कथा १००
बागेत येशू
माडीवरची खोली सोडल्यावर, येशू आणि त्याचे प्रेषित गेथशेमाने बागेकडे जातात. ते यापूर्वी इथे खूप वेळा आले आहेत. आता येशू त्यांना जागं राहायला व प्रार्थना करायला सांगतो. मग जरा दूर जाऊन, प्रार्थना करायला तो जमिनीवर पालथा पडतो.
थोड्या वेळानं येशू, त्याचे प्रेषित असतात तिथे येतो. ते काय करताहेत असं तुम्हाला वाटतं? ते झोपले आहेत! त्यांनी जागं राहावं, असं येशू त्यांना तीनदा सांगतो. पण दर वेळी, तो परत येतो तेव्हा, त्याला ते झोपलेले आढळतात. शेवटल्या वेळी येशू म्हणतो: ‘या अशा वेळी तुम्हाला झोप येते कशी? मला माझ्या वैऱ्यांच्या हाती देण्याची वेळ आली आहे.’
त्याच क्षणी, मोठ्या जमावाचा आवाज ऐकू येतो. पाहा! लोक तरवारी आणि सोटे घेऊन येताहेत! उजेडासाठी त्यांनी मशाली घेतल्या आहेत. ते जवळ आल्यावर, गर्दीतून कोणी तरी येशूच्या अगदी जवळ येतो. इथे तुम्हाला दिसतं, तसा तो त्याचा मुका घेतो. तो इसम आहे, यहूदा इस्कर्योत! तो येशूचा मुका का घेतो?
येशू विचारतो: ‘यहूदा, मुका घेऊन तू माझा विश्वासघात करतोस का?’ होय, तो मुका ही एक खूण आहे. यहूदाच्या सोबत असलेल्या माणसांना त्यावरून कळतं की, हाच त्यांना हवा असलेला माणूस, येशू, आहे. म्हणून, येशूचे शत्रू त्याला धरायला पुढे सरसावतात. पण पेत्र इतक्या सुखासुखी त्यांना येशूला पकडू देणार नाही. तो, बरोबर आणलेली तरवार उपसतो, आणि जवळच्या माणसावर वार करतो. त्या माणसाचं डोकं थोडक्यात वाचतं, आणि त्याचा कान छाटला जातो. पण येशू त्या माणसाच्या कानाला हात लावून बरा करतो.
येशू पेत्राला सांगतो: ‘तुझी तरवार म्यानात घाल. मला वाचवण्याकरता, मी पित्याला हजारो देवदूत मागू शकतो, असं तुला वाटत नाही का?’ होय, तो मागू शकतो! पण येशू देवाला स्वर्गदूत पाठवायला सांगत नाही. कारण त्याच्या शत्रूंनी त्याला धरायची वेळ आली आहे, हे तो जाणतो. म्हणून तो स्वत:ला धरून नेऊ देतो. आता येशूचं काय होतं, ते पाहू या.