उपदेशक ६:१-१२

  • संपत्ती असून उपभोग नाही (१-६)

  • तुमच्याजवळ जे आहे त्याचा आताच आनंद घ्या (७-१२)

 सूर्याखाली मी आणखी एक दुःखाची गोष्ट* पाहिली आहे आणि माणसांमध्ये ती सहसा पाहायला मिळते: २  खरा देव माणसाला धनसंपत्ती आणि वैभव देतो आणि माणसाला हवं असलेलं सर्वकाही त्याच्याकडे असतं.* पण तरीही देव त्याला त्यांचा उपभोग घेऊ देत नाही. कोणी परकाच त्यांचा उपभोग घेतो. ही एक व्यर्थ आणि फार दुःखाची गोष्ट आहे. ३  एखाद्या माणसाला १०० मुलं जरी झाली आणि जरी तो बरीच वर्षं जगून म्हातारा झाला; तरी, कबरेत जाण्याआधी त्याने आपल्या चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतला नाही, तर मी म्हणीन, जे मूल मेलेलं जन्माला येतं, ते त्याच्यापेक्षा बरं.+ ४  कारण ते उगीचच जन्माला येतं आणि अंधारात निघून जातं. त्याचं नावही कोणाला माहीत नसतं. ५  जरी त्याने कधीच दिवसाचा उजेड पाहिला नसला आणि काहीच अनुभवलं नसलं, तरी ते त्या आधीच्या माणसापेक्षा चांगलं आहे.*+ ६  जर माणसाने आनंदच उपभोगला नाही, तर हजार वर्षांचं आयुष्य दोनदा जगूनही काय फायदा? सगळे एकाच ठिकाणी जात नाहीत का?+ ७  माणसाची सगळी मेहनत पोट भरण्यासाठी असते;+ तरी त्याची भूक कधीच भागत नाही.* ८  बुद्धिमान माणूस मूर्खापेक्षा कोणत्या बाबतीत वरचढ असतो?+ किंवा आयुष्याला सामोरं कसं जायचं* हे गरिबाला माहीत असूनही काय फायदा होतो? ९  मनातल्या इच्छांमागे धावण्यापेक्षा, जे डोळ्यांसमोर आहे त्याचा आनंद घेणं कधीही चांगलं. हेही व्यर्थ आणि वाऱ्‍यामागे धावण्यासारखंच आहे. १०  जे काही अस्तित्वात आहे, त्याला आधीच नाव देण्यात आलं आहे; माणूस मुळात कसा आहे, हे उघड झालं आहे. त्याच्यापेक्षा ताकदवान असलेल्याशी तो वाद करू शकत नाही.* ११  जितके जास्त शब्द,* तितकी जास्त व्यर्थता; शेवटी त्यांच्यापासून माणसाला काय फायदा? १२  माणूस आपल्या निरर्थक आयुष्याचे मोजके दिवस सावलीसारखे घालवतो. या आयुष्यात काय करणं त्याच्यासाठी सर्वात चांगलं आहे, हे कोणाला माहीत आहे?+ तो गेल्यावर सूर्याखाली काय घडेल, हे त्याला कोण सांगू शकतं?

तळटीपा

किंवा “संकट.”
किंवा “त्याच्या जिवाला कशाचीही कमी नसते.”
शब्दशः “जास्त विश्रांती आहे.”
किंवा “त्याच्या जिवाचं समाधान होत नाही.”
शब्दशः “जिवंतांसमोर कसं चालायचं.”
किंवा “आपली बाजू मांडू शकत नाही.”
किंवा कदाचित, “गोष्टी.”