व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुनरुत्थान—कोणासाठी व कोठे?

पुनरुत्थान—कोणासाठी व कोठे?

प्रकरण २०

पुनरुत्थान—कोणासाठी व कोठे?

१, २. देवाच्या प्राचीन सेवकांचा पुनरुत्थानावर विश्‍वास होता हे आपल्याला कसे कळते?

 देवाच्या सेवकांचा पुनरुत्थानावर नेहमीच विश्‍वास होता व आहे. येशू मानव म्हणून जन्माला येण्याच्या २,००० वर्षांपूर्वी हयात असलेल्या अब्राहामाबद्दल पवित्र शास्त्र म्हणतेः “मेलेल्यामधून देखील [त्याचा मुलगा इसहाक याला] उठवावयास देव समर्थ आहे असे त्याने मानले.” (इब्रीयांस ११:१७-१९) कालांतराने देवाचा सेवक ईयोब याने विचारलेः “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” व उत्तरादाखल तो देवाला म्हणतोः “तू मला हाक मारशील व मी तुला उत्तर देईन.” अशा रितीने पुनरुत्थानावर आपला विश्‍वास असल्याचे त्याने दाखवले.—ईयोब १४:१४, १५.

भूतलावर असताना येशू ख्रिस्ताने सांगितलेः “मोशेनेही झुडुपाच्या वृत्तांतात, यहोवाला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव असे म्हणून मेलेले उठवले जातात हे दर्शविले आहे. तो मृतांचा देव नव्हे तर जिवंतांचा आहे. कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.” (लूक २०:३७, ३८) ख्रिस्ती ग्रीक शास्त्रामध्ये पुनरुत्थान हा शब्द ४० पेक्षा अधिक वेळा वापरला आहे. एवढेच नव्हे तर मृतांचे पुनरुत्थान ही पवित्र शास्त्राची एक प्रमुख शिकवण आहे.—इब्रीयांस ६:१, २.

३. मार्थाने पुनरुत्थानावर कसा विश्‍वास प्रकट केला?

येशूची मैत्रीण मार्था हिचा भाऊ मरण पावला तेव्हा तिने पुनरुत्थानावर विश्‍वास दाखवला. येशू येत आहे असे ऐकून त्याला भेटायला मार्था बाहेर धावत आली. ती म्हणालीः “प्रभुजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” तिचा शोक पाहून येशूने तिचे सांत्वन करुन म्हटलेः “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” तेव्हा मार्था उत्तरलीः “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.”—योहान ११:१७-२४.

४-६. पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवण्यास मार्थाला कोणती कारणे होती?

पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवण्यासाठी मार्थाला सबळ कारणे होती. उदाहरणार्थ, अनेक वर्षांपूर्वी एलिया व अलिशा या देवाच्या सेवकांनी देवाच्या शक्‍तीने प्रत्येकी एका बालकाला पुनरुत्थित केले होते हे तिला माहीत होते. (१ राजे १७:१७-२४; २ राजे ४:३२-३७) तसेच एका मृत माणसाला खड्डयात फेकण्यात आले तेव्हा अलिशाच्या हाडांचा स्पर्श होताच तो जिवंत झाला होता, हे सुद्धा तिला माहीत होते. (२ राजे १३:२०, २१) परंतु येशूची शिकवण व कार्य यांनी तिचा विश्‍वास सर्वात अधिक दृढ केला.

मृत लोकांना पुनरुत्थान देण्यात तो कोणती भूमिका घेईल ते, या घटनेच्या दोन वर्षे आधी येशूने यरुशलेमात सांगितले तेव्हाही मार्था तेथे हजर असण्याची शक्यता होती. तो म्हणालाः “जसा पिता मेलेल्यातून उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. याविषयी आश्‍चर्य करु नका. कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.”—योहान ५:२१, २८, २९.

हे शब्द उच्चारेपर्यंत येशूने कोणालाही पुनरुत्थित केल्याचे पवित्र शास्त्रात आढळत नाही. पण त्यानंतर लवकरच त्याने नाईन गावातील विधवेच्या तरुण मुलास मृतातून उठवले. या घटनेची वार्ता दक्षिणेत यहुदापर्यंत पसरली. तेव्हा मार्थाने ती खचितच ऐकली असेल. (लूक ७:११-१७) पुढे गालील समुद्राजवळ याईरच्या घरची घटनाही मार्थाने ऐकली असावी. याईरची १२ वर्षांची मुलगी अतिशय आजारी पडली व मरण पावली. पण याईराच्या घरी आल्यावर येशू मृत मुलीजवळ गेला व म्हणालाः “मुली, उठ!” आणि ती उठली!—लूक ८:४०-५६.

७. येशू मृतांना उठवू शकतो याचा कोणता पुरावा त्याने मार्थाला दिला?

परंतु, आपल्या भावाला येशू त्याच वेळी मृतातून उठवील अशी मार्थाची अपेक्षा नव्हती. यासाठीच ती म्हणालीः “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुनः उठेल हे मला ठाऊक आहे.” परंतु मृतांच्या पुनरुत्थानातील आपली भूमिका मार्थाच्या मनावर बिंबविण्यासाठी येशू म्हणालाः “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो तो कधीही मरणार नाही.” त्यानंतर लवकरच लाजराला ठेवले होते त्या कबरेजवळ येशूला नेण्यात आले. त्याने मोठ्याने हाक मारुन म्हटलेः “लाजरा, बाहेर ये!” आणि चार दिवस मृत असलेला लाजर बाहेर आला!—योहान ११:२४-२६, ३८-४४.

८. येशूचे पुनरुथान झाले याला काय पुरावा आहे?

यानंतर थोड्याच आठवड्यांनी येशू स्वतः मारला गेला व त्याला कबरेत ठेवले गेले. परंतु, तो तीन दिवसातील काही काळच फक्‍त तेथे होता. याचे कारण सांगताना प्रेषित पेत्र म्हणतोः “त्या येशूला देवाने उठवले ह्‍याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत.” देवाच्या पुत्राला कबरेतून बाहेर पडण्यास तेथील धार्मिक नेते आडकाठी करु शकले नाहीत. (प्रे. कृत्ये २:३२; मत्तय २७:६२-६६; २८:१-७) येशू मेलेल्यांमधून उठला यात काही शंका नाही. कारण त्याने आपल्या अनेक शिष्यांना—एकदा तर ५०० जणांना—दर्शन दिले. (१ करिंथकर १५:३-८) पुनरुत्थानावर येशूच्या शिष्यांचा इतका दृढ विश्‍वास होता की देवाच्या सेवेसाठी मृत्युलाही सामोरे जाण्यास ते तयार होते.

९. पवित्र शास्त्र कोणत्या नऊ व्यक्‍तींचे पुनरुत्थान झाल्याचे सांगते?

मृतांचे पुनरुत्थान होऊ शकते याविषयी प्रेषित पेत्र व पौल यांच्यामार्फतही पुरावा दिला गेला. प्रथम, योप्पा येथील टबिथा उर्फ दुर्कस हिला पेत्राने मृतातून उठवले. (प्रे. कृत्ये ९:३६-४२) पौल भाषण करताना तिसऱ्‍या मजल्याच्या खिडकीतून पडून मरण पावलेल्या युतुख या तरुणाला पौलाने पुन्हा जिवंत केले. (प्रे. कृत्ये २०:७-१२) मृत पुन्हा जिवंत होऊ शकतात या गोष्टीला पवित्र शास्त्रामध्ये नोंदलेली ही नऊ पुनरुत्थाने नक्कीच खात्रीचा पुरावा देतात!

कोणाचे पुनरुत्थान होईल?

१०, ११. (अ) देवाने पुनरुत्थानाची योजना का केली? (ब) प्रे. कृत्ये २४:१५ला अनुसरुन लोकांच्या कोणत्या दोन गटांचे पुनरुत्थान होईल?

१० सुरवातीला, कोणालाही पुनरुत्थान देण्याचा देवाचा हेतू नव्हता, कारण आदाम व हव्वा विश्‍वासू राहिले असते तर कोणालाही मरावेच लागले नसते. परंतु आदामाच्या पापामुळे सर्वांवर व्यंगत्व व मरण आले. (रोमकर ५:१२) यास्तव आदामाच्या कोणत्याही संततीला सार्वकालिक जीवन भोगता येण्यासाठी देवाने पुनरुत्थानाची योजना केली. पण एखाद्या व्यक्‍तीला पुनरुत्थान मिळेल किंवा नाही हे कशावरुन ठरते?

११ पवित्र शास्त्र म्हणतेः “नीतीमानअनीतीमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रे. कृत्ये २४:१५) काहींना याचे आश्‍चर्य वाटेल. ‘“अनीतीमानांना” पुन्हा का जिवंत करावे?’ असा त्यांना प्रश्‍न पडेल. येशू वधस्तंभावर असताना घडलेल्या घटनेत या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला मिळते.

१२, १३. (अ) येशूने एका गुन्हेगाराला काय अभिवचन दिले? (ब) येशूने सांगितलेले “नंदनवन” कोठे आहे?

१२ येशूच्या शेजारची ही माणसे अपराधी आहेत. “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हाला वाचीव,” असे म्हणून एकाने त्याची निंदा केली. परंतु दुसऱ्‍या अपराध्याचा येशूवर विश्‍वास आहे. येशूकडे वळून तो म्हणतोः “प्रभो, आपण आपल्या राज्याधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” तेव्हा येशू त्याला वचन देतोः “मी आज तुला खचित सांगतो, तू माझ्याबरोबर सुखलोकात [नंदनवनात] असशील.”—लूक २३:३९-४३.

१३ परंतु, येशूने जेव्हा म्हटले की, “तू माझ्याबरोबर सुखलोकात [नंदनवनात] असशील,” त्याचा अर्थ काय होतो? सुखलोक किंवा नंदनवन कोठे आहे? आरंभी देवाने निर्माण केलेले नंदनवन कोठे होते? ते याच पृथ्वीवर होते, नाही का? देवाने पहिल्या मानवी जोडप्याला एदेन बाग म्हटलेल्या सुंदर नंदनवनात ठेवले. तेव्हा हा, माजी गुन्हेगार नंदनवनात असेल असे वाचल्यावर, ही पृथ्वी सुंदर केलेल्या अवस्थेमध्ये आपण कल्पिली पाहिजे. कारण “नंदनवन” याचा अर्थ “बाग” वा “उद्यान” असा आहे.—उत्पत्ती २:८, ९.

१४. त्या माजी गुन्हेगारासह येशू कशा रितीने नंदनवनात असेल?

१४ अर्थात, त्या माजी गुन्हेगारासह येशू या पृथ्वीवर असणार नाही. भूतलावरील नंदनवनावर राज्य करणारा येशू स्वर्गीय राजा असेल. यास्तव, तो त्या माणसाबरोबर असेल याचा अर्थ तो त्याला मृतातून उठवील व त्याच्या भौतिक व आध्यात्मिक गरजा पुरवील असा होतो. परंतु गुन्हेगार माणसाला नंदनवनात राहण्याची परवानगी येशू का देईल?

१५. “अनीतीमान” लोकांचे पुनरुत्थान का होते?

१५ या माणसाने वाईट गोष्टी केल्या हे खरे. तो “अनीतीमान” होता. तसेच देवाच्या इच्छेबद्दल त्याला माहिती नव्हती. परंतु त्याला देवाचा हेतू माहीत असता तर तो गुन्हेगार झाला असता का? हीच गोष्ट शोधून काढण्यासाठी त्या अनीतीमान माणसाला व त्याच्यासारख्या अज्ञानात मरण पावलेल्या करोडो लोकांना येशू पुन्हा जिवंत करील. उदाहरणार्थ, गेल्या अनेक शतकात, वाचायला न येणारी, पवित्र शास्त्र कधीही न पाहिलेली अनेक माणसे मरण पावली. परंतु त्यांना शिओल अथवा हेडीजमधून [म्हणजेच अधोलोक वा कबरेतून] उठवले जाईल. मग, नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर त्यांना देवाची इच्छा शिकवण्यात येईल, आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करुन आपले देवावर खरेच प्रेम आहे असे सिद्ध करण्याची संधि त्यांना मिळेल.

१६. (अ) मृतातील कोणाचे पुनरुत्थान होणार नाही? (ब) याबाबतीत आपण निर्णय घेण्याचा प्रयत्न का करु नये? (क) आपण प्रामुख्याने कशाकडे लक्ष द्यावे?

१६ याचा अर्थ, सर्वांनाच पुनरुत्थान मिळेल असा नव्हे. येशूचा विश्‍वासघात करणाऱ्‍या यहुदा इस्कार्योतला पुनरुत्थान मिळणार नाही असे पवित्र शास्त्र दाखवते. त्याने जाणून-बुजून केलेल्या दुष्कृत्यामुळे यहुदाला “नाशाचा पुत्र” म्हटले आहे. (योहान १७:१२) जेथून पुनरुत्थान नाही अशा लाक्षणिक गेहेन्‍नामध्ये तो गेला. (मत्तय २३:३३) देवाची इच्छा कळल्यानंतर जे जाणून-बुजून वाईट गोष्टी करतात ते कदाचित पवित्र आत्म्याविरुद्ध पाप करणारे असतील; आणि पवित्र आत्म्याविरुद्ध पाप करणाऱ्‍यांना देव पुनरुत्थान देणार नाही. (मत्तय १२:३२; इब्रीयांस ६:४-६; १०:२६, २७) देव न्यायाधीश असल्यामुळे आधुनिक वा भूतकाळातील काही दुष्ट व्यक्‍तींना पुनरुत्थान मिळेल किंवा नाही ते ठरवण्याचे आपल्याला कारण नाही. हेडीजमध्ये कोण आहे व गेहेन्‍नात कोण आहे ते देवाला ठाऊक आहे. नव्या व्यवस्थेमध्ये देवाला जशा व्यक्‍ती हव्या आहेत तसे बनण्याचा निकराचा प्रयत्न आपण आपल्या परीने करावा.—लूक १३:२४, २९.

१७. सार्वकालिक जीवनासाठी कोणाला पुनरुत्थानाची गरज नाही?

१७ वस्तुस्थिती अशी आहे की ज्यांना सार्वकालिक जीवन मिळेल त्या सर्वांनाच पुनरुत्थानाची गरज पडणार नाही. या व्यवस्थेच्या “शेवटल्या दिवसात” हयात असलेले देवाचे अनेक सेवक हर्मगिदोनामधून जिवंत पार पडतील, आणि त्यानंतर नीतीमान “नव्या पृथ्वी”चे घटक म्हणून त्यांना कधीही मरण्याची गरज नाही. “जिवंत असलेला प्रत्येकजण, जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो तो, कधीही मरणार नाही.” असे येशूने मार्थाला म्हटले. ते त्यांच्याबाबतीत शब्दशः खरे होण्याची शक्यता आहे.—योहान ११:२६; २ तीमथ्य ३:१.

१८. पुनरुत्थान मिळणारे “नीतीमान” लोक कोण होत?

१८ पुनरुत्थान मिळणारे “नीतीमान” लोक कोण आहेत? येशू ख्रिस्त भूतलावर येण्यापूर्वीच्या देवाच्या विश्‍वासू सेवकांचा त्यात समावेश होईल. इब्रीयांस लिहिलेल्या पत्राच्या ११ व्या अध्यायात यामधील अनेक व्यक्‍तींचा नावानिशी उल्लेख केला आहे. त्यांना स्वर्गात जाण्याची नव्हे तर पृथ्वीवर पुन्हा जगण्याची आशा होती. तसेच अलिकडेच मरण पावलेल्या देवाच्या सेवकांचाही समावेश “नीतीमान” लोकांच्या पुनरुत्थानात होईल. त्यांना मृतातून उठवून, पृथ्वीवर अनंतकाल जगण्याची त्यांची आशा पूर्ण होईल, याकडे देव लक्ष पुरवील.

केव्हा व कोठे पुनरुत्थित करण्यात येतील

१९. (अ) पुनरुत्थान मिळणाऱ्‍यात येशू कोणत्या अर्थाने पहिला होता? (ब) त्यानंतर कोणाला पुनरुत्थान मिळते?

१९ “मेलेल्यांतून उठणाऱ्‍यांपैकी पहिला” असा येशू ख्रिस्ताचा उल्लेख केला आहे. (प्रे. कृत्ये २६:२३) याचा अर्थ, ज्यांना पुन्हा मरण येणार नाही त्यांच्यापैकी पुनरुत्थान झालेला तो पहिला होता. तसेच आत्मिक व्यक्‍ती म्हणून उठलेला तोच पहिला होता. (१ पेत्र ३:१८) “पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी” असे म्हणताना त्याच्यासारखे इतरही असतील असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. (१ करिंथकर १५:२०-२३) तेव्हा, पुनरुत्थानामध्ये काहीजण इतरांच्या आधी उठवले जातील.

२०. (अ) “जे ख्रिस्ताचे आहेत ते” म्हणजे कोण? (ब) त्यांना कोणते पुनरुत्थान मिळते?

२० देवाच्या राज्यामध्ये ख्रिस्तासह सत्ता चालविण्यासाठी निवडलेले १,४४,००० विश्‍वासू शिष्य म्हणजे “जे ख्रिस्ताचे आहेत ते” होत. त्यांच्या स्वर्गीय पुनरुत्थानाबद्दल पवित्र शास्त्र सांगतेः “पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्‍या मरणाची सत्ता नाही. तर ते . . . त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.”—प्रकटीकरण २०:६; १४:१, ३.

२१. (अ) “पहिले पुनरुत्थान” कधी सुरु होते? (ब) आतापर्यंत निश्‍चितपणे कोणाला स्वर्गीय जीवनाचे पुनरुत्थान मिळाले आहे?

२१ यास्तव, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ते १,४४,००० लोक उठवले जातील. “पहिल्या पुनरुत्थानात” ते सहभागी होतील. (फिलिप्पैकर ३:११, न्यू.व.) ही घटना कधी घडते? पवित्र शास्त्र म्हणतेः “त्याच्या आगमनकाळी [किंवा, उपस्थितीत]. आपण आधीच्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे १९१४ साली ख्रिस्ताच्या उपस्थितीचा आरंभ झाला. म्हणजेच, विश्‍वासू ख्रिस्तीजनांच्या स्वर्गीय, “पहिल्या पुनरुत्थानाचा” “दिवस” सुरु झाला. प्रेषित व आरंभीच्या इतर ख्रिस्ती लोकांचे, स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान झालेले आहे यात शंका नाही.—२ तीमथ्य ४:८.

२२. (अ)“पहिल्या पुनरुत्थानात” आणखी कोण सहभागी होतील? (ब) यांचे पुनरुत्थान कधी होते?

२२ पण, ख्रिस्ताच्या अदृश्‍य उपस्थितीच्या या काळात, त्याच्यासह स्वर्गातून राज्य करण्याची आशा असलेले काही ख्रिस्ती लोक हयात आहेत. तेच, १,४४,००० मधील शेष होत. त्यांचे पुनरुत्थान कधी होते? त्यांना मृत्युमध्ये निद्रा घेण्याची गरज नाही. मरणाच्या क्षणीच ते तात्काळ उठवले जातात. “आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही. तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल व मेलेले उठवले जातील,” असे पवित्र शास्त्र सांगते.—१ करिंथकर १५:५१, ५२, १ थेस्सलनीकाकर ४:१५-१७.

२३. भौतिक जीवनातून आत्मिक जीवनात होणाऱ्‍या या बदलाचे वर्णन पवित्र शास्त्रात कसे केले आहे?

२३ अर्थात, स्वर्गीय जीवनाचे हे “पहिले पुनरुत्थान” मानवी डोळ्यांना अदृश्‍य आहे. या पुनरुत्थानामुळे आत्मिक व्यक्‍तीचे जीवन मिळते. भौतिक जीवनातून आत्मिक जीवनात होणारा हा बदल पवित्र शास्त्रामध्ये अशा रितीने सांगितला आहेः “जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते. जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठवले जाते. . . . प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते.”—१ करिंथकर १५:४२-४४.

२४. (अ) “पहिल्या पुनरुत्थाना”नंतर कोणते पुनरुत्थान होते? (ब) त्याला “अधिक चांगले पुनरुत्थान” का म्हटले आहे?

२४ “पहिले पुनरुत्थान” या शब्दांवरुनच त्यानंतर दुसरे होईल असा बोध होतो. नीतीमान व अनीतीमान लोकांचे नंदनवनमय पृथ्वीवरील जीवनासाठी होणारे पुनरुत्थान ते हेच होय. हे पुनरुत्थान हर्मगिदोनानंतर होईल. एलिया व अलिशा यांनी उठवलेल्या मुलांपेक्षा, तसेच भूतलावरील इतरांच्या पुनरुत्थानापेक्षा हे “अधिक चांगले पुनरुत्थान” असेल. ते का बरे? कारण हर्मगिदोनानंतर उठवण्यात आलेल्या लोकांनी देवाची सेवा करण्याचे पसंत केल्यास त्यांना पुन्हा कधीही मरण्याची गरज नाही.—इब्रीयांस ११:३५.

देवाचा चमत्कार

२५. (अ) मरण पावलेल्या शरीराचे का पुनरुत्थान होत नाही? (ब) कशाचे पुनरुत्थान होते व पुनरुत्थान झालेल्यांना काय दिले जाते?

२५ एखादी व्यक्‍ती मेल्यानंतर कशाचे पुनरुत्थान होते? जे शरीर मरते त्याचेच नव्हे. स्वर्गीय जीवनाचे वर्णन करताना पवित्र शास्त्र हे दाखवते. (१ करिंथकर १५:३५-४४) पृथ्वीवरील जीवनासाठी पुनरुत्थान झालेल्यांनाही आधीच्या जीवनातील शरीर परत मिळत नाही. ते शरीर बहुधा कुजून मातीस परत मिळाले असेल. कालांतराने त्या मृत शरीरातील मूलतत्वे इतर जिवांचे घटक बनली असतील. म्हणून देव मृतांच्या त्याच शरीराला नव्हे तर व्यक्‍तीला पुनरुत्थान देतो. स्वर्गात जाणाऱ्‍या व्यक्‍तींना तो नवीन आत्मिक शरीरे देतो व पृथ्वीवर राहण्यासाठी उठवलेल्यांना तो नवीन भौतिक शरीर देतो. हे नवे भौतिक शरीर निश्‍चितच त्या व्यक्‍तीच्या मरणापूर्वीच्या शरीरासारखे असेल. त्यामुळे त्याच्या परिचयाचे लोक त्याला ओळखतील.

२६. (अ) पुनरुत्थान हा अद्‌भूत चमत्कार का आहे? (ब) मानवाने लावलेल्या कोणत्या शोधामुळे, मरण पावलेल्या व्यक्‍तींना स्मृतीमध्ये ठेवण्याचे देवाचे महान सामर्थ्य समजण्यास, आपल्याला मदत होते?

२६ पुनरुत्थान हा खरोखरच एक अद्‌भुत चमत्कार आहे. मेलेल्या व्यक्‍तीने जीवनामध्ये खूप अनुभव, ज्ञान व अनेक आठवणी साठवल्या असतील. पृथ्वीवर होऊन गेलेल्या इतर कोणाही व्यक्‍तीपेक्षा वेगळे असे व्यक्‍तीमत्व त्याने संपादन केले असेल. तरीही त्याबद्दल प्रत्येक बारीक तपशील यहोवाच्या स्मरणात असतो. तेव्हा, पुनरुत्थान देताना तो त्या व्यक्‍तीला संपूर्णपणे आधीसारखाच करील. पुनरुत्थान होणाऱ्‍या मृतांबद्दल पवित्र शास्त्र म्हणतेः “त्याला सर्वच जिवंत आहेत.” (लूक २०:३८) मानवाला आवाज व छायाचित्रे मुद्रित करता येतात आणि त्या व्यक्‍ती मरण पावल्यावर बऱ्‍याच काळानंतरही ते त्यांना पुन्हा पाहू व ऐकू शकतात. परंतु यहोवाला, त्याच्या स्मृतीमध्ये असलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत करणे शक्य आहे व तो तसे प्रत्यक्ष करील!

२७. पुनरुत्थानाबद्दल उत्पन्‍न होणाऱ्‍या कोणत्या प्रश्‍नांचे उत्तर आपल्याला पुढे मिळणार आहे?

२७ मृतांच्या पुनरुत्थानानंतर नंदनवनात जीवन कसे असेल त्याबद्दल पवित्र शास्त्र आपल्याला बरेचसे सांगते. उदाहरणार्थ, काही लोक “जीवनाच्या पुनरुत्थानासाठी” व इतर “न्यायाच्या पुनरुत्थानासाठी” बाहेर येतील असे येशू म्हणाला. (योहान ५:२९) त्याच्या या उद्‌गारांचा काय अर्थ होतो? पुनरुत्थान झालेल्या “नीतीमान” लोकांची स्थिती “अनीतीमान” लोकांपेक्षा वेगळी असेल का? न्यायाचा दिवस याविषयीचा विचार केल्यावर आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरे मिळू शकतील.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६७ पानांवरील चित्रं]

“तो पुनरुत्थानसमयी उठेल हे मला ठाऊक आहे”

एलियाने विधवेच्या मुलाचे पुनरुत्थान केले

अलिशाने एका मुलाचे पुनरुत्थान केले

अलिशाच्या अस्थींचा स्पर्श झालेला माणूस जिवंत झाला

[१६८ पानांवरील चित्रं]

येशूने ज्यांचे पुनरुत्थान केले ती माणसेः

नाईन गावातील विधवेचा मुलगा

लाजर

याईराची कन्या

[१६९ पानांवरील चित्रं]

ज्यांचे पुनरुत्थान झाले असे इतर काहीजणः

दुर्कस

स्वतः येशू

युतुख

[१७० पानांवरील चित्रं]

येशूने गुन्हेगाराला अभिवचन दिलेले नंदनवन कोठे आहे?