पाठ २९
यहोवा यहोशवाला निवडतो
मोशेने बरीच वर्षं इस्राएली लोकांचं मार्गदर्शन केलं. जेव्हा त्याचा मृत्यू जवळ आला, तेव्हा यहोवाने त्याला सांगितलं: ‘तू इस्राएली लोकांना वचन दिलेल्या देशात घेऊन जाणार नाहीस. मी तुला तो देश पाहू देईन, पण तू तिथे जाणार नाहीस.’ मग मोशेने यहोवाला सांगितलं, की इस्राएली लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी त्याने एका दुसऱ्या व्यक्तीची निवड करावी. यहोवा मोशेला म्हणाला: ‘यहोशवाकडे जा आणि त्याला सांग की मी त्याला निवडलं आहे.’
मोशेने इस्राएली लोकांना सांगितलं, की तो लवकरच मरणार आहे. त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी यहोवाने यहोशवाला निवडलं आहे. आता तोच त्यांना वचन दिलेल्या देशात घेऊन जाईल. मोशेने यहोशवाला म्हटलं: ‘घाबरू नको! यहोवा तुला मदत करेल.’ त्यानंतर मोशे नबो डोंगरावर गेला. तिथून यहोवाने त्याला तो देश दाखवला, ज्याचं वचन त्याने अब्राहाम, इसहाक आणि याकोबला दिलं होतं. १२० वर्षांचा असताना मोशे मरून गेला.
यहोवाने यहोशवाला म्हटलं: ‘यार्देन नदी पार कर आणि कनान देशात जा. मी मोशेला जशी मदत केली तशीच तुलाही करेन. तू माझे नियम न चुकता दररोज वाचले पाहिजे. घाबरू नको. हिंमत धर. जा आणि मी जे काही करायला तुला सांगितलं आहे ते कर.’
यहोशवाने यरीहो शहरात दोन गुप्तहेर पाठवले. तिथे काय झालं याबद्दल जास्त माहिती आपल्याला पुढच्या धड्यात मिळेल. जेव्हा ते गुप्तहेर परत आले, तेव्हा ते म्हणाले की कनानमध्ये जाण्याची हीच योग्य वेळ आहे. दुसऱ्या दिवशी यहोशवाने लोकांना आपले तंबू काढून सामान बांधायला सांगितलं. मग जे याजक कराराचा कोश घेऊन जात होते, त्यांना त्याने सर्वांच्या आधी यार्देन नदीकडे पाठवलं. यार्देन नदीला पूर आला होता. पण, याजकांनी पाण्यात पाय ठेवताच नदीचं पाणी वाहायचं थांबलं आणि कोरडी जमीन दिसू लागली. याजक नदीच्या मधोमध गेले आणि सर्व इस्राएली लोकांनी नदी पार करेपर्यंत ते तिथेच थांबले. हा चमत्कार पाहिल्यानंतर, लाल समुद्रात यहोवाने जो चमत्कार केला होता त्याची त्यांना आठवण झाली असेल ना? तुला काय वाटतं?
शेवटी बऱ्याच वर्षांनंतर, इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात पोचले. आता ते घरं आणि शहरं बांधू शकणार होते. ते शेती करू शकणार होते. द्राक्षांचे मळे आणि फळांच्या बागा लावू शकणार होते. वचन दिलेल्या देशात खाण्या-पिण्याच्या खूपसाऱ्या चांगल्या गोष्टी होत्या. इतक्या, की त्या देशाला दूध व मध वाहणारा देश असं म्हटलं जायचं.
“यहोवा पदोपदी तुला वाट दाखवत नेईल व . . . तुझ्या जिवाला तृप्त करेल.”—यशया ५८:११, पं.र.भा.