अध्याय १६
“त्यांच्या कपाळावर खूण कर”
अध्याय कशाबद्दल आहे: यहेज्केलच्या काळात विश्वासू लोकांवर कशी खूण करण्यात आली आणि त्याचा आजच्या काळाशी काय संबंध आहे
१-३. (क) यहेज्केलला धक्का का बसला? (ख) त्याला यरुशलेमच्या नाशाबद्दल काय कळलं? (ग) या अध्यायात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
यहेज्केलने आताच जे पाहिलं त्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसला आहे! धर्मत्यागी यहुदी यरुशलेमच्या मंदिरात घृणास्पद गोष्टी करत आहेत. a इस्राएलमध्ये जिथे यहोवाची शुद्ध उपासना केली जायची, ते ठिकाणच या बंडखोर लोकांनी भ्रष्ट केलं आहे. पण त्यांनी फक्त मंदिरच दूषित केलं नाही, तर यहूदाचा संपूर्ण देश हिंसेने भरून टाकला आहे. ते आता सुधरण्याच्या पार पलीकडे गेले आहेत. आपले निवडलेले लोक जे करत आहेत, ते पाहून यहोवाला खूप दुःख होतं. त्यामुळे तो यहेज्केलला म्हणतो: “मी त्यांच्यावर माझ्या क्रोधाचा वर्षाव करीन.”—यहे. ८:१७, १८.
२ यरुशलेमवर आणि एकेकाळी पवित्र असलेल्या मंदिरावर यहोवाचा क्रोध भडकला आहे आणि तो आता त्यांचा नाश करणार आहे, हे कळल्यावर यहेज्केलला खूप दुःख होतं. कदाचित यहेज्केलच्या मनात प्रश्न आले असतील, ‘आता यरुशलेम शहरातल्या विश्वासू लोकांचं काय होणार? त्यांचा जीव वाचेल का? आणि जर वाचेल तर तो कसा?’ या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी यहेज्केलला फार काळ वाट पाहावी लागली नाही. यरुशलेम शहरावर येणाऱ्या भयानक न्यायदंडाबद्दल ऐकल्यावर दृष्टान्तात यहेज्केलला लगेच आणखीन एक गोष्ट ऐकू येते. यरुशलेम शहराला शिक्षा करणाऱ्यांना मोठ्याने आवाज देऊन बोलावलं जातं. (यहे. ९:१) पण यहेजकेल दृष्टान्तात पुढे जे बघतो, त्यामुळे त्याला खूप दिलासा मिळतो. कारण यरुशलेमचा नाश अंदाधुंदपणे होणार नव्हता. तर फक्त बंडखोर लोकांचा नाश होणार होता आणि विश्वासू लोक त्यातून वाचणार होते.
३ आज आपणसुद्धा या दुष्ट व्यवस्थेच्या अंताच्या अगदी जवळ आलेलो आहोत. त्यामुळे कदाचित आपल्यालाही प्रश्न पडेल की त्या मोठ्या नाशातून नेमकं कोण वाचेल आणि कोण नाही. म्हणून आता आपण या अध्यायात पुढे दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करू या: (१) यहेज्केलने दृष्टान्तात पुढे काय पाहिलं? (२) या दृष्टान्तातली भविष्यवाणी त्याच्या काळात कशी पूर्ण झाली? (३) आणि ती आज आपल्या काळात कशी पूर्ण होणार आहे?
“शहराला शिक्षा करणाऱ्यांना बोलावून घ्या”
४. यहेज्केलला दृष्टान्तात पुढे काय दिसलं आणि त्याने काय ऐकलं?
४ यहेज्केलला दृष्टान्तात पुढे काय दिसलं आणि त्याने काय ऐकलं? (यहेज्केल ९:१-११ वाचा.) त्याला सात माणसं ‘उत्तरेकडे तोंड असलेल्या वरच्या दरवाजाच्या दिशेने येताना दिसली.’ ती माणसं जिथून येत होती, तिथे कदाचित ईर्ष्येला पेटवणारी मूर्ती होती, किंवा तिथे इस्राएली बायका तम्मूज दैवतासाठी रडत होत्या. (यहे. ८:३, १४) ती सात माणसं मंदिराच्या आतल्या अंगणात येतात आणि तांब्याच्या वेदीजवळ उभी राहतात. पण ही माणसं कोणतंही बलिदान द्यायला आली नव्हती. कारण त्या मंदिरात दिली जाणारी बलिदानं आता यहोवा स्वीकारणार नव्हता. त्या माणसांपैकी सहा जणांकडे “प्रत्येकाच्या हातात चुराडा करण्यासाठी शस्त्र होतं.” पण त्यांच्यातला सातवा माणूस थोडा वेगळा होता. त्याने मलमलीचे कपडे घातले होते आणि त्याच्याकडे शस्त्र नाही तर त्याच्या कमरेला “सचिवाची दौत” होती.
५, ६. ज्यांच्यावर खूण केली जाणार होती त्यांच्याबद्दल आपल्याला कोणत्या गोष्टी कळतात? (सुरुवातीचं चित्र पाहा.)
५ कमरेला दौत असलेल्या माणसाला काय करायचं होतं? यहोवाने त्याला एक महत्त्वाची जबाबदारी दिली. त्याने त्याला म्हटलं, “संपूर्ण यरुशलेम शहरात फिर, आणि शहरात होत असलेल्या घृणास्पद गोष्टींमुळे जी माणसं रडत आहेत आणि शोक करत आहेत त्यांच्या कपाळावर खूण कर.” हे ऐकल्यावर लगेच यहेज्केलला इजिप्तमधल्या इस्राएली लोकांची आठवण झाली असेल. त्यांनासुद्धा आपल्या पहिल्या जन्मलेल्या मुलांना नाशापासून वाचवण्यासाठी, आपल्या घराच्या चौकटीच्या वरच्या बाजूला आणि डाव्या-उजव्या बाजूंना रक्ताने खूण करायची होती. (निर्ग. १२:७, २२, २३) मग कमरेला दौत असलेला माणूस लोकांच्या कपाळावर जी खूण करणार होता, तीसुद्धा याच कारणासाठी होती का? म्हणजे ज्यांच्या कपाळावर खूण असणार होती, तेच यरुशलेमच्या नाशापासून वाचणार होते का?
६ या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला हे पाहावं लागेल, की ती खूण कोणावर केली जाणार होती. ती खूण ‘शहरात होत असलेल्या घृणास्पद गोष्टींमुळे, जी माणसं रडत आणि शोक करत होती,’ त्यांच्या कपाळावर केली जाणार होती. यावरून, ज्यांच्यावर खूण केली जाणार होती त्यांच्याबद्दल आपल्याला काय कळतं? एक गोष्ट म्हणजे, मंदिरात होत असलेल्या मूर्तिपूजेबद्दल या लोकांना मनापासून दुःख वाटत होतं. पण त्यासोबतच, संपूर्ण यरुशलेम शहरामध्ये होणाऱ्या हिंसाचारामुळे, अनैतिक कामांमुळे आणि भ्रष्टाचारामुळेसुद्धा ही माणसं दुःखी होती. (यहे. २२:९-१२) दुसरी गोष्ट म्हणजे, या वाईट गोष्टींबद्दल त्यांना कसं वाटत होतं हे त्यांनी मनात ठेवलं नाही तर बोलूनसुद्धा दाखवलं. या विश्वासू लोकांच्या वागण्या-बोलण्यावरून दिसून आलं, की त्यांना शुद्ध उपासनेबद्दल कळकळ आहे. तसंच, देशात होणाऱ्या घृणास्पद कामांबद्दल त्यांच्या मनात चीड आहे. यहोवा अशा लोकांवर दया दाखवणार होता आणि त्यांना येणाऱ्या नाशापासून वाचवणार होता.
७, ८. (क) चुराडा करण्यासाठी हातात शस्त्र असलेल्या माणसांना काय करायचं होतं? (ख) शेवटी काय घडलं?
७ तर मग, चुराडा करण्यासाठी हातात शस्त्र असलेल्या सहा माणसांना काय करायचं होतं? यहोवाने त्या सहा माणसांना जी आज्ञा दिली त्याबद्दल यहेज्केलने ऐकलं. यहोवाने असं म्हटलं: कमरेला दौत असलेल्या माणसाचं खूण करण्याचं काम संपल्यावर सगळ्यांना मारून टाका. फक्त ज्यांच्या कपाळावर खूण आहे त्यांना सोडून द्या. त्याने पुढे म्हटलं, “माझ्या मंदिरापासूनच सुरुवात करा.” (यहे. ९:६) नाश करणाऱ्यांना आपलं काम यरुशलेमच्या सर्वात महत्त्वाच्या ठिकाणापासून, म्हणजे मंदिरापासून सुरू करायचं होतं. कारण आता ते यहोवासाठी पवित्र राहिलं नव्हतं. ‘मंदिरासमोर असलेल्या वडिलजनांना’ सर्वात आधी ठार मारलं जाणार होतं. हे तेच इस्राएलचे ७० वडीलजन होते जे खोट्या दैवतांसमोर मंदिरात धूप जाळत होते.—यहे. ८:११, १२; ९:६.
८ शेवटी काय घडलं? यहेज्केलने दृष्टान्तात पुढे पाहिलं, की कमरेला दौत असलेल्या माणसाने यहोवाला येऊन म्हटलं, “तू आज्ञा दिली होतीस, तसंच मी केलं.” (यहे. ९:११) कदाचित आपण विचार करू, ‘यरुशलेमच्या रहिवाशांचं पुढे काय झालं? त्या नाशातून विश्वासू लोक वाचले का?’
यहेज्केलच्या दिवसांत हा दृष्टान्त कसा पूर्ण झाला?
९, १०. (क) यरुशलेमच्या नाशातून वाचलेले काही विश्वासू लोक कोण होते? (ख) आणि आपण त्यांच्याबद्दल काय म्हणू शकतो?
९ २ इतिहास ३६:१७-२० वाचा. इ.स.पू. ६०७ मध्ये यहेज्केलच्या दृष्टान्ताची पूर्णता झाली. त्या वेळी बाबेलच्या सैन्याने यरुशलेमचा आणि तिथल्या मंदिराचा नाश केला. बाबेलचं सैन्य ‘यहोवाच्या हातातल्या प्याल्याप्रमाणे’ होतं. त्या सैन्याचा उपयोग करून, यहोवाने आपला क्रोध यरुशलेमच्या अविश्वासू लोकांवर ओतला आणि त्यांना शिक्षा दिली. (यिर्म. ५१:७) या नाशात सर्वांनाच मारून टाकण्यात आलं का? नाही. यहेज्केलच्या दृष्टान्तात सांगण्यात आलं होतं, की या नाशापासून काही जण वाचतील.—उत्प. १८:२२-३३; २ पेत्र २:९.
१० या नाशापासून बरेच विश्वासू लोक वाचले. त्यांपैकी काही म्हणजे रेखाबी लोक, इथियोपियाचा एबद-मलेख, यिर्मया संदेष्टा आणि त्याचा सचिव बारूख. (यिर्म. ३५:१-१९; ३९:१५-१८; ४५:१-५) यहेज्केलच्या दृष्टान्तावरून आपण म्हणू शकतो, की हे लोक यरुशलेममध्ये घडत असणाऱ्या घृणास्पद गोष्टींमुळे ‘रडत आणि शोक करत’ असतील. (यहे. ९:४) त्यांनी नाशाच्या आधी नक्कीच दाखवलं असेल, की त्यांना शुद्ध उपासनेबद्दल कळकळ होती आणि वाईट कामांबद्दल मनापासून घृणा वाटत होती. त्यामुळेच ते नाशापासून वाचू शकले.
११. कमरेला दौत असलेला माणूस आणि चुराडा करण्याची शस्त्रं घेतलेली सहा माणसं कोणाला सूचित करतात?
११ त्या विश्वासू लोकांच्या कपाळावर खरोखरची खूण करण्यात आली होती का? नाही. यहेज्केलने किंवा इतर कोणत्याही संदेष्ट्याने यरुशलेममध्ये जाऊन त्या विश्वासू लोकांच्या कपाळावर खरोखरची खूण नक्कीच केली नसेल. कारण असा कोणताही उल्लेख आपल्याला बायबलमध्ये मिळत नाही. त्यामुळे आपण म्हणू शकतो की दृष्टान्तातली ही घटना स्वर्गात घडणाऱ्या गोष्टींना सूचित करते. म्हणूनच ती आपण बघू शकत नाही. यहेज्केलच्या दृष्टान्तात कमरेला दौत असलेला माणूस आणि चुराडा करण्यासाठी शस्त्र घेतलेली सहा माणसं यहोवाच्या स्वर्गदूतांना सूचित करतात. हे स्वर्गदूत यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कायम तयार असतात. (स्तो. १०३:२०, २१) यरुशलेमच्या होणाऱ्या नाशावर देखरेख करण्यासाठी यहोवाने नक्कीच स्वर्गदूतांना पाठवलं असेल. या स्वर्गदूतांनी जणू एका अर्थाने विश्वासू लोकांच्या कपाळावर खूण केली. म्हणजेच त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं, की कोणताही विश्वासू व्यक्ती मारला जाऊ नये.
या दृष्टान्तातली भविष्यवाणी आज आपल्या काळात कशी पूर्ण होणार आहे?
१२, १३. (क) यहोवाने यरुशलेमवर आपला क्रोध का ओतला? (ख) आपल्या काळातही यहोवा असंच करेल असं आपण का म्हणू शकतो? (ग) यरुशलेम आजच्या काळातल्या ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतं का? समजावून सांगा. (“प्राचीन यरुशलेम आजच्या काळातल्या ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतं का?” ही चौकट पाहा.)
१२ आज आपल्या काळात लवकरच देवाचा असा न्यायदंड येणार आहे जो आधी कोणीच पाहिलेला नाही. म्हणजेच, “जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही आणि पुन्हा कधीही येणार नाही असं मोठं संकट येईल.” (मत्त. २४:२१) त्या रोमांचक घटनेची वाट पाहत असताना आपल्या मनात काही प्रश्न येतील: ‘हा नाश अंदाधुंदपणे केला जाईल की विचारपूर्वक? यहोवाची शुद्ध उपासना करणारे वाचावेत म्हणून त्यांच्यावर एखादी खूण केली जाणार आहे का?’ दुसऱ्या शब्दांत, यहेज्केलने सचिवाची दौत घेतलेल्या माणसाचा जो दृष्टान्त पाहिला, त्याची आपल्या काळात पूर्णता होणार आहे का? या तिन्ही प्रश्नांचं उत्तर आहे, हो. असं आपण का म्हणू शकतो? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी, चला आपण पुन्हा यहेज्केलच्या दृष्टान्तावर चर्चा करू या.
१३ तुम्हाला आठवतं का, की यहोवाने यरुशलेमवर आपला क्रोध का ओतला? आपण पुन्हा यहेज्केल ९:८, ९ ही वचनं पाहू या. (वाचा.) यहेज्केलला भीती वाटत होती की यरुशलेमच्या नाशामध्ये “इस्राएलच्या उरलेल्या सगळ्या लोकांचा नाश” होईल. त्यामुळे यहोवा यरुशलेमचा नाश का करणार आहे याची त्याने यहेज्केलला चार कारणं सांगितली. पहिलं म्हणजे, त्या राष्ट्राचा “अपराध अतिशय मोठा” होता. b दुसरं म्हणजे, यहूदाचा संपूर्ण “देश रक्तपाताने” भरून गेला होता. तिसरं म्हणजे, यहूदाची राजधानी असलेल्या यरुशलेममध्ये “सगळीकडे भ्रष्टाचार” माजला होता. चौथं कारण म्हणजे, लोक वाईट कामं करताना अशी चुकीची समजूत करून घेत होते, की ‘यहोवा त्यांना पाहत नाही.’ आजही आपल्याला अशीच वाईट परिस्थिती बघायला मिळत नाही का? लोकांमध्ये घृणास्पद अनैतिक कामं, भ्रष्टाचार, विश्वासघात आणि हिंसा खूप वाढली आहे. पण ही गोष्ट खरी आहे की यहोवा कधीही बदलत नाही. यहेज्केलच्या काळात ज्या गोष्टींमुळे यहोवाचा क्रोध भडकला त्याच गोष्टींमुळे आजच्या काळातही यहोवाचा क्रोध भडकेल. (याको. १:१७; मला. ३:६) यावरून आपण हे म्हणू शकतो, की कमरेला दौत असलेला माणूस आणि चुराडा करण्याचं शस्त्र हातात असलेली सहा माणसं आजच्या काळातही यहोवाने दिलेलं काम करणार आहेत.
१४, १५. यहोवा नाश आणण्याआधी लोकांना सावध करतो हे आपल्याला कोणत्या उदाहरणांवरून कळतं?
१४ पण यहेज्केलच्या दृष्टान्तातही भविष्यवाणी आपल्या काळात कशी पूर्ण होईल? ती यहेज्केलच्या काळात कशी पूर्ण झाली यावर विचार करा. त्यामुळे आपल्याला समजेल की ती आज कशी पूर्ण होत आहे आणि भविष्यातही कशी पूर्ण होईल. यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या कोणत्या घटना आपल्या काळात घडल्या आहेत आणि येणाऱ्या काळात घडणार आहेत, यावर आता आपण चर्चा करू या.
१५ यहोवा नाश आणण्याआधी लोकांना सावध करतो. ११ व्या अध्यायात आपण पाहिलं होतं, की यहोवाने यहेज्केलला “इस्राएलच्या घराण्याचा पहारेकरी म्हणून” नेमलं होतं. (यहे. ३:१७-१९) इ.स.पू. ६१३ पासूनच यहेज्केलने इस्राएली लोकांना येणाऱ्या नाशाबद्दल स्पष्टपणे इशारा द्यायला सुरुवात केली होती. यशया, यिर्मया आणि इतर संदेष्ट्यांनीसुद्धा लोकांना यरुशलेमच्या नाशाबद्दल सावध केलं होतं. (यश. ३९:६, ७; यिर्म. २५:८, ९, ११) आज आपल्या काळातसुद्धा यहोवाने येशू ख्रिस्ताद्वारे अभिषिक्त जनांच्या एका छोट्या गटाला एक जबाबदारी सोपवली आहे. ते घरातल्या सेवकांना म्हणजे, शुद्ध उपासना करणाऱ्यांना फक्त आध्यात्मिक अन्नच पुरवत नाहीत, तर लवकरच येणाऱ्या मोठ्या संकटाबद्दल इतरांना सावधही करत आहेत.—मत्त. २४:४५.
१६. जे नाशातून वाचणार आहेत त्यांच्यावर यहोवाचे लोक खूण करतात का? स्पष्ट करा.
१६ लोकांवर खूण करायचं काम यहोवाचे लोक करत नाहीत. लक्ष द्या, यहोवाने यहेज्केलला स्वतः यरुशलेमला जाऊन नाशापासून वाचणाऱ्या लोकांवर खूण करायला सांगितलं नव्हतं. त्याचप्रमाणे, येणाऱ्या नाशापासून जे वाचणार आहेत त्यांच्यावर खूण करायचं काम आज यहोवाचे लोक करत नाहीत. याउलट, आपण सगळे ख्रिस्ताच्या घरातले सेवक आहोत आणि या नात्याने त्याने आपल्याला प्रचार करण्याचं काम दिलं आहे. त्यामुळे आपण आवेशाने लोकांना आनंदाचा संदेश सांगतो. त्यासोबतच, हे दुष्ट जग लवकरच नाश होणार आहे याबद्दलचा इशाराही आपण लोकांना देतो. असं करून आपण दाखवतो की आपण प्रचाराची जबाबदारी गंभीरतेने घेतो. (मत्त. २४:१४; २८:१८-२०) हे काम करून आपण चांगल्या मनाच्या लोकांना शुद्ध उपासना करायला मदत करतो.—१ तीम. ४:१६.
१७. भविष्यात लोकांवर खूण केली जावी म्हणून त्यांनी आधीच कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?
१७ येणाऱ्या नाशापासून वाचण्यासाठी प्रत्येकाला आधीच आपल्या विश्वासाचा पुरावा द्यावा लागेल. इ.स.पू. ६०७ मध्ये जे यरुशलेमच्या नाशापासून वाचले, त्यांनी काय केलं होतं ते आठवा. त्यांना शुद्ध उपासनेबद्दल कळकळ आहे आणि शहरात होणाऱ्या घृणास्पद गोष्टींबद्दल चीड आहे, हे त्यांनी आधीच दाखवून दिलं होतं. आजही तीच गोष्टी खरी आहे. नाश येण्याआधीच लोकांनी एका अर्थाने, ‘रडणं आणि शोक करणं’ गरजेचं आहे. म्हणजेच, जगात घडणाऱ्या दुष्टतेबद्दल त्यांना मनापासून वाईट वाटलं पाहिजे. आपल्या भावना मनात ठेवण्याऐवजी, शुद्ध उपासनेबद्दल त्यांना किती कळकळ आहे, हे त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून दाखवलं पाहिजे. यासाठी त्यांना काय करावं लागेल? आज जो आनंदाचा संदेश सांगितला जात आहे तो त्यांनी स्वीकारला पाहिजे, ख्रिस्तासारखे गुण स्वतःमध्ये वाढवत राहिलं पाहिजे, यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेतला पाहिजे आणि ख्रिस्ताच्या बांधवांना मनापासून पाठिंबा दिला पाहिजे. (यहे. ९:४; मत्त. २५:३४-४०; इफिस. ४:२२-२४; १ पेत्र ३:२१) जे लोक स्वतःमध्ये हे बदल करतील आणि मोठ्या संकटाच्या वेळी शुद्ध उपासना करत असतील, अशांवरच नाशापासून वाचण्यासाठी खूण केली जाईल.
१८. (क) येशू केव्हा आणि कशी विश्वासू लोकांवर खूण करेल? (ख) अभिषिक्त जनांवर खूण करण्याची गरज आहे का? समजावून सांगा.
१८ विश्वासू लोकांवर खूण करण्याचं काम येशू करेल. यहेज्केलच्या काळात जे लोक नाशापासून वाचणार होते, त्यांच्यावर खूण करण्याचं काम स्वर्गदूतांनी केलं. आज आपल्या काळात यहेज्केलचा हा दृष्टान्त कसा पूर्ण होईल? आपल्या काळात सचिवाची दौत असलेला माणूस येशूला सूचित करतो. आणि जेव्हा येशू राष्ट्रांचा न्याय करण्यासाठी आपल्या “वैभवात” येईल, तेव्हा तो हे खूण करण्याचं काम करेल. (मत्त. २५:३१-३३) खोट्या धर्माचा नाश c झाल्यावर मोठं संकट सुरू होईल आणि तेव्हा येशू येईल. या महत्त्वाच्या टप्प्यावर, म्हणजे हर्मगिदोन सुरू होण्याच्या काही काळाआधी येशू लोकांचा न्याय करेल, म्हणजेच त्यांच्यावर खूण करायचं काम करेल. कोणते लोक मेंढरांसारखे आहेत आणि कोणते बकऱ्यांसारखे हे तो त्या वेळी ठरवेल. ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ लोकांवर मेंढरं म्हणून खूण केली जाईल. यावरून कळतं की त्यांना “सर्वकाळाचं जीवन मिळेल.” (प्रकटी. ७:९-१४; मत्त. २५:३४-४०, ४६) पण, विश्वासू अभिषिक्त जनांबद्दल काय? हर्मगिदोनपासून वाचण्यासाठी त्यांच्यावर खूण करण्याची गरज आहे का? नाही. उलट, त्यांचा मृत्यू होण्याआधी किंवा मोठं संकट सुरू होण्याआधी, त्यांच्यावर शेवटचा शिक्का मारला जाईल. मग, हर्मगिदोन सुरू होण्याच्या काही काळाआधी पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्त जनांना स्वर्गात घेतलं जाईल.—प्रकटी. ७:१-३.
१९. या दुष्ट व्यवस्थेवर न्यायदंड आणण्यासाठी येशूसोबत कोण असतील? (“रडणं व शोक करणं, खूण करणं, चुराडा करणं—केव्हा आणि कसं होईल?” ही चौकट पाहा.)
१९ येशू ख्रिस्त आणि त्याचं स्वर्गातलं सैन्य या दुष्ट व्यवस्थेवर न्यायदंड आणेल. यहेज्केलच्या दृष्टान्तात, जोपर्यंत मलमलीचे कपडे घातलेल्या माणसाने आपलं खूण करण्याचं काम पूर्ण केलं नाही, तोपर्यंत चुराडा करण्यासाठी हातात शस्त्र असलेल्या सहा माणसांनी नाश करायला सुरुवात केली नाही. (यहे. ९:४-७) त्याचप्रमाणे, येशू जेव्हा राष्ट्रांच्या लोकांचा न्याय करेल आणि मेंढरांसारख्या लोकांवर खूण करेल, त्यानंतरच नाशाची सुरुवात होईल. मग हर्मगिदोनच्या युद्धाच्या वेळी येशू आपल्या स्वर्गातल्या सैन्याचं नेतृत्व करेल. त्या सैन्यात त्याचे पवित्र स्वर्गदूत आणि १,४४,००० अभिषिक्त जन असतील. येशू आणि त्याचं स्वर्गातलं सैन्य या दुष्ट जगाचा पूर्णपणे नाश करेल. आणि ते शुद्ध उपासना करणाऱ्या सगळ्यांना नवीन जगात घेऊन जातील.—प्रकटी. १६:१४-१६; १९:११-२१.
२०. कमरेला दौत असलेल्या माणसाचा जो दृष्टान्तात यहेज्केलने पहिला त्यातून आपल्याला कोणत्या प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी शिकायला मिळतात?
२० कमरेला दौत असलेल्या माणसाचा जो दृष्टान्तात यहेज्केलने पहिला, त्यातून आपल्याला बऱ्याच प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे आपल्याला पूर्ण खातरी मिळते, की यहोवा वाईट लोकांसोबत चांगल्या लोकांचा नाश करणार नाही. (स्तो. ९७:१०) नाशापासून वाचण्यासाठी भविष्यात आपल्यावर खूण केली जावी, म्हणून आज आपण काय केलं पाहिजे हे आता आपल्याला माहीत आहे. सैतानाच्या जगातल्या दुष्टतेमुळे लोक आज एका अर्थाने रडत आणि शोक करत आहेत. यहोवाचे उपासक या नात्याने आपण त्यांना आनंदाचा संदेश सांगण्याचा होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. तसंच, आपण त्यांना येणाऱ्या नाशाबद्दल इशाराही दिला पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याला, “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असलेल्या लोकांना, शुद्ध उपासना करण्यासाठी मदत करता येईल. त्यामुळे येणाऱ्या नाशापासून वाचण्यासाठी भविष्यात त्यांच्यावरही खूण केली जाईल. आणि त्यांना देवाच्या नवीन जगात जायची संधी मिळेल.—प्रे. कार्यं १३:४८.
a यहेज्केलला मंदिरात घडणाऱ्या घृणास्पद गोष्टींबद्दल जो दृष्टान्त दिसला, त्यावर ५ व्या अध्यायात चर्चा करण्यात आली आहे.
b एका संदर्भाप्रमाणे, ज्या हिब्रू शब्दाचं भाषांतर इथे “अपराध” म्हणून करण्यात आलं आहे, त्याचा अर्थ “खूप घृणास्पद कामं” असा असू शकतो. आणखी एका संदर्भात म्हटलं आहे, की या शब्दाचा “धार्मिक गोष्टींशी खूप जवळचा संबंध आहे. हा शब्द बहुतेक वेळा अनैतिक पापांसाठी किंवा देवाच्या नजरेत खूप वाईट असलेल्या कामांसाठी वापरला जातो.”
c मोठ्या बाबेलचा नाश होईल तेव्हा खोट्या धर्मातल्या सगळ्यांचाच नाश होईल असं नाही. त्या वेळी कदाचित पाळक वर्गातलेच काही जण खोटा धर्म सोडून देतील आणि असाही दावा करतील की ते कधीच खोट्या धर्माचा भाग नव्हते.—जख. १३:३-६.