पवित्र शास्त्र खरेच देवापासून आहे का?
प्रकरण ५
पवित्र शास्त्र खरेच देवापासून आहे का?
१. देव आपल्याला स्वतःबद्दल माहिती देईल असा समज का वाजवी आहे?
यहोवा देवाने आपल्याला स्वतःबद्दल माहिती सांगितली आहे का? त्याने आतापर्यंत काय केले आहे व पुढे काय करणार ते सांगितले आहे का? आपल्या मुलांवर प्रेम करणारा पिता त्यांना अनेक गोष्टी सांगतो; आणि आपण आतापर्यंत पाहिल्याप्रमाणे यहोवा खरोखरच प्रेमळ पिता आहे.
२. (अ) देवाने स्वतःबद्दल माहिती देण्याचा उत्तम मार्ग कोणता? (ब) त्यामुळे कोणते प्रश्न उपस्थित होतात?
२ पृथ्वीवर निरनिराळ्या भागात व वेगवेगळ्या कालखंडात राहणाऱ्या लोकांना यहोवाने माहिती कशी दिली असेल? एखादे पुस्तक लिहून घेऊन, ते सर्वांना मिळेल अशी व्यवस्था करणे हा उत्तम मार्ग दिसतो. पवित्र शास्त्र असेच देवाकडून मिळालेले पुस्तक आहे का? ते आपल्याला कसे कळेल?
पवित्र शास्त्र—अद्वितीय पुस्तक
३. पवित्र शास्त्र अद्वितीय का समजले जाते?
३ पवित्र शास्त्र जर खरोखरच देवाकडून आलेले असेल तर ते इतर सर्व पुस्तकात अद्वितीय ठरेल अशी अपेक्षा अयोग्य ठरणार नाही. ते तसे आहे का? होय. आणि त्याला कारणे आहेत. पहिले म्हणजे, ते अतिशय पुरातन आहे. देवाने मानवाला दिलेला संदेश अगदी अलिकडेच लिहिला जाण्याची अपेक्षा तुम्ही धरणार नाही, हो ना? त्याचे लेखन इब्री भाषेत ३,५०० वर्षांपूर्वी सुरु झाले. मग २,२०० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी त्याचा इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यास प्रारंभ झाला. आज जगातला जवळपास प्रत्येक माणूस आपल्या भाषेमध्ये पवित्र शास्त्र वाचू शकतो.
४. पवित्र शास्त्र व इतर पुस्तके यांच्या संख्यांची तुलना केल्यास काय आढळून येते?
४ तसेच पवित्र शास्त्राच्या जितक्या प्रती आजपर्यंत बनवल्या आहेत तेवढ्या इतर कोणत्याहि पुस्तकाच्या नाहीत. फक्त काही हजार प्रती छापल्यास त्या पुस्तकाला ‘अधिक खपाचे पुस्तक’ म्हणतात. पवित्र शास्त्राच्या तर प्रतिवर्षी काही लाख प्रती छापल्या जातात. आणि गेल्या अनेक शतकात मिळून अब्जावधी छापल्या गेल्या आहेत! जिथे पवित्र शास्त्र उपलब्ध नाही अशी जागा—मग ती कितीही दुर्गम असो—जगात सापडणे कठीणच. देवाकडून मिळालेले पुस्तक असेच असावे अशी अपेक्षा तुम्ही करणार नाही का?
५. पवित्र शास्त्र नेस्तनाबूत करण्याचे कोणते प्रयत्न झाले?
५ पवित्र शास्त्राच्या या जागतिक वितरणाची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे शत्रूंनी त्याला नेस्तनाबूत करण्याचे कसोशीने प्रयत्न केले आहेत. पण देवाच्या पुस्तकावर सैतानाच्या हस्तकांचा हल्ला अपेक्षितच नाही का? या गोष्टी खरेच घडल्या आहेत. पवित्र शास्त्र जाळण्याचे प्रकार सर्रास होत असत. तसेच पवित्र शास्त्र वाचताना कोणी आढळल्यास त्याला मृत्युदंडाची शिक्षाही मिळत असे.
६. (अ) पवित्र शास्त्र कोणत्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देते? (ब) कोठून माहिती मिळाल्याचा पवित्र शास्त्र लेखकांचा दावा आहे?
६ आपल्याला आवश्यक अशा सर्व महत्वाच्या मुद्यांचा उहापोह देवाच्या पुस्तकात असावा अशीही अपेक्षा तुम्ही कराल. उदाहरणार्थ, ‘जीवन कोठून आले?’ ‘आपण येथे का आहोत?’ ‘भविष्यात काय होईल?’ अशा प्रश्नांची ते उत्तरे देते. आणि स्पष्टच म्हणते की, त्यातील माहिती देवाकडून आलेली आहे. पवित्र शास्त्राचा एक लेखक म्हणतोः “यहोवाचा आत्मा माझ्याद्वारे बोलला. त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले.” (२ शमुवेल २३:२) दुसऱ्याने लिहिलेः “प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आहे.” (२ तीमथ्य ३:१६) ते परमेश्वराचे वचन आहे असे पवित्र शास्त्रात ठासून सांगितले असल्याने त्याचे परिक्षण करुन ते खरोखरच तसे आहे का ते पाहणे सूज्ञपणाचे नाही का?
पवित्र शास्त्र कसे लिहिले
७. (अ) पवित्र शास्त्र कोणी लिहिले? (ब) मग ते देवाचे वचन आहे असे का म्हणता येते?
७ तुम्ही म्हणालः ‘जर पवित्र शास्त्र माणसांनी लिहिले आहे तर ते देवाकडून आले असे कसे म्हणता येईल?’ जवळपास ४० लोकांनी पवित्र शास्त्र लिहिले. स्वतः देवाने आपल्या पवित्र आत्म्याने दगडावर लिहिलेल्या दशाज्ञा सोडून बाकीच्या पवित्र शास्त्राचे लिखाण या माणसांनी केले. (निर्गम ३१:१८) पण त्यामुळे त्यांनी लिहिलेले लिखाण देवाचे वचन नाही असे म्हणता येत नाही. पवित्र शास्त्र म्हणतेः “पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” (२ पेत्र १:२१) जसे देवाने आपल्या प्रबळ पवित्र आत्म्याच्या द्वारे स्वर्ग, पृथ्वी व सर्व जीवसृष्टी बनवली त्याच पवित्र आत्म्याने त्याने पवित्र शास्त्र लेखनाचे दिग्दर्शनही केले.
८, ९. पवित्र शास्त्र देवाने कसे लिहून घेतले हे आजच्या कोणत्या उदाहरणावरुन समजते?
८ याचा अर्थ, पवित्र शास्त्राचा, यहोवा परमेश्वर हा एकच लेखक आहे. एखादा उद्योगपती जसा पत्र लिहिण्यासाठी आपल्या सचिवाचा उपयोग करतो तसा देवाने ही माहिती लिहिण्यासाठी माणसांचा उपयोग केला. सचिव पत्र लिहिते, पण त्यात त्या उद्योगपतीचे विचार व कल्पना सामावलेल्या असतात. म्हणून ते त्याचे पत्र असते, सचिवाचे नव्हे. तसेच पवित्र शास्त्र देवाचे पुस्तक आहे. देवाने ज्यांचा ते लिहिण्यास उपयोग केला त्या माणसांचे नव्हे.
९ देवाने मन निर्माण केले असल्यामुळे लिहिण्यासाठी आवश्यक ती माहिती कळवण्यास आपल्या सेवकांच्या मनाशी त्याने संबंध प्रस्थापित केला. आज, स्वतःच्या घरी बसूनसुद्धा, रेडिओ व टीव्हीद्वारे दूरचे संदेश प्राप्त करता येतात. देवाने निर्माण केलेल्या भौतिक नियमानुसार आवाज अथवा प्रतिमा दूरवर जाऊ शकतात. तसेच दूरवरच्या स्वर्गात राहून यहोवा देव त्याला, मानवी कुटुंबाला द्यावीशी वाटते ती माहिती लिहिण्यास माणसांना सूचना देऊ शकतो हे समजण्यास कठीण नाही.
१०. (अ) पवित्र शास्त्रात किती पुस्तके आहेत व ते कोणत्या कालखंडात लिहिले गेले? (ब) पवित्र शास्त्राचा मुख्य विषय कोणता?
१० या सर्वांचा परिपाक म्हणजे एक अद्वितीय पुस्तक. वास्तविक पवित्र शास्त्र एकूण ६६ लहान पुस्तके मिळून बनलेले आहे. पवित्र शास्त्र म्हणजेच बायबल हा शब्द बिब्लिआ या ग्रीक शब्दावरुन बनलेला आहे. त्याचा अर्थ, “लहान पुस्तके” असा होतो. ही पुस्तके वा पत्रे इ. स. पू. १५१३ ते इ. स. ९८ पर्यंत १६०० वर्षांच्या कालावधीत लिहिली गेली. पण संपादक एकच असल्याने ती परस्परांशी सुसंगत आहेत. त्या सर्वांचा विषयही एकच आहे, व तो म्हणजे, ज्यायोगे यहोवा देव पृथ्वीवर पुन्हा नीतीमान परिस्थिती आणील ते त्याचे राज्य. देवाविरुद्ध बंड पुकारल्यामुळे नंदनवन हातचे कसे घालवले हे उत्पत्ती या पहिल्या पुस्तकात सांगितले आहे. आणि शेवटच्या पुस्तकात—प्रकटीकरणात—देवाच्या अधिपत्याने सर्व पृथ्वीचे नंदनवन पुन्हा कसे होईल याचे वर्णन केले आहे.—उत्पत्ती ३:१९, २३; प्रकटीकरण १२:१०; २१:३, ४.
११. (अ) पवित्र शास्त्र कोणत्या भाषांमध्ये लिहिले गेले? (ब) त्याचे कोणते दोन विभाग केलेले आहेत; परंतु त्या दोघांची एकवाक्यता कशी सिद्ध होते?
११ पवित्र शास्त्राची पहिली ३९ पुस्तके अरामिक भाषेतील थोडासा भाग वगळल्यास, संपूर्ण इब्री भाषेत लिहिली होती. उरलेली २७ पुस्तके येशू व त्याचे ख्रिस्ती शिष्य हयात असताना जी प्रचलित ग्रीक भाषा होती त्यामध्ये लिहिली गेली. पवित्र शास्त्राच्या या प्रमुख दोन भागांना “इब्री शास्त्रवचने” व “ग्रीक शास्त्रवचने” म्हणणे अधिक योग्य होईल. ग्रीक शास्त्रामध्ये इब्री शास्त्रातील ३६५ अवतरणे व ३७५ संदर्भ लिहिलेले आहेत. यावरुन त्याची सुसंगती सिद्ध होते.
पवित्र शास्त्र सर्वांना उपलब्ध करणे
१२. यहोवाने पवित्र शास्त्राच्या नकला का करुन घेतल्या?
१२ जर पवित्र शास्त्राची मूळ हस्तलिखिते उपलब्ध असती तर ती सर्वांना कशी वाचता आली असती? त्यामुळेच इब्री शास्त्रवचनाच्या नकला करण्याची व्यवस्था यहोवाने केली. (अनुवाद १७:१८) उदाहरणार्थ, एज्राबद्दल म्हटले आहेः “तो, इस्राएलांचा देव यहोवा याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्राचा पारंगत नकलाकार होता.” (एज्रा ७:६) तसेच ग्रीक शास्त्रवचनाच्याही हजारो नकला केल्या गेल्या.
१३. (अ) सर्वसामान्याला पवित्र शास्त्र वाचता यावे म्हणून काय करण्याची गरज होती? (ब) पवित्र शास्त्राचे पहिले भाषांतर कधी झाले?
१३ तुम्ही इब्री वा ग्रीक भाषा वाचू शकता का? जर वाचू शकत नसाल तर आजही अस्तित्वात असलेल्या पवित्र शास्त्राच्या प्राचीन नकला तुम्ही वाचू शकणार नाही. तेव्हा ते तुम्हाला वाचता येईल अशा भाषेत कोणीतरी लिहिले पाहिजे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत केलेल्या अनुवादांमुळे अधिकाधिक लोकांना देवाचे वचन वाचणे शक्य झाले आहे. उदाहरणार्थ, इ. स. पू. ३०० वर्षे ग्रीक ही सामान्य लोकांची बोलीभाषा झाली. त्यामुळे इ. स. पू. २८० मध्ये इब्री शास्त्रवचनांचा ग्रीक भाषेत अनुवाद करण्यात आला. या प्राचीन अनुवादाला “सेप्ट्युजंट” म्हटले गेले.
१४. (अ) पवित्र शास्त्राच्या भाषांतराला धर्मगुरुंनी विरोध का केला? (ब) त्यांना हार पत्करावी लागल्याचे कसे कळते?
१४ कालांतराने सर्वसाधारण जनतेची भाषा लॅटिन ही झाली. तेव्हा पवित्र शास्त्राचे लॅटिनमध्ये भाषांतर केले गेले. पण काही शतके उलटल्यावर हळू हळू लॅटिन भाषा लोकांना समजेनाशी झाली. बहुतेक लोक अरबी, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, जर्मन, इंग्लिश अशा भाषा बोलू लागले. काही काळ कॅथोलिक धर्मगुरुंनी सर्वसामान्यांना कळणाऱ्या भाषांमध्ये पवित्र शास्त्राच्या अनुवादास प्रखर विरोध केला. पवित्र शास्त्र बाळगणाऱ्यांना त्यांनी खांबावर जिवंत जाळले. पवित्र शास्त्र त्यांच्या खोट्या शिकवणी व वाईट प्रथांवर प्रकाश टाकत असल्याने त्यांनी असे केले. परंतु कालांतराने त्यांना हार पत्करावी लागली व पवित्र शास्त्राचा अनेक भाषांमध्ये अनुवाद होऊन त्याचे मोठ्या प्रमाणावर वितरण होऊ लागले. आज संपूर्ण पवित्र शास्त्र अथवा त्याचे काही भाग १,७०० पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत!
१५. पवित्र शास्त्राची नवीन भाषांतरे का हवीत?
१५ जसजसा काळ पुढे गेला तसे पवित्र शास्त्राचे एकाच भाषेमध्ये अनेक अनुवाद झाले. उदाहरणार्थ, फक्त इंग्लिशमध्येच डझनावारी भाषांतरे आहेत. का बरे? एकच पुरेसे नाही का? नाही. कारण जसजसा काळ लोटतो तसतशी भाषाही खूप बदलते. जुन्या व नवीन भाषांतराची तुलना केल्यास भाषेतील बदल लक्षात येतो. त्यामध्ये एकच विचार प्रकट केलेला असला तरी अलिकडच्या काळात छापलेले अनुवाद समजण्यास सोपे असतात. पवित्र शास्त्राच्या नवीन भाषांतरात देवाचे वचन सर्वसामान्य व सोप्या भाषेत असल्यामुळे आपल्याला कृतज्ञताच वाटली पाहिजे.
पवित्र शास्त्रात बदल केला आहे का?
१६. पवित्र शास्त्र बदलल्याची काही लोकांना शंका का येते?
१६ तुम्ही विचारालः ‘पवित्र शास्त्र लेखकांना देवाकडून मिळालेली माहिती आजही आपल्या पवित्र शास्त्रात जशीच्या तशी आहे याची काय खात्री?’ पवित्र शास्त्राच्या नकला शेकडो, नव्हे, हजारो वर्षे होत असल्याने त्यात चुका झाल्या नसतील का? होय. पण त्या शोधून व सुधारुन आधुनिक भाषांतरे लिहिलेली आहेत. आज, मुळात देवानेच दिलेली माहिती उपलब्ध आहे. याला काय पुरावा?
१७. पवित्र शास्त्रात बदल झालेला नाही याला काय पुरावा आहे?
१७ १९४७ ते १९५५ च्या दरम्यान मृत समुद्राच्या गुंडाळ्या सापडल्या. या पुरातन गुंडाळ्यांमध्ये इब्री शास्त्रातील पुस्तकांच्याहि नकला आहेत. त्या येशूच्या जन्मापूर्वी १०० ते २०० वर्षे जुन्या काळातील आहेत. त्यातील एका गुंडाळीमध्ये यशयाच्या पुस्तकाची नक्कल आहे. ही सापडण्यापूर्वी, सर्वात पुरातन समजली जाणारी इब्री भाषेतील यशयाच्या पुस्तकाची नक्कल येशूच्या जन्माच्या १,००० वर्षे नंतरची होती. या दोन्ही नकलांची तुलना केल्यावर त्यात फारच थोडे फरक आढळून आले—आणि तेहि मुख्यतः शुद्ध-लेखनाचे (वर्ण-विन्यासाचे) होते! याचा अर्थ १,००० वर्षांहून अधिक काळात झालेल्या नकलांमुळे काहीही उल्लेखनीय फरक पडला नव्हता!
१८. (अ) नकलाकारांच्या चुका कशा दुरुस्त करण्यात आल्या? (ब) ग्रीक शास्त्रवचनांच्या अचूकतेबद्दल काय म्हणता येईल?
१८ इब्री शास्त्रवचनाच्या वेगवेगळ्या भागांच्या १,७०० पेक्षा अधिक पुरातन नकला उपलब्ध आहेत. या अनेक नकलांची बारकाईने तुलना केल्यास नकलाकारांनी ज्या थोड्या चुका केल्या त्या शोधणे व दुरुस्त करणे शक्य आहे. तसेच ग्रीक शास्त्रवचनाच्या हजारो पुरातन नकला उपलब्ध आहेत. त्यातील काही तर येशू व त्याच्या शिष्यांच्या काळातील आहेत. यासाठीच, सर फ्रेड्रिक केनन यांनी म्हटल्याप्रमाणेः “शास्त्रवचने जशी लिहिली तशीच आजपर्यंत जतन झाली नसतील या शंकेचे पुसटसे सावटही आता उरलेले नाही.”—द बायबल ॲण्ड आर्किऑलॉजी, पान २८८, २८९.
१९. (अ) पवित्र शास्त्रात भर घालण्याच्या प्रयत्नांचे एक उदाहरण कोणते? (ब) काही पवित्र शास्त्र आवृत्तीत १ योहान ५:७ जसे दिसते तो पवित्र शास्त्राचा भाग नव्हे हे कसे कळते?
१९ देवाच्या वचनात बदल करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असा याचा अर्थ नव्हे. ते झालेच. याचे एक ठळक उदाहरण म्हणजे, १ योहान ५:७. १६११ साली प्रकाशित झालेल्या किंग जेम्स व्हर्शन या भाषांतरात तेथे म्हटले आहेः “स्वर्गात साक्ष देणारे तिघे आहेतः पिता, शब्द व पवित्र आत्मा. आणि हे तिघे एक आहेत.” परंतु, पवित्र शास्त्राच्या अत्यंत पुरातन नकलामध्ये हे शब्द नाहीत. त्रैक्य शिकवणीस आधार देण्यासाठी कोणीतरी हे शब्द घातले होते. ते शब्द देवाच्या वचनातील नव्हेत हे उघड असल्याने नवीन भाषांतरांमध्ये दुरुस्ती करण्यात येऊन त्यांना वगळण्यात आले आहे.
२०. पवित्र शास्त्र निर्भेळ असल्याची खात्री आपण का बाळगू शकतो?
२० तेव्हा, पवित्र शास्त्रातील माहिती बदलण्यात आली आहे असे म्हणणाऱ्यांना वस्तुस्थिती माहीत नाही. नकलाकारांनी केलेल्या चुकाच नव्हेत तर त्यात भर घालण्याच्या प्रयत्नापासूनही यहोवाने आपल्या वचनाचे रक्षण केले आहे. आज आपल्यासाठी त्याचे शब्द निर्भेळ अवस्थेमध्ये राखले जातील असे देवाचे वचन खुद्द पवित्र शास्त्रातही आढळते.—स्तोत्रसंहिता १२:६, ७; दानीएल १२:४; १ पेत्र १:२४, २५; प्रकटीकरण २२:१८, १९.
पवित्र शास्त्र वस्तुतः खरे आहे का?
२१. देवाच्या वचनासंबंधी येशूचा दृष्टीकोन कसा होता?
२१ येशू ख्रिस्ताने प्रार्थनेत देवाला म्हटलेः “तुझे वचन सत्य आहे.” (योहान १७:१७) पण याला वस्तुस्थितीचा आधार आहे का? पवित्र शास्त्राचे बारकाईने परिक्षण केल्यास ते खरे आहे असेच आढळते का? पवित्र शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या इतिहासकारांना त्याच्या अचूकतेने आश्चर्यचकित केले आहे. पवित्र शास्त्रातील नावे व तपशीलवार माहितीची खात्री करता येते. काही उदाहरणे पहा.
२२-२५. पवित्र शास्त्रातील इतिहास खरा असल्याचे कोणत्या उदाहरणांवरुन दाखवता येते?
२२ मिसर देशातील कर्नाक येथील मंदिराच्या भिंतीवरील ही चित्रे व लेखन पहा. जवळजवळ ३,००० वर्षांपूर्वी शलमोनाचा मुलगा रहबाम याच्या कारकिर्दीत मिसराचा फारो (राजा) शिशक याने यहुदावर मिळवलेल्या विजयाचे वर्णन यात केले आहे. पवित्र शास्त्रातही याच घटनेचा उल्लेख आहे.—१ राजे १४:२५, २६.
२३ तसेच मवाबी शिला पहा. फ्रान्स देशातील पॅरिस शहरातील लूव्हर संग्राहलयात मूळ शिला जतन केलेली आहे. त्यावरील लेखामध्ये मवाबचा राजा मेशा याने इस्राएलविरुद्ध केलेल्या बंडाविषयी सांगितले आहे. ही घटना पवित्र शास्त्रातही सांगितली आहे.—२ राजे १:१; ३:४-२७.
२४ शेजारी उजवीकडे दिलेल्या चित्रात यरुशलेम येथील शिलोम (शिलोह) चे तळे व १,७४९ फूट (५३३ मीटर) लांब भुयाराचे प्रवेशद्वार दिसत आहे. त्या जागेस भेट देणारे अनेक लोक भुयारातील पाण्यातून चालत गेले आहेत. हे तळे व भुयार अस्तित्वात आहेत हाच पवित्र शास्त्राच्या सत्यतेचा पुरावा आहे. ते कसे? कारण पवित्र शास्त्र सांगते की, चाल करुन आलेल्या शत्रूच्या सैन्यापासून आपल्या पाणी पुरवठ्याचा बचाव करण्यासाठी हिज्कीया राजाने हे भुयार २,५०० वर्षांपूर्वी बांधले.—२ राजे २०:२०; २ इतिहास ३२:२-४, ३०.
२५ ब्रिटीश संग्राहलयात ठेवण्यात आलेली नबोनिडसची बखर पहावयास मिळते. त्याची नक्कल शेजारच्या चित्रात दाखवली आहे. त्यामध्ये प्राचीन बाबेल कसे पडले याचा वृत्तांत, पवित्र शास्त्रात दिल्याप्रमाणेच सांगितला आहे. (दानीएल ५:३०, ३१) परंतु त्यावेळी बेलशस्सर राजा होता असे पवित्र शास्त्र म्हणते. तथापि, नबोनिडसच्या बखरीमध्ये बेलशस्सराचे नावही नाही. एवढेच नव्हे तर एक वेळ अशी होती की उपलब्ध असलेल्या सर्व लिखाणामध्ये नबोनिडस हाच बाबेलचा शेवटला राजा होता असेच लिहिले होते. त्यामुळे पवित्र शास्त्र खरे नसल्याचा दावा करणारे म्हणत की, बेलशस्सर कधी नव्हताच व पवित्र शास्त्र चुकीचे आहे. पण अलिकडे काही वर्षांपूर्वी सापडलेल्या प्राचीन लिखाणावरुन बेलशस्सर हा नबोनिडसचा मुलगा असून बाबेलच्या पाडावाच्या वेळी आपल्या वडीलांसह राज्यकारभार करीत होता असे स्पष्ट झाले! अशा अनेक उदाहरणांवरुन पवित्र शास्त्र खरे आहे हेच सिद्ध होते.
२६. वैज्ञानिक दृष्ट्याही पवित्र शास्त्र अचूक असल्याचा काय पुरावा आहे?
२६ पवित्र शास्त्रात फक्त खरा इतिहासच आहे असे नाही. त्यात सांगितलेले सर्वच सत्य आहे. जेथे विज्ञानाचा प्रश्न येतो तेथेहि ते अचूक दिसते. उदाहरणार्थ, दोन मुद्दे विचारात घेऊ. प्राचीन काळी पृथ्वीला, हत्ती किंवा नाग यासारखा दृश्य आधार असावा असा सर्वसाधारण समज होता. परंतु विज्ञानाच्या पुराव्याला अनुसरुन पवित्र शास्त्र म्हणते की, देवाने “पृथ्वी निराधार टांगली आहे.” (इयोब २६:७) तसेच पृथ्वी सपाट असल्याचा पूर्वी अनेकांचा समज होता. त्याउलट, पवित्र शास्त्र म्हणते की, देव “पृथ्वी-गोलावर आरुढ झाला आहे.”—यशया ४०:२२.
२७. (अ) पवित्र शास्त्र देवाकडून आल्याचा सर्वात सबळ पुरावा कोणता? (ब) देवाच्या पुत्राबद्दल इब्री शास्त्राने कोणत्या गोष्टींचे अचूक भविष्य केले?
२७ पवित्र शास्त्र देवाकडून आल्याचा सर्वात सबळ पुरावा म्हणजे भविष्याबद्दल अचूक माहिती देण्याचे सातत्य. माणसांनी लिहीलेले कोणतेही पुस्तक घटना घडण्यापूर्वीच त्यांचा वृत्तांत देऊ शकत नाही. पण पवित्र शास्त्र मात्र देते. ते भविष्यवाणीने—घटनेपूर्वी लिहिलेल्या इतिहासाने—ओतप्रोत भरले आहे. त्यातही देवाच्या पुत्राच्या पृथ्वीवर येण्याविषयीची भविष्ये, विशेष लक्षवेधी आहेत. तो बेथलहेम येथे जन्मास येईल, तो कुमारिकेपासून जन्माला येईल, चांदीच्या ३० नाण्यांसाठी त्याचा विश्वासघात करण्यात येईल, त्याची पाप्यांमध्ये गणना होईल, त्याच्या शरीरातील एकही हाड मोडले जाणार नाही, चिठ्ठ्या टाकून त्याच्या कपड्यांचे वाटप होईल हे आणि इतर अनेक बारीक तपशील शेकडो वर्षे आधी इब्री शास्त्राने अचूक सांगितले होते.—मीखा ५:२; मत्तय २:३-९; यशया ७:१४; मत्तय १:२२, २३; जखर्या ११:१२, १३; मत्तय २७:३-५; यशया ५३:१२; लूक २२:३७, ५२; २३:३२, ३३; स्तोत्रसंहिता ३४:२०; योहान १९:३६; स्तोत्रसंहिता २२:१८; मत्तय २७:३५.
२८. (अ) अजून पूर्ण न झालेली भविष्ये सिद्धीस जाण्याची खात्री आपल्याला का वाटते? (ब) पवित्र शास्त्राचा अभ्यास पुढे चालू ठेवल्यास तुम्हाला कशाची खात्री पटेल?
२८ या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात म्हटल्याप्रमाणे सध्याच्या परिस्थितीचा लवकरच अंत होऊन त्याऐवजी नीतीमान व्यवस्थेची स्थापना होईल असे भविष्यही पवित्र शास्त्र करते. (मत्तय २४:३-१४; २ पेत्र ३:७, १३) अजून पूर्ण व्हावयाच्या भविष्यावर आपण विसंबू शकतो का? समजा कोणी तुम्हाला शंभर वेळा खरे सांगितले तर त्याने नंतर सांगितलेल्या नव्या गोष्टींवर तुम्ही अविश्वास दाखवाल का? त्याची कधीही चूक झालेली नाही हे अनुभवल्यानंतर आता तुम्ही साशंक व्हाल का? असे करणे किती अयोग्य ठरेल! त्याप्रमाणे देवाने पवित्र शास्त्रात दिलेल्या वचनांबद्दल शंका घेण्यास काहीच जागा नाही. त्याच्या शब्दांवर भरवसा ठेवता येईल! (तीत १:२) पवित्र शास्त्राचा आणखी अभ्यास केल्यास, सर्व परिस्थितीवरुन, पवित्र शास्त्र खरोखरच देवाकडून आलेले आहे याची तुम्हालाही खात्री पटेल.
[अभ्यासाचे प्रश्न]
[४९ पानांवरील चित्रं]
उद्योगपति सचिवाकडून पत्र लिखाण करुन घेतात त्याप्रमाणे देवाने पवित्र शास्त्राचे लिखाण करण्यासाठी पुरुषांचा वापर केला
[५० पानांवरील चित्रं]
काही धर्मपुढाऱ्यांनी पवित्र शास्त्र सामान्य माणसांपर्यंत जाऊ नये यासाठी लढत दिली, त्यासाठी पवित्र शास्त्र जवळ बाळगणाऱ्यांना खांबावर जिवंत जाळले
[५२, ५३ पानांवरील चित्र]
यशयाची मृत समुद्रातील गुंडाळी
[५४, ५५ पानांवरील चित्रं]
मिसर येथील कर्नाकच्या मंदिराची भिंत
मवाबी शिला
नबोनिडसची बखर
हिज्कीयाच्या भुयारी मार्गाचा प्रवेश व शालोमचे तळे