ईयोब ४२:१-१७

  • ईयोबचं यहोवाला उत्तर (१-६)

  • तीन मित्रांना दोषी ठरवलं जातं (७-९)

  • यहोवा ईयोबला पुन्हा समृद्ध करतो (१०-१७)

    • ईयोबची मुलं आणि मुली (१३-१५)

४२  मग ईयोब यहोवाला म्हणाला:  २  “आता मला कळलंय, की तू सर्वकाही करू शकतोस;मनात आलेली कोणतीच गोष्ट करणं तुला अशक्य नाही.+  ३  तू म्हणालास, ‘ज्ञान नसताना बोलणाराआणि माझ्या संकल्पावर पडदा घालणारा हा कोण आहे?’+ हो, समज नसताना बोलणारा तो मीच होतो,मी अशा अद्‌भुत गोष्टींबद्दल बोललो, ज्यांबद्दल मला काही कळत नाही!+  ४  तू म्हणालास, ‘मी बोलतो ते कृपा करून ऐक. आता मी प्रश्‍न विचारतो आणि तू मला उत्तर दे.’+  ५  मी आपल्या कानांनी तुझ्याबद्दल ऐकलं होतं,पण आता मी प्रत्यक्ष तुला डोळ्यांनी पाहतोय.  ६  म्हणून मी आपले शब्द मागे घेतो+ आणि धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करतो.”+ ७  यहोवाचं ईयोबशी बोलणं झाल्यावर, यहोवा अलीफज तेमानी याला म्हणाला: “तुझा आणि तुझ्या दोन मित्रांचा मला खूप संताप आलाय.+ कारण, माझा सेवक ईयोब याच्याप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल खरं बोलला नाहीत.+ ८  म्हणून, आता सात बैल आणि सात मेंढे घेऊन माझा सेवक ईयोब याच्याकडे जा आणि स्वतःसाठी होमार्पण द्या. मग तो तुमच्यासाठी प्रार्थना करेल.+ कारण, माझा सेवक ईयोब याच्याप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल खरं बोलला नाहीत. पण, मी त्याची विनंती मान्य करीन* आणि तुम्हाला तुमच्या मूर्खपणाची शिक्षा देणार नाही.” ९  म्हणून, अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथी यांनी जाऊन यहोवाच्या सांगण्याप्रमाणे केलं. तेव्हा, यहोवाने ईयोबची प्रार्थना ऐकली. १०  ईयोबने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केल्यावर+ यहोवाने ईयोबवर आलेली संकटं दूर करून+ त्याला पूर्वीसारखंच वैभव दिलं.* त्याच्याकडे पूर्वी जे काही होतं, त्याच्या दुप्पट यहोवाने त्याला दिलं.+ ११  मग त्याचे सर्व भाऊ आणि बहिणी, तसंच पूर्वीचे त्याचे सर्व मित्र+ त्याच्या घरी जेवायला आले. यहोवाने त्याच्यावर जे संकट येऊ दिलं होतं, त्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्‍त केलं आणि त्याचं सांत्वन केलं. प्रत्येकाने त्याला चांदीचा एक तुकडा आणि सोन्याची एक अंगठी दिली. १२  अशा रितीने, यहोवाने ईयोबच्या सुरुवातीच्या दिवसांपेक्षा त्याच्या आयुष्यातल्या नंतरच्या दिवसांत त्याला जास्त आशीर्वाद दिले.+ ईयोबकडे १४,००० मेंढरं, ६,००० उंट, गुराढोरांच्या १,००० जोड्या आणि १,००० गाढव्या झाल्या.+ १३  तसंच, त्याला आणखी सात मुलं आणि आणखी तीन मुलीही झाल्या.+ १४  त्याने आपल्या पहिल्या मुलीचं नाव यमीमा, दुसरीचं कसीया आणि तिसरीचं केरेनहप्पूक ठेवलं. १५  संपूर्ण देशात ईयोबच्या मुलींइतक्या सुंदर स्त्रिया नव्हत्या. ईयोबने आपल्या मुलांसोबतच, आपल्या मुलींनाही संपत्तीचा वाटा दिला. १६  यानंतर ईयोब आणखी १४० वर्षं जगला. त्याने एकूण चार पिढ्यांपर्यंत आपली मुलं आणि नातवंडं-पतवंडं पाहिली. १७  शेवटी, बरीच वर्षं जगल्यावर ईयोब सुखाने* मरण पावला.

तळटीपा

शब्दशः “मी नक्की त्याचा चेहरा वर करीन.”
शब्दशः “यहोवाने ईयोबचा बंदिवास संपवला.”
शब्दशः “म्हातारा आणि भरपूर दिवसांचा होऊन.”