कथा ३९
अहरोनाची काठी फुलांनी बहरते
या काठीला किंवा छडीला आलेली फुलं नि पिकलेले बदाम पाहा. ही अहरोनाची काठी आहे. तिच्यावर ही फुलं आणि हे पिकलेले बदाम एका रात्रीत आले! का, ते पाहू या.
काही काळापासून इस्राएल जंगलात भटकत आहेत. मोशे पुढारी असावा वा अहरोन महायाजक असावा हे काहींना पटत नाही. असं वाटणाऱ्यांच्यातला एक आहे कोरह. तसंच दाथान नि अबीराम आणि लोकांचे २५० सरदारही आहेत. ते सर्व येऊन मोशेला म्हणतात: ‘तू आम्हा सर्वांवर अधिकार का गाजवतोस?’
कोरह आणि त्याच्या साथीदारांना मोशे सांगतो: ‘उद्या सकाळी धुपाटणी घेऊन त्यांत धूप घाला. मग यहोवाच्या मंडपाकडे या. यहोवा कोणाची निवड करतो ते आपण पाहू.’
दुसऱ्या दिवशी, कोरह आणि त्याचे २५० साथीदार निवासमंडपाकडे येतात. त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतरही अनेक येतात. यहोवाला अतिशय संताप आलेला आहे. मोशे म्हणतो: ‘या दुष्ट लोकांच्या तंबूंपासून दूर व्हा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करु नका.’ ते ऐकून, लोक कोरह, दाथान आणि अबीराम यांच्यापासून दूर होतात.
मग मोशे म्हणतो: ‘जमीन उघडून या दुष्ट लोकांना गिळून टाकील. यावरुन, यहोवानं कोणाला निवडलं आहे, ते तुम्हाला कळेल.’
मोशेचं बोलणं संपल्यावर लागलीच जमीन दुभंगते. कोरहचा डेरा नि मालमत्ता, दाथान, अबीराम आणि त्यांच्या बरोबरचे लोक त्यात पडतात; व त्यांच्यावर जमीन मिटते. दुभंगलेल्या जमिनीत पडणाऱ्यांच्या किंकाळ्या लोकांच्या कानावर पडतात तेव्हा ते ओरडतात: ‘पळा! जमीन आपल्यालाही गिळील!’
कोरह आणि त्याचे २५० साथीदार अजून निवासमंडपाजवळच आहेत. तेव्हा, यहोवा आग पाठवतो; व ते सर्व जळून भस्म होतात. मग, मरण पावलेल्या लोकांची धुपाटणी घेऊन, त्यांच्यापासून वेदीवर एक पातळ आवरण करायला, यहोवा, अहरोनाचा मुलगा एलाजार याला सांगतो. अहरोन आणि त्याच्या मुलांखेरीज इतर कोणीही यहोवासाठी याजक म्हणून काम करू नये, असा इशारा इस्राएलांना देण्यासाठी वेदीचं ते आवरण आहे.
परंतु याजक होण्यासाठी अहरोन आणि त्याच्या मुलांना त्यानं निवडलं असल्याचं अगदी स्पष्ट करण्याची यहोवाची इच्छा आहे. म्हणून तो मोशेला सांगतो: ‘इस्राएलांच्या प्रत्येक गोत्राच्या एका सरदाराकडून एक काठी आणव. लेवीच्या गोत्रासाठी अहरोनाकडून त्याची काठी आणव. मग त्या सर्व काठ्या मंडपात कराराच्या कोशापुढे ठेव. याजक म्हणून मी ज्या माणसाची निवड केली आहे, त्याच्या काठीला फुलं येतील.’
दुसऱ्या दिवशी मोशे पाहतो तो काय! अहरोनाच्या काठीला ही फुलं आणि पिकलेले बदाम आलेले आहेत! तेव्हा, यहोवानं अहरोनाच्या काठीला फुलं का आणली ते तुम्हाला समजलं का?