यहोवाचे साक्षीदार कशा प्रकारे संघटित आहेत
पाठ १४
यहोवाचे साक्षीदार कशा प्रकारे संघटित आहेत
यहोवाच्या साक्षीदारांची आधुनिक दिवसांत सुरवात केव्हा झाली? (१)
यहोवाच्या साक्षीदारांच्या सभा कशा चालविल्या जातात? (२)
खर्च कसा भागवला जातो? (३)
प्रत्येक मंडळीत कोण पुढाकार घेतात? (४)
प्रत्येक वर्षी कोणते मोठे मेळावे भरवले जातात? (५)
त्यांच्या मुख्यालयांमध्ये आणि शाखा दफ्तरांमध्ये कोणते काम केले जाते? (६)
१. यहोवाच्या साक्षीदारांची आधुनिक दिवसांतील सुरवात १८७० च्या दशकात झाली. सुरवातीला त्यांना बायबल विद्यार्थी असे संबोधले जात होते. परंतु सन १९३१ मध्ये त्यांनी यहोवाचे साक्षीदार हे शास्त्रवचनीय नाव अंगीकारले. (यशया ४३:१०) ही संघटना, लहानशा सुरवातींपासून २३० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये प्रचारकार्यात व्यग्र असलेल्या लाखो साक्षीदारांनी वाढली आहे.
२. यहोवाच्या साक्षीदारांच्या अनेक मंडळ्यांमध्ये प्रत्येक आठवडी तीन वेळा सभा भरतात. यांपैकी कोणत्याही सभेला येण्याचे तुम्हाला आमंत्रण आहे. (इब्री लोकांस १०:२४, २५) तेथे शिकवले जाणारे सर्व काही बायबलच्या आधारावर असते. सभांची सुरवात आणि समाप्ती प्रार्थनेने होते. बहुतेक सभांमध्ये अंतःकरणपूर्वक ‘आध्यात्मिक गीते’ देखील गायली जातात. (इफिसकर ५:१८, १९) प्रवेश विनामूल्य आहे व कोणत्याही वर्गण्या घेतल्या जात नाहीत.—मत्तय १०:८.
३. बहुतेक मंडळ्या, राज्य सभागृहात सभा चालवितात. ती गृहे साधीच असून बहुधा स्वयंसेवक साक्षीदारांनीच बांधलेली असतात. राज्य सभागृहात तुम्हाला कोणत्याही मूर्ती, क्रुसावरील ख्रिस्ताच्या मूर्ती किंवा त्यासारख्या इतर वस्तू दिसणार नाहीत. स्वेच्छेने दिलेल्या वर्गण्यांद्वारे खर्च भागवला जातो. वर्गणी देऊ इच्छिणाऱ्यांसाठी दान पेटी असते.—२ करिंथकर ९:७.
४. प्रत्येक मंडळीत वडील किंवा पर्यवेक्षक असतात. मंडळीला शिकवण्यात ते पुढाकार घेतात. (१ तीमथ्य ३:१-७; ५:१७) सेवा-सेवक त्यांना साहाय्य करतात. (१ तीमथ्य ३:८-१०, १२, १३) या पुरुषांना मंडळीतील इतरांपेक्षा मोठा हुद्दा दिला जात नाही. (२ करिंथकर १:२४) त्यांना विशेष पदव्या दिल्या जात नाहीत. (मत्तय २३:८-१०) ते इतरांपासून वेगळा पेहराव करत नाहीत. किंवा त्यांना त्यांच्या कार्यासाठी पगारही दिला जात नाही. वडीलजन स्वेच्छेने मंडळीच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेतात. ते संकटाच्या काळी सांत्वन आणि मार्गदर्शन देऊ शकतात.—याकोब ५:१४-१६; १ पेत्र ५:२, ३.
५. यहोवाचे साक्षीदार दर वर्षी मोठमोठी संमेलने किंवा अधिवेशनेही भरवतात. यावेळी, अनेक मंडळ्या बायबल सूचनांच्या खास कार्यक्रमासाठी एकत्र येतात. नव्या शिष्यांचा बाप्तिस्मा हा प्रत्येक संमेलन किंवा अधिवेशन कार्यक्रमाचा एक नियमित भाग आहे.—मत्तय ३:१३-१७; २८:१९, २०.
६. यहोवाच्या साक्षीदारांचे जागतिक मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. तेथे, जगव्याप्त मंडळीची देखरेख करणाऱ्या अनुभवी वडिलांचा केंद्रिय गट म्हणजेच नियमन मंडळ आहे. तसेच संपूर्ण जगभरात १०० पेक्षा अधिक शाखा दफ्तरे आहेत. येथे, बायबल साहित्य छापण्यास व त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचे काम करण्यासाठी स्वयंसेवक मदत करतात. प्रचार कार्याचे संघटन करण्यासाठी देखील मार्गदर्शन दिले जाते. तुमच्या जवळच्या शाखा दफ्तराला भेट देण्याची योजना का करू नये?