व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिशिष्ट

झेंडा वंदन, मतदान व नागरी सेवा

झेंडा वंदन, मतदान व नागरी सेवा

झेंडा वंदन. यहोवाचे साक्षीदार मानतात की राष्ट्रगीत होत असताना झेंड्याला नमन करणे किंवा सलामी देणे ही, आपले तारण देवाकडून नव्हे तर देशाकडून अथवा देशातील नेत्यांकडून होणार आहे या भावनेने केलेली त्याची उपासना आहे. (यशया ४३:११; १ करिंथकर १०:१४; १ योहान ५:२१) असाच एक नेता, प्राचीन बॅबिलोनचा शक्तिशाली सम्राट नबुखद्‌नेस्सर होता. त्याने एकदा, लोकांना त्याची थोरवी व धर्माबद्दल त्याला असलेला आवेश दाखवण्याकरता एक भली मोठी मूर्ती उभारली आणि राष्ट्रगीतासारखे एक संगीत वाजवले जाईल तेव्हा आपल्या प्रजेने या मूर्तीपुढे दंडवत करावे अशी आज्ञा दिली. परंतु, शद्रख, मेशक व अबेद्‌नगो या तीन हिब्रू तरुणांनी, मृत्यूदंडाची शिक्षा असतानाही मूर्तीपुढे दंडवत करण्यास नकार दिला.—दानीएल, अध्याय ३.

आपल्या काळात, “झेंड्याला उपासनेचे एक प्रतीक मानले जाते. झेंडा समोरून जातो तेव्हा लोक आदराने त्यांच्या टोप्या काढतात; कवी झेंड्याची स्तुती करणाऱ्या कविता लिहितात आणि मुले स्तोत्रे गातात,” असे इतिहासकार कार्लटन हेझ लिहितात. त्यांनी पुढे असेही म्हटले, की राष्ट्रभक्तीत “पवित्र दिवस” असतात ज्यांना राष्ट्रीय दिन मानले जाते. यात ‘संतांची व हुतात्म्यांची’ आणि त्यांच्या ‘स्मारकांची’ पूजा केली जाते. ब्राझीलमधील एका सार्वजनिक सोहळ्यादरम्यान, लष्करी न्यायालयाच्या प्रमुखांनी कबूल केले, की ‘जशी पितृभूमीची उपासना केली जाते तशीच झेंड्याची उपासना केली जाते.’ होय, “झेंडा हा क्रॉससारखाच पवित्र आहे,” असे द एनसाक्लोपिडिआ अमेरिकाना यात एकदा म्हटले होते.

वर उल्लेखण्यात आलेल्या विश्वकोशांत अलिकडेच अशी नोंद करण्यात आली होती, की राष्ट्रगीतांवरून लोकांचे “राष्ट्रप्रेम दिसून येते. लोकांना किंवा त्यांच्यावर शासन करणाऱ्यांना देवाने मार्गदर्शित करावे व त्यांचे संरक्षण करावे म्हणून या राष्ट्रगीतात देवाला विनंती केलेली असते.” म्हणून, यहोवाचे साक्षीदार जेव्हा झेंडा वंदन आणि राष्ट्रगीतांचा समावेश असलेले देशभक्तीचे सोहळे धार्मिक स्वरूपाचे आहेत असे मानतात तेव्हा ते असमंजसपणा दाखवत नाहीत. उलट, यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांनी झेंड्याला वंदन करण्यास नकार दिल्याच्या किंवा अमेरिकेतील शाळांमध्ये शपथ घेण्यास नकार दिल्याच्या घटनांचा उल्लेख करताना, द अमेरिकन कॅरेक्टर या पुस्तकात असे म्हटले होते: “दररोज पाळल्या जाणाऱ्या या प्रथा धार्मिक स्वरूपाच्या आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांत सरतेशेवटी कबूल केलेच.”

या प्रथा बायबलवर आधारित नाहीत असे यहोवाचे साक्षीदार मानत असल्यामुळे त्यात ते भाग घेत नसले तरी, जे भाग घेतात त्यांच्या हक्काचा ते निश्‍चित्तच आदर करतात. राष्ट्रध्वज हे प्रतीक आहे व सरकारी अधिकारी हे ‘वरिष्ठ अधिकारी’ आहेत जे “देवाचा सेवक” म्हणून सेवा करत आहेत, असा यहोवाच्या लोकांचा विश्वास असल्यामुळे ते राष्ट्रध्वजाचा आणि अधिकारी यांचा आदर करतात. (रोमकर १३:१-४) म्हणूनच तर यहोवाचे साक्षीदार “राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता” “प्रार्थना” करण्याचा सल्ला मानतात. कारण “पूर्ण सुभक्तिने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे,” असा त्यांचा हेतू आहे.—१ तीमथ्य २:२.

राजकीय निवडणुकांच्या वेळी मतदान करणे. खरे ख्रिस्ती, इतरांना असलेल्या मतदानाच्या हक्काचा आदर करतात. निवडणुकांच्या विरोधात ते मोर्चा काढत नाहीत व निवडून आलेल्या अधिकाऱ्यांना ते सहकार्य देतात. परंतु, राष्ट्रांच्या राजकीय बाबतीत ते पूर्णपणे तटस्थ राहतात. (मत्तय २२:२१; १ पेत्र ३:१६) पण ज्या देशांत मतदान करणे सक्तीचे असते किंवा मतदान केंद्रात न जाणाऱ्याबद्दल लोक नाराज होतात अशा देशांतील ख्रिश्चनांनी काय करावे? शद्रक, मेशक व अबेद्‌नगो हे दूरा नामक मैदानापर्यंत गेले होते हे लक्षात ठेवून एक ख्रिश्चन अशाच परिस्थितीत कदाचित त्याचा विवेक त्याला अनुमती देत असल्यामुळे मतदान केंद्रापर्यंत जाईल. परंतु, आपल्या ख्रिस्ती तटस्थतेचा भंग न करण्याची तो खबरदारी घेईल. त्याने खाली दिलेल्या सहा तत्त्वांवर विचार केला पाहिजे:

  1. १. येशूचे अनुयायी या “जगाचे नाही.”—योहान १५:१९.

  2. २. ख्रिस्ती लोक, ख्रिस्ताचे व त्याच्या राज्याचे प्रतिनिधीत्व करतात.—योहान १८:३६; २ करिंथकर ५:२०.

  3. ३. ख्रिस्ती मंडळीचा विश्वास एक असल्यामुळे तिच्यात ऐक्य आहे आणि तिच्यातील सदस्य ख्रिस्तासारख्या प्रेमामुळे एकमेकांसोबत जणू बांधलेले आहेत.—१ करिंथकर १:१०; कलस्सैकर ३:१४.

  4. ४. जे लोक एखाद्या अधिकाऱ्याला निवडून देतात ते, तो जे काही करेल त्यात सहभागी असतात.—१ शमुवेल ८:५, १०-१८ व १ तीमथ्य ५:२२ मधील तत्त्वे लक्षात घ्या.

  5. ५. इस्राएलांनी जेव्हा एका राजाची मागणी केली तेव्हा, त्यांनी यहोवाला सोडून दिले आहे असे यहोवाला वाटले.—१ शमुवेल ८:७.

  6. ६. ख्रिश्चनांनी सर्व प्रकारचे राजकीय दृष्टिकोन बाळगणाऱ्या लोकांसोबत अगदी धैर्याने देवाच्या राज्य सरकारविषयी बोलले पाहिजे.—मत्तय २४:१४; २८:१९, २०; इब्री लोकांस १०:३५.

नागरी सेवा. काही देशांत असा नियम असतो, की जे लोक लष्करी सेवा करण्याचे नाकारतात त्यांनी काही काळापुरती कुठली ना कुठली तरी नागरी सेवा केली पाहिजे. आपल्याला जेव्हा असा निर्णय घ्यावा लागतो तेव्हा आपण याविषयी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे, एखाद्या प्रौढ सहख्रिस्ती बांधवाबरोबर याविषयी बोलले पाहिजे आणि मग बायबलमधून शिकलेल्या गोष्टींच्या आधारावर आपल्या विवेकाचा उपयोग करून निर्णय घेतला पाहिजे.—नीतिसूत्रे २:१-५; फिलिप्पैकर ४:५.

देवाच्या वचनात आपल्याला असे सांगण्यात आले आहे, की आपण “सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे; . . . सौम्य, . . . असावे.” (तीत ३:१, २) हे वचन लक्षात ठेवून आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकतो: ‘नागरी सेवा करण्याची मला आलेली ऑफर मला माझ्या ख्रिस्ती तटस्थतेशी हातमिळवणी करायला किंवा खोट्या धर्मात सहभाग घ्यायला भाग तर पाडणार नाही ना?’ (मीखा ४:३, ५; २ करिंथकर ६:१६, १७) ‘हे काम केल्यामुळे मला माझ्या ख्रिस्ती जबाबदाऱ्या पूर्ण करायला जड जाईल का किंवा त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यापासून मला रोखेल का?’ (मत्तय २८:१९, २०; इफिसकर ६:४; इब्री लोकांस १०:२४, २५) ‘की, अशा सेवेत भाग घेतल्यावर, मला आध्यात्मिक गोष्टीत जास्त सहभाग घ्यायला कदाचित पूर्ण वेळेची सेवा करायला वेळ मिळेल?’—इब्री लोकांस ६:११, १२.

एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीचा विवेक तिला तुरुंगात जाण्यापेक्षा नागरी सेवा करण्याची अनुमती देत असेल तर इतर ख्रिश्चनांनी तिच्या निर्णयाचा आदर करावा. (रोमकर १४:१०) पण जर तिचा विवेक तिला ही सेवा करण्याची अनुमती देत नसेल तर इतरांनी तिच्या या निर्णयाचा देखील आदर केला पाहिजे.—१ करिंथकर १०:२९; २ करिंथकर १:२४.