देवाच्या सेवकांनी शुद्ध असले पाहिजे
पाठ ९
देवाच्या सेवकांनी शुद्ध असले पाहिजे
आपण हरतऱ्हेने शुद्ध का असले पाहिजे? (१)
आध्यात्मिकरीत्या, (२)
नैतिकरीत्या, (३) मानसिकरीत्या, (४) व शारीरिकरीत्या, (५) शुद्ध असण्याचा अर्थ काय?
आपण कोणत्या प्रकारचे अशुद्ध बोलणे टाळले पाहिजे? (६)
१. यहोवा देव शुद्ध आणि पवित्र आहे. त्याच्या उपासकांनी—आध्यात्मिकरीत्या, नैतिकरीत्या, मानसिकरीत्या, आणि शारीरिकरीत्या शुद्ध असावे असे त्याला वाटते. (१ पेत्र १:१६) देवाच्या नजरेत शुद्ध राहण्यास खरे परिश्रम घ्यावे लागतात. आपण एका अशुद्ध जगात राहत आहोत. शिवाय आपल्याला, चुका करण्याच्या आपल्या प्रवृत्तींविरुद्ध लढत द्यावी लागते. पण आपण हार मानू नये.
२. आध्यात्मिक शुद्धता: यहोवाची सेवा करण्याची आपली इच्छा आहे तर मग आपण खोट्या धर्माच्या कोणत्याही शिकवणींना किंवा रूढींना आचरत राहू शकत नाही. आपण खोट्या धर्मातून निघून कोणत्याही प्रकारे त्याला पाठिंबा देऊ नये. (२ करिंथकर ६:१४-१८; प्रकटीकरण १८:४) देवाबद्दलचे सत्य एकदाचे शिकल्यावर, लबाडीने लोकांची दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून आपण दक्ष असले पाहिजे.—२ योहान १०, ११.
३. नैतिक शुद्धता: यहोवा त्याच्या उपासकांकडून त्यांनी सर्व वेळी खऱ्या ख्रिश्चनांप्रमाणे वागावे अशी अपेक्षा करतो. (१ पेत्र २:१२) आपण जे काही करतो, मग ते एकांतात करत असलो तरी तो सर्व काही पाहतो. (इब्री लोकांस ४:१३) आपण या जगाच्या लैगिंक अनैतिकता व इतर सर्व अशुद्ध प्रथा टाळल्या पाहिजेत.—१ करिंथकर ६:९-११.
४. मानसिक शुद्धता: आपण स्वच्छ, शुद्ध विचारांनी आपले मन भरवले तर आपले वर्तन देखील शुद्ध असू शकते. (फिलिप्पैकर ४:८) परंतु जर आपण अशुद्ध गोष्टींवर विचार केला तर दुष्ट कार्ये करू. (मत्तय १५:१८-२०) आपल्या मनांना मळीण करणाऱ्या मनोरंजनाच्या सर्व प्रकारांना आपण टाळले पाहिजे. त्याऐवजी आपण आपले मन देवाच्या वचनाचा अभ्यास करून शद्ध विचारांनी भरू शकतो.
५. शारीरिक शुद्धता: ख्रिस्ती लोक देवाचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे, त्यांनी त्यांच्या शरीरांना आणि वस्त्रांना स्वच्छ राखले पाहिजे. शौचालयातून आल्यावर तसेच, भोजन करण्याआधी वा अन्नाचे पदार्थ हाताळण्याआधी आपण आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत. तुमच्याकडे मलप्रवाहाची विल्हेवाट लावण्याची योग्य व्यवस्था नसल्यास, प्रसाधन मल जमिनीत गाडला पाहिजे. (अनुवाद २३:१२, १३) शारीरिक स्वच्छतेमुळे चांगले आरोग्य लाभते. एखाद्या ख्रिश्चनाचे घर बाहेरून आणि आतून साफसुथरे असले पाहिजे. समाजामध्ये चांगले उदाहरण म्हणून ते उठून दिसले पाहिजे.
६. शुद्ध बोलणे: देवाच्या सेवकांनी नेहमी सत्य बोलले पाहिजे. खोटे बोलणाऱ्यांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. (इफिसकर ४:२५; प्रकटीकरण २१:८) ख्रिस्ती लोक अर्वाच्य भाषा वापरत नाहीत. ते घाणेरडे विनोद अथवा अश्लील गोष्टी ऐकत नाहीत, सांगत नाहीत. त्यांच्या स्वच्छ बोलण्यामुळे ते, नोकरीवर, शाळेमध्ये आणि त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये वेगळे असे दिसून येतात.—इफिसकर ४:२९, ३१; ५:३.
[१८, १९ पानांवरील चित्रं]
देवाच्या सेवकांनी सर्व बाबतीत शुद्ध असले पाहिजे