व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिशिष्ट

आपण सण पाळावेत का?

आपण सण पाळावेत का?

आज जगातील अनेक भागांत साजरे केल्या जाणाऱ्या लोकप्रिय धार्मिक आणि लौकिक सणांचा उगम बायबलमध्ये नाही. मग अशा सणांचा उगम कोठून आहे? एखाद्या पुस्तकालयात जाऊन, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणातील लोकप्रिय सणांविषयी संदर्भ पुस्तके काय म्हणतात ते तुम्ही पाहू शकता. काही उदाहरणांचा विचार करा.

ईस्टर. “ईस्टर सण साजरा केल्याचा कोणताच उल्लेख नव्या करारात नाही,” असे द एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका म्हणतो. ईस्टरची सुरुवात कशी झाली? त्याचा उगम खोट्या धर्मांतून आहे. येशूच्या पुनरुत्थानाचे स्मरण म्हणून हा सण साजरा केला जात असला तरी, ईस्टरशी निगडीत असलेल्या प्रथा ख्रिस्ती नाहीत.

नववर्ष. नववर्षाशी संबंधित असलेल्या तारखांत व रीतीरिवाजांमध्ये देशादेशांत फरक आहे. या सणाच्या उगमाविषयी, द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “रोमी शासक ज्युलियस सिझरने सा.यु.  ४६ मध्ये जानेवारी १ तारीख, नववर्ष दिन म्हणून स्थापित केली. रोमी लोकांनी फाटके, दरवाजे, प्रारंभ यांचा दैवत असलेल्या जॅनसला हा दिवस वाहिला होता. जानेवारी या महिन्याचे नाव जॅनस या नावावरूनच पडले. जॅनस दैवताला दोन चेहरे होते, एक चेहरा पुढे पाहत होता तर दुसरा चेहरा मागे.” तेव्हा, नव वर्षाच्या प्रथा खोट्या परंपरांवर आधारित आहेत.

व्हॅलेंटाईन्स डे. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “व्हॅलेंटाईन्स डे, व्हॅलेंटाईन असे नाव असलेल्या दोन ख्रिस्ती हुतात्म्यांच्या सणाच्या दिवशी येतो. पण या दिवसाशी संबंधित असलेल्या प्रथा . . . कदाचित प्रत्येक फेब्रुवारी १५ तारखेला येणारा लुपरकालिया या प्राचीन रोमी सणातून आल्या असाव्यात. हे सण, स्त्रिया व विवाह यांची रोमी देवी ज्युनो आणि निसर्गदेव पॅन यांच्या प्रीत्यर्थ पाळले जात.”

इतर सण. संपूर्ण जगभरातल्या सणांची चर्चा करणे शक्य नाही. परंतु, जे सण, मानवांच्या किंवा मानवी संघटनांच्या गौरवाप्रीत्यर्थ साजरे केले जातात ते यहोवाला मान्य नाहीत. (यिर्मया १७:​५-७; प्रेषितांची कृत्ये १०:​२५, २६) हेही लक्षात घ्या, की धार्मिक सणांच्या उगमावरून हे ठरवता येईल, की ते सण देवाला मान्य आहेत की नाहीत. (यशया ५२:११; प्रकटीकरण १८:४) या पुस्तकाच्या सोळाव्या अध्यायात उल्लेख केलेली बायबल तत्त्वे तुम्हाला, धार्मिक नसलेल्या सणांत भाग घेण्याबाबत देवाचा काय दृष्टिकोन आहे हे समजण्यास मदत करतील.