उत्पत्ती २३:१-२०
-
साराचा मृत्यू आणि पुरण्याचं ठिकाण (१-२०)
२३ सारा एकूण १२७ वर्षं जगली.+
२ मग कनान+ देशात किर्याथ-अर्बा+ म्हणजेच हेब्रोन+ इथे तिचा मृत्यू झाला. तेव्हा अब्राहाम सारासाठी शोक करून रडू लागला.
३ त्यानंतर तो आपल्या बायकोच्या मृतदेहासमोरून उठला आणि हेथच्या+ मुलांना म्हणाला:
४ “मी तुमच्यामध्ये राहायला आलेला एक विदेशी आहे.+ मला माझ्या बायकोला पुरण्यासाठी तुमच्या जमिनीतून थोडी जागा द्या.”
५ यावर हेथची मुलं त्याला म्हणाली:
६ “हे प्रभू, आमचं ऐक. तू आमच्यामध्ये देवाचा प्रधान* आहेस.+ आमच्या पुरण्याच्या जागांमधून तुला पाहिजे त्या ठिकाणी तुझ्या बायकोला तू पुरू शकतोस. आमच्यापैकी कोणाचीही पुरण्याची जागा तू वापरू शकतोस, तुला कोणीही अडवणार नाही.”
७ तेव्हा अब्राहाम उठला आणि त्या देशाच्या लोकांसमोर म्हणजे हेथच्या+ मुलांसमोर वाकून
८ त्यांना म्हणाला: “माझ्या बायकोला पुरण्यासाठी तुम्ही मला जमीन द्यायला तयार असाल, तर माझं ऐका आणि सोहरचा मुलगा एफ्रोन याला
९ त्याच्या मालकीची मकपेला नावाची गुहा मला विकण्याची विनंती करा. ती गुहा त्याच्या शेताच्या कडेला आहे. तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्याने माझ्याकडून तिच्या पूर्ण किंमतीइतकी चांदी घेऊन ती गुहा मला विकावी,+ म्हणजे मला माझ्या बायकोला पुरण्यासाठी जागा मिळेल.”+
१० हेथच्या मुलांसोबत एफ्रोनही तिथे बसला होता. म्हणून हित्ती एफ्रोन याने हेथच्या मुलांसमोर आणि त्याच्या शहराच्या फाटकातून येणाऱ्या सर्वांसमोर+ अब्राहामला असं उत्तर दिलं:
११ “नाही प्रभू माझं ऐक, माझ्या लोकांच्या साक्षीने मी माझं शेत आणि त्यात असलेली गुहा, दोन्ही तुला देतो. तू आपल्या बायकोला तिथे पूर.”
१२ तेव्हा अब्राहाम त्या लोकांसमोर खाली वाकला
१३ आणि त्या सर्वांसमोर एफ्रोनला म्हणाला: “कृपा करून माझं ऐक. तुझ्या शेतासाठी मी तुला चांदीची पूर्ण किंमत देतो. ती घे, म्हणजे मला माझ्या बायकोला तिथे पुरता येईल.”
१४ मग एफ्रोन अब्राहामला म्हणाला:
१५ “हे प्रभू, माझं ऐक. त्या जागेची किंमत ४०० चांदीचे शेकेल* इतकी आहे. पण ते इतकं महत्त्वाचं नाही. तू जाऊन आपल्या बायकोला पूर.”
१६ अब्राहामने एफ्रोनचं म्हणणं ऐकलं आणि हेथच्या मुलांसमोर एफ्रोनने सांगितली होती तितकी चांदी त्याला मोजून दिली. व्यापाऱ्यांनी ठरवलेल्या वजनाप्रमाणे त्याने ४०० चांदीचे शेकेल* त्याला दिले.+
१७ अशा रितीने मम्रेच्या समोर मकपेला इथे असलेलं एफ्रोनचं शेत; म्हणजेच ते शेत, त्यात असलेली गुहा, आणि शेताच्या हद्दीत असलेली सगळी झाडं, ही ठरल्याप्रमाणे
१८ अब्राहामच्या मालकीची झाली. हेथच्या मुलांच्या आणि त्याच्या शहराच्या फाटकातून येणाऱ्या सगळ्यांच्या साक्षीने हा व्यवहार झाला.
१९ त्यानंतर अब्राहामने आपली बायको सारा हिला मकपेलाच्या शेतात असलेल्या गुहेत पुरलं. हे शेत कनान देशातल्या मम्रेच्या, म्हणजेच हेब्रोनच्या समोर होतं.
२० अशा रितीने हेथच्या मुलांनी ते शेत आणि त्यात असलेली गुहा, पुरण्यासाठी जागा म्हणून अब्राहामच्या ताब्यात दिली.+
तळटीपा
^ किंवा कदाचित, “एक महान प्रधान.”