न्यायसभेपुढे व नंतर पिलाताकडे
अध्याय १२१
न्यायसभेपुढे व नंतर पिलाताकडे
रात्र संपत आली आहे. पेत्राने येशूला तिसऱ्यांदा नाकारले आहे आणि चौकशीचा देखावा संपवून न्यायसभेचे सभासद पांगले आहेत. शुक्रवारी सकाळी, पहाट होताहोताच ते परत भेटतात. पण या वेळी मात्र त्यांच्या न्यायसभेच्या सभागृहात. रात्रीच्या चौकशीला कायदेशीरपणाचे रूप देण्याचा बहुधा त्यांचा हेतु आहे. येशू त्यांच्यासमोर आणला गेल्यावर, रात्री त्यांनी म्हटले तसेच ते म्हणतातः “तू ख्रिस्त असल्यास आम्हास सांग.”
येशू म्हणतोः “मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही मुळीच विश्वास धरणार नाही, आणि मी विचारले तरी तुम्ही उत्तर देणार नाही.” तो धैर्याने आपली ओळख स्पष्ट करतोः “ह्यापुढे मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल.”
तेव्हा ते सर्वजण म्हणतातः “तर तू देवाचा पुत्र आहेस काय?”
येशू उत्तर देतोः “तुम्ही म्हणता की मी आहे.”
खून करायला टपलेल्या या लोकांना हे उत्तर पुरेसे आहे. ते त्याला दुर्भाषण समजतात. ते विचारतात, “आपल्याला साक्षीची आणखी काय गरज? आपण स्वतः ह्याच्या तोंडचे ऐकले आहे.” त्यामुळे ते येशूला बांधून नेतात आणि रोमी सुभेदार पंतय पिलाताकडे सोपवतात.
येशूचा विश्वासघात करणारा यहूदा या घडामोडी पाहात आहे. येशूला दोषी ठरवलेले पाहिल्यावर त्याला पश्चाताप होतो. तेव्हा त्याला मिळालेले चांदीचे ३० रुपये परत करण्यासाठी तो मुख्य याजक व वडील मंडळीकडे जातो व खुलासा करतोः “मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.”
“त्याचे आम्हास काय? तुझे तूच पाहून घे.” असे ते कठोरपणे उत्तर देतात. तेव्हा यहूदा ते रुपये मंदिरात फेकतो आणि गळफास लावून घेण्याचा प्रयत्न करतो. पण यहूदाने ज्या फांदीला दोर बांधलेला असतो ती तुटते, आणि त्याचे शरीर खालच्या खडकांवर आपटते व त्याच्या पोटाचे तुकडे होतात.
त्या चांदीच्या रुपयांचे काय करावे हे मुख्य याजकांना समजत नाही. ते अशा निर्णयाला येतात की, “हे दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे.” त्यामुळे आपसात विचारविनिमय केल्यावर, उपऱ्यांना पुरण्यासाठी, त्या रुपयांनी ते कुंभाराचे शेत विकत घेतात. अशा रितीने त्या शेताला “रक्ताचे शेत” म्हटले जाते.
येशूला सुभेदाराच्या वाड्यावर नेण्यात येते तेव्हा नुकतीच सकाळ झाली आहे. परंतु त्याच्याबरोबर गेलेले यहूदी आत जाण्यास नकार देतात. कारण परराष्ट्रीयांबरोबर इतकी जवळीक केल्यामुळे आपण अशुद्ध होऊ अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्याशी जुळते घेण्यासाठी पिलात बाहेर येतो. तो विचारतोः “तुम्ही ह्या माणसावर काय आरोप ठेवता?”
“तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते.” ते म्हणतात.
पिलात, त्यात गोवले जाण्याचे टाळण्यासाठी त्यांना म्हणतोः “त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.”
आपला खूनी हेतू प्रकट करीत यहूदी दावा करतातः “आम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” त्यांनी येशूला वल्हांडण सणाच्या काळात खरोखर मारले असते तर, अनेकांना येशूबद्दल गाढ आदर वाटत असल्यामुळे दंगल होण्याचा संभव आहे. पण रोमी लोकांकडून त्याला ते राजनैतिक आरोपावरुन जिवे मारवू शकले तर त्यामुळे लोकांपुढे ते या जबाबदारीतून मुक्त राहू शकतील.
याकरता, दुर्भाषणासाठी ज्या चौकशीमध्ये त्यांनी येशूला दोषी ठरवले तिचा उल्लेखही न करता ते धार्मिक नेते आता दुसरेच खोटे आरोप करतात. ते तिहेरी आरोप करतातः “हा [१] आमच्या राष्ट्राला फितवताना, [२] कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि [३] मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हाला आढळला आहे.”
आपण राजा असल्याचा दावा येशू करीत आहे हा आरोप, पिलाताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो वाड्यात परत जातो, येशूला आपल्याकडे बोलावतो व विचारतोः “तू यहुद्यांचा राजा आहेस काय?” दुसऱ्या शब्दात म्हणायचे तर, कैसराच्या विरोधात, स्वतः राजा असल्याची घोषणा करून तू कायदा मोडला आहेस का?
पिलाताने आतापर्यंत आपणाबद्दल कितीसे ऐकले आहे हे जाणून घेण्याची येशूची इच्छा आहे. याकरता तो विचारतोः “आपण स्वतः होऊन हे म्हणता किंवा दुसऱ्यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले?”
याबद्दल काहीही माहीत नसल्याचे पिलात म्हणतो आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याची इच्छा प्रकट करतो. तो म्हणतोः “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस?”
येशू राजपदाचा वाद टाळण्याचा कोणताही प्रयत्न करीत नाही. आता येशू जे उत्तर देतो त्याने पिलात चकित होतो यात शंका नाही. लूक २२:६६–२३:३; मत्तय २७:१-११; मार्क १५:१; योहान १८:२८-३५; प्रे. कृत्ये १:१६-२०.
▪ सकाळी कोणत्या हेतूने न्यायसभा पुन्हा भरते?
▪ यहूदा कसा मरतो व त्या चांदीच्या ३० रूपयांचे काय केले जाते?
▪ आपण येशूला मारण्यापेक्षा रोमी लोकांनी त्याला मारावे अशी यहुद्यांची का इच्छा आहे?
▪ यहूदी येशूविरुद्ध कोणते आरोप करतात?