लाजराचे पुनरुत्थान होते
अध्याय ९१
लाजराचे पुनरुत्थान होते
आता येशू, सोबतच्या लोकांबरोबर लाजराच्या कबरेपाशी येतो. प्रत्यक्षात, तोंडावर दगड ठेवलेली ती एक गुहा आहे. येशू म्हणतोः “धोंड काढा.”
येशूचा काय करण्याचा उद्देश आहे हे अजूनही न समजल्यामुळे मार्था आक्षेप घेते. ती म्हणतेः “प्रभुजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत.”
पण येशू विचारतोः “तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
तेव्हा तो दगड काढण्यात येतो. मग, येशू वर दृष्टी करून प्रार्थना करतोः “हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी, जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी बोललो. ह्यासाठी की, तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा.” तो आता जे करणार आहे ते देवाकडून मिळणाऱ्या सामर्थ्याने साध्य होणार आहे, हे लोकांना कळावे म्हणून, येशू जाहीरपणे प्रार्थना करतो. मग, तो मोठ्याने हाक मारतोः “लाजरा, बाहेर ये.”
तेव्हा लाजर बाहेर येतो. त्याचे हात व पाय अजून प्रेतवस्त्रांनी बांधलेले असून चेहरा कापडाने झाकलेला आहे. येशू म्हणतोः “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”
तो चमत्कार पाहून, मरीया व मार्थेचे सांत्वन करण्यासाठी आलेले अनेक यहुदी येशूवर विश्वास ठेवतात. पण काही मात्र घडलेली गोष्ट परुशांना सांगण्यासाठी निघून जातात. ते व प्रमुख याजक तात्काळ, यहुदी उच्च न्यायालयाची, न्यायसभेची, सभा भरवण्याची व्यवस्था करतात.
न्यायसभेत, सध्याचा प्रमुख याजक कयफा, तसेच परुशी व सदुकी, मुख्य याजक व भूतपूर्व प्रमुख याजक यांचा समावेश आहे. ते दुःखाने म्हणतातः “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करतो. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील.”
येशू “पुष्कळ चिन्हे करतो” ही गोष्ट धार्मिक नेते कबूल करीत असले तरी त्यांना केवळ त्यांच्या स्वतःच्या हुद्याची व अधिकाराचीच काळजी वाटत आहे. लाजराला उठवणे हा सदुक्यांना विशेष टोला आहे, कारण त्यांचा पुनरुत्थानावर विश्वास नाही.
कयफा हा कदाचित सदुकी असावा. तो आता बोलतोः “तुम्हास काहीच कळत नाही. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हास हितावह आहे हेही तुम्ही लक्षात आणीत नाही.”
असे बोलण्याची प्रेरणा देवाने कयफाला दिली. कारण त्यापुढे प्रेषित योहानाने लिहिलेः “हे तर [कयफा] आपल्या मनचे बोलला नाही.” कयफाच्या बोलण्याचा वास्तविक अर्थ असा होता की, त्यांच्या अधिकाराचा हुद्दा व प्रभाव यांना आणखी सुरुंग लावण्यापासून त्याला रोखण्यासाठी येशूला जिवे मारले पाहिजे. पण योहानाच्या म्हणण्याप्रमाणे ‘केवळ त्या राष्ट्रासाठीच नव्हे तर देवाच्या मुलांना जमवून एकत्र करण्यासाठी येशूचा मृत्यु ठरवला गेला होता असा संदेश कयफाने दिला.’ आणि खरोखरच, सर्वांसाठी खंडणी म्हणून त्याच्या पुत्राने मरावे असा देवाचा हेतू आहे.
येशूला मारण्याची योजना करण्यासाठी न्यायसभेवर प्रभाव टाकण्यात आता कयफा यशस्वी होतो. पण, येशूशी मैत्री असलेला व न्यायसभेचा सभासद असणाऱ्या निकदेमाकडून येशूला या योजनांची माहिती मिळाली असण्याची शक्यता असल्यामुळे येशू तेथून निघून जातो. योहान ११:३८-५४
▪ लाजराचे पुनरुत्थान करण्याआधी येशू जाहीरपणे प्रार्थना का करतो?
▪ हे पुनरुत्थान पाहिलेल्यांची त्याला प्रतिक्रिया काय होते?
▪ न्यायसभेच्या सभासदांचा दुष्टपणा कशाने प्रकट होतो?
▪ कयफाचा उद्देश काय होता पण देवाने त्याला कोणती भविष्यवाणी करण्यासाठी वापरले?