मत्तयाला पाचारण
अध्याय २७
मत्तयाला पाचारण
पक्षघाती माणसाला बरे केल्यावर लवकरच येशू कफर्णहूमातून निघून गालील समुद्राकडे जातो. पुन्हा लोकांचा मोठा समुदाय त्याच्याकडे येतो व तो त्यांना शिकवू लागतो. जात असताना तो जकात नाक्यावर बसलेल्या मत्तयाला पाहतो. याला लेवी असेही म्हणतात. येशू त्याला, “माझ्या मागे ये,” असे निमंत्रण करतो.
पेत्र, आंद्रिया, याकोब व योहान यांना पाचारण करण्यात आले तेव्हा ते येशूच्या शिकवणीशी परिचित होते तसा बहुधा मत्तयही आहे. आणि त्यांच्याप्रमाणे मत्तय तात्काळ निमंत्रणाला प्रतिसाद देतो. तो उठतो, जकातदार म्हणून असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या मागे टाकून येशूच्या मागे जातो.
नंतर कदाचित आपल्याला झालेल्या पाचारणाप्रीत्यर्थ मत्तय आपल्या घरी एक मोठी मेजवानी करतो. येशू व त्याच्या शिष्यांखेरीज मत्तयाचे पूर्वीचे सहकारीही उपस्थित आहेत. तिरस्कृत रोमी अधिकाऱ्यांसाठी जकात वसूल करत असल्यामुळे या लोकांना त्यांचे यहूदी बांधव सर्वसामान्यपणे तुच्छ लेखत असत. शिवाय, ते अनेकदा खोटेपणाने लोकांकडून वाजवीपेक्षा जादा रक्कम कर म्हणून लुबाडत असत.
अशा व्यक्तीच्या सहवासात मेजवानीच्या वेळी येशूला पाहून परूशी त्याच्या शिष्यांना विचारतातः “तुमचा गुरु जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?” तो प्रश्न ऐकून येशू परुशांना उत्तर देतोः “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे. ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको,’ याचा अर्थ काय, हे जाऊन शिका. कारण नीतीमानांना नव्हे तर पापी जनांना बोलवण्यासाठी मी आलो आहे.”
त्यांनी, येशूचे भाषण ऐकावे तसेच आध्यात्मिक आरोग्य मिळवावे या कारणासाठी मत्तयाने या जकातदारांना आपल्या घरी बोलावले असावेसे दिसते. त्यामुळे, येशू, देवाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या सहवासात राहतो. स्वमताभिमानी परुशांसारखा येशू त्यांना तुच्छ लेखीत नाही. उलट दया येऊन वास्तविक तो त्यांच्यासाठी आध्यात्मिक वैद्याचे काम करतो.
अशाप्रकारे, पापी लोकांसाठी येशूने दाखविलेली दया ही त्यांच्या पापाला दिलेली सूट नसून शारीरिकरित्या आजारी असलेल्यांसाठी दाखवलेल्या प्रेमळ भावनांचेच प्रदर्शन होते. उदाहरणार्थ, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो,” असे म्हणत दयाळूपणे हात लांबवून त्याने कुष्ठरोग्याला स्पर्श केल्याचे आठवा. याचप्रमाणे आपणही, गरजवंतांना, विशेषतः आध्यात्मिकरित्या, मदत करून दया व्यक्त करावी. मत्तय ८:३; ९:९-१३; मार्क २:१३-१७; लूक ५:२७-३२.
▪ येशू मत्तयाला पाहतो तेव्हा मत्तय कोठे असतो?
▪ मत्तयाचा व्यवसाय काय आहे व अशा व्यक्तींना इतर यहुदी तुच्छ का लेखतात?
▪ येशूविरुद्ध कोणती तक्रार केली जाते व तो त्याला कसे प्रत्त्युतर देतो?
▪ येशू पापी लोकांच्या सहवासात का राहतो?