पाठ २१
दहावी पीडा
मोशेने फारोला वचन दिलं: ‘मी तुझ्याकडे परत येणार नाही.’ पण, जाताना त्याने फारोला म्हटलं: ‘आज मध्यरात्री, मिसरच्या लोकांच्या घरांतला पहिला मुलगा मरेल. फारोपासून त्याच्या दासांपर्यंत, सर्वांचा पहिला मुलगा मरेल.’
यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं, की त्यांनी एक खास जेवण करावं. तो त्यांना म्हणाला: ‘एक वर्षाचं मेंढरू किंवा बकरा कापा आणि त्याचं थोडं रक्त तुमच्या दरवाजाच्या चौकटीवर लावा. त्याचं मांस भाजा आणि ते खमीर नसलेल्या भाकरीसोबत खा. तुम्ही कपडे वगैरे घालून तयार राहा. पायात चपला घाला आणि जाण्याच्या तयारीत राहा. आज रात्री मी तुमची सुटका करणार आहे.’ हे ऐकल्यानंतर, इस्राएली लोक खरंच किती खूश झाले असतील ना!
मग, मध्यरात्री यहोवाचा देवदूत मिसरमधल्या सर्व घरांकडे गेला. ज्या घराच्या दरवाज्यावर रक्त लावलेलं नव्हतं, त्या घरातला सर्वात मोठा मुलगा मेला. पण, ज्या घरावर रक्ताची खूण लावलेली होती, ते घर देवदूताने ओलांडलं. इस्राएली लोकांचा एकही मुलगा मेला नाही. पण, मिसरच्या लोकांच्या प्रत्येक कुटुंबातला पहिला मुलगा मेला; मग ते कुटुंब श्रीमंत असो किंवा गरीब.
इतकंच काय, तर फारोचा मुलगाही मेला. फारो हे दुःख सहन करू शकला नाही. त्याने लगेच मोशेला आणि अहरोनला म्हटलं: ‘चला उठा. निघून जा इथून! जा आणि तुमच्या देवाची उपासना करा. तुमच्या प्राण्यांनाही घेऊन जा.’
पौर्णिमेच्या रात्री इस्राएली लोक मिसरमधून निघाले. सगळ्यांना अगदी व्यवस्थितपणे विभागलं
होतं. ते आपआपल्या कुळाप्रमाणे आपल्या कुटुंबासोबत एकत्र चालत होते. त्यांची संख्या खूप मोठी होती. ६,००,००० (सहा लाख) इस्राएली पुरुष होते आणि बऱ्याच स्त्रिया आणि मुलंही होती. तसंच, त्यांच्यासोबत इस्राएली नसलेले इतरही पुष्कळ लोक निघाले. कारण त्यांनाही यहोवाची उपासना करायची होती. अशा रीतीने, इस्राएली लोकांची शेवटी सुटका झाली!यहोवाने त्यांना कसं वाचवलं याची आठवण म्हणून, त्यांना दरवर्षी त्याच प्रकारचं खास जेवण करायचं होतं. त्याला वल्हांडणाचं जेवण असं म्हटलं जायचं. वल्हांडण म्हणजे ओलांडून जाणं.
“तुझ्या बाबतीत माझं सामर्थ्य दाखवून द्यावं आणि सबंध पृथ्वीवर माझं नाव घोषित करावं या उद्देशानेच मी तुला अजून जिवंत ठेवलं आहे.”—रोमकर ९:१७