ईयोब ४१:१-३४
-
देव अद्भुत लिव्याथानचं वर्णन करतो (१-३४)
४१ तू लिव्याथानला*+ गळाने पकडू शकतोस का?
त्याची जीभ तू दोरीने बांधू शकतोस का?
२ त्याच्या नाकात तू वेसण* घालू शकतोस का?
किंवा त्याच्या जबड्यांमध्ये आकडा* टोचू शकतोस का?
३ तो तुझ्यापुढे गयावया करेल का?
किंवा तुझ्याशी प्रेमाने बोलेल का?
४ आयुष्यभर तुझा गुलाम बनून राहण्यासाठी,तो तुझ्याशी करार करेल का?
५ पक्ष्यासोबत खेळावं, तसं तू त्याच्याशी खेळशील का?
तुझ्या लहान मुलींना खेळण्यासाठी, त्याला दोरीने बांधशील का?
६ व्यापारी त्याचा सौदा करतील का?
ते त्याला आपसात वाटून घेतील का?
७ तू त्याच्या कातडीत बरच्या* भोसकशील का?+
किंवा त्याच्या डोक्यात भाले खुपसशील का?
८ त्याला हात लावून तर पाहा!
ती झुंज कायम तुझ्या लक्षात राहील; तू पुन्हा तसं धाडस करणार नाहीस!
९ त्याला काबीज करण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.
त्याला नुसतं पाहिलंस, तरी तुला धडकी भरेल.*
१० त्याला डिवचण्याचं धैर्य कोणीच करू शकत नाही.
मग माझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?+
११ मला कोणी काय दिलंय, की मी त्याची परतफेड करावी?+
आकाशाखाली जे काही आहे, ते सर्व माझंच आहे.+
१२ मी त्याच्या पायांबद्दल, त्याच्या ताकदीबद्दल,आणि त्याच्या बांधेसूद शरीराबद्दल सांगतो.
१३ त्याची कातडी कोण काढू शकतं?
त्याच्या जबड्यांमध्ये कोण शिरू शकतं?
१४ कोण त्याचं तोंड* बळजबरीने उघडू शकतं?
त्याचे दात भीतिदायक असतात.
१५ त्याच्या पाठीवर खवल्यांच्या रांगा असतात*ती सोबत घट्ट बसवलेली असतात.
१६ ती एकमेकांच्या इतकी जवळजवळ असतात,की त्यांच्यातून हवासुद्धा जाऊ शकत नाही.
१७ ती एकमेकांना चिकटलेली असतात;ती अशी घट्ट जोडलेली असतात, की त्यांना वेगळं करता येत नाही.
१८ तो फुरफुरतो तेव्हा प्रकाश चमकतो,त्याचे डोळे पहाटेच्या किरणांसारखे दिसतात.
१९ त्याच्या तोंडातून जणू चमकणाऱ्या विजा निघतात;आणि आगीच्या ठिणग्या उडतात.
२० गवताने पेटवलेल्या भट्टीतून निघावा,तसा धूर त्याच्या नाकपुड्यांतून निघतो.
२१ त्याच्या श्वासाने कोळसे पेटतात,आणि त्याच्या तोंडातून ज्वाला निघते.
२२ त्याच्या मानेत प्रचंड ताकद असते;त्याला पाहून सर्व भीतीने कावरेबावरे होतात.
२३ त्याच्या कातडीचे थर एकमेकांवर घट्ट बसलेले असतात;धातू ओतून तयार केल्याप्रमाणे, ते अगदी मजबूत आणि भक्कम असतात.
२४ त्याचं हृदय दगडासारखं;जात्याच्या तळीसारखं* कठीण असतं.
२५ तो उठतो तेव्हा शूरवीरसुद्धा भयभीत होतात;तो हालचाल करतो तेव्हा ते गांगरून जातात.
२६ तलवार त्याला हरवू शकत नाही;भाला, बाण किंवा कोणतंही शस्त्र त्याला लागत नाही.+
२७ लोखंड त्याला पेंढ्यासारखं;आणि तांबं कुजलेल्या लाकडासारखं वाटतं.
२८ तो बाणाच्या भीतीने पळून जात नाही;गोफणीतले दगड त्याला भुशासारखे वाटतात.
२९ सोटा त्याला गवताच्या पेंढीसारखा वाटतो;सळसळत येणाऱ्या भाल्याला तो हसतो.
३० त्याचं पोट धारदार खापरांसारखं असतं;तो ओंडक्यासारखा*+ मातीत लोळत असतो.
३१ तो समुद्रात उतरतो तेव्हा पाण्याला फेस येतो;ते भांड्यातल्या उकळत्या तेलासारखं दिसतं.
३२ तो पुढे जातो तेव्हा त्याच्यामागे पाणी चमकतं.
जणू समुद्राचे पांढरे केस!
३३ पृथ्वीवर त्याच्यासारखा प्राणी नाही;देवाने त्याला निर्भय बनवलंय.
३४ तो सर्व गर्विष्ठ प्राण्यांकडे नजर रोखून पाहतो.
तो सगळ्या शक्तिशाली जंगली पशूंचा राजा आहे.”
तळटीपा
^ कदाचित मगर.
^ किंवा “दोर.” शब्दशः “लव्हाळं.”
^ शब्दशः “काटा.”
^ भाल्यासारखं शस्त्र. कदाचित याला गळासारखी मागच्या बाजूला वळलेली टोकं असावीत.
^ किंवा “तू खाली आपटशील.”
^ शब्दशः “तोंडाचे दरवाजे.”
^ किंवा कदाचित, “खवल्यांच्या रांगा त्याचं भूषण आहेत.”
^ किंवा “खालच्या दगडासारखं.”
^ म्हणजे, मळणीसाठी वापरला जाणारा ओंडका.