व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या सरकारच्या शासनाचा आरंभ

देवाच्या सरकारच्या शासनाचा आरंभ

प्रकरण १६

देवाच्या सरकारच्या शासनाचा आरंभ

१. (अ) विश्‍वासू लोक पुरातन काळापासून कशाकडे डोळे लावून आहेत? (ब) देवाच्या राज्याला “नगर” का म्हटले आहे?

 देवाच्या सरकारवर विश्‍वास ठेवणारे लोक, त्याचे शासन कधी सुरु होईल याकडे हजारो वर्षे डोळे लावून बसले आहेत. उदाहरणार्थ, “पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पहात होता,” असे विश्‍वासू अब्राहामाबद्दल पवित्र शास्त्र म्हणते. (इब्रीकर ११:१०) ते “नगर” म्हणजे देवाचे राज्य होय. पण येथे त्याला “नगर” असे का म्हटले आहे? कारण प्राचीन काळी बहुधा राजा एकाच नगरावर राज्य करीत असे. त्यामुळे लोक नगरालाच राज्य समजत असत.

२. (अ) ख्रिस्ताच्या सुरवातीच्या अनुयायांना ते राज्य वास्तववादी वाटत होते हे कशावरुन समजते? (ब) त्यांना त्याबद्दल कोणती माहिती हवी होती?

ख्रिस्ताच्या आरंभीच्या अनुयायांना देवाचे राज्य वास्तव वाटत होते. त्याच्या शासनामध्ये ते गाढ आस्था बाळगून होते. (मत्तय २०:२०-२३) पण त्यांच्या मनात प्रश्‍न होताः ख्रिस्त व त्याचे शिष्य कधी राज्य करु लागतील? पुनरुत्थानानंतर एकदा येशू आपल्या शिष्यांना प्रकट झाला तेव्हा त्यांनी विचारलेः “प्रभुजी, ह्‍याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” (प्रे. कृत्ये १:६) येशूच्या शिष्यांप्रमाणे, देवाच्या सरकारचा राजा म्हणून ख्रिस्त केव्हा राज्य आरंभणार हे जाणण्यास तुम्हीही आतुर आहात का?

ख्रिस्तीजन ज्यासाठी प्रार्थना करतात ते देवाचे सरकार

३, ४. (अ) देव नेहमीच सार्वभौम राजा असतो असे कशावरुन दिसून येते? (ब) तर मग, ख्रिस्ताने ते राज्य येवो अशी प्रार्थना करण्यास आपल्या शिष्यांना का शिकवले?

“तुझे राज्य येवो; जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्याच इच्छेप्रमाणे होवो,” अशी प्रार्थना करण्यास ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना शिकविले. (मत्तय ६:९, १०) पण कोणी विचारीलः ‘यहोवा देव नेहमीच राजा या नात्याने सत्ता चालवत नव्हता का? जर त्याचीच सत्ता चालू असेल तर त्याचे राज्य येण्यासाठी प्रार्थना करण्याची गरजच काय?’

हे खरे की, पवित्र शास्त्र यहोवाला “सनातन . . . राजा” म्हणते. (१ तीमथ्य १:१७) तसेच, “यहोवाने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. त्याचे राज्य सर्वांवर आहे,” असेही ते म्हणते. (स्तोत्रसंहिता १०३:१९) म्हणजेच यहोवा नेहमीच आपल्या निर्मितीचा सर्वश्रेष्ठ सत्ताधारी आहे. (यिर्मया १०:१०) परंतु एदेन बागेत त्याच्या राजपदाविरुद्ध झालेल्या बंडाळीमुळे देवाने एका खास शासनाची योजना केली. ह्‍याच राज्य-शासनाविषयी प्रार्थना करण्यास नंतर येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना शिकवले. दियाबल सैतान व इतर, देवाच्या सत्तेविरुद्ध गेल्याने उद्‌भवलेल्या समस्या मिटविण्याचा या सरकारचा उद्देश आहे.

५. ते देवाचे राज्य असताना त्याला ख्रिस्ताचे राज्य व १,४४,००० चे राज्य असेही का म्हटले आहे?

या नव्या सरकारला सामर्थ्य व राज्य करण्याचे हक्क राजाधिराज यहोवा देवाकडून मिळालेले आहेत. ते त्याचे राज्य आहे. पवित्र शास्त्रात त्याला वारंवार “देवाचे राज्य” म्हटले आहे. (लूक ९:२, ११, ६०, ६२; १ करिंथकर ६:९, १०; १५:५०) परंतु यहोवाने आपल्या पुत्राला या राज्याचा प्रमुख राजा नेमल्याने त्याला ख्रिस्ताचे राज्य असेही म्हणतात. (२ पेत्र १:११) आपण मागच्या एका प्रकरणात पाहिल्याप्रमाणे मानवजातीमधील १,४४,००० व्यक्‍तीही ख्रिस्तासह या राज्यात सत्ता चालवितील. (प्रकटीकरण १४:१-४; २०:६) म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये या सरकारचा उल्लेख “त्यांचे राज्य” असाही केला आहे.—दानीएल ७:२७.

६. काही लोकांच्या मते देवाच्या राज्याचे अधिपत्य कधी सुरु झाले?

येशू स्वर्गाला परतला तेव्हापासून या राज्याची सत्ता सुरु झाली असे काही लोक म्हणतात. ते म्हणतात की, इ.स. ३३ मध्ये पेंटेकॉस्ट या यहुदी सणाच्या दिवशी ख्रिस्ताने आपल्या अनुयायांवर पवित्र आत्मा ओतिला तेव्हापासून त्याचे राज्य सुरु झाले. (प्रे. कृत्ये २:१-४) परंतु सैतानाच्या बंडामुळे उत्पन्‍न झालेल्या समस्यांचा अंत करण्यासाठी यहोवाने योजलेल्या राज्याची सत्ता तेव्हा सुरु झाली नाही. ख्रिस्त ज्याचा राजा आहे त्या देवाच्या राज्याचे प्रतिक असलेल्या “पुसंतान” याचा जन्म तेव्हा झाला व त्याचे राज्य तेव्हा सुरु झाले असे दर्शविण्यास काहीच पुरावा नाही. (प्रकटीकरण १२:१-१०) तर मग, इ.स. ३३ मध्ये येशूचे एखादे राज्य होते का?

७. इ.स. ३३ पासून ख्रिस्त कोणावर राज्य करीत आहे?

होय. कालांतराने त्याला येऊन मिळणाऱ्‍या आपल्या अनुयायांच्या मंडळीवर येशूची सत्ता सुरु झाली. यासाठी पवित्र शास्त्र म्हणते की, पृथ्वीवर असताना त्यांना “[देवाच्या] प्रिय पुत्राच्या राज्यात” घेतले गेले. (कलस्सैकर १:१३) स्वर्गीय जीवनाची आशा असलेल्या ख्रिस्तीजनांवरील हे शासन वा “राज्य” म्हणजे, ज्यासाठी येशूने त्यांना प्रार्थना करण्यास शिकविले ते राज्य नव्हे. त्याच्यासह स्वर्गातून राज्य करणाऱ्‍या फक्‍त १,४४,००० लोकांवरच ह्‍या राज्याची सत्ता आहे. गेल्या अनेक शतकांपासून फक्‍त तेच लोक याचे नागरिक आहेत. जेव्हा स्वर्गीय जीवनाची आशा धरणारा शेवटचा नागरिक मरण पावून स्वर्गात ख्रिस्ताला जाऊन मिळेल तेव्हा ही सत्ता वा “प्रिय पुत्राचे राज्य” संपुष्टात येईल. तेव्हा ते, ख्रिस्ताची प्रजा न राहता, देवाने पुरातन काळापासून वचन दिलेल्या राज्य-शासनात त्याच्यासह राजे होतील.

शत्रूंच्या मध्ये राज्याचा आरंभ

८. (अ) ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापासून, त्याने अधिपत्य हाती घेईपर्यंत, वाट पाहण्याचा काळ आहे असे कशावरुन दिसून येते? (ब) ख्रिस्ताने राज्य करण्याची वेळ आल्यावर देव त्याला काय म्हणाला?

पुनरुत्थानानंतर स्वर्गाला परतल्यावर येशूने देवाच्या शासनाचा राजा म्हणून सत्ता चालविण्यास सुरवात केली नाही. प्रेषित पौलाने सांगितल्याप्रमाणे काही काळ त्याला वाट पहात थांबावयाचे होते. “पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा [येशू ख्रिस्त] देवाच्या उजवीकडे बसला आहे. आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत, वाट पहात आहे.” (इब्रीयांस १०:१२, १३) ख्रिस्ताची सत्ता चालविण्याची वेळ आल्यावर यहोवाने त्याला सांगितलेः “तू आपल्या वैऱ्‍यांमध्ये धनीपण कर.”—स्तोत्रसंहिता ११०:१, २, ५, ६ (पंडिता रमाबाई यांचे भाषांतर).

९. (अ) देवाचे राज्य सर्वांनाच हवेसे का वाटत नाही? (ब) देवाच्या सरकारचा अंमल सुरु झाल्यावर राष्ट्रे काय करतात?

देवाच्या सरकारसोबत कोणाचे वैर असावे हे विचित्र वाटते का? परंतु आपल्या नागरिकांकडून योग्य वर्तनाची अपेक्षा करणाऱ्‍या सरकारखाली रहावे असे सर्वांना वाटत नाही. यामुळेच, पवित्र शास्त्र, यहोवा व त्याचा पुत्र हे जागतिक सत्ता कशी मिळवितील हे सांगितल्यावर, म्हणतेः “राट्रे क्रोधाविष्ट झाली.” (प्रकटीकरण ११:१५, १७, १८) राष्ट्रे देवाच्या राज्याचे स्वागत करीत नाहीत. कारण सैतान त्यांची दिशाभूल करीत असून त्यांना देवाच्या राज्याला विरोध करावयास लावतो.

१०, ११. (अ) देवाच्या सरकारचे अधिपत्य सुरु झाल्यावर स्वर्गात काय घडते? (ब) पृथ्वीवर काय घडते? (क) कोणता महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे?

१० देवाच्या सरकारच्या राजवटीचा आरंभ होतो तेव्हा सैतान व त्याचे दूत हे अद्याप स्वर्गातच आहेत. त्यांचा या राज्याला विरोध असल्यामुळे तात्काळ लढाईला तोंड लागते. याचा परिणाम हा होतो की, सैतान व त्याच्या दूतांना स्वर्गातून बाहेर फेकले जाते. यावेळी एक मोठी वाणी होतेः “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य, त्याचे राज्य व त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहेत.” होय, देवाच्या राज्याची सत्ता सुरु होते! स्वर्गातून सैतान व त्याच्या दूतांना काढून टाकल्यामुळे तेथे आनंदोत्सव होतो. पवित्र शास्त्र म्हणतेः “स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्‍यांनो, उल्लास करा!”—प्रकटीकरण १२:७-१२.

११ हा समय पृथ्वीसाठीही आनंदाचा आहे का? नाही! उलट, पृथ्वीवर पूर्वी कधी नव्हता इतका त्रासदायक काळ येतो. पवित्र शास्त्र सांगतेः “पृथ्वी व समुद्र यांवर अनर्थ ओढवला आहे. कारण सैतान, आपला काळ थोडा आहे हे ओळखून, अतिशय संतप्त होऊन तुम्हाकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:१२) देवाच्या राज्याची सुरवात झाली याचा अर्थ पृथ्वीवर तात्काळ शांती व सुरक्षा आली असा नव्हे. हा लक्षात ठेवण्याजोगा महत्वाचा मुद्दा आहे. देवाचे राज्य पृथ्वीचा पूर्ण ताबा घेईल तेव्हा खरी शांती येईल. ‘थोड्या काळा’च्या शेवटी सैतान व त्याच्या दूतांना दूर केल्यानंतर ते साध्य होईल. यानंतर ते कोणालाही त्रास देऊ शकणार नाहीत.

१२. देवाच्या राज्याचा अंमल कधी सुरु होईल हे पवित्र शास्त्राने आपल्याला सांगावे अशी अपेक्षा आपण का करावी?

१२ परंतु, सैतान स्वर्गातून केव्हा टाकला जातो की, ज्यामुळे पृथ्वीवर “थोडा काळ” अनर्थ उद्‌भवतो? देवाच्या सरकारचा आरंभ कधी होतो? पवित्र शास्त्र या प्रश्‍नांची उत्तरे देते का? आपण तशी अपेक्षा केली पाहिजे. का बरे? कारण देवाचा पुत्र पृथ्वीवर मशीहा बनण्यासाठी मानव या नात्याने कधी सामोरा येईल ते खूपच पूर्वी पवित्र शास्त्राने सांगितले. इतकेच नव्हे तर तो ख्रिस्त केव्हा होईल ते वर्षही अचूक सांगितले. तर मग, राज्य करण्यासाठी मशीहा किंवा ख्रिस्त कधी येईल ती अधिक महत्त्वाची गोष्ट ते सांगणार नाही का? पवित्र शास्त्र ते आपल्याला सांगणार याची आपण खात्रीपूर्वक अपेक्षा केली पाहिजे!

१३. ख्रिस्ताच्या पृथ्वीवर येण्याचे अचूक वर्ष पवित्र शास्त्र कसे विदित करते?

१३ पण कोणी म्हणेलः ‘मशीहा पृथ्वीवर ज्या वर्षी आला ते अचूक वर्ष पवित्र शास्त्रात कोठे भाकित करण्यात आले आहे?’ पवित्र शास्त्रातील दानीएलाचे पुस्तक म्हणतेः “यरुशलेमाचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्‍त अधिपती असा जो तो येईपर्यंत सात सप्तके व बासष्ट सप्तके [म्हणजे एकंदरीत ६९ सप्तके] यांचा अवकाश आहे.” (दानीएल ९:२५) परंतु हे शब्दशः ६९ आठवडे म्हणजे ४८३ दिवस किंवा एका वर्षाहून थोडा अधिक काळ नव्हे. ती ६९ सप्तकीय वर्षे किंवा ४८३ वर्षे होत. (गणना १४:३४ पडताळा.) यरुशलेमाच्या तटबंदीचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा इ.स.पू. ४५५ मध्ये देण्यात आली. a (नेहम्या २:१-८) तद्वत, ही ६९ सप्तकीय वर्षे ४८३ वर्षांनी इ.स. २९ मध्ये संपली. आणि याच वर्षी येशू योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी आला! त्या प्रसंगी त्याचा पवित्र आत्म्याने अभिषेक झाला व तो मशीहा वा ख्रिस्त बनला.—लूक ३:१, २, २१-२३.

देवाच्या सरकारच्या अधिपत्याचा आरंभ कधी होतो

१४. दानीएलाच्या चवथ्या अध्यायातील “वृक्ष” कशाचे प्रतिक आहे?

१४ बरे, मग, देवाच्या सरकारचा राजा या अर्थी ख्रिस्ताने अधिपत्य सुरु करण्याचे वर्ष पवित्र शास्त्रात कोठे भाकित करण्यात आले आहे? या दानीएलच्या पुस्तकातच. (दानीएल ४:१०-३७) तेथे एक प्रचंड गगनचुंबी वृक्ष, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याचे प्रतिनिधित्व करतो. तो त्या काळच्या राजांमध्ये सर्वश्रेष्ठ होता. परंतु त्याच्याहूनही कोणी श्रेष्ठ व्यक्‍ती सत्ता चालवीत आहे याची नबुखद्‌नेस्सर राजाला जाणीव करुन देण्यात आली. तो म्हणजे “परात्पर” अथवा “स्वर्गीचा राजा” यहोवा देव होय. (दानीएल ४:३४, ३७) यास्तव अधिक महत्त्वाच्या रुपात हा गगनचुंबी वृक्ष, देवाच्या सार्वभौम सत्तेचे—विशेषेरित्या पृथ्वीच्या अनुषंगाने असणाऱ्‍या त्याच्या सत्तेचे प्रतिक आहे. काही काळासाठी इस्राएल राष्ट्रावर स्थापन केलेल्या राज्याकरवी यहोवाची सत्ता प्रतीत होत होती. या कारणास्तव, इस्राएलावर सत्ता गाजविणारे यहुदा वंशाचे राजे “यहोवाच्या सिंहासनावर विराजमान” झाले असे म्हटले जात असे.—१ इतिहास २९:२३.

१५. तो “वृक्ष” कापल्यावर त्याच्या बुंध्याला पट्ट्या का बांधण्यात आल्या?

१५ पवित्र शास्त्रातील दानीएलाच्या चौथ्या अध्यायातील वृत्तांतानुसार तो गगनचुंबी वृक्ष कापण्यात आला. परंतु त्याचा बुंधा मात्र राखला गेला आणि त्याला लोखंड व तांब्याच्या पट्ट्या बांधण्यात आल्या. यामुळे, पट्ट्या काढून टाकण्याची देवाची वेळ येईपर्यंत त्या झाडास वाढू देण्यास प्रतिबंध होणार होता. त्यानंतर मात्र ते पुन्हा बहरु लागेल. पण मग, देवाचे अधिपत्य कधी व कसे खंडित करण्यात आले?

१६. (अ) देवाचे अधिपत्य कसे व कधी खंडित झाले? (ब) “यहोवाच्या सिंहासनावर” बसणाऱ्‍या यहुदाच्या शेवटल्या राजाला काय सांगण्यात आले?

१६ देवाने स्थापन केलेले यहुदाचे राज्य कालांतराने इतके भ्रष्ट झाले की, यहोवाने नबुखद्‌नेस्सर राजाला त्याचा नाश करण्याची—त्याला खंडित करण्याची—परवानगी दिली. ही घटना इ.स.पू. ६०७ मध्ये घडली. त्यावेळी यहोवाच्या सिंहासनावर बसलेल्या सिदकिया या शेवटच्या राजाला सांगण्यात आलेः “मुकूट काढून ठेव. . . . ज्याचा हक्क आहे तो येईपर्यंत हा पुन्हा असणार नाही. तो येईल तेव्हा हा मी त्याला देईन.”—यहेज्केल २१:२५-२७ (पंडिता रमाबाई भाषांतर).

१७. इ.स.पू. ६०७ मध्ये कोणत्या कालखंडाची सुरवात झाली?

१७ अशाप्रकारे, देवाच्या अधिपत्याचे प्रतिक असणारा “वृक्ष” इ.स.पू. ६०७ मध्ये तोडण्यात आला. देवाच्या अधिपत्याचे प्रतिनिधित्व करणारे सरकार पृथ्वीवरुन संपुष्टात आले. तेव्हापासून, येशूने कालांतराने ज्याचा उल्लेख केला तो “परराष्ट्रीयांची सद्दी” किंवा “विदेश्‍यांचा काळ” इ.स.पू. ६०७ मध्ये सुरु झाला. (लूक २१:२४) या सद्दीच्या काळात देवाच्या अधिपत्याचे प्रतिनिधित्व करील असे एकही सरकार या पृथ्वीवर अस्तित्वात नव्हते.

१८. “परराष्ट्रीयांची सद्दी” संपल्यावर काय घडणार होते?

१८ मग, “परराष्ट्रीयांच्या सद्दी”चा काळ संपल्यावर काय होणार होते? “ज्याचा हक्क आहे” त्याला यहोवा सत्ता गाजविण्याचा अधिकार देणार होता. तो येशू ख्रिस्त आहे. तेव्हा, “परराष्ट्रीयांच्या सद्दी”चा काळ कधी संपतो हे आपण शोधून काढले तर मग ख्रिस्त राजा या नात्याने आपल्या हाती कधी सत्ता घेईल ते आपल्याला कळू शकेल.

१९. पृथ्वीवरील देवाच्या अधिपत्यामध्ये किती “काळ” खंड पडणार होता?

१९ दानीएलाच्या चवथ्या अध्यायानुसार ही “सद्दी” “सात काळ” एवढ्या मुदतीची आहे. “वृक्ष” रुपाने दर्शविलेले देवाचे अधिपत्य “सात काळ”पर्यंत पृथ्वीवर अंमल चालवणार नाही असे दानीएलाने सांगितले. (दानीएल ४:१६, २३) हे सात काळ किती मुदतीचे आहेत?

२०. (अ) “एक काळ” किती अवधीचा आहे? (ब) “सात काळां”ची मुदत किती आहे? (क) आपण एका दिवसासाठी एक वर्ष का मोजतो?

२० प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायातील ६ व १४ वचनांवरुन आपल्याला कळते की, १,२६० दिवस म्हणजे “एक काळ, दोन काळ व अर्धकाळ” आहेत. ते एकूण ३/ काळ आहेत. तेव्हा “एक काळ” म्हणजे ३६० दिवस व “सात काळ” म्हणजे ३६०×७ म्हणजेच २,५२० दिवस. आता पवित्र शास्त्राच्या नियमाप्रमाणे आपण एका दिवसासाठी एक वर्ष मोजल्यास हे “सात काळ” २,५२० वर्षे बनतात.—गणना १४:३४; यहेज्केल ४:६.

२१. (अ) “परराष्ट्रीयांची सद्दी” केव्हा सुरु होते व कधी संपते? (ब) देवाच्या राज्याचे अधिपत्य कधी सुरु होते? (क) देवाचे राज्य यावे अशी आताही प्रार्थना करणे उचित का आहे?

२१ आपण आधीच पाहिल्याप्रमाणे “परराष्ट्रीयांची सद्दी”चा काळ इ.स.पू. ६०७ मध्ये सुरु झाला. तेव्हापासून २,५२० वर्षे मोजल्यास आपण इ.स. १९१४ सालापर्यंत येतो. त्या वर्षीच ही “सद्दी” संपली. आज हयात असलेल्या लाखो लोकांना १९१४ मध्ये घडलेल्या घटनांची आठवण आहे. त्या वर्षी, पहिल्या महायुद्धामुळे, आतापर्यंत चालत आलेल्या भीषण त्रासाच्या एका कालखंडाची सुरवात झाली. याचा अर्थ १९१४ मध्ये देवाच्या स्वर्गीय सरकारचा राजा या नात्याने येशू ख्रिस्त राज्य करु लागला. अशा रितीने त्या राज्याच्या अधिपत्याची सुरवात झालेली असल्याने त्याने “यावे” आणि पृथ्वीवरुन सैतानाच्या दुष्ट व्यवस्थेचा अंत करावा अशी प्रार्थना आपण करणे किती उचित आहे!—मत्तय ६:१०; दानीएल २:४४.

२२. लोक काय प्रश्‍न विचारण्याचा संभव आहे?

२२ तरीही कोणी विचारील की, ‘त्याच्या पित्याच्या राज्यात अधिपत्य गाजविण्यासाठी ख्रिस्त परतलेला आहे तर तो आपल्याला का दिसत नाही?’

[तळटीपा]

a ही आज्ञा इ.स.पू. ४५५ मध्ये दिली गेली याचा ऐतिहासिक पुरावा एड टु बायबल अंडरस्टँडिंग या वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात “अर्तहशश्‍त” या विषयाखाली मिळेल.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३४ पानांवरील चित्रं]

“ह्‍याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?”

[१३९ पानांवरील चित्रं]

दानीएलाच्या चवथ्या अध्यायात असणारा उत्तुंग वृक्ष ईश्‍वरी अधिपत्यास सूचित करतो. हे अधिपत्य एकेकाळी यहुदाच्या राज्यामार्फत चालविले जात होते

[१४०, १४१ पानांवरील तक्‍ता]

इ.स.पू. ६०७ मध्ये देवाचे यहुदातील राज्य पडले.

इ.स. १९१४ मध्ये येशू ख्रिस्ताने देवाच्या स्वर्गीय सरकारचा राजा या नात्याने अधिपत्य गाजविण्यास सुरवात केली

इ.स.पू. ६०७ इ.स. १९१४

इ.स.पू. ६०७ ऑक्टोबर—इ.स.पू. १ ऑक्टोबर = ६०६ वर्षे

इ.स.पू. १ ऑक्टोबर—इ.स. १९१४ ऑक्टोबर = १,९१४ वर्षे

विदेश्‍यांचे सात काळ = २,५२० वर्षे

[१४०, १४१ पानांवरील चित्रं]

यहुदाचे राज्य नष्ट झाले त्यावेळी वृक्ष कापण्यात आला