ईयोब १:१-२२

  • ईयोबचा खरेपणा आणि संपत्ती (१-५)

  • सैतान ईयोबच्या हेतूंबद्दल शंका व्यक्‍त करतो (६-१२)

  • ईयोब आपली संपत्ती आणि मुलं गमावतो (१३-१९)

  • ईयोब देवाला दोष देत नाही (२०-२२)

 ऊस देशात ईयोब*+ नावाचा एक माणूस राहायचा. तो सरळ मार्गाने आणि खरेपणाने चालणारा होता.*+ तो देवाला भिऊन वागायचा आणि वाईट गोष्टींचा द्वेष करायचा.+ २  त्याला सात मुलं आणि तीन मुली होत्या. ३  त्याच्याकडे ७,००० मेंढरं, ३,००० उंट, १,००० गुरंढोरं* आणि ५०० गाढवं* होती. त्याच्याकडे बरेच नोकरचाकरही होते. त्यामुळे, तो पूर्वेकडच्या लोकांमधला सर्वात श्रीमंत माणूस होता. ४  त्याच्या मुलांपैकी प्रत्येक जण आपल्या ठरलेल्या दिवशी घरी* मेजवानी ठेवायचा. ते त्यांच्या तिन्ही बहिणींनाही आपल्यासोबत खायला-प्यायला बोलवायचे. ५  त्या सगळ्यांच्या घरी मेजवानी झाल्यावर ईयोब त्यांना शुद्ध करण्यासाठी आपल्याकडे बोलावून घ्यायचा. मग तो पहाटे उठून त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी होमार्पणं द्यायचा.+ ईयोब नेहमी असंच करायचा. कारण तो म्हणायचा: “कदाचित माझ्या मुलांनी पाप केलं असेल आणि मनात देवाला शाप दिला असेल.”+ ६  मग एक दिवशी सगळे स्वर्गदूत*+ यहोवासमोर* आले+ आणि सैतानही+ त्यांच्यासोबत आला.+ ७  तेव्हा यहोवाने सैतानाला विचारलं: “तू कुठून आलास?” सैतानाने यहोवाला उत्तर दिलं: “मी पृथ्वीवर इकडे-तिकडे हिंडून फिरून आलो.”+ ८  मग यहोवा सैतानाला म्हणाला: “माझा सेवक ईयोब याच्याकडे तू लक्ष दिलंस का?* पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही. तो सरळ मार्गाने आणि खरेपणाने चालणारा आहे.*+ तो देवाला भिऊन वागतो आणि वाईट गोष्टींचा द्वेष करतो.” ९  तेव्हा सैतान यहोवाला म्हणाला: “ईयोब उगाच देवाला भिऊन वागतो का?+ १०  त्याला, त्याच्या घराला आणि त्याच्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याभोवती तू कुंपण घातलं आहेस ना?+ तू त्याच्या सर्व कामांवर आशीर्वाद दिला आहेस+ आणि सबंध देशात त्याची गुरंढोरं वाढत आहेत. ११  पण आता तू आपला हात पुढे करून त्याचं सर्वकाही काढून घे. मग पाहा, तो नक्की तुझ्या तोंडावर तुझी निंदा करेल.” १२  यावर यहोवा सैतानाला म्हणाला: “पाहा! त्याच्याकडे असलेलं सर्वकाही तुझ्या हातात आहे.* फक्‍त त्याच्या शरीराला धक्का लावू नकोस!” तेव्हा सैतान यहोवाच्या समोरून* निघून गेला.+ १३  मग एक दिवशी ईयोबची मुलं आणि त्याच्या मुली, हे सर्व त्यांच्या सगळ्यात मोठ्या भावाच्या घरी मेजवानी करत आणि द्राक्षारस पीत होते.+ १४  तेवढ्यात एक माणूस ईयोबकडे ही बातमी घेऊन आला: “गुरं नांगरणी करत होती आणि बाजूला गाढवं चरत होती, १५  तेव्हा शबाई लोकांनी हल्ला केला आणि ते त्यांना घेऊन गेले. त्यांनी सर्व सेवकांना तलवारीने मारून टाकलं. मी एकटाच वाचलो आणि तुम्हाला हे सांगायला आलो.” १६  तो हे सांगतच होता, इतक्यात आणखी एक जण आला आणि म्हणाला: “आकाशातून देवाची आग* आली आणि तिने मेंढरांना आणि सेवकांना भस्म करून टाकलं! मी एकटाच वाचलो आणि तुम्हाला हे सांगायला आलो.” १७  तो हे सांगतच होता, इतक्यात आणखी एक जण आला आणि म्हणाला: “खास्द्यांनी+ तीन गट करून उंटांवर हल्ला केला आणि त्यांना पळवून नेलं. त्यांनी सेवकांनाही तलवारीने मारून टाकलं. मी एकटाच वाचलो आणि तुम्हाला हे सांगायला आलो.” १८  तो हे सांगतच होता, इतक्यात आणखी एक जण आला आणि म्हणाला: “तुमची मुलं आपल्या मोठ्या भावाच्या घरी मेजवानी करत आणि द्राक्षारस पीत होती; १९  तेव्हा अचानक ओसाड रानातून जोराचं वादळ आलं. घराला चारही बाजूंनी वादळाचा तडाखा बसल्यामुळे, ते तुमच्या मुलांवर कोसळलं आणि ती सर्व मरून गेली. मी एकटाच वाचलो आणि तुम्हाला हे सांगायला आलो.” २०  हे ऐकल्यावर ईयोब उठून उभा राहिला आणि त्याने आपला झगा फाडला. त्याने आपल्या डोक्याचं मुंडण केलं; मग तो जमिनीवर पालथा पडला आणि नमन करून २१  म्हणाला: “मी माझ्या आईच्या पोटातून उघडाच आलो,आणि उघडाच परत जाईन.+ यहोवाने दिलं+ आणि यहोवानेच परत घेतलं. यहोवाच्या नावाची स्तुती होत राहो.” २२  इतकं सर्व होऊनही, ईयोबने पाप केलं नाही किंवा चुकीचं काही केल्याचा देवावर आरोप लावला नाही.

तळटीपा

म्हणजे कदाचित, “ज्याचा द्वेष करण्यात आला.”
किंवा “निर्दोष होता आणि सरळ मार्गाने चालायचा.”
शब्दशः “गुराढोरांच्या ५०० जोड्या.”
शब्दशः “गाढव्या.”
किंवा “आळीपाळीने आपापल्या घरी.”
शब्दशः “देवाची मुलं.” हिब्रू भाषेत स्वर्गदूतांना सूचित करणारा वाक्यांश.
शब्दशः “आपलं हृदय लावलंस का?”
किंवा “निर्दोष आहे आणि सरळ मार्गाने चालतो.”
किंवा “तुझ्या ताब्यात आहे.”
शब्दशः “चेहऱ्‍यासमोरून.”
किंवा कदाचित, “वीज.”