कथा १५
लोटाच्या बायकोनं मागं पाहिलं
लोट आणि त्याचा परिवार, अब्राहामाबरोबर कनान देशात राहिला. एका दिवशी अब्राहाम लोटाला म्हणाला: ‘आपल्या सर्व गुरांसाठी इथे पुरेशी जागा नाही. तेव्हा, कृपया, आपण वेगळे होऊ या. तू एका दिशेला गेलास, तर मी दुसऱ्या दिशेला जाईन.’
लोटानं चौफेर नजर टाकली. पाणी आणि त्याच्या गुरांसाठी मुबलक व चांगला चारा असलेला, त्या प्रदेशाचा एक फारच सुंदर भाग त्यानं पाहिला. ते यार्देनचं खोरं होतं. म्हणून लोटानं आपलं कुटुंब आणि गुरं तिकडे नेली. अखेरीस सदोम शहरात त्यांनी घर केलं.
सदोमाचे रहिवासी अत्यंत वाईट होते. त्यामुळे लोट अस्वस्थ होता, कारण तो एक चांगला माणूस होता. देवालाही चिंता वाटत होती. शेवटी, त्यांच्या वाईटपणामुळे, सदोम आणि त्याच्या शेजारच्या गमोरा या शहरांचा आपण नाश करणार असल्याचा इशारा लोटाला देण्यासाठी, देवानं दोन देवदूतांना पाठवलं.
त्या देवदूतांनी लोटाला सांगितलं: ‘घाई कर! तुझ्या बायकोला आणि दोन्ही मुलींना घेऊन इथून निघून जा!’ लोट आणि त्याचं कुटुंब जाण्यात रेंगाळलं, म्हणून देवदूतांनी हात धरून त्यांना शहराबाहेर नेलं. तेव्हा एक देवदूत म्हणाला: ‘आपला जीव वाचवण्यासाठी पळा! मागे पाहू नका. डोंगराकडे पळा, म्हणजे तुम्ही मरणार नाही.’
लोट आणि त्याच्या मुलींनी आज्ञा मानली, आणि ते सदोमापासून पळाले. ते क्षणभरही थांबले नाहीत, की त्यांनी वळून पाहिलं नाही. पण लोटाच्या बायकोनं अवज्ञा केली. सदोमापासून काही अंतर गेल्यावर, तिनं थांबून मागे पाहिलं. तेव्हा लोटाची बायको मिठाचा खांब झाली. चित्रात तुम्हाला ती दिसते का?
यापासून एक चांगला धडा शिकता येतो. आपल्याला दिसून येतं की, देवाची आज्ञा पाळणाऱ्यांना तो वाचवतो. पण त्याची आज्ञा न पाळणारे आपल्या जिवाला मुकतील.