पाठ ३
बायबलचे सत्य पुन्हा उजेडात कसे आले?
बायबलमध्ये असे भाकीत करण्यात आले होते की ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर, पहिल्या शतकातील ख्रिश्चनांमध्ये खोटे शिक्षक उठतील आणि ते बायबल सत्यांमध्ये खोट्या शिकवणी मिसळतील. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) जसे सांगितले होते तसेच झाले. या खोट्या शिक्षकांनी येशूच्या शिकवणींमध्ये मूर्तिपूजक कल्पना जोडल्या आणि एक बनावटी ख्रिस्ती धर्म तयार झाला. (२ तीमथ्य ४:३, ४) पण मग, बायबल नेमके काय शिकवते यांबद्दलची आपली आजची समज योग्य आहे हे आपण खातरीने कसे सांगू शकतो?
सत्य उघडकीस आणण्याची यहोवाची वेळ आली. देवाने सांगितले होते की “अंतसमयात . . . ज्ञानवृद्धि होईल,” म्हणजेच सत्याचे ज्ञान वाढेल. (दानीएल १२:४) १८७० साली सत्याचा शोध घेणाऱ्या एका छोट्या गटाला समजले की चर्चमधील शिकवणी बायबलवर आधारित नाहीत. त्यामुळे मग ते बायबलच्या मूळ शिकवणींचा शोध घेऊ लागले, आणि यहोवाने त्यांच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देऊन त्यांना आध्यात्मिक ज्ञान दिले.
खऱ्या मनाच्या लोकांनी बायबलचे जवळून परीक्षण केले. त्या बायबल विद्यार्थ्यांनी एका विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला आणि आपण आजही हीच पद्धत वापरतो. त्यांनी बायबलचा विषयवार अभ्यास केला. अभ्यास करताना एखादा उतारा त्यांना कठीण वाटायचा तेव्हा ते इतर बायबल वचनांच्या आधारे तो उतारा समजण्याचा प्रयत्न करायचे. आणि जेव्हा ते इतर शास्त्रवचनांशी सुसंगत असलेल्या निष्कर्षावर पोचायचे तेव्हा ते त्याची नोंद करून ठेवायचे. या प्रकारे बायबलचा अभ्यास केल्यामुळे, त्यांना देवाचे नाव व त्याचे राज्य, पृथ्वी व मानवजातीसाठी त्याचा उद्देश, मृत लोकांची अवस्था आणि पुनरुत्थानाची आशा यांबद्दलचे सत्य पुन्हा समजले. या सत्यांमुळे त्यांची बऱ्याच खोट्या शिकवणींपासून व प्रथांपासून सुटका झाली.—योहान ८:३१, ३२.
१८७९ साली या बायबल विद्यार्थ्यांना वाटले की बायबलमधील सत्य सर्वांपुढे आणण्याची हीच ती वेळ आहे. म्हणून त्या वर्षी त्यांनी इंग्रजीतील टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याची घोषणा करते, या नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले जे आम्ही आजही करत आहोत. आज आम्ही २४० देशांत आणि सुमारे ७५० भाषांमध्ये बायबलचे सत्य प्रकाशित करत आहोत. यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात खरे ज्ञान कधीच उपलब्ध नव्हते!
-
ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर बायबलमधील सत्याच्या बाबतीत काय झाले?
-
बायबलचे सत्य पुन्हा उजेडात आणणे कशामुळे शक्य झाले?