काना येथील दुसरा चमत्कार
अध्याय २०
काना येथील दुसरा चमत्कार
यहूदीयातील दीर्घ प्रचार मोहीम संपवून येशू आपल्या प्रांतात परततो ते विश्रांती घेण्यासाठी नव्हे. तर तो जेथे वाढला त्या गालीलात त्याहूनही मोठे सेवाकार्य तो सुरु करतो. पण त्याचे शिष्य त्याच्याबरोबर राहण्याऐवजी आपली कुटुंबे व आपल्या पूर्वीच्या व्यवसायाकडे परततात.
येशू कोणत्या संदेशाचा प्रचार सुरु करतो? याचा की, “देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.” आणि त्याला प्रतिक्रिया कशी मिळते? गालीलकर येशूचा स्वीकार करतात. त्याला सर्वांचा आदर प्राप्त होतो. परंतु तो त्याच्या संदेशामुळे नसून काही महिन्यांपूर्वी ते यरुशलेममध्ये असताना येशूने केलेली विलक्षण चिन्हे त्यांनी पाहिली असल्याचा परिणाम असतो.
येशू त्याचे गालीलमधील मोठे सेवाकार्य कानामध्ये सुरु करतो असे दिसते. या आधी यहूदीयातून परतल्यावर एका लग्नाच्या मेजवानीत त्याने पाण्याचा द्राक्षारस केल्याचे तुम्हाला आठवत असेल. आता या दुसऱ्या प्रसंगी हेरोद अंतिपा राजाच्या एका अमलदाराचे मूल अतिशय आजारी आहे. येशू यहूदीयाहून काना गावात आल्याचे ऐकून तो अंमलदार येशूच्या शोधात कफर्णहूमातील दूरच्या आपल्या घरून येतो. अतिशय दुःखी-कष्टी झालेला तो माणूस येशूला विनंती करतोः “माझे मूल मरण्यापूर्वी कृपया तात्काळ या.”
येशू उत्तर देतोः “घरी परत जा, तुमचा मुलगा बरा झाला आहे.” हेरोदाचा अंमलदार विश्वास धरतो व घरच्या लांबच्या प्रवासाला निघतो. त्याचे नोकर, सर्व क्षेम आहे, त्याचा मुलगा बरा झाला आहे असे त्याला सांगण्यासाठी घाईने त्याला वाटेत भेटतात. तो विचारतोः “तो कधी बरा झाला?”
‘काल दुपारी १ वाजता,’ ते उत्तर देतात.
‘तुमचा मुलगा बरा झाला आहे,’ असे येशूने त्याच वेळी म्हटल्याचे अंमलदाराच्या लक्षात येते. त्यानंतर तो माणूस व त्याचे सर्व कुटुंब ख्रिस्ताचे शिष्य होतात.
अशा रितीने यहूदीयाहून परतल्याचा संकेत म्हणून दोनदा चमत्कार करून येशूने काना गावाला अनुग्रह दाखवला. या वेळेपर्यंत त्याने केवळ हेच चमत्कार केलेले नाहीत. पण गालीलात परतल्याची खूण म्हणून त्यांना महत्त्व आहे.
आता येशू नासरेथला आपल्या गावी जातो. तेथे काय घडेल? योहान ४:४३-५४; मार्क १:१४, १५; लूक ४:१४, १५.
▪ येशू गालीलात परततो तेव्हा त्याच्या शिष्यांचे काय होते व लोक त्याचे कसे स्वागत करतात?
▪ येशू कोणता चमत्कार करतो व संबंधितांवर त्याचा काय परिणाम होतो?
▪ अशा रितीने येशूचा काना गावावर कसा अनुग्रह होता?