परिशिष्ट
खरे ख्रिस्ती उपासनेत क्रूसाचा उपयोग का करीत नाहीत
कोट्यवधी लोकांचे, क्रूसावर प्रेम आहे आणि ते त्याचा आदर करतात. क्रूस हे “ख्रिस्ती धर्माचे मुख्य प्रतीक आहे,” असे द एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका म्हणतो. तरीपण, खरे ख्रिस्ती उपासनेत क्रूसाचा उपयोग करीत नाहीत. का नाही?
एक प्रमुख कारण म्हणजे, येशू ख्रिस्ताचा मृत्यू क्रूसावर झाला नाही. “क्रूस” असे सहसा ज्याचे भाषांतर केले जाते तो ग्रीक शब्द आहे स्टाऊरोस. याचा मूळ अर्थ “एक सरळ स्तंभ किंवा खांब” असा होतो. द कंपॅनियन बायबल असे म्हणते: “[स्टाऊरोस] याचा केव्हाही, कोणत्याही कोनात उभ्या खांबावर मारलेले आडवे लाकूड असा अर्थ होत नाही. त्याचा अर्थ दोन नव्हे तर एकच खांब असा होतो. . . . [नव्या कराराच्या] ग्रीक भाषेत लाकडाच्या दोन तुकड्यांना सूचित करणारा कोणताही उल्लेख नाही.”
प्रेषितांची कृत्ये ५:३०; १०:३९; १३:२९; गलतीकर ३:१३; १ पेत्र २:२४) या शब्दाचा अर्थ, “लाकूड” किंवा “काठी, दांडका, किंवा झाड” असा होतो.
अनेक वचनांत, बायबल लेखकांनी, येशूला ज्यावर मारण्यात आले त्याच्यासाठी एक वेगळा शब्द वापरला आहे. तो शब्द आहे झायलोन. (मृत्यूदंड देण्यासाठी एक साधासा खांब का वापरला जाई, याचे स्पष्टीकरण देताना, हर्मन फुल्दा यांनी लिहिलेल्या द क्रॉस अॅण्ड द क्रूसीफिक्शन या पुस्तकात असे म्हटले: “सार्वजनिक मृत्यूदंड देण्याकरता निवडलेल्या सर्वच ठिकाणी झाडे नसत. त्यामुळे एक साधासा खांब जमिनीत रोवला जात असे. या खांबावर गुन्हेगाराचे हात वर करून बांधले जात किंवा त्यांवर खिळे ठोकले जात आणि खाली पाय बांधून त्यांनाही एकतर बांधले जात किंवा त्यांवर खिळे ठोकले जात असे.”
परंतु सर्वात खात्रीदायक पुरावा, देवाच्या वचनात मिळतो. प्रेषित पौलाने म्हटले: “आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरुन सोडविले; जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे.” (गलतीकर ३:१३) येथे पौल अनुवाद २१:२२, २३ चा संदर्भ देतो जेथे स्पष्टपणे झाड हा शब्द वापरला आहे, क्रूस नव्हे. अशाप्रकारच्या मृत्यूदंडामुळे एक व्यक्ती “शापित” होत असल्यामुळे, ख्रिश्चनांनी ख्रिस्ताची खांबावर टांगलेली चित्रे लावून आपले घर सुशोभित करणे उचित ठरणार नाही.
ख्रिस्ताचा मृत्यू झाल्यावर सुरुवातीच्या ३०० वर्षांदरम्यान, ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्यांनी उपासनेत क्रूसाचा उपयोग केल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. परंतु, चवथ्या शतकात, सम्राट कॉन्स्टंटाईन ख्रिस्ती, धर्मत्यागी बनला आणि त्याने क्रूसाला या धर्माचे प्रतीक बनवले. कॉन्स्टंटाईनचा काहीही उद्देश असो; क्रूसाचा मात्र येशू ख्रिस्ताशी कसलाही संबंध नव्हता. खरे पाहता, क्रूसाचा उगम मूर्तिपूजक धर्मातून आहे. द न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ कबूल करतो: “क्रूसाचा उपयोग, ख्रिस्तपूर्व आणि गैरख्रिस्ती संस्कृतींमध्ये केलेला आढळतो.” इतर अनेक लेखकांनी, क्रूसाचा संबंध निसर्ग उपासना आणि मूर्तिपूजक लैंगिक प्रथा यांजशी लावला.
मग या मूर्तिपूजक प्रतीकाला इतकी मान्यता का देण्यात आली? मूर्तिपूजक लोकांना “ख्रिस्ती धर्म” स्वीकारण्यास सोपे जावे म्हणून या प्रतिकाला मान्यता देण्यात आली. पण, कोणत्याही मूर्तिपूजक प्रतीकाची उपासना करण्याला बायबल स्पष्ट शब्दांत निषेध करते. (२ करिंथकर ६:१४-१८) शास्त्रवचने, सर्व प्रकारच्या मूर्तिपूजेस मनाई करतात. (निर्गम २०:४, ५; १ करिंथकर १०:१४) यास्तव, उपासनेत क्रूसाचा उपयोग न करण्यासाठी खऱ्या ख्रिश्चनांकडे उचित कारण आहे. *
^ परि. 5 क्रूसाविषयी आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले रीझनिंग फ्रॉम द स्क्रिप्चर्स या पुस्तकाची पृष्ठे ८९-९३ पाहा.