व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिशिष्ट

बायबलमध्ये वापरण्यात आलेला “प्राण” किंवा “आत्मा” या शब्दांचा काय अर्थ होतो?

बायबलमध्ये वापरण्यात आलेला “प्राण” किंवा “आत्मा” या शब्दांचा काय अर्थ होतो?

बहुतेक भारतीय भाषांत, मानवांच्या व प्राण्यांच्या शरीराचा मृत्यू झाल्यानंतर, अदृश्य असे काहीतरी जिवंत राहते व ते अमर असते, असा अर्थ देणारे शब्द आहेत. त्यामुळे, लोक सर्रास अमर आत्म्याविषयी बोलतात आणि त्याचा संबंध ते, मनुष्याच्या शरीरातील काहीतरी निघून दुसऱ्या शरीरात जाऊन पुनर्जन्म घेते, या कल्पनेशी जोडतात. असे आणखीही शब्द आहेत ज्यांच्याविषयी गोंधळ होऊ शकतो, जसे की “जीव,” “प्राण,” किंवा “प्राणी.”

अनेक बायबल भाषांतरकारांनी भारतीय भाषांत शास्त्रवचनांचे भाषांतर करताना हे शब्द वापरल्यामुळे गोंधळ झाला आहे. म्हणूनच, काही लोक असे गृहीत धरतात, की बायबलसुद्धा मृत्यूनंतर शरीरातून काहीतरी जिवंत राहते अशी शिकवण देते. पण, मूळ बायबल भाषांत वापरलेल्या शब्दांचे जवळून परीक्षण केल्याने आपल्याला, बायबल नेमके काय शिकवते हे पाहायला मदत होईल.

बायबलमध्ये “जीव,” “प्राण,” “प्राणी” या अर्थाने वापरण्यात आलेले शब्द

बायबल हे प्रामुख्याने हिब्रू व ग्रीक भाषांत लिहिले होते, हे तुम्हाला आठवत असेल. जीवाविषयी लिहिताना बायबल लेखकांनी निफेश हा हिब्रू शब्द किंवा प्सीखे हा ग्रीक शब्द वापरला. हे दोन्ही शब्द शास्त्रवचनांत ८०० पेक्षा अधिक वेळा आढळतात आणि मराठीत यांचे भाषांतर सहसा “प्राण,” “प्राणी” किंवा “जीव” असे करण्यात आले आहे. “प्राण,” “प्राणी” किंवा “जीव” या शब्दांचा बायबलमध्ये ज्याप्रकारे उपयोग करण्यात आला आहे त्याचे परीक्षण केल्यावर तुम्हाला स्पष्ट दिसून येईल, की हे शब्द मुळात (१) लोकांना, (२) पशूपक्ष्यांना किंवा (३) एखाद्या व्यक्तीच्या किंवा पशूपक्ष्यांच्या जीवनाला सूचित करतात. आता आपण, हे तीन वेगवेगळे अर्थ देणाऱ्या काही शास्त्रवचनांवर विचार करू या.

लोक. “नोहाच्या दिवसांत . . . आठ जीव पाण्यातून वाचवले गेले.” (१ पेत्र ३:​२०, पं.र.भा.) येथे वापरण्यात आलेला “जीव” हा शब्द, स्पष्टतः लोकांसाठी अर्थात नोहा, त्याची पत्नी, त्याचे तीन पुत्र आणि त्यांच्या बायका यांच्या संदर्भात वापरण्यात आला आहे. आणखी एक उदाहरण प्रारंभ ४६:१८ (पं.र.भा.) मध्ये आहे. या वचनात याकोबाला झालेल्या मुलांविषयी सांगितले आहे. ते म्हणते: “हे जिल्पेचे मुलगे; ती लाबानाने आपली कन्या लेआ हिला दिली होती. आणि हे सोळा जीव याकोबाला तिच्या पोटी झाले.” “जीव,” “प्राण” किंवा “प्राणी” हे शब्द एखाद्या व्यक्तीला किंवा लोकांना सूचित करतात हे दर्शवणारी बायबलमधील इतर उदाहरणे यहोशवा ११:​११, प्रेषितांची कृत्ये २७:३७ (पं.र.भा.) या वचनांत पाहायला मिळतील.

पशूपक्षी. बायबलमधील निर्मितीविषयीच्या अहवालात आपण असे वाचतो: “आणि देव बोलला, ‘जले जिवंत प्राण्यांच्या थव्यांनी भरली जावोत, आणि पृथ्वीवर आकाशाच्या उघड्या अंतराळात पक्षी उडोत.’ आणि देव बोलला, ‘जिवंत प्राणी त्यांच्या त्यांच्या जातीप्रमाणे, गुरेढोरे आणि सरपटणारे जीव आणि पृथ्वीवरील जनावरे ही त्यांच्या त्यांच्या जातीप्रमाणे पृथ्वी उपजवो;’ आणि तसे झाले.” (उत्पत्ति १:​२०, २४, पं.र.भा.) या उताऱ्यात, मासे, पक्षी, गुरेढोरे आणि जंगली जनावरे या सगळ्यांना, “प्राणी” या शब्दाने सूचित केले आहे. उत्पत्ति ९:​१०, लेवीय ११:​४६ येथेही पशूंना प्राणी म्हटले आहे आणि गणना ३१:​२८, (पं.र.भा.) मध्ये जीव म्हटले आहे.

एखाद्या व्यक्तीचे जीवन. कधीकधी, “प्राण” किंवा “जीव” या शब्दांचा अर्थ एखाद्या व्यक्तीचे जीवन असाही होतो. यहोवाने मोशेला सांगितले: “तुझा जीव घेऊ पाहणारे सगळे मृत्यु पावले आहेत.” (निर्गम ४:१९) मोशेचे शत्रू काय घेऊ पाहत होते? ते मोशेचा जीव अथवा त्याचे जीवन घेऊ पाहत होते. राहेल तिचा पुत्र बन्यामीन याला जन्म देत असताना ‘तिचा जीव जात होता (कारण ती मेली).’ (प्रारंभ ३५:१६-१९, पं.र.भा.) त्याक्षणी राहेलचे जीवन संपुष्टात आले. येशूच्या शब्दांचाही विचार करा: “मीच उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो.” (योहान १०:११) येशूने मानवजातीसाठी आपला प्राण अथवा जीवन दिले. या बायबल उताऱ्यांत “प्राण” किंवा “जीव” हे शब्द स्पष्टपणे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला सूचित करतात. अशा अर्थाची अनेक उदाहरणे तुम्हाला १ राजे १७:​१७-२३, मत्तय १०:​३९, योहान १५:१३ आणि प्रेषितांची कृत्ये २०:​१० [पं.र.भा.] यांत पाहायला मिळतील.

देवाच्या वचनाचा आणखी अभ्यास केल्यावर तुम्हाला दिसून येईल, की संपूर्ण बायबलमध्ये कोठेच, “अमर” किंवा “सार्वकालिक” या शब्दांचा “प्राण,” “प्राणी” किंवा “जीव” या शब्दांशी संबंध जोडलेला नाही. उलट, शास्त्रवचने म्हणतात की प्राणी किंवा जीव मर्त्य आहे म्हणजे तो मरतो.​—यहेज्केल १८:​४, २०, पं.र.भा.

“आत्मा” याची ओळख

आता आपण, बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या “आत्मा” या शब्दाचा विचार करू या. काही लोक असे समजतात, की “आत्मा” म्हणजेच “प्राण.” परंतु ते तसे नाही. बायबल स्पष्टपणे सांगते, की “आत्मा” आणि “प्राण” किंवा “जीव” या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या कशा?

बायबल लेखकांनी हिब्रू शब्द रुआख किंवा ग्रीक शब्द न्यूमा या शब्दांचा उपयोग केला आणि मराठीत यांचे भाषांतर “आत्मा” किंवा “श्वास” असे करण्यात आले आहे. शास्त्रवचनेच या शब्दांचा अर्थ सांगतात. जसे की, स्तोत्र १०४:२९ म्हणते: “तू [यहोवा] त्यांचा श्वास [रूआख] काढून घेतोस तेव्हा ते मरतात व मातीस मिळतात.” आणि याकोब २:२६ म्हणते, की “शरीर आत्म्यावाचून [न्यूमावाचून] निर्जीव आहे.” तेव्हा या वचनांत, “आत्मा” किंवा “श्वास,” शरीराला ज्यामुळे जीवन मिळते त्याला सूचित करतो. आत्म्यावाचून शरीर मृत असते. यास्तव, बायबलमध्ये रूआख या शब्दाचे भाषांतर फक्त “आत्मा” असेच करण्यात आलेले नाही तर “जीवनाचा श्वास” म्हणूनही करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, नोहाच्या दिवसांतील जलप्रलयाविषयी प्रारंभ ६:१७ [पं.र.भा.] म्हणते: “मी, पाहा, मीच, ज्या सर्व देहांत जीवनाचा श्वास [रूआख] आहे त्यांना आकाशाखालून नष्ट करायला पृथ्वीवर जलांचा पूर आणतो.” (प्रारंभ ७:​१५, २२, पं.र.भा.] यास्तव, “आत्मा” एका अदृश्य शक्तीला (जीवनाच्या ठिणगीला) सूचित करतो ज्यामुळे सर्व जीवधारी प्राणी सचेतन होतात.

प्राण आणि आत्मा हे दोन्ही सारखे नाहीत. यांच्यात काय फरक आहे? सोप्या शब्दांत सांगायचे तर, एका रेडिओला जशी विघुत शक्तीची गरज असते तशीच शरीराला आत्म्याची गरज आहे. याच्या आणखी स्पष्टीकरणासाठी एका पोर्टेबल रेडिआचे उदाहरण घ्या. एका पोर्टेबल रेडिओत बॅटरी घालून तुम्ही तो चालू करता तेव्हा बॅटरीत साठलेल्या विघुत शक्तीमुळे रेडिओ चालू होतो. बॅटरीशिवाय रेडिओ बंद पडतो. तसेच, आत्मा, आपल्या शरीराला जिवंत करणारी शक्ती आहे. विघुत शक्तीला भावना नसतात तसेच आत्म्याला देखील भावना नसतात, आत्मा विचार करू शकत नाही. ती एक व्यक्तिभावरहित शक्ती आहे. पण आत्म्याविना किंवा जीवनी-शक्तीविना आपली शरीरे स्तोत्रकर्त्याने म्हटल्याप्रमाणे “मरतात व मातीस मिळतात.”

मनुष्याच्या मृत्यूविषयी बोलताना उपदेशक १२:७ म्हणते: “तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जाईल.” आत्मा किंवा जीवनीशक्ती शरीरातून निघते तेव्हा शरीर मरते आणि ज्यापासून बनवले होते तेथे जाते अर्थात शरीराची माती होते. तसेच, जीवनीशक्ती जेथून आली होती तेथे म्हणजे देवाकडे परत जाते. (ईयोब ३४:​१४, १५; स्तोत्र ३६:९) याचा अर्थ जीवनीशक्ती खरोखरचा प्रवास करून स्वर्गात जाते, असे नाही. तर त्याचा अर्थ, एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा भवितव्यातील जीवनाची आशा यहोवा देवावर अवलंबून आहे असा होतो. मृत व्यक्तीचे जीवन जणू काय देवाच्या हातात आहे. फक्त देवाच्या शक्तीनेच, आत्मा किंवा जीवनीशक्ती पुन्हा मृत व्यक्तीला दिली जाऊ शकते ज्यामुळे ती व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकेल.

“स्मृती कबरेत” असलेल्यांसाठी देव हेच तर करणार आहे, हे जाणून किती सांत्वन मिळते! (योहान ५:​२८, २९, NW) पुनरुत्थानाच्या वेळी, मृतांसाठी यहोवा एक नवीन शरीर बनवेल आणि आत्मा किंवा जीवनीशक्ती घालून त्यांना पुन्हा जिवंत करेल. तो किती आनंदाचा दिवस असेल!

बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या “प्राण” व “आत्मा” या शब्दांविषयी तुम्हाला आणखी शिकून घ्यायचे असेल तर, मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी) हे माहितीपत्रक आणि रीझनिंग फ्रॉम द स्क्रिप्चर्स या पुस्तकाची पृष्ठे ३७५-८४ पाहा. ही दोन्ही प्रकाशने यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केली आहेत.