देवाचे राज्य म्हणजे काय?
पाठ ६
देवाचे राज्य म्हणजे काय?
देवाचे राज्य कोठे आहे? (१) त्या राज्याचा राजा कोण आहे? (२)
राजासोबत इतर जणही शासन करतात का? जर करतात तर मग त्यांची संख्या किती आहे? (३)
आपण शेवटल्या दिवसांमध्ये जगत आहोत हे काय दाखवते? (४)
भविष्यामध्ये देवाचे राज्य मानवजातीसाठी काय करील? (५-७)
१. येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने आपल्या अनुयायांना देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करण्यास शिकवले. राज्य एक असे सरकार आहे की ज्याचा प्रमुख राजा असतो. देवाचे राज्य एक खास सरकार आहे. ते स्वर्गामध्ये स्थापित असून या पृथ्वीवर शासन करणार आहे. ते देवाच्या नावाला शुद्ध किंवा पवित्र करील. त्याच्यामुळे, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही देवाची इच्छा पूर्ण होईल.—मत्तय ६:९, १०.
२. येशू, देवाच्या राज्याचा राजा होईल असे अभिवचन देवाने दिले. (लूक १:३०-३३) येशू पृथ्वीवर असताना त्याने हे सिद्ध केले की, तो दयाशील, न्यायी आणि परिपूर्ण शासक असेल. स्वर्गामध्ये पुन्हा गेल्यावर त्याला लगेचच देवाच्या राज्याचा राजा म्हणून सिहांसनाधिष्ठ करण्यात आले नाही. (इब्री लोकांस १०:१२, १३) सन १९१४ मध्ये यहोवाने येशूला अभिवचन दिल्याप्रमाणे अधिकार दिला. तेव्हापासून, येशूने यहोवाचा नियुक्त राजा या नात्याने स्वर्गामध्ये राज्य केले आहे.—दानीएल ७:१३, १४.
३. यहोवाने पृथ्वीवरून काही विश्वासू पुरुष आणि महिलांना देखील स्वर्गामध्ये जाण्याकरता निवडले आहे. ते येशूबरोबर संपूर्ण मानवजातीवर राजे, न्यायधीश आणि याजक या नात्याने राज्य करतील. (लूक २२:२८-३०; प्रकटीकरण ५:९, १०) येशूने त्याच्या राज्यातील या सहराजांना ‘लहान कळप’ असे संबोधले. त्यांची संख्या १,४४,००० इतकी आहे.—लूक १२:३२; प्रकटीकरण १४:१-३.
४. येशू राजा झाल्यावर लगेचच, त्याने सैतान आणि त्याच्या दुष्ट देवदूतांना स्वर्गातून पृथ्वीवरील परिसरात खाली फेकले. म्हणूनच तर १९१४ पासून पृथ्वीवरील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे. (प्रकटीकरण १२:९, १२) युद्धे, दुष्काळ, मऱ्या, वाढता स्वैराचार—या सर्व गोष्टी, येशू राज्य करीत आहे आणि हे युग शेवटल्या दिवसांमध्ये असल्याचे सूचित करणाऱ्या ‘चिन्हाचा’ भाग आहेत.—मत्तय २४:३, ७, ८, १२; लूक २१:१०, ११; २ तीमथ्य ३:१-५.
५. लवकरच, येशू लोकांचा न्याय करील, मेंढपाळ जसे मेंढरांना शेरडांपासून वेगळे करतो तसेच तोही करील. स्वतःला त्याची एकनिष्ठ प्रजा शाबीत करणारे लोक “मेंढरे” आहेत. त्यांना पृथ्वीवरील अनंतकाळचे जीवन प्राप्त होईल. देवाच्या राज्याला नाकारणारे लोक ‘शेरडे’ असतील. (मत्तय २५:३१-३४, ४६) समीपच्या भवितव्यात, येशू सर्व शेरडांसमान लोकांचा नाश करील. (२ थेस्सलनीकाकर १:६-९) तुम्हाला येशूच्या ‘मेंढरांपैकी’ एक व्हावयाचे आहे तर तुम्ही राज्य संदेश ऐकला पाहिजे आणि तुम्ही जे काही शिकता ते आचरले पाहिजे.—मत्तय २४:१४.
६. आता पृथ्वीचे अनेक राष्ट्रांमध्ये विभाजन झाले आहे. प्रत्येकाला स्वतःचे सरकार आहे. ही राष्ट्रे बहुतेक वेळा एकमेकांसोबत झगडत असतात. पण देवाचे राज्य सर्व मानवी सरकारांना काढून टाकील. केवळ तेच, संपूर्ण पृथ्वीवर एक सरकार या नात्याने राज्य करील. (दानीएल २:४४) तेव्हा युद्ध, गुन्हेगारी आणि हिंसाचार नसेल. सर्व लोक शांतीने व ऐक्याने एकत्र राहतील.—मीखा ४:३, ४.
७. येशूच्या हजार वर्षीय राजवटीत, विश्वासू मानव परिपूर्ण होतील, आणि संपूर्ण पृथ्वी परादीस होईल. हजार वर्षांच्या राजवटीच्या अंतापर्यंत, देवाने येशूला सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याने केलेल्या असतील. मग तो ते राज्य पुन्हा आपल्या पित्याच्या हाती देईल. (१ करिंथकर १५:२४) देवाचे राज्य काय करणार आहे याबद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना व प्रिय जनांना का सांगू नये?
[१३ पानांवरील चित्र]
येशूच्या शासनादरम्यान, द्वेष किंवा कलुषितपणाला थारा नसेल