पाठ ८९
पेत्र येशूला नाकारतो
प्रेषितांसोबत माडीवरच्या खोलीत असताना, येशू त्यांना म्हणाला होता: ‘आज रात्री तुम्ही सर्व जण मला सोडून जाल.’ पेत्र म्हणाला: ‘नाही! सर्व जरी तुला सोडून गेले, तरी मी तुला कधीच सोडून जाणार नाही.’ पण येशू पेत्रला म्हणाला: ‘कोंबडा ओरडण्याच्या आधी, तू तीन वेळा मला ओळखत असल्याचं नाकारशील.’
सैनिक येशूला कयफाच्या घरी घेऊन गेले, त्याआधी बरेच प्रेषित पळून गेले होते. पण त्यांपैकी दोन प्रेषित लोकांच्या गर्दीत येशूच्या मागोमाग गेले. दोघांपैकी एक पेत्र होता. तो कयफाच्या घराच्या अंगणात गेला. तिथे तो शेकोटीचा शेक घेत होता. तेव्हा, एका दासीने उजेडात त्याचा चेहरा पाहिला आणि त्याला म्हटलं: ‘मी तुला ओळखते. तू येशूसोबत होतास!’
पेत्र म्हणाला: ‘नाही. तो मी नव्हतो. तू काय बोलत आहेस मला समजत नाही.’ मग तो बाहेरच्या दरवाजाजवळ गेला. पण लगेच आणखीन एका दासीने त्याच्याकडे पाहून लोकांना म्हटलं: ‘हा माणूस येशूसोबत होता!’ यावर पेत्र म्हणाला: ‘मी तर येशूला ओळखतही नाही!’ मग एक माणूस म्हणाला: ‘तू त्यांच्यापैकीच एक आहेस. मी तुझ्या बोलण्यावरून सांगू शकतो, की तू येशूसारखाच गालीलचा राहणारा आहेस.’ मग पेत्रने शपथ घेऊन म्हटलं: ‘मी त्याला अजिबात ओळखत नाही!’
त्याच वेळी कोंबडा ओरडला. येशू आपल्याकडे वळून पाहत आहे, हे पेत्रने पाहिलं. त्याला येशूच्या शब्दांची आठवण झाली. यामुळे तो बाहेर जाऊन खूप रडला.
त्यादरम्यान येशूची चौकशी करण्यासाठी कयफाच्या घरी न्यायसभेची, म्हणजेच यहुदी न्यायालयाची सभा भरवण्यात आली. येशूला मारून टाकण्याचं त्यांनी आधीच ठरवलं होतं आणि यासाठी ते कारण शोधत होते. पण त्याच्याविरुद्ध त्यांना काहीच पुरावा सापडत नव्हता. शेवटी, कयफाने येशूला असं विचारलं: ‘तू देवाचा मुलगा आहेस का?’ येशू म्हणाला: ‘हो. मी आहे.’ मग कयफा म्हणाला: ‘आता आणखीन कोणता पुरावा हवा आपल्याला. याने देवाची निंदा केली आहे.’ सर्वांनी येशूला मृत्युदंड देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी येशूच्या थोबाडीत मारलं आणि त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. ते त्याच्यावर थुंकले आणि त्याला बुक्क्या मारू लागले. मग त्यांनी त्याला असं विचारलं: ‘तू संदेष्टा आहेस ना? मग सांग तुला कोणी मारलं?’
सकाळ झाल्यावर ते येशूला न्यायसभेत घेऊन गेले आणि त्याला पुन्हा विचारलं: ‘तू देवाचा मुलगा आहेस का?’ येशूने उत्तर दिलं: ‘तुम्ही स्वतः तसं म्हणत आहात.’ मग, त्यांनी त्याच्यावर देवाची निंदा करण्याचा आरोप लावला. ते त्याला पंतय पिलात नावाच्या रोमन राज्यपालाकडे घेऊन गेले. त्यानंतर काय झालं? ते आपण पुढच्या धड्यात पाहू.
“अशी वेळ . . . आलीच आहे, जेव्हा तुम्हा सर्वांची पांगापांग होईल आणि तुम्ही आपापल्या घरी जाल आणि मला एकटं सोडाल. पण मी एकटा नाही, कारण पिता माझ्यासोबत आहे.”—योहान १६:३२