पाठ ५०
यहोवा यहोशाफाटच्या बाजूने लढतो
यहोशाफाट हा यहूदाचा राजा होता. त्याने यहूदामधल्या बआल देवाच्या वेदींचा आणि मूर्तींचा नाश केला. त्याची इच्छा होती, की यहोवाच्या नियमांबद्दल लोकांना कळावं. यामुळे त्याने संपूर्ण यहूदा राज्यात, लोकांना यहोवाचे नियम शिकवण्यासाठी राजकुमारांना आणि लेवींना पाठवलं.
यहूदाच्या आजूबाजूच्या राष्ट्रांना माहीत होतं, की यहोवा यहुदी लोकांसोबत आहे. म्हणून ते यहूदाच्या लोकांवर हल्ला करायला घाबरायचे. एवढंच काय, तर ते यहोशाफाट राजाला भेटवस्तूही द्यायचे. पण मवाब, अम्मोन आणि सेईरचे लोक मात्र यहुदी लोकांशी लढायला आले. अशा वेळी यहोशाफाटला माहीत होतं, की त्याला यहोवाच्या मदतीची गरज आहे. म्हणून त्याने सगळ्या पुरुषांना, स्त्रियांना आणि मुलांना यरुशलेम शहरामध्ये जमा केलं आणि त्या सर्वांच्या समोर त्याने अशी प्रार्थना केली: ‘हे यहोवा, तुझ्या मदतीशिवाय आम्ही जिंकू शकत नाही. आम्ही काय केलं पाहिजे, ते आम्हाला कृपा करून सांग.’
मग यहोवाने यहोशाफाटच्या प्रार्थनेचं असं उत्तर दिलं: ‘तुम्ही घाबरू नका. मी तुम्हाला मदत करेन. स्थिर उभे रहा आणि मी तुम्हाला कसं वाचवतो ते पाहा.’ आपल्या लोकांना वाचवण्यासाठी यहोवाने काय केलं?
दुसऱ्या दिवशी सकाळी यहोशाफाटने गायकांना निवडून, त्यांना सैनिकांच्या पुढे चालायला सांगितलं. ते यरुशलेमपासून तकोवा इथे असलेल्या युद्धभूमीपर्यंत चालत गेले.
एकीकडे गायक आनंदाने मोठ्या आवाजात यहोवाची महिमा करत होते, तर दूसरीकडे यहोवा आपल्या लोकांच्या बाजूने लढत होता. त्याने अम्मोनी आणि मवाबी सैनिकांना गोंधळात टाकलं. इतकं की ते एकमेकांवरच हल्ला करू लागले! त्यांच्यापैकी एकही सैनिक जिवंत राहिला नाही. पण यहोवाने मात्र यहुदी सैनिकांचं, लोकांचं आणि याजकांचं रक्षण केलं. यहोवाने जे केलं ते आजूबाजूच्या राष्ट्रांच्या लोकांनाही कळलं. त्यामुळे यहोवा अजूनही त्याच्या लोकांच्या बाजूने आहे ही गोष्ट त्यांना समजली. या घटनेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच की यहोवा वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या लोकांना वाचवतो. आणि असं करण्यासाठी त्याला मानवांच्या मदतीची गरज नाही.
“या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही . . . स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करेल ते पाहा.”—२ इतिहास २०:१७