व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क४

हिब्रू शास्त्रवचनांत देवाचं नाव

इस्राएली लोक बाबेलच्या बंदिवासात गेले, त्याआधीच्या काळात देवाच्या नावासाठी वापरण्यात आलेली प्राचीन हिब्रू भाषेतली चार अक्षरं

इस्राएली लोक बाबेलच्या बंदिवासातून परत आले, त्यानंतरच्या काळात देवाच्या नावासाठी वापरण्यात आलेली हिब्रू भाषेतली अक्षरं

मूळ हिब्रू शास्त्रवचनांत देवाचं नाव जवळजवळ ७,००० वेळा येतं. हे नाव, יהוה या चार हिब्रू व्यंजनांनी लिहिण्यात आलं आहे. बायबलच्या या भाषांतरात, टेट्राग्रमॅटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या या चार अक्षरांचं भाषांतर “यहोवा” असं केलं आहे. देवाचं हे नाव, बायबलमध्ये असलेल्या दुसऱ्‍या कोणत्याही नावापेक्षा जास्त वेळा येतं. देवाच्या प्रेरणेने बायबलचं लिखाण करणाऱ्‍या लेखकांनी देवासाठी अनेक पदव्यांचा उपयोग केला; जसं की, “सर्वशक्‍तिमान,” “सर्वोच्च देव,” आणि “प्रभू.” पण, देवाचं वैयक्‍तिक नाव दाखवण्यासाठी त्यांनी नेहमी टेट्राग्रमॅटन या चार अक्षरांचाच उपयोग केला आहे.

यहोवा देवाने स्वतः बायबलच्या लेखकांना त्याच्या नावाचा उपयोग करण्याची प्रेरणा दिली. उदाहरणार्थ, त्याने योएल संदेष्ट्याला असं लिहायला प्रेरित केलं: “जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल.” (योएल २:३२) तसंच, त्याने एका स्तोत्रकर्त्यालाही असं लिहायला प्रेरित केलं: “लोकांना कळू दे, की तुझं नाव यहोवा आहे आणि या संपूर्ण पृथ्वीवर फक्‍त तूच सर्वोच्च देव आहेस.” (स्तोत्र ८३:१८) स्तोत्र हे कवितेच्या रूपात लिहिलेलं पुस्तक असून त्यातली स्तोत्रं लोकांना गायची होती आणि तोंडपाठ करून म्हणायची होती. स्तोत्र या एकाच पुस्तकात देवाचं नाव जवळजवळ ७०० वेळा येतं. मग, बायबलच्या अनेक भाषांतरांमधून देवाचं नाव का काढून टाकण्यात आलं? इंग्रजीतल्या नवे जग भाषांतर  या आवृत्तीत देवाच्या नावासाठी “जेहोवा” हा उच्चार का वापरला आहे? आणि देवाच्या नावाचा काय अर्थ होतो?

मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळीतला स्तोत्रं पुस्तकातला काही भाग. ही गुंडाळी पहिल्या शतकाच्या सुरुवातीची आहे. यातली लेखनशैली ही इस्राएली लोक बाबेलच्या बंदिवासातून परत आल्यानंतर सहसा वापरायचे तीच आहे. पण, यात वारंवार आलेली देवाच्या नावाची चार अक्षरं (टेट्राग्रमॅटन) मात्र प्राचीन हिब्रू अक्षरांमध्येच लिहिण्यात आली आहेत

बायबलच्या अनेक भाषांतरांमधून देवाचं नाव का काढून टाकण्यात आलं? याची अनेक कारणं आहेत. काहींचं असं म्हणणं आहे, की देवाला ओळखण्यासाठी त्याला एका खास नावाची गरज नाही. तर, इतर काहीजण यहुदी परंपरेने प्रभावित झाल्यामुळे देवाचं नाव घेत नाहीत; त्यांना अशी भीती वाटते, की देवाचं नाव उच्चारल्याने ते नाव अपवित्र होईल. आणि असेही काही जण आहेत ज्यांना वाटतं, की देवाच्या नावाचा नेमका उच्चार काय आहे हे कोणालाही माहीत नाही. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे, की देवाच्या नावाऐवजी “प्रभू” किंवा “देव” यांसारख्या पदव्या वापरणंच बरं आहे. पण बायबलच्या भाषांतरांतून देवाचं नाव काढून टाकायची ही काही ठोस कारणं नाहीत. असं आपण का म्हणू शकतो?

  •  सर्वशक्‍तिमान देवाला ओळखण्यासाठी एका खास नावाची गरज नाही, असं म्हणणारे लोक एका पुराव्याकडे दुर्लक्ष करतात; तो म्हणजे, सुरुवातीच्या हस्तलिखितांमध्ये आणि ख्रिस्तपूर्व काळापासून सुरक्षित असलेल्या हस्तलिखितांमध्ये देवाचं नाव सापडतं. शिवाय, या लेखात आधी सांगितल्याप्रमाणे, देवानेच बायबलच्या लेखकांना त्याच्या वचनात जवळजवळ ७,००० वेळा त्याच्या नावाचा उल्लेख करण्याची प्रेरणा दिली होती. यावरून हे स्पष्ट होतं, की आपल्याला देवाचं नाव माहीत व्हावं आणि आपण त्या नावाचा उपयोग करावा अशी त्याची इच्छा आहे.

  •  यहुदी परंपरेने प्रभावित होऊन ज्या भाषांतरकारांनी आपल्या भाषांतरांमधून देवाचं नाव काढून टाकलं, ते एक महत्त्वाची गोष्ट विचारात घेत नाहीत. ती म्हणजे, बायबलच्या प्रती तयार करणारे काही यहुदी शास्त्री देवाचं नाव जरी उच्चारत नव्हते, तरी प्रती तयार करताना मात्र त्यांनी त्यांतून देवाचं नाव काढून टाकलं नव्हतं. मृत समुद्राजवळच्या कुमरान या ठिकाणी सापडलेल्या प्राचीन गुंडाळ्यांमध्ये बऱ्‍याच ठिकाणी देवाचं नाव दिसून आलं आहे. मूळ लिखाणांत अमुक ठिकाणी देवाचं नाव दिलं आहे, हे दाखवण्यासाठी काही भाषांतरकारांनी आपल्या भाषांतरात तिथे मोठ्या अक्षरांत “प्रभू” हा शब्द दिला आहे. पण तरीही काही प्रश्‍न राहतातच: हे भाषांतरकार जर ही गोष्ट कबूल करतात, की मूळ लिखाणांमध्ये हजारो वेळा देवाचं नाव दिलं आहे, तर मग त्यांनी स्वतःच्या मनाप्रमाणे बायबलमधून देवाचं नाव का काढून टाकलं? किंवा त्या नावाऐवजी दुसरा शब्द का वापरला? हा बदल करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? याचं उत्तर तेच देऊ शकतात.

  •  देवाच्या नावाचा नेमका उच्चार कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे त्या नावाचा उपयोग करू नये असं म्हणणारे अनेक जण, येशूच्या नावाचा मात्र सर्रासपणे उपयोग करतात. पण, आज बहुतेक ख्रिस्ती लोक येशूच्या नावाचा जसा उच्चार करतात, तसा पहिल्या शतकातले येशूचे शिष्य मुळीच करत नव्हते. पहिल्या शतकातले यहुदी ख्रिस्ती, येशूच्या नावाचा उच्चार कदाचित येशुआ  असा करायचे. आणि “ख्रिस्त” या पदवीचा उच्चार ते मशीआख  किंवा “मसीहा” असा करायचे. ग्रीक भाषा बोलणारे ख्रिस्ती लोक येशूला ईसोअस ख्रिस्तोस  म्हणायचे, तर लॅटिन भाषा बोलणारे ख्रिस्ती लोक त्याला ईसूस ख्रिस्तूस  असं म्हणायचे. बायबलमध्ये देवाच्या प्रेरणेने येशूच्या नावाचा ग्रीक उच्चार नमूद करण्यात आला आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते; ती म्हणजे, पहिल्या शतकातले लोक येशूच्या नावाचा सहसा जसा उच्चार करायचे, तसाच उच्चार नमूद करून त्या काळातल्या ख्रिश्‍चनांनी सुज्ञता दाखवली. अगदी तसंच, नवे जग बायबल भाषांतर समितीला वाटतं, की प्राचीन हिब्रू भाषेत देवाच्या नावाचा नेमका उच्चार कसा केला जायचा हे जरी माहीत नसलं, तरी इंग्रजीमध्ये देवाच्या नावासाठी “जेहोवा” हा उच्चार वापरणं योग्य आहे.

इंग्रजीतल्या नवे जग भाषांतरया आवृत्तीत देवाच्या नावासाठी “जेहोवा” हा उच्चार का वापरला आहे? इंग्रजी भाषेत, टेट्राग्रमॅटन (יהוה) या चार अक्षरांसाठी YHWH  ही व्यंजनं a वापरली जातात. लोक प्राचीन काळात जेव्हा हिब्रू भाषा लिहायचे, तेव्हा ते शब्दांमध्ये स्वरांचा b उपयोग करत नव्हते. त्यामुळे टेट्राग्रमॅटन या चार अक्षरांमध्येही स्वर वापरले गेले नव्हते. पूर्वीच्या काळी, रोजच्या जीवनात प्राचीन हिब्रू भाषा वापरली जायची, तेव्हा एखाद्या शब्दात कोणता स्वर जोडून वाचायचं हे वाचकाला चांगलं माहीत होतं.

हिब्रू शास्त्रवचनांचं लिखाण पूर्ण झाल्यावर, जवळजवळ हजार वर्षांनंतर यहुदी विद्वानांनी हिब्रू शब्दांचा उच्चार कसा करायचा हे समजण्यासाठी एक पद्धत तयार केली. या पद्धतीत, हिब्रू भाषा वाचताना एखाद्या शब्दात कोणता स्वर जोडायचा हे दाखवण्यासाठी काही चिन्ह किंवा खुणा वापरल्या होत्या. पण ही पद्धत तयार करण्यात आली, तोपर्यंत अनेक यहुदी लोकांमध्ये अशी अंधश्रद्धा पसरली होती, की देवाचं नाव मोठ्याने उच्चारणं चुकीचं आहे. त्यामुळे त्या नावाच्या जागी त्यांनी इतर पर्यायी शब्दांचा किंवा पदव्यांचा उपयोग केला. म्हणून असं दिसतं, की हस्तलिखितांच्या प्रती तयार करताना देवाचं नाव सूचित करणाऱ्‍या टेट्राग्रमॅटन या चार व्यंजनांमध्ये पर्यायी शब्दांतले  स्वर जोडण्यात आले. त्यामुळे, स्वर जोडून वाचण्यासाठी हस्तलिखितांमध्ये दिलेल्या खुणांवरून हे सांगणं कठीण आहे, की मूळ हिब्रू भाषेत देवाच्या नावाचा उच्चार नेमका कसा केला जायचा. काहींना असं वाटतं की या नावाचा उच्चार “याव्हे,” असा केला जायचा, तर इतर काहींना वाटतं की त्याचा उच्चार वेगळ्या पद्धतीने केला जायचा. मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळ्यांमध्ये ग्रीक भाषेत अनुवाद केलेला लेवीय पुस्तकाचा काही भाग सापडला; त्यात, देवाचं नाव ग्रीक लिपीत लिहिलेलं असलं, तरी त्याचा हिब्रू भाषेतला उच्चार याओ  असाच ठेवण्यात आला आहे. याशिवाय, सुरुवातीचे ग्रीक लेखक देवाच्या नावाचा उच्चार याए, याबे  आणि याऊवे  असाही केला जाऊ शकतो असं म्हणतात. पण, देवाच्या नावाचा अमुक एका पद्धतीनेच उच्चार केला पाहिजे असं ठामपणे म्हणता येणार नाही. कारण, प्राचीन काळातले देवाचे सेवक हिब्रू भाषेत त्याच्या नावाचा उच्चार कसा करायचे हे कोणालाही माहीत नाही. (उत्पत्ती १३:४; निर्गम ३:१५) पण, एक गोष्ट मात्र आपल्याला नक्की माहीत आहे; ती म्हणजे, आपल्या लोकांशी बोलताना देवाने अनेकदा स्वतःच्या नावाचा वापर केला. याशिवाय, देवाचे लोक याच नावाचा उपयोग करून त्याला प्रार्थना करायचे, आणि इतरांशी बोलतानाही ते सर्रासपणे हे नाव वापरायचे.​—निर्गम ६:२; १ राजे ८:२३; स्तोत्रं ९९:९.

तर मग, इंग्रजीतल्या नवे जग भाषांतर  या आवृत्तीत देवाच्या नावासाठी “जेहोवा” हा उच्चार का वापरला आहे? कारण यासाठी इंग्रजी भाषेत फार पूर्वीपासून हाच उच्चार वापरण्यात आला आहे.

विल्यम टिंडेल यांचं १५३० सालातलं पेन्टेट्यूकचं भाषांतर; यात उत्पत्ती १५:२ या वचनात असलेलं देवाचं नाव

इंग्रजी बायबलमध्ये देवाच्या नावाचा पहिल्यांदा उल्लेख करण्यात आला तो १५३० मध्ये; त्या वेळी विल्यम टिंडेल यांनी, बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांच्या (पेन्टेट्यूक) आपल्या भाषांतरात त्या नावाचा उल्लेख “येहुआ” असा केला. काही काळाने इंग्रजी भाषेत बदल झाला आणि देवाच्या नावासाठी आधुनिक शब्द-लेखन वापरलं गेलं. उदाहरणार्थ, १६१२ मध्ये हेन्री आईन्सवर्थ यांनी स्तोत्रं या पुस्तकाच्या आपल्या भाषांतरात सगळीकडे “येहोवा” हा उच्चार वापरला. मग १६३९ मध्ये जेव्हा या पुस्तकाची सुधारित आवृत्ती पेन्टेट्यूकसोबत प्रकाशित करण्यात आली, तेव्हा त्यात “जेहोवा” हा उच्चार वापरला गेला. पुढे १९०१ मध्ये, अमेरिकन स्टॅन्डर्ड व्हर्शन  हे बायबल तयार करणाऱ्‍या भाषांतरकारांनी, हिब्रू लिखाणांत जिथे-जिथे देवाचं नाव आलं आहे तिथे-तिथे “जेहोवा” हा उच्चार वापरला.

बायबलचे प्रतिष्ठित विद्वान, जोसेफ ब्राएन्ट रॉदरहॅम यांनी सन १९११ मध्ये प्रकाशित केलेल्या स्टडीज इन द साम्स  या आपल्या पुस्तकात “याव्हे” ऐवजी “जेहोवा” हा उच्चार वापरला आहे. त्यांनी असं का केलं याचं कारण सांगताना ते म्हणाले, की “बायबलचं वाचन करणाऱ्‍या सर्वसामान्य लोकांना देवाच्या नावाचा जो उच्चार जास्त माहीत आहे (पण त्याच वेळी त्यांना खटकणारही नाही), तो उच्चार वापरायची त्यांची इच्छा होती.” १९३० मध्ये ए. एफ. कर्कपॅट्रिक यांनी “जेहोवा” हा उच्चार वापरण्याच्या बाबतीत काहीसा असाच मुद्दा मांडला. ते म्हणाले: “आजच्या काळातल्या व्याकरणाच्या विद्वानांचं असं ठाम मत आहे, की हे नाव याहवे  किंवा याहावे  असं उच्चारलं पाहिजे. पण, इंग्रजी भाषेत या नावासाठी जेहोवा हाच उच्चार रुळला आहे. शिवाय, या नावाचा नेमका उच्चार कसा करायचा हा महत्त्वाचा मुद्दा नाही. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की ही ‘प्रभू’ किंवा त्यासारखी एखादी पदवी नसून एक वैयक्‍तिक नाव आहे ही गोष्ट ओळखणं.” मराठी भाषेत देवाच्या नावाचा उच्चार “यहोवा” असा केला जातो. आणि काही मराठी बायबलमध्येही हाच उच्चार वापरण्यात आला आहे.

YHWH, टेट्राग्रमॅटन: “तो व्हायला लावतो”

HWH क्रियापद: “बनणं” किंवा “होणं”

यहोवा या नावाचा काय अर्थ होतो? हिब्रू भाषेत, हे नाव एका क्रियापदावरून आलं आहे आणि त्याचा अर्थ “बनणं” किंवा “होणं” असा होतो. अनेक विद्वानांना असं वाटतं, की या ठिकाणी जे क्रियापद वापरण्यात आलं आहे ते प्रयोजक क्रियापद आहे; म्हणजे, कर्ता एखादी क्रिया स्वतः करत नसून, तो ती दुसऱ्‍या कोणालातरी किंवा कशालातरी करायला लावतो अशा अर्थाचं क्रियापद. त्यामुळे, नवे जग बायबल भाषांतर समितीला असं वाटतं, की देवाच्या नावाचा अर्थ “तो व्हायला लावतो,” असा होतो. त्याच्या अर्थाबद्दल मात्र विद्वानांची वेगवेगळी मतं आहेत. म्हणून, या नावाचा हाच अर्थ आहे असा दावा आम्ही करत नाही. पण, यहोवा हा सर्व काही निर्माण करणारा आणि आपला संकल्प पूर्ण करणारा देव आहे. त्यामुळे त्याच्या या भूमिकेला हा अर्थ अगदी योग्य वाटतो. देवाने विश्‍व, मानव आणि स्वर्गदूत हे सगळं तर निर्माण केलंच; पण त्यासोबतच तो आपल्या निर्मितीशी आणि संकल्पाशी संबंधित असलेल्या परिस्थितींना आणि घटनांनाही आपल्या मनाप्रमाणे वळण देऊ शकतो.

म्हणूनच निर्गम ३:१४ मध्ये दिलेल्या क्रियापदावरून यहोवाच्या नावाचा जो अर्थ येतो तेवढाच फक्‍त त्याचा अर्थ होत नाही; म्हणजे, “मला जे व्हायचं आहे, ते मी होईन,” किंवा “मी जे सिद्ध होईन, ते सिद्ध होईन,” असा जो अर्थ येतो तितकाच त्याचा अर्थ होत नाही. खरंतर हे शब्द यहोवाच्या नावाचा संपूर्ण अर्थ देत नाहीत. ते फक्‍त इतकंच सांगतात, की आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी देव परिस्थितीनुसार त्याला पाहिजे ते होऊ शकतो. पण, देवाच्या नावाचा अर्थ फक्‍त इतकाच नाही, की परिस्थितीनुसार देव त्याला पाहिजे ते होऊ शकतो; तर आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी तो आपल्या निर्मितीला जे पाहिजे ते व्हायला लावतो, हा अर्थसुद्धा त्यात समाविष्ट आहे.

a स्वर नसलेली अक्षरं.

b स्वर म्हणजे ज्या अक्षरांचा उच्चार स्वतंत्रपणे पूर्ण होतो अशी अक्षरं. उदा. अ, आ, इ, ई, . . . . ओ, औ यांसारखी अक्षरं.