देवास वीट आणणाऱ्या प्रथा
पाठ १०
देवास वीट आणणाऱ्या प्रथा
देव ज्या गोष्टींना वाईट म्हणतो अशा गोष्टींबद्दल तुम्हाला कसे वाटले पाहिजे? (१)
लैगिंक वर्तनाचे कोणते प्रकार चुकीचे आहेत? (२)
ख्रिस्ती लोकांनी लबाडी, (३) जुगार, (३) चोरी, (३) हिंसा, (४) भूतविद्या, (५) मद्यपी (६) या गोष्टींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?
वाईट सवयींपासून एक व्यक्ती स्वतःची सुटका कशी करू शकते? (७)
१. देवाच्या सेवकांना भल्या गोष्टी आवडतात. परंतु त्यांनी वाईट गोष्टींचा वीट मानण्यास देखील शिकले पाहिजे. (स्तोत्र ९७:१०) याचा अर्थ देवाला ज्या विशिष्ट सवयींचा वीट आहे त्या टाळणे. काही कोणत्या सवयी आहेत?
२. जारकर्म: विवाहाआधी लैगिंक समागम, व्यभिचार, पशुगमन, गोत्रगमन आणि समलैगिंकता, ही सर्व देवाविरुद्ध गंभीर पापे आहेत. (लेवीय १८:६; रोमकर १:२६, २७; १ करिंथकर ६:९, १०) एक जोडपे विवाहाविना एकत्र राहत असल्यास, त्यांनी एकतर विभक्त व्हावे अथवा कायदेशीररीत्या विवाह करावा.—इब्री लोकांस १३:४.
३. लबाडी, जुगार, चोरी: यहोवा देव खोटे बोलू शकत नाही. (तीत १:२) त्याची स्वीकृती प्राप्त करू पाहणाऱ्यांनी खोटे बोलण्याचे टाळले पाहिजे. (नीतिसूत्रे ६:१६-१९; कलस्सैकर ३:९, १०) जुगारीचा प्रत्येक प्रकार स्वार्थाने डागाळलेला आहे. यास्तव, ख्रिस्ती लॉटरी, घोड्यांच्या शर्यती व बिंगो यासारख्या कोणत्याही प्रकारच्या जुगारात भाग घेत नाहीत. (इफिसकर ५:३-५) शिवाय ख्रिस्ती लोक चोरी करत नाहीत. ते चोरलेला माल जाणूनबुजून विकत घेत नाहीत किंवा परवानगी शिवाय काही घेत नाहीत.—निर्गम २०:१५; इफिसकर ४:२८.
४. क्रोधाचा उद्रेक, हिंसा: अनियंत्रित क्रोधामुळे हिंसक कृत्ये घडू शकतात. (उत्पत्ति ४:५-८) हिंसक व्यक्ती देवाचा मित्र असू शकत नाही. (स्तोत्र ११:५; नीतिसूत्रे २२:२४, २५) बदला घेणे किंवा इतरांनी आपल्याविरुद्ध केलेल्या गोष्टींमुळे आपणही त्यांचे वाईट करणे चुकीचे आहे.—नीतिसूत्रे २४:२९; रोमकर १२:१७-२१.
५. जादुई मंत्र व भूतविद्या: काही लोक रोगनिवारण करण्यासाठी अलौकिक शक्तींना कळकळीने विनंती करतात. इतर जण त्यांच्या शत्रूंना आजारी पाडण्यासाठी किंवा त्यांना ठार मारण्यासाठी त्यांच्यावर करणी करतात. या सर्व रूढींमागची शक्ती सैतान आहे. यास्तव, ख्रिस्ती लोकांनी यांपैकी एकाही रूढीत भाग घेऊ नये. (अनुवाद १८:९-१३) यहोवाच्या समीप राहिल्याने, इतरांनी आपल्यावर केलेल्या करणींपासून आपल्याला सर्वोत्तम सुरक्षा मिळू शकते.—नीतिसूत्रे १८:१०.
६. मद्यपी: थोडेसे द्राक्षारस, बियर अथवा इतर कोणतेही मद्यार्कयुक्त पेय पिणे चुकीचे नाही. (स्तोत्र १०४:१५; १ तीमथ्य ५:२३) पण पिऊन तरर् होणे व दारूबाजी देवाच्या नजरेत चुकीची आहे. (१ करिंथकर ५:११-१३; १ तीमथ्य ३:८) अतिमद्यप्राशनामुळे तुमच्या आरोग्याचा नाश होऊ शकतो व तुमच्या कुटुंबामध्ये अशांती येऊ शकते. शिवाय ते तुम्हाला इतर मोहांना सहजपणे बळी पाडू शकते.—नीतिसूत्रे २३:२०, २१, २९-३५.
७. देव ज्या गोष्टींना वाईट लेखतो अशा गोष्टी आचरणाऱ्यांना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (गलतीकर ५:१९-२१) तुम्ही खरोखरच देवावर प्रेम करत असाल व त्याला संतुष्ट करू पाहता, तर तुम्ही या सवयींपासून मुक्त होऊ शकता. (१ योहान ५:३) देव ज्यांना वाईट असे समजतो त्या गोष्टींचा वीट मानण्यास शिका. (रोमकर १२:९) ईश्वरी सवयी असलेल्यांबरोबर संगत ठेवा. (नीतिसूत्रे १३:२०) प्रौढ ख्रिस्ती सोबती मदतीचा स्रोत ठरू शकतील. (याकोब ५:१४) या सर्वाहून अधिक, प्रार्थनेद्वारे देवाच्या मदतीवर अवलंबून राहा.—फिलिप्पैकर ४:६, ७, १३.
[२०, २१ पानांवरील चित्रं]
मद्यपी, चोरी, जुगार आणि हिंसक कृत्यांचा देवाला वीट आहे