चौकट ४क
“त्या जिवंत प्राण्यांकडे मी पाहत होतो”
यहेज्केलने बऱ्याच राजमहालांच्या आणि मंदिरांच्या प्रवेशद्वारांत बैलांचे आणि सिंहांचे मोठमोठे पुतळे पाहिले असतील. त्यांना माणसांसारखं डोकं आणि पक्ष्यांसारखे पंख होते. ते राजमहालांचं आणि मंदिरांचं रक्षण करतात असं मानलं जायचं. प्राचीन काळात अशा प्रकारचे पुतळे अश्शूर आणि बॅबिलोनियामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळायचे. जवळजवळ २० फूट उंच असलेल्या या भल्यामोठ्या प्राण्यांकडे यहेज्केलने इतरांसारखंच चकित होऊन पाहिलं असेल. पण ते कितीही शक्तिशाली वाटत असले, तरी ते दगडापासून कोरलेले फक्त निर्जीव पुतळे होते.
पण याच्या अगदी उलट, यहेज्केलने दृष्टान्तात जे प्राणी पाहिले ते ‘जिवंत प्राणी’ होते. खरंच, त्या निर्जीव पुतळ्यांमध्ये आणि या प्राण्यांमध्ये किती मोठा फरक होता! या प्राण्यांची यहेज्केलच्या मनावर इतकी खोलवर छाप पडली, की आपल्या भविष्यवाणीच्या सुरुवातीला त्याने १० पेक्षा जास्त वेळा त्यांचा ‘जिवंत प्राणी’ म्हणून उल्लेख केला. (यहे. १:५-२२) यहोवाच्या राजासनाखाली असलेले हे चार जिवंत प्राणी, सोबतच हालचाल करत असल्याचं पाहून यहेज्केल खूप चकित झाला. यामुळे सगळ्या गोष्टी यहोवाच्या नियंत्रणात आहेत हे त्याच्या मनावर पक्कं कोरलं गेलं असेल. त्या दृष्टान्ताचा आज आपल्यावरही तसाच परिणाम होतो. यहोवाची महानता, सामर्थ्य, वैभव, ऐश्वर्य आणि सन्मान या सर्व गोष्टी पाहून त्याची स्तुती करायची नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळते.—१ इति. २९:११.
अध्याय ४, परिच्छेद ४ वर परत जाण्यासाठी