात्म्यांची सुरुवात केव्हा व कशी झाली ते पाहू या.
दुरात्मे झालेले देवदूत
८. (अ) सैतानाने आणखी कोणाला देवाविरुद्ध बंड करायला प्रवृत्त केले? (ब) स्वर्गातील आपले काम सोडून ते कोठे गेले?
८ एदेन बागेत हव्वेशी खोटे बोलून एका देवदूताने स्वतःला दियाबल सैतान बनवले. त्यानंतर तो इतर देवदूतांना देवाविरुद्ध चिथवण्याच्या खटपटीस लागला. कालांतराने त्याला यशही आले. स्वर्गात देवाने त्यांना नेमून दिलेले काम टाकून काही देवदूत मानवी देह धारण करुन पृथ्वीवर आले. याच देवदूतांचा, ख्रिस्ताचा एक शिष्य यहुदानेही उल्लेख करुन म्हटलेः “देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता वस्तीस्थान सोडले.” (यहुदा ६) ते पृथ्वीवर का आले? स्वर्गातली आपली उत्तम जागा सोडावी असे वाटण्यास सैतानाने त्यांच्या मनात कोणती चुकीची इच्छा निर्माण केली?
९. (अ) देवदूत पृथ्वीवर का आले? (ब) त्यांचे वर्तन चूक होते हे पवित्र शास्त्र कसे दाखवते?
९ याचे उत्तर सांगताना पवित्र शास्त्र म्हणतेः “मानवकन्या सुंदर आहेत असे देवदूतांनी पाहिले व त्यापैकीच्या ज्या आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.” (उत्पत्ती ६:२) म्हणजे त्या देवदूतांनी हाडामांसाचे शरीर धारण केले व ते सुंदर स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पृथ्वीवर आले. परंतु देवदूतांनी असे संबंध ठेवणे गैर होते. हे अवज्ञेचे कृत्य होते. सदोम व गमोरामधील लोकांच्या समलिंगी संबंधाइतकेच देवदूतांचे हे कृत्य अयोग्य होते असे पवित्र शास्त्र सांगते. (यहुदा ६, ७) त्याचा परिणाम काय झाला?
१०, ११. (अ) देवदूतांची मुले कशा प्रकारची होती? (ब) जलप्रलय आल्यावर महाकायांचे काय झाले? (क) जलप्रलयाच्या वेळी देवदूतांचे काय झाले?
१० हे देवदूत व त्यांच्या स्त्रिया यांना मुले झाली. पण ती वेगळीच होती. त्यांची वाढ इतकी झाली की ते महाकाय—दुष्ट महाकाय (राक्षस) झाले. पवित्र शास्त्रात त्यांना “प्राचीन काळचे महावीर . . . नामांकित पुरुष” म्हटले आहे. स्वतःप्रमाणे इतरांनीही वाईट वागावे अशी ते लोकांवर सक्ती करीत. परिणामी—“पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे यहोवाने पाहिले.” (उत्पत्ती ६:४, ५) त्यामुळे यहोवाने जलप्रलय आणला. “नेफिलीम” म्हटलेले महाकाय व इतर सर्व दुष्ट माणसे बुडून मेली. पण पृथ्वीवर आलेल्या देवदूतांचे काय झाले?
११ ते इतरांबरोबर बुडून मेले नाहीत. आपली पार्थिव शरीरे टाकून, आत्मिक शरीराने ते स्वर्गास परतले. परंतु, तेथे, देवाच्या पवित्र देवदूतांच्या मंडळीमध्ये त्यांना पुन्हा प्रवेश नाकारण्यात आला. पवित्र शास्त्र म्हणतेः “ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही. तर त्यांना टारटरसमध्ये टाकले आणि न्यायनिवाड्याकरता राखून अंधकारमय खाड्यात ठेवले.”—२ पेत्र २:४.
१२. (अ) हे दुरात्मे स्वर्गाला परतल्यावर त्यांचे काय झाले? (ब) त्यांना पुन्हा मानवी शरीर का धारण करता येत नाही? (क) आता ते काय करीत आहेत?
१२ या दुष्ट देवदूतांना टारटरस नावाच्या कोणा जागेत टाकण्यात आले नाही. तर ते त्यांच्या पतित, हीन अवस्थेला अनुलक्षून म्हटले आहे. काही भाषांतरात टारटरस याचा “नरक” असा चुकीचा अनुवाद करण्यात आला आहे. देवाच्या मंडळीच्या आध्यात्मिक प्रकाशापासून त्यांना वंचित करण्यात आले असून कायमच्या नाशाचे भवितव्य त्यांच्यापुढे आहे. (याकोब २:१९; यहुदा ६) जलप्रलयाच्या काळापासून देवाने त्यांना मानवी शरीर धारण करण्याची परवानगी दिलेली नसल्यामुळे आपली अनैसर्गिक लैंगिक भूक ते प्रत्यक्ष शमवू शकत नाहीत. पण तरी ते मानवावर घातक सत्ता चालवू शकतात. खरे तर याच दुरात्म्यांच्या मदतीने सैतान “सर्व जगाला ठकवीत आहे.” (प्रकटीकरण १२:९) आजच्या जगात वाढणारे लैंगिक गुन्हे, हिंसा व इतर गैरकृत्यांमुळे त्यांच्याकडून न फसण्यासाठी आपण जागृत राहिले पाहिजे.
दुरात्मे कसे फसवतात
१३. (अ) दुरात्मे दिशाभूल कशी करतात? (ब) भूतविद्या म्हणजे काय व त्याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?
१३ आपण मागेच पाहिल्याप्रमाणे “या युगाचे दैवत” या नात्याने, सैतान लोकांचे पवित्र शास्त्रातील सत्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून, जागतिक शासने व खोट्या धर्मांचा उपयोग करीत आहे. (२ करिंथकर ४:४) मानवांना फसवण्यासाठी दुरात्म्यांनी वापरलेला आणखी एक महत्वाचा मार्ग म्हणजे भूतविद्या. ही भूतविद्या म्हणजे काय? मानवी मध्यस्थांमार्फत अथवा थेट दुरात्म्यांशी संपर्क साधणे म्हणजे भूतविद्या होय. त्यामुळे ती व्यक्ती दुरात्म्यांच्या प्रभावाखाली येते. यासाठीच, चेटकाशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींपासून दूर राहण्याबद्दल पवित्र शास्त्र आपल्याला इशारा देते.—गलतीकर ५:१९-२१; प्रकटीकरण २१:८.
१४. (अ) ज्योतिष म्हणजे काय? (ब) पवित्र शास्त्र त्याबद्दल काय म्हणते?
१४ ज्योतिष सांगणे हा चेटकाचा सर्वांत प्रचलित प्रकार आहे. अदृश्य आत्मिक व्यक्तींच्या सहाय्याने भविष्य जाणण्याचा, तसेच अज्ञात माहिती मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे ज्योतिष होय. “कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करुन देत असे.” लूकने लिहिलेल्या या घटनेवरुन हेच दिसून येते. प्रेषित पौलाने तिला दुरात्म्यांच्या तावडीतून मुक्त केल्यावर तिला भविष्य सांगता येईना.—प्रे. कृत्ये १६:१६-१९.
१५. (अ) भूतविद्येसोबत संबंधित इतर गोष्टी कोणत्या आहेत? (ब) त्यात भाग घेणे धोक्याचे का आहे?
१५ अनेक लोकांना भूतविद्येत रस वाटतो. कारण ते विचित्र व गूढ असते. त्यांना ते आकर्षक वाटते. यामुळेच ते मांत्रिकी, व्हूडू, वशिकरण, जादू, ज्योतिष वा चेटकाशी संबंधित असणाऱ्या इतर गोष्टीत गुंततात. त्या विषयाची पुस्तके वाचतात, चित्रपट किंवा दूरदर्शन कार्यक्रम पाहतात. जेथे एखादा मध्यस्त आत्मिक जगाशी संबंध जोडतो अशा बैठकींनाही ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण ज्यांना खऱ्या देवाची सेवा करायची आहे त्यांनी अशा गोष्ट करणे शहाणपणाचे नव्हे. ते घातक आहे. एका मोठ्या धोक्याकडे ते आपल्याला आज वळवू शकतील. आणि भविष्यात, भूतविद्या आचरणाऱ्या सर्वांचा न्यायनिवाडा करुन देव त्यांचा अव्हेर करील.—प्रकटीकरण २२:१५.
१६. ख्रिस्ती लोकांचा दुरात्म्यांसोबत लढा असल्याचे पवित्र शास्त्र कसे दाखवते?
१६ चेटकापासून दूर राहण्याचा एखाद्याने कसून प्रयत्न केला तरी त्यावर दुरात्म्यांचे आक्रमण होऊ शकते. येशू ख्रिस्ताने, देवाचा नियम मोडावा असे सांगणारा प्रत्यक्ष सैतानाचा आवाज ऐकला होता याची आठवण ठेवा. (मत्तय ४:८, ९) देवाच्या इतर सेवकांवरही असे आक्रमण झालेले आहे. प्रेषित पौल म्हणालाः “आपले झगडणे . . . आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” याचा अर्थ देवाच्या सेवकांनी “देवाची शस्त्रसामग्री” “टिकाव धरता यावा” म्हणून धारण केली पाहिजे.—इफिसकर ६:११-१३.
दुरात्म्यांच्या आक्रमणाला प्रतिकार करणे
१७. आत्मिक जगातील “आवाज” तुमच्या बरोबर बोलल्यास तुम्ही काय करावे?
१७ आत्मिक जगातून आवाज ऐकू आल्यास तुम्ही काय करावे? शिवाय तो “आवाज” एखाद्या मृत नातेवाईकाचा वा चांगल्या देवदूताचा आहे असे भासवले तर? “दुरात्म्यांचा अधिपति” येशूसोबत बोलला तेव्हा त्याने काय केले? (मत्तय ९:३४) तो म्हणालाः “अरे सैताना, चालता हो!” (मत्तय ४:१०) तुम्हीही तेच करु शकता. तसेच तुम्ही यहोवाला मदतीसाठी हाक मारु शकता. मोठ्याने प्रार्थना करुन देवाचे नाव घ्या. दुरात्म्यांपेक्षा तो अधिक प्रबळ आहे हे विसरु नका. हा सूज्ञ मार्ग अनुसरा. आत्मिक जगातून आलेल्या “आवाजा”कडे दुर्लक्ष करा. (नीतीसूत्रे १८:१०; याकोब ४:७) ज्यांना आवाज ऐकू येतात त्या सर्वांशीच दुरात्मे बोलत असतात असे नव्हे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळेही “आवाज” ऐकू येण्याचा संभव आहे.
१८. भूतविद्येपासून दूर होण्यासाठी इफिसमधील प्राचीन ख्रिस्ती लोकांचे कोणते उत्तम उदाहरण अनुसरण्यास योग्य आहे?
१८ तुम्ही भूतविद्येच्या एखाद्या प्रकारात भाग घेतला असेल आणि आता त्यापासून वेगळे होऊ इच्छित असाल तर तुम्ही काय केले पाहिजे? त्यासाठी इफिसमधल्या प्राचीन ख्रिस्ती लोकांचे उदाहरण पहा. प्रेषित पौलाने प्रचार करुन सांगितलेले “यहोवाचे वचन” स्वीकारल्यावर “जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करुन सर्वांदेखत जाळून टाकली,” असे पवित्र शास्त्र म्हणते. ती ५०,००० चांदीच्या नाण्यांइतक्या किंमतीची होती! (प्रे. कृत्ये १९:१९, २०) भूतविद्येशी संबंधित वस्तु तुमच्याजवळ असल्यास त्या कितीही किंमतीच्या असल्या तरी, इफिसमधील ख्रिस्ताच्या अनुयायांप्रमाणे, त्यांचा नाश करणे हाच सूज्ञ मार्ग होय.
१९. (अ) भूतविद्येत भाग घेणाऱ्या बहुतेक लोकांना काय माहीत नसते? (ब) पृथ्वीवर आनंदात अनंतकाल जीवन उपभोगावयाचे असल्यास आपण काय केले पाहिजे?
१९ आजकाल चमत्कारिक व गूढ विषयांचे लोकांना आकर्षण वाटत असल्याने अधिकाधिक लोक भूतविद्येत गुंतत आहेत. त्यातील बहुतेकांना कल्पनाही नसते की ते दुरात्म्यांमध्ये गुरफटत आहेत. हा काही निरुपद्रवी खेळ नव्हे. दुरात्मे त्रास देऊ शकतात व दुखापत करु शकतात. ते खुनशी असतात. ख्रिस्त त्यांचा नाश करीपर्यंत मानवांना आपल्या प्रभावाखाली आणण्याचा ते कसून प्रयत्न करीत आहेत. (मत्तय ८:२८, २९) यास्तव, सर्व दुष्टपणाचा अंत झाल्यावर तुम्हाला आनंदात अनंतकाल जीवन उपभोगायचे आहे तर सर्व प्रकारच्या चेटकाला टाळून तुम्ही दुरात्म्यांपासून दूर राहिले पाहिजे.
[अभ्यासाचे प्रश्न]
[९१ पानांवरील चित्रं]
एनदोर येथील चेटकिणीने कोणाशी संपर्क साधला?
[९२, ९३ पानांवरील चित्रं]
देवपुत्रांनी मानवकन्या पाहिल्या
[९४ पानांवरील चित्रं]
देहधारी दूत बुडाले नाहीत; त्यांनी आपली दैहिक शरीरे बाजूला टाकून दिली व स्वर्गाकडे परतले
[९७ पानांवरील चित्रं]
पवित्र शास्त्र ताकीद देतेः ‘भूतविद्येच्या हर प्रकारापासून दूर राहा’
[९८ पानांवरील चित्रं]
इफिसमधील ख्रिस्ती बनलेल्या लोकांनी भूतविद्येविषयी त्यांच्यापाशी असणारी सर्व पुस्तके जाळली—हे आज आम्हासाठी उत्तम उदाहरण आहे