व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संक्रमणाला उत्तम प्रतीचा पर्याय

संक्रमणाला उत्तम प्रतीचा पर्याय

संक्रमणाला उत्तम प्रतीचा पर्याय

‘संक्रमण धोकादायक आहे, पण त्याला काही उत्तम प्रतीचे पर्याय आहेत का?’ असे तुम्हाला वाटेल. प्रश्‍न चांगला आहे आणि “प्रती” या शब्दाकडे लक्ष द्या.

यहोवाच्या साक्षीदारांसकट सर्वांना उत्तम प्रतीची परिणामकारक स्वास्थ्य-सेवा हवी आहे. डॉ. ग्रँट इ. स्टीफन यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे नमूद केलेः “उत्तम प्रतीची स्वास्थ्य-सेवा म्हणजे त्या सेवेतील घटकांची, कायदेशीर वैद्यकीय व अवैद्यकीय ध्येये गाठण्याची क्षमता होय.” (द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन, जुलै १, १९८८) “अवैद्यकीय ध्येयां”मध्ये रुग्णाच्या बायबलवर किंवा पवित्र शास्त्रावर आधारीत विवेकाचा वा नैतिकतेचा भंग न करण्याचा समावेश होईल.—प्रे. कृत्ये १५:२८, २९.

रक्‍त न वापरता गंभीर वैद्यकीय समस्या हाताळण्याचे कायदेशीर व परिणामकारक मार्ग आहेत का? होय, ते आहेत असे सांगण्यास आनंद वाटतो.

अगदी जरुर पडल्यासच आपण रक्‍त देतो असा दावा बहुतेक सर्जन करीत असले तरी, एडस्‌ची साथ उत्पन्‍न झाल्यापासून ते करीत असलेल्या रक्‍ताचा उपयोग झपाट्याने कमी झाला. मेयोक्लीनिक प्रोसिडिंग्ज्‌ (सप्टेंबर १९८८) मधील एका संपादकीय लेखात म्हटले होते की, “या साथीमुळे झालेल्या थोड्याशा फायद्यांमधील एक” असा की, त्यामुळे “रक्‍ताचे संक्रमण टाळण्यासाठी डॉक्टर व रुग्ण यांनी योजना आखल्या.” एका रक्‍तपेढीच्या अधिकाऱ्‍याने म्हटलेः “बदल झाला आहे तो संदेशाच्या तीव्रतेत, (धोक्याच्या वाढत्या जाणीवेमुळे) त्या संदेशाविषयी चिकित्सज्ञांमधील ग्रहणक्षमतेत व पर्यायांचा विचार करण्याच्या मागणीत.”—ट्रान्सफ्यूशन मेडिसिन रिव्ह्यज्‌, ऑक्टोबर १९८९.

पर्याय आहेत याकडे लक्ष द्या! याविषयीची समज रक्‍त संक्रमण का केले जाते याचे परिक्षण केल्यास समजून येईल.

सुस्वास्थ्य व जीवनासाठी आवश्‍यक असलेला प्राणवायु लाल पेशीतील हिमोग्लोबिनने वाहून नेला जातो. या कारणास्तव, एखाद्या व्यक्‍तीचे बरेचसे रक्‍त गेले असल्यास त्याची जागा दुसऱ्‍याने भरून काढणे हे तर्कसंगत वाटेल. सामान्यपणे तुमच्या दर १०० घनसेंटिमीटर रक्‍तामध्ये १४ वा १५ ग्रॅम हिमोग्लोबिन असते. (हे प्रमाण मोजण्याचे आणखी एक माप आहे हिमॅटोक्रिट. ते सर्वसामान्यपणे ४५ टक्के असते.) शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचे हिमोग्लोबिन १० च्या खाली (वा ३० टक्के हिमॅटोक्रिट) असल्यास त्याला रक्‍त देण्याचा “नियम” होता. वॉक्स संगुइनिस या स्विडीश जर्नलने असा अहवाल दिला की, (मार्च १९८७) “वैकल्पिक शस्त्रक्रियेसाठी रुग्णामध्ये शस्त्रक्रियेपूर्वी दर १०० घ. से. मी.ला १० ग्रॅम हिमोग्लोबिन असावे असा (बधीरीकरण शास्त्रज्ञांपैकी) ६५ टक्क्यांचा दंडक होता.”

परंतु १९८८ मध्ये रक्‍ताच्या संक्रमणाविषयी झालेल्या एका परिषदेत प्राध्यापक हॉवर्ड एल. झॉडर यांनी विचारलेः “आपल्याला हा ‘अद्‌भूत आकडा’ कसा मिळाला?” त्यांनी स्पष्ट म्हटलेः “भूल देण्याआधी रुग्णाचे हिमोग्लोबिन १० ग्रॅम असावे या मापनाची कार्य-कारण मीमांसा लपलेली, अनाकलनीयतेने झाकलेली असून व्यावहारिक व प्रायोगिक पुराव्याने सिद्ध न केलेली आहे.” तर मग, ज्यांना संक्रमण देण्यास ‘आकलन न झालेला, सिद्ध न झालेला’ दंडक कारणीभूत झाला त्या हजारो रूग्णांची कल्पना करा!

काहींना कदाचित वाटेलः ‘कमी पातळीवर काम भागत असताना हिमोग्लोबिनची पातळी १४ असल्यास तिला सामान्य का मानले जाते?’ त्याचे कारण असे की, त्यामुळे व्यायाम वा अवजड काम करण्यास तुमची तयारी असावी म्हणून तुमच्या जवळ प्राणवायु वाहून नेण्याची मोठी राखीव क्षमता असते. पंडुरोग्यांच्या अभ्यासातून असेही दिसून आले की, “दर १०० घ.सें.मी. ला ७ ग्रॅम इतके कमी हिमोग्लोबिन असल्यास काम करण्याच्या क्षमतेत आलेली कमतरता जाणणे कठीण आहे. कामात माफक दुर्बलता आल्याचा पुरावा इतरांना सापडला आहे.”—कंटेम्पररी ट्रान्सफ्यूशन प्रॅक्टीस्‌, १९८७.

प्रौढांना हिमोग्लोबिनची खालची पातळी चालू शकते तर मुलांच्या बाबतीत काय? डॉ. जेम्स ए. स्टॉकमॅन तिसरे म्हणतातः “काही अपवाद वगळता अकाली जन्मलेल्या तान्ह्‌या मुलांमध्ये पहिल्या एक ते तीन महिन्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते . . . तान्ह्‌या बाळांना रक्‍त कधी द्यावे याच्या सूचना सुस्पष्ट नाहीत. खरे पाहता, पुष्कळ तान्ही मुले हिमोग्लोबिनची विलक्षण कमी पातळी, रुग्णविषयक अडचणी न येता, सहन करतात असे दिसते.”—पेडिॲट्रिक क्लीनिक्स्‌ ऑफ नॉर्थ अमेरिका, फेब्रुवारी १९८६.

याचा अर्थ, कोणा अपघातात वा शस्त्रकियेमध्ये एखाद्या माणसाचे बरेचसे रक्‍त गेल्यास काहीही करण्याची गरज नाही, असा नाही. रक्‍त मोठ्या प्रमाणावर व झपाट्याने गेल्यास त्या माणसाच्या रक्‍ताचा दाब कमी होतो व त्याला धक्का बसण्याची शक्यता असते. सर्वप्रथम गरज असते ती रक्‍तस्राव थांबविण्याची व रुधिराभिसरण संस्थेतील रक्‍ताच्या पातळीची पुनःस्थापना करण्याची. यामुळे धक्का येण्यास प्रतिबंध होतो व उरलेल्या लाल पेशी व इतर घटकांचे अभिसरण चालू राहील.

संपूर्ण रक्‍त वा रक्‍तातील प्लाझ्मा वापरल्याविना पातळीची पुनःस्थापना साधता येते. a अनेक प्रकारचे रक्‍तहीन द्रव परिणामकारकपणे पातळीची वृद्धी करणारे आहेत. स्वस्त व आपल्या रक्‍ताशी सुसंगत असा सर्वात साधा द्रव म्हणजे सलाईन (मिठाचे द्रावण) होय. डेक्स्‌ट्रॅन, हीमॅसेल व लॅक्टेटेड रिंगर्स सोल्यूशन यासारखी विशेष गुणधर्म असलेले द्रवही आहेत. हीटास्टार्च (HES) हे पातळीत वाढ करणारे नवे द्रावण आहे. “रक्‍तापासून बनवलेल्या उत्पादनांना नकार देणाऱ्‍या (भाजलेल्या) रूग्णांना त्याची शिफारस निर्धास्तपणे करता येणे शक्य आहे.” (जर्नल ऑफ बर्न केअर ॲण्ड रीहॅबिलिटेशन, जानेवारी/फेब्रुवारी १९८९) अशा द्रवांचे निःसंदिग्ध फायदे आहेत. “क्रिस्टलॉईड द्रावणे [जसे की, सामान्य सलाईन व लॅक्टेटेड रिंगर्स सोल्युशन] डेक्स्‌ट्रॅन व HES ही तुलनात्मक दृष्ट्या अविषारी व स्वस्त, झटकन उपलब्ध असलेली, हवेच्या तपमानाला साठवता येणारी, सुसंगतीसाठी परिक्षा करण्याची गरज न लागणारी व संक्रमणामार्फत पसरणाऱ्‍या रोगांपासून मुक्‍त असतात.”—ब्लड ट्रान्सफ्यूशन थेरपी—ए फिजिशियन्स हँडबुक, १९८९.

आता तुम्ही विचारालः ‘माझ्या शरीरभर प्राणवायु पोचवण्यासाठी लाल पेशींची मला गरज असताना रक्‍ताच्या बदली दिले जाणारे रक्‍तहीन द्रव चांगले काम का करतात?’ आधी उल्लेख केल्याप्रमाणे तुमच्यापाशी प्राणवायु वाहण्याची राखीव क्षमता आहे. तुमचे रक्‍त गेल्यास उणीव भरून काढणारी अद्‌भुत रचना आपले काम सुरु करते. प्रत्येक स्पंदनाबरोबर तुमचे हृदय अधिक रक्‍त पुढे लोटते. गेलेल्या रक्‍ताच्या बदली अनुरुप असे द्रव घातल्याने, आता पातळ झालेले रक्‍त, बारीक रक्‍तवाहिन्यांतूनही, अधिक सहजतेने वाहते. रासायनिक बदल झाल्यामुळे पेशींसाठी अधिक प्राणवायुचा पुरवठा केला जातो. परिस्थितीशी जुळवून घेण्याचे हे बदल इतके परिणामकारक असतात की, तुमच्या फक्‍त अर्ध्या लाल पेशी उरल्या असल्या तरी प्राणवायुचा पुरवठा नेहमीप्रमाणे ७५ टक्के असतो. विश्रांती घेत असलेला रूग्ण, रक्‍तात उपलब्ध असलेल्या प्राणवायुपैकी फक्‍त २५ टक्क्यांचाच उपयोग करतो. आणि बहुतेक भूल देणारी औषधे शरीराला लागणाऱ्‍या प्राणवायुची गरज कमी करतात.

डॉक्टर कशी मदत करू शकतात?

रक्‍त गेल्यामुळे कमी लाल पेशी असलेल्या व्यक्‍तीला डॉक्टर मदत करू शकतात. एकदा का पातळीचे पुनःस्थापन केले की, डॉक्टर मोठ्या प्रमाणावर प्राणवायु देऊ शकतात. यामुळे तो शरीराला अधिक प्रमाणात उपलब्ध होतो व त्यामुळे अनेकदा लक्षणीय परिणाम प्राप्त झाले आहेत. हाच उपाय ब्रिटिश डॉक्टरांनी एका स्त्रीवर केला. तिचे इतके रक्‍त गेले होते की, तिचे हिमोग्लोबिन दर १०० घ.सें.मी. ला १.८ ग्रॅम इतके घसरले . . . नाकातून मोठ्या प्रमाणावर प्राणवायु देणे तसेच मोठ्या प्रमाणावर जिलेटिनच्या द्रावणाचे [हिमॅसेल] संक्रमण देऊन तिच्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आला.” (ॲनेस्थीसिया, जानेवारी १९८७) त्या अहवालात असेही म्हटले आहे की, अतिशय रक्‍त गेलेल्या इतरांना मोठ्या दबावाखालील प्राणवायुच्या खोलीत ठेवून यशस्वीरित्या उपाय करण्यात आला आहे.

अधिक लाल पेशी बनवण्यास आपल्या रूग्णांना डॉक्टर मदत करू शकतात. ती कशी? नेहमीपेक्षा तिप्पट ते चौपट गतीने लाल पेशी बनवण्यास मदत करणारी लोहयुक्‍त औषधे (स्नायुमध्ये वा शिरांमध्ये) देऊन. नुकतीच एक नवी मदत उपलब्ध झाली आहे. तुमचे मूत्रपिंड इरिथ्रोपीटिन (EPO) नावाच्या ग्रंथी उत्पन्‍न करतात. ते लाल पेशी बनवण्यास अस्थिमज्जेला उत्तेजन देते. आता संयोगाने बनवलेले EPO उपलब्ध आहे. कोणा पंडुरोग्याला डॉक्टर ते देऊ शकतात व अशारितीने गेलेल्या लाल पेशींच्या जागी नव्या लाल पेशी झटपट बनवण्यात त्यांना मदत करतात.

शस्त्रक्रियेच्या वेळीही रुधिर-जतनाच्या अत्याधुनिक पद्धती वापरून कुशल व सद्विवेक बुद्धीशी प्रामाणिक राहणारे सर्जन व बधीरीकरण-शास्त्रज्ञ मदत करू शकतात. रक्‍तस्राव कमी करण्यासाठी इलेक्ट्रोकॉटरीसारख्या शस्त्रक्रियेच्या दक्ष व कौशल्यपूर्ण तंत्रांचे महत्त्व सांगावे तेवढे कमीच आहे. कधी कधी जखमेमध्ये वाहणारे रक्‍त शोषून, गाळून ते रुधिराभिसरणात परत केले जाते. b

रक्‍तहीन द्रव भरलेल्या हार्ट-लंग मशीनवर असलेल्या रोग्यांना परिणामी हिमोग्लोबिनची घनता कमी झाल्याने व फारच थोड्या लाल पेशी गमावल्याने फायदा होण्याची शक्यता आहे.

मदतीचे आणखी मार्ग आहेत. शस्त्रक्रियेच्या वेळी त्याची प्राणवायुची गरज कमी करण्यासाठी रूग्णाला थंड करणे. रक्‍तदाब कमी करणारी भूल देणारी औषधे. रक्‍ताचे गोठणे सुधारण्यासाठी उपाय. रक्‍तस्रावाचा वेळ कमी करण्यासाठी डिस्मोप्रेसिन्‌ (DDAVP). लेसर किरणांच्या “सुऱ्‍या.” डॉक्टर व चिंतित रोगी रक्‍ताचे संक्रमण टाळण्यासाठी धडपडतील तशी ही यादी वाढताना तुम्हाला दिसेल. तुम्ही मोठ्या प्रमाणावर रक्‍त गमावणार नाही अशी आम्ही आशा बाळगतो. परंतु गमावलेच तर अनेक धोके असलेल्या रक्‍त संक्रमणाविना कुशल डॉक्टर तुमची देखभाल करू शकतील.

शस्त्रक्रिया, होय—पण संक्रमणाविरहीत

आज अनेक लोक रक्‍त स्वीकरणार नाहीत. साक्षीदार प्रामुख्याने धार्मिक कारणासाठी करत असलेली याचना ते स्वास्थ्याच्या कारणास्तव करतातः रक्‍ताला पर्यायी असलेली योग्य प्रतीची सेवा स्वीकारुन. आता आपल्या लक्षात आलेच असेल की, रक्‍त न वापरले तरीही महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. तुमच्या शंकांचे पूर्ण निरसन झाले नसल्यास वैद्यकीय साहित्यातील आणखी इतर पुरावे त्या दूर करतील.

“यहोवाच्या साक्षीदारांच्या एका सभासदाच्या चार मोठ्या सांध्यात एकाच वेळी बदल” (ऑर्थोपेडिक रिव्ह्‌यु, ऑगस्ट १९८६) या लेखात “दोन्ही गुडघे व कमरेच्या खुब्यांमध्ये वेगाने फैलावत जाणारा रोग” झालेल्या एका पंडुरोग्याविषयी सांगितले होते. टप्याटप्याने केलेल्या या शस्त्रक्रियेच्या पूर्वी व नंतर लोहयुक्‍त डेक्स्‌ट्रॅन वापरण्यात आले व ती यशस्वी झाली. ब्रिटिश जर्नल ऑफ ॲनेस्थेसिया (१९८२) मध्ये हिमोग्लोबिनची पातळी १० च्या खाली असलेल्या एका ५२ वर्षांच्या साक्षीदाराबद्दल सांगितले होते. रक्‍ताची हानी कमी करण्यासाठी रक्‍तदाब कमी करणारे बधीरीकरण करून तिचे कमरेचे व खांद्याचे सांधे पूर्णपणे बदलण्यात आले. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ आरकानसास येथील शस्त्रक्रिया पथकाने साक्षीदारांमध्ये शंभर कमरेचे सांधे बदलण्यासाठी हीच पद्धत वापरली व सर्व रोगी बरे झाले. त्या शाखेचे नेतृत्व करणारे आध्यापक म्हणालेः “या [साक्षीदार] रूग्णांपासून आम्ही जे शिकलो आहोत ते संपूर्ण कंबर (कंबरेच्या सांध्याचा बदल) करावयाच्या सर्व रूग्णांवर लागू करतो.”

काही साक्षीदारांची सद्‌सद्‌विवेक बुद्धी, रक्‍ताशिवाय केलेल्या अवयव आरोपणाविषयी (ऑरगन ट्रान्स्‌प्लान्ट) मान्यता दाखविण्यास आड येत नाही. मूत्रपिंडांच्या १३ आरोपणांच्या अहवालाच्या शेवटी म्हटले आहेः “एकूण परिणामांवरुन असे सूचित होते की मूत्रपिंडांचे आरोपण बहुतेक सर्व यहोवाच्या साक्षीदारांना सुरक्षितपणे व परिणामकारकपणे लागू करणे शक्य आहे.” (ट्रान्सप्लान्टेशन, जून १९८८) अशाच तऱ्‍हेने, रक्‍त नाकारणे, यशस्वीपणे केलेल्या हृदयारोपणाच्याही मार्गात आड आलेले नाही.

‘पण, रक्‍ताविना केलेल्या इतर शस्त्रक्रियेविषयी काय म्हणता येईल?’ असा तुम्हाला प्रश्‍न पडेल. “[अमेरिकेतील वेन स्टेट युनिव्हर्सिटीत] रक्‍ताच्या संक्रमणाशिवाय साक्षीदारांवर झालेल्या स्त्रीरोगविषयक व प्रसूतिशास्त्र विषयक मोठ्या शस्त्रक्रियांबद्दल” मेडिकल हॉटलाईन (एप्रिल/मे १९८३) मध्ये सांगितले होते. या बातमीपत्रात म्हटले होतेः “रक्‍तासह अशाच प्रकारच्या शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रियांपेक्षा यांच्यामध्ये अधिक मृत्यु झाले नाहीत वा समस्या निर्माण झाल्या नाहीत.” बातमीपत्राने पुढे म्हटलेः “या अभ्यासाच्या परिणामांमुळे, प्रसूतिशास्त्रविषयक, स्त्रीरोगविषयक व शस्त्रक्रिया केल्या जाणाऱ्‍या सर्व स्त्रियांसाठी दिल्या जाणाऱ्‍या रक्‍ताच्या वापरावर फिरून दृष्टी टाकणे भाग पडेल.”

ग्याटिंजेन युनिव्हर्सिटी (जर्मनी) येथील रुग्णालयात रक्‍त घेण्यास नकार दिलेल्या ३० रोग्यांवर सामान्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या. “रक्‍ताचे संक्रमण स्वीकारणाऱ्‍या रोग्यांमध्येही होणार नाहीत अशा कोणत्याही समस्या उद्‌भवल्या नाहीत. . . . संक्रमणाची मदत घेता येणार नसल्याचा बाऊ करण्यात येऊ नये व यामुळे गरजेच्या वेळी शल्यचिकित्सेच्या दृष्टीने समर्थन करता येण्यासारख्या शस्त्रक्रिया करण्यापासून परावृत्त होऊ नये.”—रिसिको इन डेर चिरुर्गी, १९८७.

उदाहरणार्थ, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये अनेक प्रौढांवर तसेच बालकांवर रक्‍त न वापरता मेंदूवरील शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. १९८९ मध्ये न्यूरोसर्जरीचे प्रमुख डॉ. जोसेफ रेन्सोहॉफ यांनी लिहिलेः “रक्‍तापासून बनविण्यात येणारी उत्पादने वापरण्याविरुद्ध ज्यांचा धार्मिक सिद्धांत आहे अशा रोग्यांमध्ये कमीतकमी धोका पत्करून, विशेषतः शस्त्रक्रिया झटपट व प्रत्यक्ष कार्यकाल तुलनात्मक दृष्ट्या कमी वेळात केल्यास, बहुधा अशी उत्पादने टाळणे साधता येते हे स्पष्ट आहे. रोग्याला हॉस्पिटलमधून जाण्याची परवानगी देण्याच्या वेळी, त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा आदर केल्याबद्दल ते जेव्हा माझे आभार मानतात तोपर्यंत तो रूग्ण एक साक्षीदार आहे हे मी अनेकदा विसरतो ही विशेष ध्यानात घेण्यासारखी गोष्ट आहे.”

शेवटी, प्रौढ तसेच मुलांवर रक्‍ताशिवाय गुंतागुंतीची हृदय व रक्‍तवाहिन्यांची शस्त्रक्रिया करता येते का? अगदी तेच करण्यात डॉ. डेन्टन ए. कुले हे अग्रेसर होते. पृष्ठ २७-९ वरील पुरवणीमधील पुनर्मुद्रित वैद्यकीय लेखावरुन दिसून येते त्याप्रमाणे एका पूर्वीच्या अभ्यासावर आधारुन, डॉ. कुले यांनी निष्कर्ष काढला की, “यहोवाच्या साक्षीदारांच्या गटातील रुग्णांमधील शस्त्रक्रियेतील धोका इतरांपेक्षा म्हणण्याजोगा फार जास्त नाही.” आता १,१०६ शस्त्रक्रिया केल्यावर ते आता लिहितातः “प्रत्येक वेळी रुग्णाशी असलेला माझा वायदा किंवा करार अभंग राखला जातो.” तो म्हणजे रक्‍त न वापरणे.

यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आणखी एक बाब म्हणजे चांगली मनोभावना असे सर्जनांच्या निदर्शनास आले आहे. “या रूग्णांची मनोभावना अनुकरणीय होती. बहुतांश रोग्यांना वाटणारी समस्यांची वा मरणाचीही भीती त्यांना वाटत नाही. आपल्या श्रद्धेवर व आपल्या देवावर त्यांचा अढळ व अगाध विश्‍वास आहे.” असे डॉ. कुले यांनी ऑक्टोबर १९८९ मध्ये लिहिले.

याचा अर्थ, ते मरण्याचा हक्क बजावीत आहेत असा नाही. बरे व्हावयाची त्यांची इच्छा असल्यामुळे ते उत्तम प्रतीची सेवा मिळवण्याचा क्रियाशीलतेने प्रयत्न करतात. रक्‍ताबद्दलचा देवाचा नियम सूज्ञतेचा असल्याबद्दल त्यांची खात्री आहे. अशा दृष्टीकोनाचा रक्‍तहीन शस्त्रक्रियेत सकारात्मक परिणाम होतो.

युनिव्हर्सिटी ऑफ फ्रायबर्ग (जर्मनी) येथील शल्यचिकित्सा हॉस्पिटलचे प्राध्यापक डॉ. व्ही. श्‍लॉसर यांनी नमूद केलेः “या गटाच्या रोग्यांमध्ये शस्त्रक्रियेच्या दरम्यानच्या काळात रक्‍तस्राव होण्याचे प्रमाण जास्त नव्हते; समस्या म्हटल्याच तर कमी होत्या. यहोवाच्या साक्षीदारांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आजाराविषयीच्या खास दृष्टीकोणामुळे शस्त्रक्रियेच्या दरम्यानच्या काळात सकारात्मक परिणाम झाला.” हर्झ क्राइस्लाउफ, ऑगस्ट १९८७.

[तळटीपा]

a संपूर्ण रक्‍त, लाल पेशी, पांढऱ्‍या पेशी, प्लेटलेट्‌स्‌ किंवा रक्‍ताचे द्रावण यांचे संक्रमण साक्षीदार स्वीकारीत नाहीत. इम्यून ग्लोब्युलिनसारख्या लहान घटकांबद्दल जून १, १९९० च्या द वॉचटावरमध्ये पृष्ठे ३०-१ पहा.

b द वॉचटावरच्या मार्च १, १९८९ अंकात पृष्ठ ३०-१ वर रक्‍त वाया जाण्यापासून वाचवणे व (शरीराबाहेरील) रूधिराभिसरणाची उपकरणे यांच्याशी संबंधित पवित्र शास्त्रीय तत्त्वांचा विचार केलेला आहे.

[१३ पानांवरील चौकट]

संक्रमणापासून फायदा मिळण्याची मुळीच शक्यता नसताना (रक्‍ताची गरज नाही) परंतु नकोशा परिणामांचा विशेष धोका असलेल्या अनेक रूग्णांना रक्‍ताचे घटक दिले जात आहेत असे अनुमान आपल्याला काढावे लागते. एखाद्या रूग्णाला साहाय्य न करू शकणारी परंतु अपाय करू शकणारी उपचार पद्धती कोणीही डॉक्टर जाणून बुजून अवलंबणार नाही. पण विनाकारण रक्‍ताचे संक्रमण केल्याने नेमके तेच होते.”—“ट्रान्सफ्यूशन-ट्रान्समिटेड व्हायरल डिसीजेस्‌,” १९८७.

[१४ पानांवरील चौकट]

दर १०० घ.सें.मी. ला २ ते २.५ ग्रॅम इतक्या कमी प्रमाणात हिमोग्लोबिन असल्यास चालेल असे काही डॉक्टरांनी म्हटले आहे. . . . दीर्घ कालावधीमध्ये रक्‍त गमावल्यास एखादा सुदृढ माणूस एकूण लाल पेशींपैकी ५० टक्के हानी सहन करू शकतो व त्याचा त्याच्यावर जवळजवळ काहीही बाह्‍य परिणाम अथवा लक्षणे दिसून येत नाहीत.”—“टेक्नीक्स्‌ ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूशन,” १९८२.

[१५ पानांवरील चौकट]

“प्राणवायु पेशींपर्यंत नेणे, जखम भरणे व रक्‍ताची पोषकता याविषयी जुन्या कल्पना सोडून दिल्या जात आहेत. यहोवाचे साक्षीदार असलेल्या रूग्णांबद्दलच्या अनुभवाने, तीव्र पंडुरोग सहन करता येतो हे सिद्ध झाले आहे.”—“द ॲनल्स ऑफ थोरॅसिक सर्जरी.” मार्च १९८९.

[१६ पानांवरील चौकट]

लहान मुले देखील? “कोणत्याही शल्यशास्त्रीय समस्या संभवल्या तरी हृदय उघडण्याच्या शस्त्रक्रियांच्या कार्यपद्धती अठ्ठेचाळीस बाल रुग्णांवर रक्‍तहीन तंत्राने करण्यात आल्या.” ती मुले १०.३ पौंडाइतकी (४.७ कि.ग्राम) वजनाची लहान होती. “यहोवाच्या साक्षीदारांमधील सातत्याच्या यशामुळे तसेच रक्‍त संक्रमणामुळे गंभीर समस्यांचा धोका असल्याने सध्या आम्ही संक्रमणाशिवाय बहुतेक सर्व बालरुग्णांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया करीत आहोत.’—“सर्क्युलेशन,” सप्टेंबर १९८४.

[१५ पानांवरील चित्रं]

ज्यांची रक्‍त घेण्याची इच्छा नाही अशा रूग्णांवर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी हे हार्ट-लंग मशीन खूपच उपयुक्‍त ठरले आहे