भाग २४
पौल मंडळ्यांना पत्रे लिहितो
पौलाच्या पत्रांमुळे पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळ्या बळकट होतात
नुकतीच स्थापन झालेली ख्रिस्ती मंडळी यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत एक महत्त्वाची भूमिका बजावणार होती. पण, लवकरच पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना छळाला तोंड द्यावे लागले. मंडळीबाहेरील लोकांकडून तर त्यांचा विरोध व छळ होतच होता, पण मंडळीच्या आतही सहजासहजी दिसून येणार नाहीत असे घातक प्रभाव होते. अशा परिस्थितीतही ते देवाला एकनिष्ठ राहणार होते का? विश्वासात टिकून राहण्यास त्या काळातील ख्रिश्चनांना आवश्यक असणारा सल्ला व उत्तेजन देणारी २१ पत्रे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत वाचायला मिळतात.
यांपैकी रोमकरांस ते इब्री लोकांस ही चौदा पत्रे प्रेषित पौलाने लिहिली. ज्या व्यक्तीला किंवा मंडळीला उद्देशून ती लिहिण्यात आली त्यानुसार या पत्रांची नावे देण्यात आली आहेत. पौलाच्या पत्रांत त्याने ज्या निरनिराळ्या विषयांबद्दल लिहिले त्यांपैकी काही येथे विचारात घेऊ या.
उचित व अनुचित वर्तनाबद्दल सल्ला. व्यभिचार, जारकर्म आणि इतर गंभीर स्वरूपाचे पाप करणाऱ्यांना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (गलतीकर ५:१९-२१; १ करिंथकर ६:९-११) देवाच्या उपासकांनी, मग ते कोणत्याही राष्ट्राचे असले तरीही देवाची ऐक्याने उपासना केली पाहिजे. (रोमकर २:११; इफिसकर ४:१-६) गरजू सहउपासकांना मदत करण्यासाठी त्यांनी आनंदाने पुढे आले पाहिजे. (२ करिंथकर ९:७) पौल बांधवांना “निरंतर प्रार्थना करा” असे सांगतो. यहोवाच्या उपासकांनी प्रार्थनेत त्याच्याजवळ अगदी मनापासून आपल्या भावना व्यक्त कराव्यात असे प्रोत्साहन तो देतो. (१ थेस्सलनीकाकर ५:१७; २ थेस्सलनीकाकर ३:१; फिलिप्पैकर ४:६, ७) देवाने प्रार्थना ऐकाव्यात म्हणून त्या पूर्ण विश्वासाने केल्या पाहिजेत.—इब्री लोकांस ११:६.
कुटुंबे यशस्वी कशी होऊ शकतात? पतीने आपल्या पत्नीवर स्वतःच्या शरीराप्रमाणे प्रेम केले पाहिजे. पत्नीने पतीचा मनापासून आदर केला पाहिजे. मुलांनी आईवडिलांच्या आज्ञेत राहिले पाहिजे कारण यामुळे देवाला आनंद होतो. आईवडिलांनी आपल्या मुलांवर प्रेमळपणे, बायबलमधील तत्त्वांनुसार उत्तम संस्कार केले पाहिजेत.—इफिसकर ५:२२–६:४; कलस्सैकर ३:१८-२१.
देवाच्या उद्देशाचा खुलासा. मोशेच्या नियमशास्त्रातील बऱ्याच आज्ञा या ख्रिस्त येईपर्यंत इस्राएली लोकांचे संरक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी देण्यात आल्या होत्या. (गलतीकर ३:२४) पण, आज ख्रिश्चनांना देवाची उपासना करण्यासाठी त्या नियमशास्त्राचे पालन करण्याची गरज नाही. इब्री ख्रिश्चनांना अर्थात यहुदी पार्श्वभूमीच्या बांधवांना लिहिताना पौलाने नियमशास्त्राच्या अर्थाविषयी आणि देवाचा उद्देश कशा प्रकारे ख्रिस्तामध्ये पूर्ण होतो, याविषयी सविस्तर खुलासा केला. नियमशास्त्रातील निरनिराळ्या गोष्टींचा भविष्यासाठी काही ना काही अर्थ होता हे पौलाने स्पष्ट केले. उदाहरणार्थ, प्राण्यांची बलिदाने येशूच्या बलिदानाला सूचित करत होती ज्यामुळे पापांची खऱ्या अर्थाने क्षमा होणार होती. (इब्री लोकांस १०:१-४) येशूने आपले जीवन अर्पण केल्यावर देवाने नियमशास्त्राचा करार रद्द केला, कारण आता त्याची गरज उरली नव्हती.—कलस्सैकर २:१३-१७; इब्री लोकांस ८:१३.
मंडळीच्या सुव्यवस्थित कारभाराविषयी मार्गदर्शन. मंडळीत जबाबदाऱ्या हाताळण्यास इच्छुक असलेले पुरुष उच्च नैतिक तत्त्वांनुसार वागणारे असले पाहिजेत आणि त्यांनी बायबलमध्ये घालून देण्यात आलेल्या पात्रता पूर्ण केल्या पाहिजेत. (१ तीमथ्य ३:१-१०, १२, १३; तीत १:५-९) यहोवा देवाच्या उपासकांनी एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी नियमितपणे एकत्र आले पाहिजे. (इब्री लोकांस १०:२४, २५) उपासनेच्या सभा उभारणीकारक व बोधपर असल्या पाहिजेत.—१ करिंथकर १४:२६, ३१.
पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या दोन पत्रांपैकी दुसरे पत्र लिहिताना तो पुन्हा एकदा रोममध्ये कैदेत होता आणि न्यायालयाच्या निकालाची वाट पाहात होता. केवळ काही धाडसी लोकच आपला जीव धोक्यात घालून त्याला भेटायला गेले. आपल्याजवळ आता फार कमी वेळ उरला आहे हे पौलाला माहीत होते. त्याने म्हटले, “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे.” (२ तीमथ्य ४:७) कदाचित याच्या काही काळानंतरच प्रेषित पौलाला त्याच्या विश्वासाकरता जिवे मारण्यात आले असावे. पण त्याची पत्रे आजही देवाच्या खऱ्या उपासकांचे मार्गदर्शन करतात.
—रोमकर; १ करिंथकर; २ करिंथकर; गलतीकर; इफिसकर; फिलिप्पैकर; कलस्सैकर; १ थेस्सलीनाकाकर; २ थेस्सलीनाकाकर; १ तीमथ्य; २ तीमथ्य; तीत; फिलेमोन; इब्री लोकांस या पुस्तकांवर आधारित.