अध्याय ८
“मी एक मेंढपाळ नेमीन”
अध्याय कशाबद्दल आहे: मसीहाबद्दलच्या चार भविष्यवाण्या आणि ख्रिस्ताने त्या कशा पूर्ण केल्या
१-३. (क) यहेज्केल इतका दुःखी का आहे? (ख) यहोवाने त्याला काय लिहायची प्रेरणा दिली?
बाबेलच्या बंदिवासातलं यहेज्केलचं हे सहावं वर्षं आहे. a शेकडो मैल दूर असलेल्या आपल्या मायदेशाबद्दल, यहूदाबद्दल विचार करून हा संदेष्टा खूप दुःखी आहे. कारण तिथल्या शासकांनी इस्राएल राष्ट्राची फार वाईट अवस्था केली आहे. यहेज्केलच्या काळात बऱ्याच राजांनी राज्य केलं; कितीतरी आले आणि कितीतरी गेले.
२ यहेज्केलचा जन्म विश्वासू राजा योशीयाच्या काळात झाला होता. यहूदामधून मूर्तिपूजा काढून टाकण्यासाठी आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी योशीया राजाने एक जोरदार मोहीम राबवली होती. त्याबद्दल समजल्यावर यहेज्केलला नक्कीच खूप आनंद झाला असेल. (२ इति. ३४:१-८) पण योशीयाने केलेले हे चांगले बदल फार काळ टिकले नाहीत. कारण त्याच्यानंतर आलेल्या बहुतेक राजांनी मूर्तिपूजा पुन्हा सुरू केली. अशा दुष्ट शासनकर्त्यांमुळे इस्राएल राष्ट्र यहोवापासून आणखी दूर गेलं आणि वाईट कामांच्या दलदलीत खोल रुतत गेलं. हे चित्र कधीच बदलणार नव्हतं का? नाही तसं नाही. ते नक्कीच बदलणार होतं.
३ यहोवा आपल्या विश्वासू संदेष्ट्याला, यहेज्केलला एक आशेचा संदेश देतो. तो त्याला मसीहाबद्दल एक भविष्यवाणी लिहायची प्रेरणा देतो. मसीहाबद्दलच्या या पहिल्या भविष्यवाणीत असं सांगितलं होतं की मसीहा पुढे जाऊन राजा बनेल, शुद्ध उपासना पुन्हा कायमची सुरू करेल आणि मेंढपाळ म्हणून यहोवाच्या मेंढरांची प्रेमळपणे काळजी घेईल. यहेज्केलने मसीहाबद्दल आणखीही बऱ्याच भविष्यवाण्या केल्या. त्यांचा आपण मन लावून अभ्यास केला पाहिजे, कारण त्या पूर्ण झाल्यावर आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल. तर चला, आता मसीहाबद्दल यहेज्केलच्या पुस्तकात दिलेल्या चार भविष्यवाण्यांचा आपण अभ्यास करू.
एक “कोवळी डहाळी” नंतर “मोठं देवदाराचं झाड” बनते
४. (क) यहेज्केल कोणती भविष्यवाणी करतो? (ख) भविष्यवाणीच्या सुरुवातीला यहोवाने यहेज्केलला काय सांगितलं?
४ इ.स.पू. ६१२ च्या आसपास, यहेज्केलला ‘यहोवाकडून एक संदेश’ मिळाला आणि यहोवाच्या प्रेरणेने त्याने एक भविष्यवाणी केली. मसीहा किती मोठ्या प्रमाणावर शासन करेल आणि त्याच्या राज्यावर भरवसा ठेवणं किती महत्त्वाचं आहे याबद्दलची ती भविष्यवाणी होती. भविष्यवाणीच्या सुरुवातीला यहोवाने यहेज्केलला, बंदिवासात असलेल्या यहुद्यांना एक कोडं घालायला सांगितलं. त्यातून दिसून आलं, की यहूदाचे शासक यहोवाशी किती अविश्वासूपणे वागत होते आणि मसीहाच्या नीतिमान शासनाची किती गरज होती.—यहे. १७:१, २.
५. कोडं काय होतं ते थोडक्यात सांगा.
५ यहेज्केल १७:३-१० वाचा. थोडक्यात ते कोडं असं होतं: “एक भला मोठा गरुड,” देवदार झाडाची “सर्वात वरची” कोवळी डहाळी तोडतो आणि ती नेऊन “व्यापाऱ्यांच्या शहरात” लावतो. मग तो गरुड “देशातलं काही बी” घेतो आणि ते एका सुपीक देशात, “भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी” लावतो. पुढे ते बी अंकुरतं आणि त्यातून एक “द्राक्षवेल” उगवते. नंतर दुसरा एक ‘मोठा गरुड’ तिथे येतो, तेव्हा ती द्राक्षवेल “मोठ्या आनंदाने” त्याच्याकडे आपली मुळं पसरवते. कारण आपल्याला भरपूर पाणी असलेल्या दुसऱ्या एका ठिकाणी लावलं जावं असं तिला वाटत होतं. द्राक्षवेलीचं हे वागणं यहोवाला मुळीच आवडलं नाही. त्याने म्हटलं की तिला मुळासकट उपटून टाकलं जाईल आणि ती ‘पूर्णपणे जळून जाईल’ किंवा तिथेच “सुकून जाईल.”
६. कोड्याचा अर्थ सांगा.
६ या कोड्याचा अर्थ काय होता? (यहेज्केल १७:११-१५ वाचा.) इ.स.पू. ६१७ मध्ये पहिल्या ‘मोठ्या गरुडाने,’ म्हणजेच बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने यरुशलेमला वेढा घातला. त्याने ‘सर्वात वरच्या डहाळीला,’ म्हणजे यहूदाच्या यहोयाखीन राजाला राजासनावरून काढलं आणि त्याला “व्यापाऱ्यांच्या शहरात,” म्हणजे बाबेलमध्ये आणलं. मग नबुखद्नेस्सरने ‘देशातलं बी’ यातून, म्हणजेच शाही घराण्यातून सिद्कीयाला यरुशलेममध्ये राजा बनवलं. नबुखद्नेस्सरने यहूदाच्या या नवीन राजाला यहोवाच्या नावाने शपथ घ्यायला लावली. तो नबुखद्नेस्सरच्या अधिकाराखाली राहून राज्य करेल आणि कधीच त्याच्या विरोधात जाणार नाही अशी ती शपथ होती. (२ इति. ३६:१३) पण सिद्कीयाने आपली ही शपथ मोडली आणि बाबेलविरुद्ध बंड केलं. त्याने दुसऱ्या ‘मोठ्या गरुडाकडे,’ म्हणजेच इजिप्तच्या फारोकडे सैन्याची मदत मागितली; पण याचा काहीच उपयोग झाला नाही. शपथ मोडणाऱ्या सिद्कीयाचं हे वागणं यहोवाला मुळीच आवडलं नाही. (यहे. १७:१६-२१) शेवटी, सिद्कीयाला राजासनावरून काढून टाकण्यात आलं आणि बाबेलमधल्या तुरुंगात त्याचा मृत्यू झाला.—यिर्म. ५२:६-११.
७. कोड्याच्या रूपात असलेल्या भविष्यवाणीतून आपण काय शिकतो?
७ कोड्याच्या रूपात सांगितलेल्या या भविष्यवाणीतून आपण काय शिकतो? पहिली गोष्ट म्हणजे, आपण जर कोणाला शब्द किंवा वचन दिलं असेल तर आपण ते पाळलं पाहिजे, कारण आपण शुद्ध उपासना करणारे आहोत. येशूनेसुद्धा म्हटलं की “तुमचं बोलणं ‘हो’ तर हो, ‘नाही’ तर नाही इतकंच असावं.” (मत्त. ५:३७) आपल्याला जर कधी कोर्टात किंवा इतर ठिकाणी खरं बोलायची शपथ घ्यावी लागली तर आपण ती गोष्ट खूप गंभीरपणे घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, आपण कोणावर भरवसा ठेवतो याचा विचार करणंही खूप महत्त्वाचं आहे. बायबल आपल्याला अशी चेतावणी देतं: “शासकांवर भरवसा ठेवू नका. माणसावर भरवसा ठेवू नका, कारण तो तारण करू शकत नाही.”—स्तो. १४६:३.
८-१०. (क) यहोवाने भविष्यात येणाऱ्या राजाबद्दल काय म्हटलं? (ख) ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (“मसीहाबद्दलची भविष्यवाणी—देवदाराचं मोठं झाड” ही चौकटसुद्धा पाहा.)
८ पण असा एक शासक आहे ज्याच्यावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. तो म्हणजे, भविष्यात राज्य करणारा मसीही राजा. भविष्यवाणीत डहाळीबद्दल सांगितल्यावर यहोवा पुढे मसीही राजाबद्दल बोलतो.
९ या भविष्यवाणीत काय सांगितलं आहे? (यहेज्केल १७:२२-२४ वाचा.) त्यात सांगितलं आहे की आता मोठमोठे गरूड नाही, तर यहोवा स्वतः काहीतरी करेल. तो ‘मोठ्या देवदार झाडाच्या शेंड्यावरून एक कोवळी डहाळी घेऊन ती एका मोठ्या, उंच पर्वतावर’ लावेल. पुढे ती डहाळी जोमाने वाढून एक मोठं देवदाराचं झाड बनेल. आणि त्याच्या फांद्यांच्या सावलीत “सगळ्या प्रकारचे पक्षी” राहतील. मग “सगळ्या झाडांना” कळून येईल, की यहोवामुळेच ती डहाळी वाढून एक मोठं झाड बनलं आहे.
१० ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? यहोवाने ‘मोठ्या देवदाराच्या झाडावरून,’ म्हणजेच दावीदच्या राजघराण्यातून आपल्या मुलाला, येशू ख्रिस्ताला निवडलं. आणि त्याला “एका मोठ्या, उंच पर्वतावर,” म्हणजे स्वर्गातल्या सीयोन पर्वतावर राजा म्हणून नेमलं. (स्तो. २:६; यिर्म. २३:५; प्रकटी. १४:१) अशा प्रकारे, ज्याला शत्रू ‘अगदी क्षुल्लक व साधारण माणूस’ समजायचे, त्या आपल्या मुलाला यहोवाने “दावीदचं राजासन” देऊन सन्मानित केलं. (दानी. ४:१७, लूक १:३२, ३३) एका मोठ्या देवदाराच्या झाडासारखंच मसीहाला, म्हणजेच येशू ख्रिस्ताला मोठा अधिकार देण्यात आला. लवकरच तो स्वर्गातून संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल आणि आपल्या प्रजेला भरपूर आशीर्वाद देईल. खरंच, अशाच एका भरवशालायक राजाची आपल्याला गरज आहे. त्याच्या राज्याच्या छत्रछायेत देवाच्या आज्ञा पाळणारे पृथ्वीवरचे सर्व लोक ‘सुरक्षित राहतील आणि त्यांना संकटाची भीती सतावणार नाही.’—नीति. १:३३.
११. ‘एक कोवळी डहाळी देवदाराचं मोठं झाड’ बनतं या भविष्यवाणीतून आपल्याला कोणता महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो?
११ या भविष्यवाणीतून आपण काय शिकतो? एक ‘कोवळी डहाळी’ पुढे ‘एक मोठं देवदाराचं’ झाड बनतं याबद्दलच्या रोमांचक भविष्यवाणीतून आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तो प्रश्न आहे: आपण कोणावर भरवसा ठेवला पाहिजे? मानवी सरकारांवर की मसीही राजावर? मानवी सरकारांवर आणि त्यांच्या सैन्यांच्या ताकदीवर भरवसा ठेवणं अगदीच मूर्खपणाचं आहे. त्याऐवजी, खऱ्या सुरक्षेसाठी मसीही राजावर, येशू ख्रिस्तावर भरवसा ठेवणं सुज्ञपणाचं आहे. कारण, त्याच्या मजबूत हातांत असलेलं स्वर्गातलं सरकारच मानवांना एक सुंदर भविष्य देऊ शकतं.—प्रकटी. ११:१५.
‘ज्याला कायदेशीर हक्क आहे’
१२. दावीदसोबत केलेला करार यहोवा विसरला नाही हे त्याने कसं स्पष्ट केलं?
१२ देवाने जेव्हा यहेज्केलला दोन गरुडांबद्दलच्या भविष्यवाणीचं स्पष्टीकरण दिलं तेव्हा यहेज्केलला एक गोष्ट समजली. त्याला समजलं, की दावीदच्या राजघराण्यातल्या दुष्ट सिद्कीया राजाचं राज्यपद काढून घेतलं जाईल, आणि त्याला बाबेलला बंदी म्हणून नेलं जाईल. यहेज्केलला कदाचित प्रश्न पडला असेल, ‘देवाने दावीदसोबत केलेल्या कराराचं आता काय होईल? देवाने तर असं वचन दिलं होतं की दावीदच्या राजघराण्यातला एक जण कायमसाठी राज्य करेल. ते वचन कसं पूर्ण होईल?’ (२ शमु. ७:१२, १६) असे प्रश्न यहेज्केलला पडले असतील तर त्यांच्या उत्तरांसाठी त्याला जास्त वेळ थांबावं लागलं नाही, त्याला ती लवकरच मिळाली. कारण बंदिवासाच्या सातव्या वर्षी, म्हणजे इ.स.पू. ६११ च्या आसपास जेव्हा सिद्कीया अजूनही यरुशलेममध्ये राज्य करत होता, तेव्हा यहेज्केलला ‘यहोवाकडून एक संदेश मिळाला.’ (यहे. २०:२) यहोवाने त्याला मसीहाबद्दल आणखी एक भविष्यवाणी सांगितली जी पुढे त्याला लोकांना सांगायची होती. त्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की दावीदसोबत केलेला करार यहोवा विसरला नव्हता. उलट या भविष्यवाणीतून स्पष्ट झालं, की दावीदचा वारस या नात्याने मसीही राजाला राज्य करण्याचा कायदेशीर हक्क असेल.
१३, १४. (क) यहेज्केल २१:२५-२७ मध्ये दिलेली भविष्यवाणी थोडक्यात सांगा. (ख) ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?
१३ या भविष्यवाणीत काय सांगितलं आहे? (यहेज्केल २१:२५-२७ वाचा.) यात सांगितलं आहे की यहेज्केलद्वारे यहोवा इस्राएलच्या ‘दुष्ट प्रधानाशी,’ सिद्कीयाशी अगदी स्पष्टपणे बोलतो. कारण त्याला शिक्षा द्यायची वेळ आता आली होती. त्या दुष्ट राजाला यहोवा म्हणतो की त्याच्या “डोक्यावरची पगडी” आणि “मुकुट” काढून घेतला जाईल. मग जे शासक “खाली” आहेत त्यांना वर उचललं जाईल आणि जे “वर” आहेत त्यांना खाली आणलं जाईल. ज्या शासकांना वर उचललं जाईल ते फक्त काही काळासाठी राज्य करतील, म्हणजे ‘ज्याला कायदेशीर हक्क आहे तो येईपर्यंतच.’ कारण त्यानंतर राज्य करण्याचा अधिकार त्याला दिला जाईल.
१४ ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? सुरुवातीला यहूदाचं राज्य “वर” होतं. पण इ.स.पू. ६०७ मध्ये बाबेलच्या लोकांनी यरुशलेम शहराचा नाश केला तेव्हा त्याला खाली आणण्यात आलं. कारण त्या वेळी सिद्कीया राजाचं राज्यपद काढून घेण्यात आलं आणि त्याला बाबेलला बंदी म्हणून नेण्यात आलं. त्यानंतर दावीदच्या घराण्यातला कोणीही यरुशलेममध्ये राज्य करत नव्हता. मग “खाली” असलेल्या विदेशी शासकांना “वर” उचलण्यात आलं आणि संपूर्ण पृथ्वीवर त्यांचंच शासन होतं. पण हे फक्त काही काळासाठीच, कारण १९१४ मध्ये जेव्हा यहोवाने येशू ख्रिस्ताला राजा म्हणून नेमलं तेव्हा “विदेश्यांसाठी ठरवलेले काळ” संपले. (लूक २१:२४) येशू हा दावीद राजाचा वंशज असल्यामुळे देवाच्या राज्याचा शासक बनण्याचा “कायदेशीर हक्क” त्यालाच होता. b (उत्प. ४९:१०) अशा प्रकारे दावीदचा वारस सदासर्वकाळ राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही, हे यहोवाने त्याला दिलेलं वचन पूर्ण केलं.—लूक १:३२, ३३.
१५. आपण आपल्या राजावर, येशू ख्रिस्तावर पूर्ण भरवसा का ठेवू शकतो?
१५ या भविष्यवाणीतून आपण काय शिकतो? हेच, की आपण आपल्या राजावर, येशू ख्रिस्तावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो. जगात पाहिलं तर शासकांना एकतर लोक निवडतात किंवा ते स्वतः दुसऱ्यांची सत्ता हडपून शासक बनतात. पण येशूच्या बाबतीत तसं नाही. त्याला तर स्वतः यहोवाने निवडलं आहे आणि ‘राज्य करण्याचा’ अधिकार दिला आहे, कारण तो मिळण्याचा कायदेशीर हक्क त्यालाच आहे. (दानी. ७:१३, १४) खरंच, ज्याला यहोवाने नेमलं आहे त्याच्यापेक्षा भरवशालायक आणखी कोण असू शकतं!
‘माझा सेवक दावीद त्यांचा मेंढपाळ होईल’
१६. (क) यहोवाला आपल्या मेंढरांबद्दल कसं वाटतं? (ख) ‘इस्राएलचे मेंढपाळ’ आपल्या मेंढरांशी कसं वागत होते?
१६ सगळ्यात मोठा मेंढपाळ यहोवा आपल्या मेंढरांची, म्हणजेच पृथ्वीवरच्या आपल्या सेवकांची खूप काळजी घेतो. (स्तो. १००:३) आपल्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी त्याने पृथ्वीवर मेंढपाळांना, म्हणजेच जबाबदार बांधवांना नेमलं आहे. ते या मेंढरांशी कसं वागतात याकडे यहोवाचं लक्ष असतं. त्यामुळे विचार करा, यहेज्केलच्या काळात ‘इस्राएलच्या मेंढपाळांनी कठोरपणे अधिकार गाजवून लोकांवर जुलूम केला,’ तेव्हा यहोवाला किती वाईट वाटलं असेल! खरंच, त्या मेंढपाळांमुळे देवाच्या लोकांची स्थिती खूप वाईट झाली होती आणि अनेकांनी शुद्ध उपासना करायचं सोडून दिलं होतं.—यहे. ३४:१-६.
१७. यहोवाने स्वार्थी मेंढपाळांच्या हातून आपल्या मेंढरांना कसं सोडवलं?
१७ इस्राएलच्या त्या कठोर मेंढपाळांबद्दल यहोवा म्हणाला, “मी त्यांच्याकडून माझ्या मेंढरांचा हिशोब मागीन” आणि “मी त्यांच्या तोंडांतून माझी मेंढरं सोडवीन.” (यहे. ३४:१०) यहोवा दिलेलं वचन नेहमी पूर्ण करतो हे आपल्याला माहीतच आहे. (यहो. २१:४५) त्यामुळे त्याने इ.स.पू. ६०७ मध्ये बाबेलच्या लोकांना पाठवून इस्राएलच्या त्या स्वार्थी मेंढपाळांचा अधिकार काढून घेतला आणि आपल्या मेंढरांना सोडवलं. मग शुद्ध उपासना पुन्हा सुरू व्हावी म्हणून पुढे सत्तर वर्षांनंतर, त्याने बाबेलमधून मेंढरांसारख्या सेवकांना पुन्हा त्यांच्या मायदेशात आणलं. पण यहोवाच्या मेंढरांना अजूनही धोका होता, कारण पुढे जगातली सरकारं त्यांच्यावर राज्य करणार होती. म्हणजेच “विदेश्यांसाठी ठरवलेले काळ” अनेक शतकांपर्यंत चालू राहणार होते.—लूक २१:२४.
१८, १९. यहेज्केलने इ.स.पू. ६०६ मध्ये कोणती भविष्यवाणी केली? (सुरुवातीचं चित्र पाहा.)
१८ यरुशलेमचा नाश झाल्याच्या एका वर्षानंतर, म्हणजे इ.स.पू. ६०६ मध्ये यहोवाने यहेज्केलला एक भविष्यवाणी करायची प्रेरणा दिली. त्या भविष्यवाणीतून दिसून येतं, की सर्वात मोठ्या मेंढपाळाला आपल्या मेंढरांची किती काळजी आहे. कारण मसीही राजा मेंढपाळ म्हणून यहोवाच्या मेंढरांची कशी काळजी घेईल याचं वर्णन त्या भविष्यवाणीत केलं आहे.
१९ भविष्यवाणीत काय सांगितलं आहे? (यहेज्केल ३४:२२-२४ वाचा.) त्यात सांगितलं आहे की देव ‘एक मेंढपाळ नेमेल.’ त्याला तो “माझा सेवक दावीद” असं म्हणतो. लक्ष द्या, इथे “एक मेंढपाळ” आणि “माझा सेवक” असे एकवचनी शब्द वापरले आहेत. यावरून कळतं की मसीहा दावीदच्या घराण्यातला असा एकमेव वारस असणार होता जो सदासर्वकाळ राज्य करणार होता; त्याच्यानंतर दुसरा कोणीही येणार नव्हता. भविष्यवाणीत असंही म्हटलं आहे, की राजा आणि मेंढपाळ म्हणून तो देवाच्या मेंढरांना चारेल आणि त्यांचा “प्रधान” होईल. तसंच, यहोवा आपल्या मेंढरांसोबत “शांतीचा करार” करेल आणि त्यांच्यावर “आशीर्वादांचा पावसासारखा वर्षाव” करेल. त्यामुळे ते सुरक्षित राहतील, त्यांची भरभराट होईल आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. शिवाय सगळे एकमेकांसोबत शांतीने राहतील. इतकंच काय तर मानव आणि प्राणी यांनासुद्धा एकमेकांपासून धोका नसेल.—यहे. ३४:२५-२८.
२०, २१. (क) “माझा सेवक दावीद” याबद्दलची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (ख) शांतीच्या कराराची भविष्यवाणी नवीन जगात कशी पूर्ण होईल?
२० ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? राजाला “माझा सेवक दावीद” असं म्हणून यहोवा खरंतर येशूबद्दल भविष्यवाणी करत होता. येशू दावीदचा वंशज असल्यामुळे राज्य करण्याचा “कायदेशीर हक्क” त्यालाच होता. (स्तो. ८९:३५, ३६) पृथ्वीवर असताना येशूने सिद्ध केलं, की तो एक “चांगला मेंढपाळ” आहे, कारण त्याने आपल्या ‘मेढरांसाठी आपला प्राण दिला.’ (योहा. १०:१४, १५) पण आता हा मेंढपाळ स्वर्गातून आपल्या मेंढरांची काळजी घेत आहे. (इब्री १३:२०) यहोवाने १९१४ मध्ये येशूला राजा बनवलं आणि त्याच्यावर आपल्या मेंढरांची काळजी घ्यायची आणि त्यांचं भरणपोषण करायची जबाबदारी सोपवली. मग लगेच १९१९ मध्ये या नवीन राजाने “विश्वासू आणि बुद्धिमान दासाला’ नेमलं. “आपल्या घरातल्या लोकांना,” म्हणजेच स्वर्गातल्या किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असलेल्या देवाच्या विश्वासू सेवकांना अन्न पुरवण्यासाठी त्याने या दासाला नेमलं. (मत्त. २४:४५-४७) ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली विश्वासू दास देवाच्या मेंढरांना भरपूर आध्यात्मिक अन्न पुरवत आला आहे. त्यामुळेच आज देवाचे लोक आध्यात्मिक नंदनवनात शांतीने व सुरक्षेने राहत आहेत आणि पुढेही राहतील.
२१ यहेज्केलने ‘शांतीच्या कराराबद्दल’ आणि ‘आशीर्वादांच्या पावसाबद्दल’ जी भविष्यवाणी केली ती नवीन जगात कशी पूर्ण होईल? त्या वेळी, पृथ्वीवर असलेले देवाचे सर्व सेवक ‘शांतीच्या करारामुळे’ मिळणाऱ्या आशीर्वादांचा पूर्णपणे आनंद घेतील. संपूर्ण पृथ्वी खरोखर नंदनवन बनेल तेव्हा सगळ्यांना सर्वकाळाचं जीवन मिळेल. तिथे युद्ध, गुन्हेगारी, दुष्काळ, आजार किंवा हिंस्र प्राणी यांचा धोका नसेल. (यश. ११:६-९; ३५:५, ६; ६५:२१-२३) त्या वेळी देवाच्या मेंढरांना ‘कोणीही घाबरवणार नाही; ती सगळी सुरक्षित राहतील.’ खरंच, अशा परिस्थितीत जीवन जगण्याची आपण सगळेच खूप उत्सुकतेने वाट पाहत आहोत.—यहे. ३४:२८.
२२. (क) येशूला मेंढरांबद्दल कसं वाटतं? (ख) मंडळीतले वडीलसुद्धा मेंढरांची कशी काळजी घेऊ शकतात?
२२ या भविष्यवाणीतून आपण काय शिकतो? आपल्या पित्यासारखंच येशूलासुद्धा मेंढरांची खूप काळजी आहे. तो राजा आणि मेंढपाळ असल्यामुळे आपल्या पित्याच्या मेंढरांना भरपूर आध्यात्मिक अन्न मिळत आहे याकडे तो लक्ष देतो. तसंच आध्यात्मिक नंदनवनात ते सुरक्षित आहेत आणि शांतीने राहत आहेत याचीही तो खातरी करतो. अशा प्रेमळ राजाच्या अधीन राहणं खरंच किती चांगलं आहे! आज पृथ्वीवर ज्यांना मेंढपाळ म्हणून नेमलं आहे त्यांनीसुद्धा येशूप्रमाणेच मेंढरांची काळजी घेतली पाहिजे. मंडळीतल्या या वडिलांनी “स्वखुषीने” व “उत्सुकतेने” कळपाचा सांभाळ केला पाहिजे आणि मेंढरांसमोर चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे. (१ पेत्र ५:२, ३) त्यांनी यहोवाच्या कोणत्याही मेंढराशी कधीच वाईट वागू नये. यहेज्केलच्या काळात यहोवाने इस्राएलच्या स्वार्थी मेंढपाळांना काय म्हटलं होतं ते आठवा. त्याने म्हटलं होतं: “मी त्यांच्याकडून माझ्या मेंढरांचा हिशोब मागीन.” (यहे. ३४:१०) खरंच, आपल्या मेंढरांना कसं वागवलं जातं याकडे सगळ्यात मोठ्या मेंढपाळाचं आणि त्याच्या मुलाचं लक्ष असतं.
“माझा सेवक दावीद सर्वकाळासाठी त्यांचा प्रधान असेल”
२३. (क) इस्राएलला एकत्र करण्याबद्दल यहोवाने कोणतं वचन दिलं होतं? (ख) त्याने ते वचन कसं पूर्ण केलं?
२३ आपल्या उपासकांमध्ये एकी असावी अशी यहोवाची इच्छा आहे. त्याने इस्राएल राष्ट्राबद्दल जी भविष्यवाणी केली होती, त्यात त्याने असं वचन दिलं होतं, की तो आपल्या लोकांना एकत्र आणेल. त्याने म्हटलं होतं, की तो दोन वंशांनी बनलेल्या यहूदाच्या राज्यातल्या आणि दहा वंशांनी बनलेल्या इस्राएलच्या राज्यातल्या काही लोकांना एकत्र आणून त्यांचं “एक राष्ट्र” बनवेल; जणू काय तो दोन ‘काठ्या’ एकत्र जोडून त्यांना “एक काठी” बनवेल. (यहे. ३७:१५-२३) ही भविष्यवाणी इ.स.पू. ५३७ मध्ये पूर्ण झाली. तेव्हा यहोवाने यहूदा आणि इस्राएलच्या दोन्ही राज्यांना एकत्र आणून “एक राष्ट्र” बनवलं आणि त्यांना वचन दिलेल्या देशात परत आणलं. c ही गोष्ट भविष्यात होणाऱ्या एका मोठ्या गोष्टीची फक्त एक झलक होती. कारण भविष्यात यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात यहोवाच्या लोकांमध्ये कायम टिकणारी एकी असेल. असं आपण का म्हणू शकतो? कारण इस्राएलमध्ये एकी आणण्याचं वचन दिल्यावर यहोवा यहेज्केलला आणखी एक भविष्यवाणी सांगतो. भविष्यात येणारा राजा पृथ्वीवरच्या सर्व खऱ्या उपासकांमध्ये एकी कशी आणेल आणि ती कायम कशी टिकून राहील याबद्दलची ती भविष्यवाणी होती.
२४. (क) यहोवाने मसीहाचं वर्णन कसं केलं? (ख) त्याचं शासन कसं असेल?
२४ या भविष्यवाणीत काय सांगितलं आहे? (यहेज्केल ३७:२४-२८ वाचा.) येणाऱ्या मसीहाबद्दल बोलताना यहोवा पुन्हा एकदा “माझा सेवक दावीद,” “एकच मेंढपाळ,” आणि “प्रधान” हे शब्द वापरतो. पण या वेळी तो वचन दिलेल्या मसीहाला ‘राजाही’ म्हणतो. (यहे. ३७:२२) या राजाचं शासन कसं असेल? त्याच्या शासनाला अंत नसेल. भविष्यवाणीत सांगितलं आहे की त्याचं शासन “कायम” टिकणारं आणि “सर्वकाळासाठी” असेल. याचाच अर्थ, त्याच्या राज्याखाली त्याच्या प्रजेला नेहमीच आशीर्वाद मिळत राहतील. d त्याच्या शासनाखाली लोकांमध्ये एकी असेल. त्यांचा “एकच राजा” असेल आणि ते सगळे एकसारख्याच “न्याय-निर्णयांप्रमाणे चालतील.” त्याच्या शासनाखाली लोक यहोवा देवाच्या आणखी जवळ येतील. यहोवा आपल्या लोकांसोबत “शांतीचा एक करार” करेल. तो त्यांचा देव होईल आणि ते त्याचे लोक होतील. त्याचं मंदिर “कायम त्यांच्यामध्ये राहील.”
२५. मसीहाबद्दलची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?
२५ ही भविष्यवाणी कशी पूर्ण होते? १९१९ मध्ये विश्वासू अभिषिक्त जनांना ‘एका मेंढपाळाच्या,’ म्हणजे राजा येशू ख्रिस्ताच्या अधीन एकत्र करण्यात आलं. नंतर येशूने “सर्व राष्ट्रं, वंश, लोक आणि भाषा” यांतून आलेल्या एका ‘मोठ्या लोकसमुदायाला’ अभिषिक्त जनांसोबत एकत्र आणलं. (प्रकटी. ७:९) हे दोन्ही गट मिळून “एक कळप” बनला आणि ते ‘एकाच मेंढपाळाच्या’ अधिकाराखाली आहेत. (योहा. १०:१६) त्यांना स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची, ते सगळे यहोवाच्या न्याय-निर्णयांप्रमाणे म्हणजेच त्याच्या स्तरांप्रमाणे आणि नियमांप्रमाणे चालतात. यामुळे जगभरात असलेले आपले भाऊबहीण आध्यात्मिक नंदनवनात एकीचा आनंद घेत आहेत. यहोवाच्या आशीर्वादामुळे त्यांच्यामध्ये शांती आहे. तसंच त्यांच्यामध्ये यहोवाचं मंदिर आहे, म्हणजेच ते शुद्ध उपासना करत आहेत. यहोवा त्यांचा देव आहे आणि ते त्याचे उपासक आहेत. या गोष्टीचा त्यांना आता तर अभिमान आहेच, पण पुढेही कायम राहील.
२६. आपल्यातली एकी आणखी वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
२६ या भविष्यवाणीतून आपण काय शिकतो? आपण जगभरातल्या भाऊबहिणींसोबत मिळून यहोवाची शुद्ध उपासना करतो हा खरंच आपल्यासाठी किती मोठा बहुमान आहे! पण त्यासोबतच आपल्यातली एकता टिकवून ठेवायची जबाबदारीही आपल्यावर आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकसारख्या शिकवणी मानल्या पाहिजेत आणि त्यांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (१ करिंथ. १:१०) त्यासाठी आपण बायबलमधून एकाच प्रकारचं ज्ञान घेतो, वागण्या-बोलण्याच्या बाबतीत सारखेच स्तर पाळतो, आणि आपण सगळेच प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम करतो. पण आपल्यातल्या एकीचं मुख्य कारण म्हणजे आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम. प्रेमाचा हा गुण वाढवण्याचा आणि तो वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो; जसं की सहानुभूती दाखवून, दयाळूपणे वागून आणि क्षमा करून. यामुळे आपल्यातली एकी आणखी वाढते. कारण बायबल म्हणतं, ‘प्रेम हे ऐक्याचं परिपूर्ण बंधन आहे.’—कलस्सै. ३:१२-१४; १ करिंथ. १३:४-७.
२७. (क) यहेज्केलच्या पुस्तकात दिलेल्या मसीहाच्या भविष्यवाण्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? (ख) आपण पुढच्या अध्यायांमध्ये काय शिकणार आहोत?
२७ खरंच, आपण किती आभारी आहोत की यहेज्केलच्या पुस्तकात मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्या दिल्या आहेत! त्यांचा अभ्यास केल्यामुळे आपण खूप काही शिकलो. जसं की, आपला राजा येशू ख्रिस्त भरवशालायक आहे, राज्य करण्याचा कायदेशीर हक्क त्यालाच आहे, मेंढपाळ या नात्याने तो आपली प्रेमळपणे काळजी घेतो आणि आपल्यातली एकता कायम टिकवून ठेवतो. अशा राजाची प्रजा असणं हा आपल्यासाठी खरंच एक खूप मोठा बहुमान आहे. यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू होणं हा यहेज्केल पुस्तकाचा मुख्य विषय आहे, आणि मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्या त्याचाच एक भाग आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यहोवा येशूद्वारेच त्याच्या लोकांना एकत्र करतो आणि त्यांच्यामध्ये शुद्ध उपासना पुन्हा सुरू करतो. (यहे. २०:४१) पुढच्या अध्यायांमध्ये आपण शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दल आणि यहेज्केलच्या पुस्तकात त्याबद्दल आणखी काय सांगितलं आहे हे पाहणार आहोत.
a इ.स.पू. ६१७ मध्ये बंदिवासाचं पहिलं वर्ष सुरू झालं, कारण त्याच वर्षी काही यहुद्यांना पहिल्यांदा बाबेलला नेण्यात आलं. या हिशोबाने सहावं वर्ष इ.स.पू. ६१२ मध्ये सुरू झालं.
b येशू दावीदच्या वंशातून आला हे शुभवर्तमानांच्या पुस्तकांत अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे.—मत्त. १:१-१६; लूक ३:२३-३१.
c दोन काठ्यांबद्दलची यहेज्केलची भविष्यवाणी आणि ती कशी पूर्ण झाली यांबद्दल अध्याय १२ मध्ये चर्चा केली जाईल.
d एका पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ‘सर्वकाळ’ आणि “कायम” यासाठी असलेल्या हिब्रू शब्दांच्या अर्थावरून कळतं की, एखादी गोष्ट किती काळासाठी राहणार आहे. पण त्यांत अटळ, स्थिर, टिकाऊ आणि कधीही न बदलणारा अशा अर्थाच्याही छटा आहेत.