येशू त्याच्या विरोधकांना तोंड देतो
अध्याय १०९
येशू त्याच्या विरोधकांना तोंड देतो
येशूने त्याच्या विरोधकांना इतके गोंधळात टाकले आहे की, त्याला अधिक काही विचारायला ते घाबरतात. तो त्यांचे अज्ञान उघड करण्यात पुढाकार घेतो. तो म्हणतोः “ख्रिस्ताविषयी तुम्हास काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे?”
“दावीदाचा,” असे परुशी उत्तर देतात.
दावीद हा ख्रिस्ताचा वा मशीहाचा दैहिक पूर्वज असल्याचे येशू नाकारीत नसला तरी तो विचारतोः “तर मग, दावीद आत्म्याच्या प्रेरणेने [स्तोत्रसंहिता ११० मध्ये] त्याला प्रभु असे कसे म्हणतो? ‘यहोवाने माझ्या प्रभूला सांगितलेः “मी तुझ्या शत्रूंस तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.”’ दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार?”
ख्रिस्ताची वा अभिषिक्ताची खरी ओळख नसल्याने परुशी गप्प आहेत. परुशांची कल्पना दिसते त्याप्रमाणे मशीहा हा काही केवळ दावीदाचा वंशज नव्हे. तर तो स्वर्गात होता व दावीदाहून श्रेष्ठ वा त्याचा प्रभु होता.
आता जमाव आणि त्याच्या शिष्यांकडे वळून तो शास्त्री व परुशांबद्दल सावधगिरीचा इशारा देतो. ‘मोशेच्या आसनावर’ बसून ते देवाचे नियमशास्त्र शिकवत असल्याने येशू त्यांना आवर्जून सांगतोः “ते जे काही तुम्हास सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा. परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत.”
ते ढोंगी आहेत व अनेक महिन्यांपूर्वी एका परुशाच्या घरी जेवत असताना ज्या शब्दात त्याने त्यांना दोष लावला तशाच शब्दात तो आता त्यांना पुन्हा दोष देतो. तो म्हणतोः “आपली सर्व कामे लोकांनी पहावी म्हणून ते ती करतात.” आणखी उदाहरणे देत तो सांगतोः
“ते आपली मंत्रपत्रे रुंद . . . करतात.” कपाळावर किंवा दंडावर घातल्या जाणाऱ्या या लहानशा डब्यांमध्ये नियमशास्त्राचे चार उतारे असतातः निर्गम १३:१-१०, ११-१६; व अनुवाद ६:४-९; ११:१३-२१. पण नियमशास्त्राबद्दल त्यांना अत्यंत कळकळ आहे अशी लोकांची कल्पना व्हावी म्हणून परुशी त्या डब्यांचा आकार वाढवतात.
येशू पुढे म्हणतो की, ते आपल्या वस्त्रांचे “गोंडे मोठे करतात.” गणना १५:३८-४० मध्ये इस्राएलांना वस्त्रांना गोंडे लावण्याची आज्ञा दिलेली आहे. पण परुशी इतर कोणाच्याही गोंड्यापेक्षा आपले गोंडे मोठे करतात. हे सर्वकाही देखाव्यासाठी केले जाते! येशू म्हणतोः “श्रेष्ठ स्थाने” त्यांना आवडतात.
दुःखाची गोष्ट अशी की, श्रेष्ठतेच्या या इच्छेचा त्याच्या स्वतःच्या शिष्यांवरही परिणाम झालेला आहे. यासाठी तो सल्ला देतोः “तुम्ही तर आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका. कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा. पृथ्वीवरील कोणाला पिता म्हणू नका. कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणवून घेऊ नका. कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय.” सर्वात वरचढ होण्याची इच्छा शिष्यांनी आपणामधून काढून टाकली पाहिजे! येशू ताकीद देतोः “तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे.”
त्यानंतर शास्त्री व परुशांना पुनःपुन्हा ढोंगी म्हणून तो त्यांच्यावर येणाऱ्या पिडांचा उच्चार करतो. तो म्हणतो, ते ‘लोकांना देवाचे राज्य बंद करतात.’ आणि ‘विधवांची घरे खाऊन टाकतात व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करतात.’
येशू म्हणतोः “अहो अंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार!” ते करीत असलेल्या मनमानेल भेदभावातून प्रतीत होणाऱ्या, परुशांमधील आध्यात्मिक मूल्यांच्या अभावाला येशू दोष देतो. उदाहरणार्थ, ते म्हणतातः ‘कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही. परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर तो बांधला जातो.’ त्या भक्तीस्थानाच्या आध्यात्मिक मूल्यांपेक्षा मंदिराच्या सोन्याला जास्त महत्त्व देऊन ते आपला नैतिक अंधळेपणा प्रकट करतात.
मग, येशू, आधी केले होते त्याप्रमाणे क्षुल्लक वनस्पतींच्या दशमांश देण्याकडे बारीक लक्ष देताना “नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास” यांकडे दुर्लक्ष करण्याबद्दल तो परुशांना दोष देतो.
येशू परुशांना ‘मुरकुट गाळून काढताना उंट गिळणारे, अंधळे वाटाड्ये’ म्हणतो. ते केवळ कीटक असल्यामुळे नव्हे तर विधीवत अशुद्ध असल्याने ते आपल्या द्राक्षारसातून मुरकुट गाळून काढतात. पण त्यांचे नियमशास्त्राच्या मुख्य गोष्टींना तुच्छ लेखणे, विधीवत अशुद्ध असलेला उंट गिळण्यासारखेच आहे. मत्तय २२:४१–२३:२४; मार्क १२:३५-४०; लूक २०:४१-४७; लेवीय ११:४, २१-२४.
▪ दावीदाने स्तोत्रसंहिता ११० मध्ये म्हटलेल्या गोष्टीबद्दल येशू परुशांना प्रश्न करतो तेव्हा ते गप्प का राहतात?
▪ परुशी त्यांची मंत्रपत्रे व वस्त्रांचे गोंडे मोठे का करतात?
▪ येशू त्याच्या शिष्यांना काय सल्ला देतो?
▪ परुशी कोणते मन मानेल तसे भेदभाव करतात व महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल येशू त्यांना कसा दोष देतो?