अनुवाद १२:१-३२
१२ तुमच्या वाडवडिलांचा देव यहोवा तुम्हाला ज्या देशाचा ताबा देईल, त्या देशात तुम्ही आयुष्यभर हे नियम आणि न्याय-निर्णय काळजीपूर्वक पाळा.
२ ज्या राष्ट्रांना तुम्ही हाकलून लावाल, त्यांतल्या लोकांनी आपल्या देवांची ज्या ज्या ठिकाणी उपासना केली होती, ती सर्व ठिकाणं तुम्ही पूर्णपणे नष्ट करा;+ मग ती उंच पर्वतांवर, डोंगरांवर किंवा कोणत्याही हिरव्यागार झाडाखाली असो.
३ तुम्ही त्यांच्या वेदी आणि पूजेचे स्तंभ फोडून टाका,+ त्यांचे पूजेचे खांब* जाळून टाका आणि त्यांच्या देवांच्या कोरलेल्या प्रतिमा तोडून टाका.+ तुम्ही त्या ठिकाणातून त्यांच्या देवांचं नामोनिशाण मिटवून टाका.+
४ ते आपल्या देवांची ज्या प्रकारे उपासना करतात, त्या प्रकारे तुम्ही तुमचा देव यहोवा याची उपासना करू नका.+
५ याउलट, तुमच्या वंशांना दिलेल्या प्रदेशांतून, तुमचा देव यहोवा आपल्या नावाच्या गौरवासाठी आणि आपल्या राहण्यासाठी जे ठिकाण निवडेल, तिथे जाऊन त्याची उपासना करा.+
६ आणि त्याच ठिकाणी तुम्ही आपली होमार्पणं,+ बलिदानं, दशमांश,*+ दानं,+ नवसाची अर्पणं, स्वेच्छेने दिलेली अर्पणं+ आणि तुमच्या गुराढोरांच्या व मेंढरांच्या कळपातले पहिले जन्मलेले प्राणी आणा.+
७ तुम्ही आणि तुमच्या घराण्यातले सर्व जण त्या ठिकाणी तुमचा देव यहोवा याच्यासमोर जेवा+ आणि तुमच्या सर्व कामांत तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आशीर्वाद दिल्यामुळे आनंद करा.+
८ आज इथे, जसं आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या मनाला योग्य वाटेल ते* करत आहे, तसं त्या ठिकाणी करू नका;
९ कारण तुमचा देव यहोवा, जो देश तुम्हाला विश्रांतीचं ठिकाण+ आणि वारसा म्हणून देणार आहे, तिथे तुम्ही अजून पोहोचला नाहीत.
१० पण जेव्हा तुम्ही यार्देन ओलांडाल+ आणि तुमचा देव यहोवा ज्या देशाचा ताबा तुम्हाला देत आहे तिथे राहू लागाल, तेव्हा तो तुमच्या आजूबाजूच्या सर्व शत्रूंपासून तुम्हाला विश्रांती देईल आणि तुम्ही तिथे सुरक्षितपणे राहाल.+
११ तुमचा देव यहोवा त्याच्या नावाच्या गौरवासाठी जे ठिकाण निवडेल,+ त्या ठिकाणी मी आज्ञा देत असलेल्या सर्व गोष्टी तुम्ही आणा, म्हणजे तुमची होमार्पणं, बलिदानं, दशमांश,+ दानं आणि यहोवाला केलेल्या नवसाची अर्पणं.
१२ तुम्ही तुमच्या मुलामुलींसोबत, दासदासींसोबत; तसंच तुमच्या शहरांत* राहणारे लेवी, ज्यांना तुमच्यासोबत जमिनीचा वाटा किंवा वारसा मिळालेला नाही,+ त्यांच्यासोबत तुमचा देव यहोवा याच्यासमोर आनंद करा.+
१३ सांभाळा, मनाला वाटेल तसं इतर कोणत्याही ठिकाणी आपली होमार्पणं देऊ नका.+
१४ तुमच्या वंशांना दिलेल्या एखाद्या प्रदेशातून यहोवा जे ठिकाण निवडेल, तिथेच तुम्ही आपली होमार्पणं द्या आणि मी तुम्हाला आज्ञा देत असलेल्या सर्व गोष्टी तिथे करा.+
१५ पण जेव्हाही तुम्हाला इच्छा होईल, तेव्हा तुम्ही राहत असलेल्या सर्व शहरांत* तुमचा देव यहोवा याने तुम्हाला दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे, तुम्ही प्राणी कापून त्याचं मांस खाऊ शकता.+ तुम्ही सांबराचं किंवा हरणाचं मांस खाता, त्याच प्रकारे हे मांससुद्धा शुद्ध किंवा अशुद्ध अशी कोणतीही व्यक्ती खाऊ शकते.
१६ पण तुम्ही त्या प्राण्याचं रक्त खाऊ नका;+ ते पाण्यासारखं जमिनीवर ओतून टाका.+
१७ तुमच्या धान्याचा, नवीन द्राक्षारसाचा व तेलाचा दहावा भाग; तुमच्या गुराढोरांच्या वा मेंढराच्या कळपातले पहिले जन्मलेले; तसंच, तुम्ही केलेल्या नवसांची अर्पणं, स्वेच्छेने दिलेली अर्पणं किंवा तुम्ही दिलेली दानं, यांपैकी काहीही तुमच्या शहरांत* खाण्याची तुम्हाला परवानगी नाही.+
१८ हे सर्व तुम्ही तुमचा देव यहोवा निवडेल त्या ठिकाणी, तुमच्या मुलामुलींसोबत व दासदासींसोबत; तसंच, तुमच्या शहरांत* राहणाऱ्या लेव्यांसोबत तुमचा देव यहोवा याच्यासमोर खा+ आणि तुमच्या सर्व कामांबद्दल तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यासमोर आनंद करा.
१९ त्या देशात राहत असताना, तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यभर लेव्यांकडे दुर्लक्ष करू नका.+
२० तुमचा देव यहोवा याने तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे+ जेव्हा तो तुमच्या देशाच्या सीमा वाढवेल,+ आणि जेव्हा तुम्हाला मांस खायची इच्छा होईल आणि तुम्ही म्हणाल, ‘मला मांस खायचंय,’ तेव्हा तुम्ही कधीही ते खाऊ शकता.+
२१ जर यहोवाने आपल्या नावाच्या गौरवासाठी निवडलेलं ठिकाण+ तुमच्या राहत्या ठिकाणापासून दूर असेल, तर यहोवाने दिलेल्या गुराढोरांच्या किंवा मेंढरांच्या कळपातून तुम्हाला वाटेल तेव्हा, मी तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे प्राणी कापा आणि तुमच्या शहरांमध्ये* खा.
२२ तुम्ही सांबराचं किंवा हरणाचं मांस खाता,+ त्याच प्रकारे हे मांससुद्धा शुद्ध किंवा अशुद्ध अशी कोणतीही व्यक्ती खाऊ शकते.
२३ फक्त त्याचं रक्त न खाण्याचा पक्का निश्चय करा.+ कारण रक्त हे जीवन* आहे+ आणि तुम्ही मांसासोबत जीवन* खाऊ नका.
२४ तुम्ही रक्त खाऊ नका; ते पाण्यासारखं जमिनीवर ओतून टाका.+
२५ तुम्ही ते खाऊ नका, म्हणजे तुमचं आणि तुमच्या मुलांचं भलं होईल, कारण तुम्ही यहोवाच्या नजरेत योग्य ते करत आहात.
२६ यहोवाने निवडलेल्या ठिकाणी, तुम्ही फक्त आपल्या पवित्र वस्तू आणि आपल्या नवसाची अर्पणं घेऊन जा.
२७ तिथे तुमचा देव यहोवा याच्या वेदीवर तुम्ही आपली होमार्पणं त्यांच्या मांसासोबत आणि रक्तासोबत अर्पण करा.+ तुम्ही दिलेल्या बलिदानांचं रक्त तुमचा देव यहोवा याच्या वेदीच्या बाजूला ओतून टाका.+ पण त्याचं मांस तुम्ही खाऊ शकता.
२८ मी तुम्हाला सांगत असलेल्या सर्व गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुमचं आणि तुमच्या मुलांचं भलं होईल. कारण तुम्ही आपला देव यहोवा याच्या नजरेत जे चांगलं आणि योग्य आहे ते करत आहात.
२९ तुम्ही ज्या राष्ट्रांना हाकलून लावणार आहात, त्या राष्ट्रांचा जेव्हा तुमचा देव यहोवा सर्वनाश करेल+ आणि तुम्ही त्यांच्या देशात राहू लागाल;
३० तेव्हा सांभाळा, नाहीतर तुमच्यासमोरून नाश झालेल्या राष्ट्रांप्रमाणेच तुम्हीही पाशात पडाल. तुम्ही त्यांच्या देवांबद्दल असं विचारू नका, की ‘ही राष्ट्रं त्यांच्या देवांची उपासना कशी करायची? आम्हीही तसंच करू.’+
३१ पण तुम्ही आपला देव यहोवा याची त्यांच्यासारखी उपासना करू नका; कारण यहोवाला ज्यांचा द्वेष आहे अशा सगळ्या घृणास्पद गोष्टी ते त्यांच्या देवांसाठी करतात. ते तर स्वतःच्या मुलामुलींनाही त्यांच्या देवांसाठी आगीत अर्पण करतात.+
३२ मी तुम्हाला आज्ञा देत असलेला प्रत्येक शब्द तुम्ही काळजीपूर्वक पाळा.+ त्यात भर घालू नका किंवा त्यातून काही कमी करू नका.+
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “दहावे भाग.”
^ किंवा “आपल्या दृष्टीने योग्य आहे ते.”
^ शब्दशः “फाटकांच्या आत.”
^ शब्दशः “तुमच्या सर्व फाटकांच्या आत.”
^ शब्दशः “तुमच्या फाटकांच्या आत.”
^ शब्दशः “फाटकांच्या आत.”
^ शब्दशः “फाटकांच्या आत.”
^ किंवा “जीव.”
^ किंवा “जीव.”